वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr22 जुलै पृ. १-१०
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ—२०२२
  • उपशिर्षक
  • ४-१० जुलै
  • ११-१७ जुलै
  • १८-२४ जुलै
  • २५-३१ जुलै
  • १-७ ऑगस्ट
  • ८-१४ ऑगस्ट
  • १५-२१ ऑगस्ट
  • २२-२८ ऑगस्ट
  • २९ ऑगस्ट-४ सप्टेंबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ—२०२२
mwbr22 जुलै पृ. १-१०

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

४-१० जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल १८-१९

“बर्जिल्ल्यप्रमाणे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा”

टेहळणी बुरूज१८.०९ ९ ¶६

वयस्क बांधवांनो—यहोवा तुमच्या एकनिष्ठतेला मौल्यवान लेखतो

तिथल्या तीन पुरुषांनी उदारतेने त्यांच्यासाठी बिछाने, भांडीकुंडी आणि इतर खाद्यपदार्थ आणले. बर्जिल्ल्य हा त्या तीन पुरुषांपैकी एक होता. (२ शमु. १७:२७-२९) अबशालोमने केलेला बंड संपल्यानंतर दावीद यरुशलेमला जाऊ शकत होता. म्हणून दावीदला यार्देनपार पोचवण्यासाठी बर्जिल्ल्य त्याच्यासोबत आला. दावीदने त्याला त्याच्यासोबत यरुशलेमला येण्यासाठी आर्जवलं. तसंच राजाने त्याला म्हटलं की तिथे त्याच्या खाण्यापिण्याची सोय केली जाईल. खरंतर, बर्जिल्ल्यला या गोष्टींची गरज नव्हती कारण तो खूप श्रीमंत होता. (२ शमु. १९:३१-३३) पण, दावीदला बर्जिल्ल्यचा स्वभाव आवडला असावा. त्याच्याकडे बऱ्‍याच वर्षांचा अनुभव असल्यामुळे त्याने दिलेले सल्ले फायदेकारक ठरतील म्हणून दावीदने त्याला यरुशलेमला येण्याचा आग्रह केला असावा. राजदरबारात राहणं आणि काम करणं हा बर्जिल्ल्यसाठी खरंच एक मोठा बहुमान असणार होता!

टेहळणी बुरूज१८.०९ ९ ¶७

वयस्क बांधवांनो—यहोवा तुमच्या एकनिष्ठतेला मौल्यवान लेखतो

नम्र आणि आपली कमतरता ओळखून असणाऱ्‍या बर्जिल्ल्यने सांगितलं की तो ८० वर्षांचा आहे. त्याने पुढे म्हटलं: “मला बऱ्‍यावाइटाचा भेद काय समजणार?” (२ शमु. १९:३५) त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? बर्जिल्ल्य अनेक वर्षं जगल्यामुळे त्याच्याकडे बराच अनुभव होता. ज्या प्रकारे रहबाम राजाला “वृद्ध मनुष्य” यांनी सल्ले दिले त्याच प्रकारे बर्जिल्ल्यही सुज्ञ सल्ले देऊ शकत होता. (१ राजे १२:६, ७; स्तो. ९२:१२-१४; नीति. १६:३१) वृद्ध झाल्यामुळे तो शारीरिक रीतीने दुर्बळ झाला होता. म्हणून त्याने कदाचित म्हटलं असावं की त्याला बऱ्‍यावाइटाचा भेद समजणार नाही. त्याने मान्य केलं की वयामुळे त्याला कमी ऐकू येतं आणि अन्‍नाची चव त्याला कळत नाही. (उप. १२:४, ५) म्हणून बर्जिल्ल्यने स्वतःहून राजाला सांगितलं की त्याच्याऐवजी दावीदने किम्हाम नावाच्या तरुण पुरुषाला न्यावं. किम्हाम हा कदाचित बर्जिल्ल्यचा मुलगा असावा.—२ शमु. १९:३६-४०.

टेहळणी बुरूज१७.०१ २३ ¶६

आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो

६ बर्जिल्ल्याने दाविदाचं आमंत्रण का स्वीकारलं नाही? तो जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत होता का? की, राजदरबाराच्या कामांपासून दूर राहून सोपं आणि सुरळीत जीवन जगण्याची त्याची इच्छा होती? खरंतर, बर्जिल्ल्य नम्र असल्यामुळे त्याने हे आमंत्रण स्वीकारलं नाही. त्याने स्वतःच्या मर्यादा ओळखल्या आणि बदललेली परिस्थिती लक्षात घेतली. (गलतीकर ६:४, ५ वाचा.) बर्जिल्ल्याप्रमाणेच आपणही नम्र असण्याची गरज आहे. आपल्याला काय हवं आहे याकडे लक्ष देण्याऐवजी किंवा इतरांसोबत स्वतःची तुलना करण्याऐवजी, यहोवाच्या सेवेत आपण आपलं सर्वोत्तम दिलं पाहिजे. आपल्याकडे एखादी खास नेमणूक असण्यापेक्षा किंवा आपण नावाजलेले असण्यापेक्षा, यहोवाची मनापासून सेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? (गलती. ५:२६) आपण जर नम्र असलो तर यहोवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी आपल्या बांधवांसोबत मिळून आपण काम करू.—१ करिंथ. १०:३१.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज२०.०४ ३० ¶१९

जीवनाची शर्यत पूर्ण करा

१९ जर तुम्ही शारीरिक समस्यांचा सामना करत असाल आणि इतर जण तुमची परिस्थिती समजून घेत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल, तर मफीबोशेथच्या उदाहरणामुळे तुम्हाला सांत्वन मिळू शकतं. (२ शमु. ४:४) तो अपंग होता आणि दावीद राजाने त्याच्याबद्दल चुकीचं मत बनवून त्याच्यावर अन्याय केला. यात खरंतर मफीबोशेथची काहीही चूक नव्हती. तरी त्याने चुकीचा विचार केला नाही; उलट, त्याच्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यांबद्दल त्याला कदर होती. आधी दावीद त्याच्याशी किती दयाळूपणे वागला होता, हे तो विसरला नाही. (२ शमु. ९:६-१०) त्यामुळे, जेव्हा दावीदने त्याच्यावर अन्याय केला तेव्हा त्याने परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करायचा प्रयत्न केला. दावीदच्या चुकीमुळे त्याने मनात राग बाळगला नाही आणि त्यासाठी यहोवाला दोष दिला नाही. यहोवाने नियुक्‍त केलेल्या राजाला पाठिंबा कसा देता येईल यावर त्याने लक्ष केंद्रित केलं. (२ शमु. १६:१-४; १९:२४-३०) मफीबोशेथच्या चांगल्या उदाहरणातून आपण शिकावं म्हणून यहोवाने त्याच्याबद्दल आपल्या वचनात लिहून ठेवलं.—रोम. १५:४.

११-१७ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल २०-२१

“यहोवा न्यायप्रिय देव आहे”

टेहळणी बुरूज२२.०३ १३ ¶४, ७

वाचकांचे प्रश्‍न

शौल राज्याच्या काळातसुद्धा इस्राएली लोक त्या कराराला बांधलेले होते. पण शौलने हा करार मोडला आणि सगळ्या गिबोनी लोकांना संपवून टाकायचा प्रयत्न केला. त्यामुळे तो आणि त्याचं घराणं “रक्‍तदोषी” बनलं. (२ शमु. २१:१) पुढे जेव्हा दावीद राजा सत्तेवर आला, तेव्हा संहारातून वाचलेल्या गिबोनी लोकांनी त्यांच्यावर झालेल्या या घोर अन्यायाबद्दल त्याला सांगितलं. तेव्हा दावीदने त्यांना विचारलं, की ‘शौलच्या भयंकर चुकीची भरपाई कशी करता येईल? आणि इस्राएल राष्ट्रावर देवाचा आशीर्वाद पुन्हा यावा म्हणून काय करता येईल?’ यावर भरपाई म्हणून सोनं-चांदी मागण्याऐवजी गिबोनी लोक दावीदला म्हणाले, की ‘ज्या माणसाने आमचा समूळ नाश करायचा प्रयत्न केला, त्याच्या सात मुलांना आमच्या हवाली करा. म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू.’ (गण. ३५:३०, ३१) दावीदने त्यांची मागणी मान्य केली.—२ शमु. २१:२-६.

ही फक्‍त इतिहासातली एक घटना नाही. तर, या घटनेवरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकतो. तुम्हाला आठवत असेल, देवाच्या नियमशास्त्रात असं म्हटलं होतं: “वडिलांच्या पापासाठी मुलांना ठार मारलं जाऊ नये.” (अनु. २४:१६) शौलची ती दोन मुलं आणि पाच नातवं जर निर्दोष असती, तर त्यांच्यासोबत जे घडलं त्याला यहोवाने संमती दिली नसती. नियमशास्त्रात पुढे म्हटलं होतं, “प्रत्येकाला स्वतःच्याच पापासाठी ठार मारलं जावं.” यावरून असं दिसतं, की शौलच्या वंशातल्या ज्या सात जणांना ठार मारण्यात आलं, त्यांनी गिबोनी लोकांच्या कत्तलीत सहभाग घेतला होता. आणि म्हणूनच त्या सात जणांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज१३ १/१५ ३१ ¶१४

ख्रिस्ती वडील—आपल्या “आनंदात साहाय्यकारी”

१४ आज सैतान व त्याचे प्रतिनिधी आपल्या सेवाकार्यात अडथळे आणत असूनही, यहोवाचे लोक या नात्याने आपण जगभरात आपले सेवाकार्य पार पाडत आहोत. आपल्यापैकी काहींना अतिशय मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. पण, यहोवावर पूर्ण भरवसा ठेवल्यामुळे आपण ‘गल्याथासारख्या’ या मोठमोठ्या समस्यांचा सामना केला आहे व त्यांवर विजय मिळवला आहे. तरीसुद्धा, या जगातील दबावांचा सतत सामना करताना, कधीकधी आपण थकून जातो व निरुत्साहित होतो. सामान्य स्थितीत आपण या दबावांना यशस्वी रीत्या तोंड देऊ शकतो, पण अशा कमजोर स्थितीत आपण या दबावांना बळी पडण्याची शक्यता वाढते. अशा प्रसंगी, योग्य वेळी मिळालेल्या एखाद्या वडिलाच्या मदतीमुळे आपण आपला आनंद व बळ पुन्हा मिळवू शकतो. हा अनुभव अनेकांना आला आहे. उदाहरणार्थ, साठीत असलेल्या एका पायनियर बहिणीने असे सांगितले: “काही काळाआधी, मला बरं वाटत नव्हतं, आणि क्षेत्रसेवेमुळं मी थकून जायचे. मी किती लवकर थकून जातेय हे एका वडिलांच्या लक्षात आलं आणि ते माझ्याशी याविषयी बोलले. आम्ही बायबलमधून एका प्रोत्साहनदायक उताऱ्‍यावर चर्चा केली. त्यांनी दिलेल्या सूचना मी अंमलात आणल्या आणि याचा मला फायदा झाला.” बहिणीने पुढे म्हटले: “त्या प्रेमळ वडिलांनी माझ्या दुर्बलतेकडे लक्ष दिलं आणि माझी मदत केली हे किती बरं झालं!” खरेच, मंडळीतील प्रेमळ वडिलांचे आपल्याकडे लक्ष असते आणि प्राचीन काळातील अबीशयप्रमाणेच ते आपल्या मदतीला धावून येण्यास तयार असतात हे जाणून आपल्याला खूप दिलासा मिळतो.

१८-२४ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल २२

“नेहमी यहोवावर विसंबून राहा”

यहोवा के करीब अध्या. २ ¶११

क्या आप सचमुच “परमेश्‍वर के करीब” आ सकते हैं?

११ यह पढ़ना एक अलग बात है कि परमेश्‍वर “अत्यन्त बली है।” (यशायाह ४०:२६) लेकिन, जब हम यह पढ़ते हैं कि परमेश्‍वर ने इस्राएल को लाल सागर से कैसे बचाया और ४० साल तक वीराने में उस जाति की कैसे देखभाल की, तो हमें इस वचन के असली मायने समझ में आते हैं। आप मन की आँखों से देख सकते हैं कि हिलोरें मारता सागर कैसे दो भागों में बँटता जा रहा है। आप कल्पना कर सकते हैं कि इस्राएल जाति जो कुल मिलाकर शायद ३०,००,००० लोग थे, सागर की सूखी ज़मीन पर चल रहे हैं और उनके दोनों तरफ पानी जमा होकर, बड़ी-बड़ी विशाल दीवारों की तरह खड़ा हुआ है। (निर्गमन १४:२१; १५:८) वीराने में परमेश्‍वर ने कैसे उनकी हिफाज़त और देखभाल की, आप इसका भी सबूत देख सकते हैं। चट्टान से पानी बह निकला। सफेद दानों के रूप में भोजन ज़मीन पर गिरा। (निर्गमन १६:३१; गिनती २०:११) यहोवा ने, सिर्फ यह नहीं दिखाया कि उसके पास शक्‍ति है बल्कि यह कि वह अपने लोगों की खातिर इसका इस्तेमाल भी करता है। क्या यह जानकर हमें तसल्ली नहीं होती कि हमारी प्रार्थनाएँ एक ऐसा शक्‍तिशाली परमेश्‍वर सुनता है जो “हमारा शरणस्थान और बल है, संकट में अति सहज से मिलनेवाला सहायक” है?—भजन ४६:१.

टेहळणी बुरूज१३ ६/१५ १७-१८ ¶४-५

यहोवाच्या एकनिष्ठतेची आणि क्षमाशीलतेची कदर करा

४ यहोवा कशा प्रकारे एकनिष्ठा दाखवतो? तो कधीही त्याच्या विश्‍वासू उपासकांचा त्याग करत नाही. यहोवा आपल्या उपासकांना कसा एकनिष्ठ राहतो याविषयी त्याच्या एका उपासकाने, म्हणजे दावीद राजाने सांगितले. (२ शमुवेल २२:२६ वाचा.) दावीद संकटांत होता तेव्हा यहोवाने एकनिष्ठपणे त्याचे मार्गदर्शन केले, त्याचे संरक्षण केले आणि त्याला संकटांतून सोडवले. (२ शमु. २२:१) दाविदाला माहीत होते, की यहोवा आपली एकनिष्ठा केवळ शब्दांतूनच व्यक्‍त करत नाही, तर ती कार्यांतून दाखवतो. यहोवा दाविदाशी एकनिष्ठेने का वागला? कारण दावीद स्वतः ‘एकनिष्ठ’ पुरुष होता. यहोवाला आपल्या उपासकांची एकनिष्ठा पाहून खूप आनंद होतो, आणि म्हणून तोदेखील त्यांना एकनिष्ठ राहतो.—नीति. २:६-८.

५ यहोवा त्याच्या उपासकांशी कसा एकनिष्ठेने वागतो यावर मनन केल्याने आपल्याला प्रोत्साहन मिळते. रीड नावाच्या एका विश्‍वासू बांधवाने असे म्हटले: “दावीद संकटांत असताना यहोवा त्याच्याशी ज्या प्रकारे वागला त्याविषयी वाचल्यामुळं मला खूप साहाय्य मिळतं. दावीद जीव मुठीत घेऊन पळत होता, वेगवेगळ्या गुहांमध्ये लपत होता अशा वेळीसुद्धा यहोवानं नेहमी त्याचा सांभाळ केला. याबद्दल वाचून मला खूप दिलासा मिळतो! यामुळं मला हे आठवणीत ठेवण्यास मदत मिळते, की परिस्थिती कोणतीही असो, कितीही निराशाजनक असो, मी यहोवाला एकनिष्ठ राहिलो तर तो नेहमीच माझा सांभाळ करेल.” तुमच्याही भावना अशाच असतील यात काही शंका नाही.—रोम. ८:३८, ३९.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज१२ ११/१५ १७ ¶७

स्वतःला कनिष्ठ लेखण्यास शिका

७ देवाने दाखवलेल्या नम्रतेचा स्तोत्रकर्त्या दाविदावर जबरदस्त प्रभाव पडला. त्याने एका गीतात यहोवाला असे म्हटले: “तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.” (२ शमु. २२:३६) यहोवाच्या नम्रतेमुळेच, अर्थात यहोवाने खाली वाकून किंवा स्वतःला नम्र करून दाविदाकडे लक्ष दिल्यामुळेच त्याला इस्राएलमध्ये थोरवी मिळाली होती हे त्याने ओळखले. (स्तो. ११३:५-७) आपल्या बाबतीत काय? आपल्याजवळ जे काही चांगले गुण, क्षमता आणि विशेषाधिकार आहेत ते आपल्याला यहोवानेच “दिलेले” नाहीत का? (१ करिंथ. ४:७) स्वतःला कनिष्ठ लेखणारा “श्रेष्ठ” बनतो तो या अर्थाने की तो यहोवाचा सेवक या नात्याने आणखी मौल्यवान बनतो. (लूक ९:४८) असे का म्हणता येईल ते पाहू या.

२५-३१ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल २३-२४

“यहोवाच्या सेवेसाठी तुम्ही त्याग करत आहात का?”

इन्साइट-१ १४६

अरवना

अरवना कोणताही मोबदला न घेता, अर्पणासाठी लागणारी गुरंढोरं आणि लाकूड द्यायला तयार होता. पण दावीद या गोष्टी फुकट घ्यायला तयार नव्हता. २ शमुवेल २४:२४ इथे असं सांगितलं आहे, की दावीदने चांदीचे ५० शेकेल देऊन खळं आणि गुरं अरवनाकडून विकत घेतली. पण १ इतिहास २१:२५ मध्ये असं म्हटलं आहे, की दावीदने या जमिनीसाठी सोन्याचे ६०० शेकेल दिले. हा फरक का बरं? कारण २ शमुवेल यात फक्‍त प्राणी, लाकूड आणि वेदी बांधण्यासाठी लागणाऱ्‍या जागेसाठी दावीदने जी किंमत दिली त्याबद्दल सांगितलं आहे. याउलट, १ इतिहास या पुस्तकात याच जमिनीवर पुढे जे मंदिर बांधण्यात आलं, त्याबद्दल सांगितलं आहे. (१इत २२:१-६; २इत ३:१) मंदिरासाठी लागणारी जमीन खूप मोठी असल्यामुळे दावीदने त्यासाठी सोन्याचे ६०० शेकेल दिले असावेत असं दिसतं. सुरवातीला दावीदने वेदी बांधण्यासाठी जमिनीचा जो लहानसा तुकडा वापरला होता, त्याची ही किंमत नव्हती.

टेहळणी बुरूज१२ १/१५ १८ ¶८

‘सत्याच्या स्वरूपावरून’ शिका

८ एक इस्राएली व्यक्‍ती, यहोवाबद्दल तिला वाटणारी कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्वेच्छेने बलिदान देऊ शकत होती. किंवा यहोवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी ती स्वेच्छेने होमार्पण करू शकत होती. अशा वेळी, बलिदान करण्यासाठी सगळ्यात उत्तम पशूची निवड करणे बहुधा तिला सोपे होते. आणि यहोवाला सगळ्यात उत्तम प्रतीचे बलिदान अर्पण करण्यात तिला आनंद व्हायचा. आज आपण नियमशास्त्रात सांगितलेली बलिदाने अर्पण करत नसलो, तरी यहोवाची सेवा करण्यासाठी आपण आपला वेळ, शक्‍ती व साधने खर्च करतो; त्यामुळे एका अर्थी आपण देवाला बलिदान अर्पण करतो. प्रेषित पौलाने, ख्रिस्ती आशेची जाहीर घोषणा करण्याचा, ‘चांगले करण्याचा’ व ‘दान करण्याचा’ उल्लेख करून म्हटले, की हे ‘यज्ञ’ किंवा बलिदाने आहेत व या बलिदानांनी देव संतुष्ट होतो. (इब्री १३:१५, १६) यहोवाचे लोक ज्या भावनेने अशा कार्यांत सहभाग घेतात त्यावरून देवाने त्यांच्यासाठी जे काही केले आहे त्याची ते किती कदर करतात व त्याविषयी त्यांना किती कृतज्ञता वाटते हे दिसून येते. होय, प्राचीन काळी देवाला स्वेच्छेने बलिदाने अर्पण करणाऱ्‍यांच्या व आज ख्रिस्ती सेवेत सहभाग घेणाऱ्‍यांच्या मनोवृत्तीत व हेतूंत नक्कीच साम्यता आहे.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०५ ६/१ ११ ¶६

दुसरे शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे

२३:१५-१७. जीवन व रक्‍त यांविषयी देवाच्या नियमांबद्दल दाविदाला इतका मनस्वी आदर होता की या प्रसंगी, या नियमांचे अप्रत्यक्षरित्या उल्लंघन करण्यासही त्याने नकार दिला. देवाच्या सर्व आज्ञांविषयी आपण अशीच मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करावा.

१-७ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे १-२

“तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता का?”

इन्साइट-२ ९८७ ¶४

शलमोन

लोक शलमोन राजाचा जयजयकार करत आहेत, हे ऐकून अदोनीया आणि त्याच्यासोबत बंड करणाऱ्‍या साथीदारांनी ऐकलं तेव्हा त्यांच्यात भीतीने गोंधळ उडाला आणि ते तिथून पळून जाऊ लागले. शलमोनचं राज्य हे शांतीचं राज्य असेल असं सांगण्यात आलं होतं. आणि आपल्या शासनाच्या सुरवातीलाच शत्रूंचा सूड न घेण्याद्वारे त्याने ही गोष्ट सिद्ध केली. घाबरल्यामुळे अदोनीया देवाच्या मंदिरात जाऊन लपला. ही गोष्ट शलमोनला समजली तेव्हा त्याने त्याला असं कळवलं, की “तो एक भला माणूस असल्याचं दिसून आलं, तर त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही.”—१रा १:४१-५३.

टेहळणी बुरूज०५ ७/१ २९ ¶१

पहिले राजे पुस्तकातील ठळक मुद्दे

१:४९-५३; २:१३-२५—अदोनीयाला क्षमा केल्यानंतरही शलमोनाने त्याला ठार का मारले? अदोनीयाने बथशेबाला विनंती केली, की तिने आपणास अबीशग बायको करून देण्यास राजाला सांगावे. यामागे अदोनीयाचा खरा हेतू काय होता हे बथशेबाला कळले नव्हते परंतु शलमोनाला कळले होते. दिसायला देखणी असलेली अबीशग दावीदाची उपपत्नी होती. परंतु दावीदाने तिच्याबरोबर समागम केला नव्हता. त्या काळातील रीतीरिवाजांनुसार, कायदेशीररीत्या ती दावीदाच्या वारशाच्या मालकीची होणार होती. अदोनीयाने विचार केला असेल, की अबीशगला पत्नी म्हणून घेतल्यावर तो पुन्हा सिंहासन मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. अदोनीयाच्या मागणीवरून, त्याला राजपद हवे आहे हे दिसून येत असल्यामुळे शलमोनाने त्याची क्षमा रद्द केली.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०५ ७/१ ३० ¶१

पहिले राजे पुस्तकातील ठळक मुद्दे

२:३७, ४१-४६. देवाच्या नियमांचा भंग करून आपण शिक्षा टाळू शकतो, असा विचार करणे किती घातक आहे! ‘जीवनाकडे जाणाऱ्‍या अरुंद दरवाजातून’ आत जाण्याऐवजी मुद्दामहून दुसऱ्‍या दरवाजातून जाणाऱ्‍यांना त्यांच्या मूर्ख निर्णयाचे परिणाम भोगावे लागतील.—मत्तय ७:१४.

८-१४ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे ३-४

“बुद्धी मौल्यवान आहे”

टेहळणी बुरूज११ १२/१५ ८ ¶४-६

तो तुमच्याकरता चांगले उदाहरण आहे की वाईट?

४ शलमोन राजाच्या शासनकाळाच्या सुरुवातीला देवाने त्याला स्वप्नात दर्शन दिले व त्याला एक वर मागण्यास सांगितले. आपल्याला कमी अनुभव आहे याची जाणीव बाळगून शलमोनाने देवाकडे बुद्धीसाठी विनंती केली. (१ राजे ३:५-९ वाचा.) शलमोनाने धनसंपत्ती व वैभव न मागता बुद्धीसाठी विनंती केली यावर देव खूश झाला आणि त्याने शलमोनाला “बुद्धिमान व विवेकी चित्त” दिले व सोबतच त्याला समृद्ध केले. (१ राजे ३:१०-१४) येशूने उल्लेख केल्याप्रमाणे, शलमोनाची बुद्धी इतकी उल्लेखनीय होती की शबाच्या राणीने त्याच्या बुद्धीविषयी ऐकले व स्वतः त्याच्या बुद्धीचा अनुभव घेण्यासाठी तिने खूप लांबचा प्रवास केला.—१ राजे १०:१, ४-९.

५ आपल्याला चमत्कारिक रीत्या बुद्धी मिळावी अशी अपेक्षा आपण करत नाही. शलमोनाने म्हटले की “ज्ञान [“बुद्धी,” NW] परमेश्‍वर देतो,” पण त्याने असेही लिहिले की देवाकडून हा गुण प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्याने लिहिले: ‘आपला कान ज्ञानाकडे दे, आणि आपले मन सुज्ञानाकडे दे.’ बुद्धी प्राप्त करण्याच्या संदर्भात त्याने, ‘हाक मार,’ ‘शोध कर’ व ‘उमगून काढ’ असे शब्द वापरले. (नीति. २:१-६) यावरून स्पष्ट होते की आपण बुद्धी प्राप्त करू शकतो.

६ तर मग, आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे की ‘शलमोनाप्रमाणे मीदेखील देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीला अनमोल समजतो का?’ जगातील आर्थिक स्थिती अनिश्‍चित असल्यामुळे काही जण आपल्या नोकरीवर व आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त झाले आहेत. तसेच, कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे व किती प्रमाणात घ्यावे हेदेखील लोक जगाची आर्थिक स्थिती पाहून ठरवतात. तुमच्याबद्दल व तुमच्या कुटुंबाबद्दल काय म्हणता येईल? तुम्ही जे निर्णय घेता त्यावरून तुम्ही देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीला खूप मौल्यवान समजता हे दिसून येते का? पैशाविषयी व शिक्षणाविषयी तुम्ही जो विचार करता त्यात फेरबदल केल्याने तुम्हाला आणखी बुद्धी प्राप्त करता येईल का? खरोखर, बुद्धी प्राप्त केल्याने व जीवनात बुद्धीचा वापर केल्याने तुम्हाला कायमचा फायदा होईल. शलमोनाने लिहिले: “धर्म, नीति व सात्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल.”—नीति. २:९.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज९८ २/१ ११ ¶१५

यहोवा करारांचा देव आहे

१५ अब्राहामाचे वंशज नियमशास्त्राखाली राष्ट्र म्हणून संघटित झाल्यानंतर, यहोवाने त्यांच्या कुलपित्याला दिलेल्या अभिवचनानुसार त्यांना आशीर्वादित केले. सा. यु. पू. १४७३ मध्ये मोशेचा उत्तराधिकारी, यहोशवा, इस्राएल लोकांना कनानमध्ये घेऊन गेला. त्यानंतर, वंशांमध्ये झालेल्या जमिनीच्या विभागणीकरवी अब्राहामाच्या संततीला देश देण्याचे यहोवाचे अभिवचन पूर्ण झाले. इस्राएल विश्‍वासू होते तेव्हा यहोवाने त्यांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवून देण्याचे जे अभिवचन दिले होते ते पूर्ण केले. हे विशेषतः राजा दावीदाच्या शासनादरम्यान घडले. दावीदाचा पुत्र शलमोन याच्या काळापर्यंत अब्राहामासोबत केलेल्या कराराचा तिसरा पैलू पूर्ण करण्यात आला. “यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनाऱ्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.”—१ राजे ४:२०.

१५-२१ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे ५-६

“त्यांनी जीव ओतून काम केलं”

टेहळणी बुरूज११-E २/१ १५

तुम्हाला माहीत होतं का?

लबानोनचे देवदार वृक्ष त्यांच्या टिकाऊ, सुंदर आणि सुगंधी लाकडासाठी प्रसिद्ध होते. तसंच, या लाकडाला कीडही लागत नव्हती. शलमोनने मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्यात उत्तम प्रतीचं साहित्य वापरलं हे यावरून दिसून येतं. एकेकाळी लबानोनची डोंगरं या देवदार वृक्षांच्या जंगलांनी व्यापलेली होती. पण आज फक्‍त काही भागांमध्येच हे वृक्ष पाहायला मिळतात.

इन्साइट-१ ४२४

देवदार

मंदिराच्या बांधकामासाठी देवदार वृक्षाच्या भरपूर लाकडांची गरज होती. आणि यासाठी हजारो मजुरांची आवश्‍यकता होती. त्यांना ही लाकडं तोडून सोर किंवा सीदोन इथे न्यावी लागणार होती. कारण ही शहरं भूमध्य सागराजवळ होती. त्यांना या लाकडांचे तराफे बनवून ते समुद्रमार्गाने कदाचित यापोपर्यंत न्यायचे होते. आणि मग तिथून ही लाकडं यरुशलेमपर्यंत वाहून न्यायची होती.

इन्साइट-२ १०७७ ¶१

मंदिर

शलमोनने इस्राएलमधून ३०,००० माणसांना बांधकामासाठी नेमलं होतं. तो दहा-दहा हजार माणसांना आळीपाळीने महिनाभर काम करण्यासाठी लबानोनला पाठवायचा. एक महिना काम केल्यावर त्यांना दोन महिन्यांची रजा मिळायची. (१रा ५:१३, १४) त्याने इस्राएलमध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यांपैकी ७०,००० लोकांना ओझी वाहणारे मजूर म्हणून आणि ८०,००० लोकांना दगड फोडणारे मजूर म्हणून नेमलं. (१रा ५:१५; ९:२०, २१; २इत २:२) त्याने ५५० प्रमुख अधिकारी आणि त्यांना मदत करणारे ३,३०० मुकादमसुद्धा कामगारांवर देखरेख करण्यासाठी नेमले. (१रा ५:१६; ९:२२, २३) या देखरेख करणाऱ्‍यांपैकी २५० लोक इस्राएली होते तर ३,६०० विदेशी होते.—२इत २:१७, १८.

आध्यात्मिक रत्नं

सावध राहा!-E ५/१२ १७, चौकट

बायबल—अचूक भविष्यवाणीचं पुस्तक, भाग १

अचूक तारखा

बायबलमध्ये विशिष्ट घटना कोणत्या वर्षी आणि कोणत्या तारखेला घडल्या याचा अचूक अहवाल दिलेला आहे. या तारखा किती महत्त्वाच्या आहेत याचं एक उदाहरण आपल्याला १ राजे ६:१ मध्ये पाहायला मिळतं. इथे शलमोन राजाने यरुशलेममध्ये मंदिराचं बांधकाम कधी सुरू केलं, हे सांगितलं आहे. त्यात असं म्हटलं आहे: “इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्याच्या ४८० व्या वर्षी, म्हणजे शलमोन इस्राएलचा राजा बनला त्याच्या चौथ्या वर्षी, जिव महिन्यात (म्हणजे दुसऱ्‍या महिन्यात) त्याने यहोवासाठी मंदिर बांधायला सुरुवात केली.”

बायबलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इ.स.पू. १०३४ हे शलमोनच्या शासनाचं चौथं वर्ष होतं. या तारखेपासून जर आपण ४७९ वर्षं मोजत मागे गेलो, तर आपण इ.स.पू. १५१३ या वर्षापर्यंत येतो. आणि अगदी याच वर्षी इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडले होते.

२२-२८ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे ७

“दोन स्तंभांवरून आपण काय शिकतो?”

टेहळणी बुरूज१३-E १२/१ १३ ¶३

‘तिथल्या डोंगरांतून तुम्ही तांबं खणून काढाल’

यरुशलेम इथल्या मंदिराच्या बांधकामासाठी शलमोन राजाने खूप मोठ्या प्रमाणात तांब्याचा वापर केला होता. यापैकी बरंच तांबं दावीदने सीरियावर विजय मिळवल्यानंतर लुटीत आणलं होतं. (१ इतिहास १८:६-८) याच तांब्यापासून शलमोनने “गंगाळ-सागर” बनवलं होतं. या गंगाळ-सागरातल्या पाण्याने याजक हात-पाय धुवायचे. त्याचं वजन ३० टन होतं आणि त्यात ६६,००० लिटर पाणी मावायचं. (१ राजे ७:२३-२६, ४४-४६) तसंच, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन मोठे स्तंभ होते. त्यांची उंची २६ फूट होती आणि स्तंभावर ७.३ फूट उंचीचे कळससुद्धा होते. हे स्तंभ पोकळ होते आणि त्यांची जाडी ३ इंच इतकी होती आणि त्यांचा व्यास ५.६ फूट इतका होता. (१ राजे ७:१५, १६; २ इतिहास ४:१७) या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तांबं वापरण्यात आलं होतं.

इन्साइट-१ ३४८

बवाज, २

उत्तर दिशेला असलेल्या तांब्याच्या मोठ्या स्तंभाचं नाव बवाज होतं. याचा अर्थ कदाचित “त्याच्यात सामर्थ्य आहे,” असा असावा. तसंच, दक्षिणेकडे असलेल्या स्तंभाचं नाव याखीन असं होतं आणि त्याचा अर्थ, “तो [यहोवा] कायमचं स्थापित करो” असा होता. त्यामुळे एखादी व्यक्‍ती मंदिराच्या समोर उभी राहून ही दोन नावं उजवीकडून डावीकडे सोबत वाचायची तेव्हा त्यातून असा अर्थ निघायचा, की ‘यहोवा मंदिराला सामर्थ्यात कायमचं स्थापित करो.’—१रा ७:१५-२१.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ २६३

अंघोळ

यहोवाची अशी इच्छा आहे, की त्याच्या लोकांनी आपलं शरीर स्वच्छ ठेवावं. मंदिरात करण्यात आलेल्या व्यवस्थेवरून हीच गोष्ट दिसून येते. याजक मंदिरातल्या मोठ्या गंगाळ-सागरात असलेल्या पाण्याचा वापर करून आपले हात-पाय धुवायचे. (२इत ४:२-६) प्रायश्‍चित्ताच्या दिवशी महायाजक दोन वेळा अंघोळ करायचा. (लेवी १६:४, २३, २४) जो माणूस अजाजेलसाठी असलेल्या बकऱ्‍याला रानात सोडायचा, तसंच जो अर्पणांनंतर प्राण्यांच्या शरीराचे उरलेले भाग छावणीबाहेर घेऊन जायचा आणि लाल गाईचं अर्पण दिल्यानंतर तिची राख छावणीबाहेर न्यायचा, त्यालासुद्धा अंघोळ करून आपले कपडे धुवावे लागायचे. त्यानंतरच तो उपासनेच्या ठिकाणी परत येऊ शकत होता.—लेवी १६:२६-२८; गण १९:२-१०.

२९ ऑगस्ट-४ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे ८

“शलमोनने सर्वांसमोर नम्रपणे आणि मनापासून केलेली प्रार्थना”

टेहळणी बुरूज०९ ११/१५ ९ ¶९-१०

बायबल अभ्यासाद्वारे आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवा

९ देवाने आपली प्रार्थना ऐकावी अशी आपली इच्छा असल्यास आपण मनापासून प्रार्थना केली पाहिजे. शलमोनाने सा.यु.पू. १०२६ मध्ये यहोवाच्या मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी जेरूसलेम येथे जमलेल्या लोकसमुदायासमोर कळकळीची प्रार्थना केली, जी १ राजे अध्याय ८ मध्ये नमूद आहे. कराराचा कोश परमपवित्रस्थानात ठेवण्यात आला आणि मंदिर यहोवाच्या मेघाने व्यापले तेव्हा शलमोनाने देवाची स्तुती केली.

१० शलमोनाच्या प्रार्थनेचे परीक्षण करा आणि त्याने किती वेळा या प्रार्थनेत मनाचा उल्लेख केला याची नोंद घ्या. एका व्यक्‍तीच्या मनात काय आहे हे केवळ यहोवालाच माहीत असल्याचे शलमोनाने मान्य केले. (१ राजे ८:३८, ३९) याच प्रार्थनेतून हेही दिसून येते की ‘देवाकडे जिवेभावे [मनापासून] वळणाऱ्‍या’ पापी व्यक्‍तीला यहोवा कधीही झिडकारणार नाही. देवाच्या लोकांच्या शत्रूंनी त्यांना बंदी बनवल्यास, त्यांनी पूर्ण मनाने केलेल्या प्रार्थना यहोवा ऐकेल असे शलमोनाने म्हटले. (१ राजे ८:४८, ५८, ६१) म्हणूनच, तुम्ही देवाला संपूर्ण मनाने प्रार्थना केली पाहिजे.

टेहळणी बुरूज९९ १/१५ १७ ¶७-८

निष्ठावान हात वर करून प्रार्थना करा

७ केव्हाही प्रार्थना करताना, मग ती सर्वांपुढे असो की एकान्तात असो, बायबलमध्ये सांगितलेले एक महत्त्वाचे तत्त्व आपण आठवणीत ठेवले पाहिजे आणि ते म्हणजे, आपल्या प्रार्थनांतून आपण नम्र मनोभावाने त्या करत आहोत हे दिसून आले पाहिजे. (२ इतिहास ७:१३, १४) जेरुसलेममध्ये बांधलेल्या यहोवाच्या मंदिराच्या समर्पण प्रसंगी सर्व लोकांपुढे शलमोनाने अतिशय विनम्रभावाने प्रार्थना केली. शलमोनाने नुकतेच बांधून पूर्ण केलेले हे मंदिर पृथ्वीवर असलेल्या सर्वात शानदार इमारतींपैकी एक होते. पण तरीही तो प्रार्थनेत नम्रपणे म्हणतो: “देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधिले आहे यात तो कसा व्हावा?”—१ राजे ८:२७.

८ शलमोनाप्रमाणे, आपणही इतरांच्या वतीने सार्वजनिक प्रार्थना करतो तेव्हा ती नम्र अंतःकरणाने करावी. नम्रपणा हा आपल्या आवाजाच्या पट्टीवरूनही दिसून येतो; अर्थात आपण फुकटच धार्मिकतेचा आव आणून बोलतो आहे असे आपल्या आवाजावरून वाटता कामा नये. विनम्र प्रार्थना या कधीही दिखाऊ किंवा नाटकी वाटत नाहीत. त्या प्रार्थना करणाऱ्‍या व्यक्‍तीकडे नव्हे, तर ज्याला प्रार्थना केली जाते त्या देवाकडे लक्ष वेधतात. (मत्तय ६:५) याशिवाय, आपण प्रार्थनेत कोणत्या गोष्टींचा उल्लेख करतो, त्यावरूनही आपला नम्रपणा दिसून येतो. आपल्या बोलण्यावरून असे वाटू नये की काही गोष्टी आपल्याच मताप्रमाणे व्हाव्यात म्हणून जणू आपण देवाला फर्मावत आहोत. उलट आपण यहोवाला नम्रपणे अशी याचना करावी की तुझ्या पवित्र इच्छेनुसार जे आहे तेच होवो. याबाबतीत स्तोत्रकर्त्याची मनोवृत्ती अनुकरण करण्यासारखी आहे; त्याने यहोवाला कशी कळकळीने याचना केली ते पाहा: “हे परमेश्‍वरा, आम्ही तुला विनवितो की, आमचे तारण कर. हे परमेश्‍वरा, आम्ही तुला विनवितो की, आमचा उत्कर्ष कर.”—स्तोत्र ११८:२५; लूक १८:९-१४.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ १०६० ¶४

स्वर्ग

शलमोनच्या या शब्दांचा असा अर्थ होत नाही, की देव सर्वव्यापी आहे किंवा तो कणाकणात म्हणजे सगळीकडे आणि प्रत्येक गोष्टीत आहे. तसंच, त्याच्या राहण्याचं कोणतंही विशिष्ट ठिकाण नाही, असाही याचा अर्थ होत नाही. शलमोनने आपल्या प्रार्थनेत पुढे जे म्हटलं त्यावरून हे स्पष्ट होतं. तो यहोवाला म्हणाला, की जेव्हा लोक तुला विनंती करतील तेव्हा “स्वर्गातल्या आपल्या निवासस्थानातून तू ती विनंती ऐक.” हे शब्द आकाश आणि अंतराळाच्या पलीकडे असलेल्या स्वर्गाला सूचित करतात जिथे यहोवा आणि स्वर्गदूत राहतात.—१रा ८:३०, ३९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा