वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr22 सप्टेंबर पृ. १-१२
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ—२०२२
  • उपशिर्षक
  • ५-११ सप्टेंबर
  • १२-१८ सप्टेंबर
  • १९-२५ सप्टेंबर
  • २६ सप्टेंबर–२ ऑक्टोबर
  • ३-९ ऑक्टोबर
  • १०-१६ ऑक्टोबर
  • १७-२३ ऑक्टोबर
  • २४-३० ऑक्टोबर
  • ३१ ऑक्टोबर–६ नोव्हेंबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ—२०२२
mwbr22 सप्टेंबर पृ. १-१२

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

५-११ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे ९-१०

“यहोवाच्या बुद्धीसाठी त्याची स्तुती करा”

टेहळणी बुरूज९९ ७/१ ३० ¶६

प्रतिफलदायी ठरलेली भेट

शलमोनाला भेटल्यावर राणी त्याला ‘कूट प्रश्‍न’ विचारून त्याची परीक्षा पाहू लागली. (१ राजे १०:१) येथे वापरण्यात आलेल्या इब्री शब्दाचे भाषांतर “कोडे” असे केले जाऊ शकते. पण याचा असा अर्थ होत नाही, की राणीने शलमोनाला क्षुल्लक खेळांमध्ये गुंग ठेवले. आस्थेची गोष्ट म्हणजे, स्तोत्र ४९:४ मध्ये, पाप, मृत्यू आणि सुटका यांच्याविषयीच्या गंभीर प्रश्‍नांचे वर्णन देण्याकरता त्याच इब्री शब्दाचा वापर करण्यात आला आहे. तेव्हा कदाचित, शबाच्या राणीने शलमोनाबरोबर अतिशय गहन विषयांवर चर्चा करण्याद्वारे त्याच्या बुद्धीच्या गहनतेची परीक्षा घेतली असावी. बायबल म्हणते, की “आपल्या मनांत जे काही होते ते सर्व ती त्याजपुढे बोलली.” आणि शलमोनाने “तिच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकहि गोष्ट नव्हती.”—१ राजे १०:२ब, ३.

टेहळणी बुरूज९९ ११/१ २० ¶६

जगावेगळी उदारता

ऐकलेल्या आणि पाहिलेल्या सर्व गोष्टींनी अचंबित होऊन राणी नम्रपणे असे म्हणाली: “हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत!” (१ राजे १०:४-८) शलमोनाचे सेवक संपन्‍नतेत राहत होते; पण त्यासाठी तिने त्यांना धन्य म्हटले नाही. त्याउलट, देवाने शलमोनाला दिलेले शहाणपण सतत ऐकू शकत असल्यामुळे ते धन्य होते. स्वतः निर्माणकर्ता आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्या बुद्धीचा अनुभव घेणाऱ्‍या यहोवाच्या आजच्या लोकांपुढे शबाच्या राणीचे केवढे अप्रतिम उदाहरण आहे!

टेहळणी बुरूज९९ ७/१ ३०-३१

प्रतिफलदायी ठरलेली भेट

शलमोनाची बुद्धी व त्याच्या राज्याचे ऐश्‍वर्य पाहून शबाची राणी इतकी प्रभावित झाली की ती “गांगरून गेली.” (१ राजे १०:४, ५) काहींच्या मते या वाक्यांशाचा अर्थ असा होतो, की राणीने आश्‍चर्याने आपला “श्‍वास रोखला.” एक विद्वान तर म्हणतात, की ती बेशुद्ध पडली! काहीही असो, ती जे पाहत होती व ऐकत होती त्यामुळे राणी चाट पडली. अशा राजाची सुज्ञता ऐकायला मिळत असल्यामुळे तिने शलमोनाच्या दासांना धन्य म्हटले; शलमोनाला सिंहासनावर विराजमान केल्याबद्दल तिने यहोवाचे आभार मानले. मग तिने राजाला किंमती देणग्या दिल्या; त्यातील फक्‍त सोन्याचीच किंमत आधुनिक किंमतीप्रमाणे ४,००,००,००० डॉलर होते. शलमोनानेही तिला देणग्या दिल्या; शलमोनाने, “तिने जे जे मागितले ते ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरविली.”—१ राजे १०:६-१३.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०८ ११/१ २२ ¶४-६

तुम्हाला माहीत होतं का?

शलमोन राजाकडे किती सोनं होतं?

बायबलमध्ये सांगितलं आहे की सोरचा राजा हीरामने शलमोन राजाला चार टन सोनं पाठवलं होतं. तसंच, शबाच्या राणीनेही त्याला तितकंच सोनं दिलं होतं. शिवाय, ओफीरहून शलमोनने आपल्या जहाजांतून १५ टन सोनं आणलं होतं. शलमोन राजाला “दरवर्षी ६६६ तालान्त सोनं मिळायचं” म्हणजे २५ टनाहून जास्त सोनं मिळायचं. (१ राजे ९:१४, २८; १०:१०, १४) पण हे खरं आहे का? त्या काळात शाही खजिन्यात खरंच इतकं सोनं असायचं का?

एका प्राचीन लिखाणात शलमोन राजाच्या काळात राहणाऱ्‍या एका इजिप्तच्या राजाबद्दल सांगितलं आहे. विद्वान हे लिखाण भरवशालायक असल्याचं मानतात. या लिखाणात असं म्हटलंय, की त्याने आपल्या देवाच्या मंदिरासाठी साडेतेरा टन सोनं दिलं होतं.

असं म्हटलं जातं, की अलेक्झांडर द ग्रेटने (इ.स.पू. ३३६-३२३) जेव्हा पर्शियाचं सुसा शहर काबीज केलं, तेव्हा त्याने जवळपास १,१८० टन सोनं लुटलं. तसंच संपूर्ण पर्शियातून त्यांने जवळजवळ ७,००० टन सोनं गोळा केलं. यावरून कळतं की बायबलमध्ये शलमोन राजाकडे असलेल्या सोन्याबद्दल जे म्हटलंय ते वाढवून सांगितलेलं नाही.

१२-१८ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे ११-१२

“जोडीदार निवडण्याआधी विचार करा”

टेहळणी बुरूज१८.०७ १८ ¶७

यहोवाच्या पक्षाचा कोण आहे?

७ तरुण असताना शलमोनचा यहोवासोबत चांगला नातेसंबंध होता. यहोवाने त्याला खूप बुद्धी दिली आणि यरुशलेममध्ये सुंदर मंदिर बांधण्याची महत्त्वाची जबाबदारीही त्याच्यावर सोपवली होती. पण शलमोनने देवासोबतची मैत्री गमावली. (१ राजे ३:१२; ११:१, २) देवाचा असा नियम होता, की “राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन” बहकेल. (अनु. १७:१७) पण शलमोनने ही आज्ञा पाळली नाही आणि त्याने ७०० पत्नी आणि ३०० उपपत्नी केल्या. (१ राजे ११:३) त्यातल्या अनेक जणी खोट्या दैवतांच्या उपासक होत्या. अशा प्रकारे इस्राएली नसलेल्या स्त्रियांशी लग्न न करण्याबद्दल देवाची जी आज्ञा होती, तिचंही पालन करण्यात शलमोन अपयशी ठरला.—अनु. ७:३, ४.

टेहळणी बुरूज१९.०१ १५ ¶६

आपल्या हृदयाचं रक्षण करा

६ सैतानाने यहोवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष करून बंड केलं आणि तो स्वार्थी होता. आणि त्याची इच्छा आहे की आपणदेखील त्याच्यासारखं व्हावं. पण त्याच्यासारखा विचार करण्यासाठी किंवा वागण्यासाठी तो आपल्यावर बळजबरी करू शकत नाही. म्हणून तो इतर मार्गांनी त्याचं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, त्याच्याद्वारे आधीच भ्रष्ट झालेल्या लोकांना तो आपल्या अवतीभोवती ठेवण्याचा प्रयत्न करतो. (१ योहा. ५:१९) अशा वाईट लोकांसोबत राहून आपले विचार आणि कार्यं भ्रष्ट होतील हे आपल्याला माहीत असतं, पण तरीही तो आशा बाळगतो की आपण अशा लोकांसोबत वेळ घालवू. (१ करिंथ. १५:३३) हीच युक्‍ती शलमोन राजाच्याबाबतीत यशस्वी ठरली. त्याने मूर्तिपूजा करणाऱ्‍या बऱ्‍याच स्त्रियांशी लग्न केलं आणि त्यांचा हळूहळू त्याच्यावर जबरदस्त प्रभाव झाला आणि त्यांनी यहोवापासून “त्याचे मन बहकवले.”—१ राजे ११:३.

टेहळणी बुरूज१८.०७ १९ ¶९

यहोवाच्या पक्षाचा कोण आहे?

९ पण यहोवा पापाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. बायबल सांगतं की शलमोनचं मन यहोवापासून “फिरले.” म्हणून मग यहोवा त्याच्यावर रागावला. पण त्याने शलमोनची मदत करण्याचा प्रयत्नही केला. त्याने त्याला दोनदा दर्शन दिलं आणि “अन्य देवांच्या नादी लागू नको” अशी खास ताकीदही दिली. पण शलमोनने त्याकडे दुर्लक्ष केलं. याचा परिणाम असा झाला, की तो देवाची स्वीकृती आणि पाठिंबा गमावून बसला. यहोवाने त्याच्या वंशजांना संपूर्ण इस्राएल राष्ट्रावर राज्य करण्याची परवानगी दिली नाही. तसंच शेकडो वर्षांपर्यंत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.—१ राजे ११:९-१३.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१८.०६ १३ ¶६-१४ ¶३

तो देवाची स्वीकृती मिळवू शकला असता

रहबामने या बंडखोर गोत्रांशी लढण्यासाठी सैन्य गोळा केलं. पण यहोवाने शमाया संदेष्ट्याला त्याच्याकडे पाठवून म्हटलं: “आपले बांधव इस्राएल यांवर स्वारी करून लढू नका; तुम्ही सर्व आपआपल्या घरी परत जा; कारण ही माझी करणी आहे.”—१ राजे १२:२१-२४.

यहोवाच्या म्हणण्यानुसार करणं रहबामला सोपं गेलं का? लोकांनी त्यांच्या नवीन राजाबद्दल काय विचार केला असता? त्याने तर म्हटलं होतं की तो लोकांना “टोकदार धातूची टोके जोडलेल्या चाबकांनी शासन” करेल. आणि आता तर तो या बंडाळीविरुद्ध काहीच करणार नव्हता. (२ इतिहास १३:७ पडताळून पाहा.) लोक त्याच्याविषयी काय विचार करत आहेत हे त्याच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. राजा आणि त्याच्या सैन्याने “परमेश्‍वराचे हे वचन ऐकले व त्याप्रमाणे ते सगळे परत चालते झाले.”

यातून आपण कोणता धडा शिकू शकतो? इतरांनी आपल्याला नावं ठेवली तरी देवाची आज्ञा पाळणं सुज्ञपणाचं आहे. आपण आज्ञाधारक राहतो तेव्हा देव आपल्याला नेहमी आशीर्वाद देतो.—अनु. २८:२.

देवाची आज्ञा पाळल्यामुळे रहबामला आशीर्वाद मिळाला का? हो. यहूदा आणि बन्यामीन गोत्रांवर रहबाम राज्य करत राहिला आणि त्याने त्यांच्या क्षेत्रात नवीन शहरं बांधण्याचंही ठरवलं. यासोबतच, त्याने काही शहरांना “अधिक मजबुती आणली.” (२ इति. ११:५-१२) महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने काही काळासाठी यहोवाचे नियम पाळले. दहा गोत्रांनी मूर्तिपूजा सुरू केली होती. त्यामुळे तिथले अनेक लोक रहबाम आणि खऱ्‍या उपासनेला पाठिंबा देण्यासाठी यरुशलेमला आले. (२ इति. ११:१६, १७) रहबामने यहोवाची आज्ञा पाळल्यामुळे त्याचं राज्य आणखी शक्‍तिशाली बनलं.

१९-२५ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे १३-१४

“समाधानी आणि नम्र असणं का चांगलंय?”

टेहळणी बुरूज०८ ८/१५ ८ ¶४

एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ भक्‍ती करत राहा

४ मग यराबाम देवाच्या माणसाला असे म्हणतो: “मजबरोबर घरी चल आणि काही उपाहार करून ताजातवाना हो, मी तुला काही इनाम देतो.” (१ राजे १३:७) आता संदेष्ट्याने काय करावे? ज्याच्याविरुद्ध त्याने नुकतीच दंडाज्ञा सुनावली, त्याच्याचकडून आता त्याने पाहुणचार करून घ्यावा का? (स्तो. ११९:११३) की राजाला पश्‍चात्ताप झाला आहे असे दिसत असूनही त्याने त्याचे निमंत्रण धुडकावून लावावे? यराबामाकडे भरपूर धनसंपत्ती आहे आणि त्याच्या मर्जीस उतरणाऱ्‍यांना तो मौल्यवान बक्षीसे देऊ शकतो यात शंका नाही. देवाच्या संदेष्ट्याला जर आधीपासूनच मौल्यवान वस्तू मिळवण्याची लालसा असती तर राजाचा प्रस्ताव निश्‍चितच त्याच्याकरता मोठे प्रलोभन ठरले असते. पण यहोवाने आपल्या संदेष्ट्याला अशी आज्ञा केली आहे, “तू येथे अन्‍नपाणी सेवन करू नको आणि ज्या वाटेने जाशील तिने परत येऊ नको.” म्हणून, संदेष्टा यराबामास अगदी सडेतोड उत्तर देतो: “तू मला आपले अर्धे घर देशील तरी मी तुझ्या येथे येणार नाही; या ठिकाणी मी अन्‍नपाणी सेवन करणार नाही.” आणि तो ज्या वाटेने बेथेलास आला होता तिने न जाता, दुसऱ्‍याच वाटेने परत निघून जातो. (१ राजे १३:८-१०) संदेष्ट्याने घेतलेल्या या निर्णयावरून यहोवाची एकाग्र चित्ताने एकनिष्ठ भक्‍ती करण्याविषयी आपल्याला काय शिकायला मिळते?—रोम. १५:४.

टेहळणी बुरूज०८ ८/१५ ११ ¶१५

एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ भक्‍ती करत राहा

१५ यहूदाहून आलेल्या संदेष्ट्याने जी चूक केली, त्यावरून आपण आणखी काय शिकू शकतो? नीतिसूत्रे ३:५ यात असे म्हटले आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” यहूदाहून आलेल्या संदेष्ट्याने पूर्वीप्रमाणे यहोवावर विसंबून न राहता, या प्रसंगी स्वतःच्याच निर्णयशक्‍तीवर भरवसा ठेवला. ही चूक त्याला खूपच महागात पडली. कारण त्याचा प्राण तर गेलाच, पण तो देवाच्या नजरेतूनही उतरला. स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून न राहता, नम्रपणे व एकनिष्ठेने यहोवाची सेवा करत राहणे किती महत्त्वाचे आहे हे त्याच्या अनुभवावरून अगदी स्पष्टपणे दिसून येते!

टेहळणी बुरूज०८ ८/१५ ९ ¶१०

एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ भक्‍ती करत राहा

१० वृद्ध संदेष्टा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे हे यहूदाहून आलेल्या संदेष्ट्याने खरे तर ओळखायला हवे होते. ‘मला नवीन सूचना देण्याकरता यहोवा दुसऱ्‍याच व्यक्‍तीकडे देवदूताला का म्हणून पाठवेल?’ असा त्याने विचार करायला हवा होता. किंवा तो आणखी स्पष्ट मार्गदर्शनासाठी यहोवाकडे विनंती करू शकला असता. पण त्याने यापैकी काहीही केल्याचे बायबल आपल्याला सांगत नाही. त्याऐवजी, “त्याने [वृद्ध माणसाबरोबर] परत जाऊन त्याच्या घरी अन्‍नपाणी सेवन केले.” यहोवाला हे आवडले नाही. वृद्ध माणसाच्या बहकाव्यात आलेला संदेष्टा शेवटी यहुदाला परत जायला निघाला तेव्हा वाटेत त्याला एका सिंहाने गाठून मारून टाकले. संदेष्टा म्हणून त्याच्या सेवेचा किती हा दुःखद अंत!—१ राजे १३:१९-२५.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१० ७/१ २९ ¶५

तो लोकांतील चांगले गुण पाहतो

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १ राजे १४:१३ या वचनातील शब्दांवरून आपण, यहोवाबद्दल आणि तो आपल्यात काय पाहतो याबद्दल काहीतरी सुरेख शिकतो. पुन्हा एकदा आठवण करा, की अबीयाच्या “ठायी” चांगुलपणा आढळला होता. असे दिसते, की यहोवाने अबीयाचे अंतःकरण, त्याच्याठायी चांगुलपणाचा लवलेश सापडेपर्यंत पारखले होते. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे, “दगड-गोट्यांच्या ढिगाऱ्‍यात” एक दुर्मिळ मोती सापडावा तसा अबीया त्याच्या घराण्यातल्या इतर सदस्यांच्या तुलनेत होता. यहोवाने अबीयाच्या या चांगुलपणाची दखल घेतली आणि त्याला प्रतिफळ दिले. एका दुष्ट घराण्यातल्या या सदस्याला त्याने दया दाखवली.

२६ सप्टेंबर–२ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे १५-१६

“आसासारखंच तुम्हीही धैर्य दाखवत आहात का?”

टेहळणी बुरूज१२ ८/१५ ८ ¶४

“तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल”

इस्राएल राष्ट्राची दोन राज्यांत विभागणी झाल्यानंतरच्या २० वर्षांदरम्यान यहूदा पूर्णपणे मूर्तिपूजक बनले होते. इ.स.पू. ९७७ मध्ये आसा राजा बनला. एव्हाना राजदरबारातसुद्धा कनानच्या सुपीकतेच्या देवतांची उपासना केली जात होती. पण, आसाच्या कारकीर्दीविषयी देवाच्या प्रेरणेने लिहिलेला इतिहास सांगतो की त्याने “आपला देव परमेश्‍वर याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले.” आसाने “अन्य देवींच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकिली. मूर्तिस्तंभ मोडिले व अशेरा मूर्ती भंगिल्या.” (२ इति. १४:२, ३) त्याने यहूदा राज्यातून “पुरुषगमन करणाऱ्‍यांस” काढून टाकले जे धर्माच्या नावाखाली अनैतिक कृत्ये करत होते. पण आसा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने लोकांना: “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्‍वर याच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन” करावे असा आग्रह केला.—१ राजे १५:१२, १३; २ इति. १४:४.

टेहळणी बुरूज१७.०३ १९ ¶७

“पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करा

७ आपणही यहोवाला पूर्ण मनाने समर्पित आहोत की नाही, याचं आपल्यापैकी प्रत्येकाने परीक्षण केलं पाहिजे. यासाठी आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारू शकतो: ‘अगदी कठीण परिस्थितीतही मी यहोवाला आज्ञाधारक राहील का? त्याची मंडळी शुद्ध ठेवण्याचा माझा निर्धार पक्का आहे का?’ आसाला आपल्या आजीला राजमातेच्या पदावरून काढण्यासाठी किती धैर्य दाखवण्याची गरज पडली असेल याचा विचार करा. कदाचित तुमच्यासमोरही अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुम्हाला धैर्य दाखवण्याची गरज पडेल. एक उदाहरण घ्या. समजा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने किंवा जवळच्या एखाद्या मित्राने पाप केलं आहे आणि त्याबद्दल पश्‍चात्ताप न दाखल्यामुळे त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं आहे. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? अशा व्यक्‍तीसोबत कोणत्याही प्रकारे संगती न करण्याचा तुमचा निर्धार पक्का असेल का? तुमचं ‘हृदय’ तुम्हाला काय करण्यास प्रेरित करेल?

इन्साइट-१ १८४-१८५

आसा

आसाने आपल्या आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेतले. त्याने काही वेळा यहोवावर पूर्ण भरवसा दाखवला नाही. पण त्याच्यात काही चांगले गुण होते. तसंच, त्याने आपल्या राज्यातून खोटी उपासना काढून टाकली. असं दिसतं, की त्याने केलेल्या चुकांपेक्षा त्याचे चांगले गुण आणि त्याने केलेली चांगली कामं जास्त होती. म्हणूनच त्याला यहूदाच्या विश्‍वासू राजांपैकी एक गणलं जातं.—२इत १५:१७.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज९८ ९/१५ २१-२२

देव तुम्हाला खरी व्यक्‍ती वाटते का?

उदाहरणार्थ, यरिहोचे पुनःबांधकाम केल्याने मिळणाऱ्‍या शिक्षेसंबंधाने असलेली भविष्यवाणी वाचा आणि मग तिची पूर्णता कधी झाली त्यावर विचार करा. यहोशवा ६:२६ म्हणते: “त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्‍वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.” या भविष्यवाणीची पूर्णता सुमारे ५०० वर्षांनंतर झाली; कारण आपण १ राजे १६:३४ येथे असे वाचतो: “[राजा अहाबाच्या] कारकीर्दीत बेथेलकर हिएल याने यरीहो नगर पुनः वसविले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अबीराम मरण पावला; आणि त्याने त्याच्या वेशी उभारिल्या तेव्हा त्याचा कनिष्ट पुत्र सगूब मरण पावला, परमेश्‍वराने नूनाचा पुत्र यहोशवा याच्या द्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.” खरा देवच अशा प्रकारची भविष्यवाणी करण्यास प्रेरणा देऊन तिच्या पूर्णतेची खात्री करू शकत होता.

३-९ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे १७-१८

“तुम्ही आणखी किती दिवस दोन मतांमध्ये डगमगत राहणार?”

टेहळणी बुरूज१७.०३ १४ ¶६

विश्‍वास दाखवा व सुज्ञपणे निर्णय घ्या!

६ इस्राएली लोक जेव्हा वचन दिलेल्या देशात राहत होते, तेव्हा त्यांच्यासमोर एक निवड करण्याची वेळ आली. ती म्हणजे, यहोवाची उपासना करावी की अन्य दैवतांची. (यहोशवा २४:१५ वाचा.) वरवर पाहता याविषयीचा निर्णय घेणं सोपं होतं असं वाटतं. पण खरं पाहता त्यांच्या निर्णयाचे परिणाम म्हणजे जीवन किंवा मरण होतं. शास्त्यांच्या काळादरम्यान इस्राएली लोक चुकीची निवड करत राहिले. त्यांनी यहोवाची उपासना करण्याचं सोडून दिलं आणि ते खोट्या दैवतांची भक्‍ती करू लागले. (शास्ते २:३, ११-२३) नंतर, एलीया संदेष्ट्याच्या काळात इस्राएली लोकांना या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागला, की ते यहोवाची सेवा करतील की खोटा दैवत बआल याची. (१ राजे १८:२१) या दोघांमधून कोणाची सेवा करावी याची निवड करणं खरंतर सोपं आहे, असं कदाचित आपल्याला वाटेल. कारण, यहोवाची सेवा करणं हे नेहमीच योग्य आहे. एक सुज्ञ व्यक्‍ती कधीही अशा एखाद्या देवाची उपासना करणार नाही ज्याच्यामध्ये प्राणच नाही. पण इस्राएली लोकांना याविषयी निर्णय घेता आला नाही. बायबल म्हणतं इस्राएली लोक “दोहो मतांमध्ये” लटपटत होते. अशा वेळी एलीयाने सुज्ञपणा दाखवला आणि लोकांना खऱ्‍या देवाची, यहोवाची उपासना करण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केलं.

अनुकरण करा अध्या. १० ¶१५

त्यानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली

१५ आता तर ते आणखीनच वेडेपिसे होऊन बआलाचा धावा करू लागले: “ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्‍यांनी व भाल्यांनी आपणांस घात करून घेऊ लागले, एवढे की ते रक्‍तबंबाळ झाले.” पण, सगळं व्यर्थ! कारण “काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही.” (१ राजे १८:२८, २९) मुळात बआल अस्तित्वातच नव्हता! लोकांना यहोवापासून दूर नेण्यासाठी सैतानानं शोधून काढलेली ही केवळ एक चलाख युक्‍ती होती. खरोखर, यहोवाला सोडून दुसऱ्‍या कोणत्याही ‘बआलाची’ किंवा मालकाची सेवा करायचं आपण निवडलं, तर आपली निराशा आणि फजितीच होईल.—स्तोत्र २५:३; ११५:४-८ वाचा.

अनुकरण करा अध्या. १० ¶१८

त्यानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली

१८ एलीयानं प्रार्थना करण्यापूर्वी, तिथं जमा असलेल्या लोकांना कदाचित असं वाटलं असावं का, की बआलाप्रमाणेच यहोवासुद्धा खोटा ठरेल? पण, एलीयानं प्रार्थना केल्यानंतर मात्र त्यांना जास्त विचार करावा लागला नाही. कारण अहवाल म्हणतो: “तेव्हा परमेश्‍वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले.” (१ राजे १८:३८) खरंच, यहोवानं किती अद्‌भुत रीतीनं उत्तर दिलं होतं! मग, ते पाहून लोकांची काय प्रतिक्रिया होती?

आध्यात्मिक रत्नं शोधा

अनुकरण करा अध्या. १०, चौकट

त्यानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली

एलीयाच्या दिवसांतला दुष्काळ किती काळाचा?

बऱ्‍याच काळापासून पडलेला दुष्काळ आता लवकरच संपणार आहे, असं यहोवाचा संदेष्टा एलीया यानं अहाब राजाला सांगितलं. “तिसरे वर्ष लागले तेव्हा” एलीयानं ही घोषणा केली; हे तिसरं वर्ष म्हणजे एलीयानं दुष्काळ पडणार असं पहिल्यांदा सांगितलं होतं त्यानंतरचं तिसरं वर्ष. (१ राजे १८:१) यहोवा पृथ्वीवर पाऊस पाडेल असं एलीयानं अहाबाला सांगितलं त्यानंतर थोड्याच वेळानं पावसाला सुरुवात झाली. यावरून काही जण कदाचित म्हणतील, की हा दुष्काळ तिसऱ्‍या वर्षादरम्यान कधीतरी संपला आणि त्यामुळं तो तीन वर्षांपेक्षा कमी काळाचा होता. पण, येशू आणि याकोब या दोघांनी तर असं म्हटलं, की एलीयाच्या काळात “साडेतीन वर्षे” दुष्काळ पडला होता. (लूक ४:२५; याको. ५:१७) मग, या दोन गोष्टींमध्ये तफावत आहे का?

मुळीच नाही. प्राचीन इस्राएलमध्ये सहसा उन्हाळा बराच मोठा असायचा; कधीकधी तर तो सहा महिने चालायचा. देशात दुष्काळ पडेल असं एलीयानं अहाबाला सांगितलं तेव्हा उन्हाळा चालू होता; या वेळी तर तो जरा जास्तच लांबला होता आणि नेहमीपेक्षा कडक होता. याचा अर्थ, सहा महिन्यांपूर्वीच दुष्काळाला सुरुवात झाली होती. त्यामुळं, “तिसरे वर्ष लागले तेव्हा” दुष्काळ संपेल अशी एलीयानं घोषणा केली तेव्हा दुष्काळ पडून जवळजवळ साडेतीन वर्षं उलटली होती. आणि कर्मेल डोंगरावर सर्व लोक जमले तोपर्यंत “साडेतीन वर्षे” पूर्ण झाली होती.

एलीयानं पहिल्यांदा अहाबाला दुष्काळाविषयी सांगितलं ती वेळ इतकी उचित का होती, हे विचारात घ्या. लोकांचा असा विश्‍वास होता, की बआल हा “मेघांवर स्वारी करणारा,” पाऊस पाडणारा देव आहे. पण, उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त लांबल्यामुळं लोकांना साहजिकच प्रश्‍न पडला असेल की ‘बआल कुठं आहे? तो केव्हा पाऊस पाडेल?’ म्हणून, आपण सांगितल्याशिवाय पाऊस किंवा दहिवर पडणार नाही असं जेव्हा एलीयानं घोषित केलं, तेव्हा बआलाच्या त्या उपासकांना नक्कीच फार मोठा धक्का बसला असेल.—१ राजे १७:१.

१०-१६ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे १९-२०

“यहोवा आपल्याला सांत्वन देतो”

टेहळणी बुरूज१९.०६ १५ ¶५

तणावात असताना यहोवावर विसंबून राहा

५ १ राजे १९:१-४ वाचा. पण ईजबेल राणीने एलीयाला जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा मात्र तो खूप घाबरला. यामुळे तो बैर-शेबा या ठिकाणी पळून गेला. तो इतका जास्त निराश झाला होता की “आपला प्राण जाईल तर बरे” असं त्याला वाटलं. त्याच्या मनात अशा भावना का आल्या? एलीया अपरिपूर्ण होता आणि तोही “आपल्यासारख्याच भावना असलेला मनुष्य होता.” (याको. ५:१७) तणावामुळे आणि खूप थकून गेल्यामुळे त्याला कदाचित असं वाटलं असावं. एलीयाने विचार केला की खऱ्‍या उपासनेला वाढवण्यासाठी त्याने केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत आणि त्याच्या प्रयत्नांचा इस्राएली लोकांवर काहीच परिणाम झाला नाही. तसंच त्याला वाटलं की संपूर्ण इस्राएलमध्ये यहोवाची उपासना करणारा आता तो एकटाच उरला आहे. (१ राजे १८:३, ४, १३; १९:१०, १४) एका विश्‍वासू संदेष्ट्याच्या मनात अशा भावना आल्या हे जाणून आपल्याला कदाचित आश्‍चर्य वाटेल. पण यहोवाने एलीयाच्या भावना समजून घेतल्या.

अनुकरण करा अध्या. १२ ¶१३

त्यानं देवाकडून मिळणारं सांत्वन अनुभवलं

१३ ओसाड अरण्यातील झुडपाखाली पडलेल्या आणि मृत्यूची विनंती करणाऱ्‍या आपल्या प्रिय संदेष्ट्याला पाहून यहोवाला कसं वाटलं असेल? नक्कीच त्याला खूप वाईट वाटलं असेल. कारण, एलीया झोपी गेला तेव्हा यहोवानं आपल्या एका देवदूताला त्याच्याकडे पाठवलं. देवदूतानं अगदी हळुवारपणे स्पर्श करून एलीयाला झोपेतून उठवलं आणि म्हटलं: “ऊठ, हे खा.” देवदूतानं त्याच्या उशाशी ताजी, गरम भाकर आणि पाणी असं साधंसं जेवण ठेवलं होतं. एलीयानं उठून ते खाल्लं, पण त्यानं देवदूताचे आभार मानले का? अहवालात इतकंच सांगितलं आहे, की तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला. कदाचित तो इतका निराश झाला असेल, की त्याच्यात काही बोलण्याचेही त्राण उरले नसतील. नंतर पुन्हा एकदा, कदाचित पहाटे, देवदूतानं त्याला झोपेतून उठवलं आणि म्हटलं: “ऊठ, हे खा.” पुढं तो एलीयाला म्हणाला: “कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे.” देवदूताचे हे शब्द विशेष लक्षात घेण्यासारखे आहेत.—१ राजे १९:५-७.

अनुकरण करा अध्या. १२ ¶२१

त्यानं देवाकडून मिळणारं सांत्वन अनुभवलं

२१ यहोवानं आपलं विलक्षण सामर्थ्य प्रकट करण्यासाठी ज्या तीन नैसर्गिक शक्‍तींचा उपयोग केला, त्या तीनही शक्‍तींत यहोवा नव्हता, याची आठवण अहवाल आपल्याला करून देतो. एलीयाला माहीत होतं, की यहोवा हा बआलाप्रमाणे दंतकथेतील निसर्गदैवत नाही. बआल हा, “ढगांवर स्वारी करणारा” किंवा पाऊस आणणारा देव आहे, असं त्याचे उपासक मानायचे. अर्थात, या काल्पनिक बआल दैवतानं त्यांची घोर निराशा केली होती. पण याच्या अगदी उलट, यहोवा हा निसर्गात दिसणाऱ्‍या सर्व अद्‌भुत शक्‍तींचा उगम आहे. खरंतर, त्यानं जे काही निर्माण केलं आहे त्यापेक्षा तो कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे; इतका श्रेष्ठ की, स्वर्गांतही तो सामावू शकत नाही! (१ राजे ८:२७) मग, यहोवानं या निरनिराळ्या नैसर्गिक शक्‍तींतून आपलं सामर्थ्य प्रकट केल्यामुळं एलीयाला कशी मदत झाली? हे आठवणीत आणा, की एलीया घाबरला होता. पण, यहोवानं अशा प्रकारे आपली शक्‍ती प्रकट केल्यामुळे एलीयाला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, विश्‍वातला सगळ्यात शक्‍तिशाली देव, यहोवा आपल्या बाजूनं आहे; तेव्हा, आपण अहाबाला किंवा ईजबेलीला घाबरण्याचं काहीच कारण नाही!—स्तोत्र ११८:६ वाचा.

अनुकरण करा अध्या. १२ ¶२२

त्यानं देवाकडून मिळणारं सांत्वन अनुभवलं

२२ अग्नी प्रकट होऊन गेल्यानंतर अगदी सामसूम झालं. मग, एलीयानं एक “शांत, मंद वाणी” ऐकली. देवदूताच्या त्या वाणीमुळं एलीयाला पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्‍त करण्याचं प्रोत्साहन मिळालं. यामुळं एलीयाचं मन किती हलकं झालं असेल! पण, देवदूतानं पुढं जे म्हटलं त्यावरून एलीयाला नक्कीच आणखी दिलासा मिळाला असेल. यहोवानं त्या देवदूताद्वारे त्याला आश्‍वासन दिलं, की तो त्याची मनापासून कदर करतो. यहोवानं हे कसं केलं? इस्राएलमधून बआल उपासना नाहीशी करण्यासाठी तो पुढं काय करणार होता हे त्यानं एलीयाला सांगितलं. यावरून दिसून येतं, की एलीयानं जी सेवा केली होती ती मुळीच व्यर्थ गेली नव्हती; कारण बआल उपासनेविरुद्ध कारवाई करण्याचा यहोवाचा उद्देश अजूनही बदलला नव्हता. शिवाय, हा उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवा पुढंही एलीयाचा संदेष्टा या नात्यानं उपयोग करणार होता; आणि म्हणूनच, यहोवानं त्याला काही विशिष्ट सूचना देऊन परत पाठवलं.—१ राजे १९:१२-१७.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज९७ ११/१ ३१ ¶२

आत्म-त्याग व निष्ठा यांचा नमुना

आज, देवाचे अनेक सेवक अशाच प्रकारचा आत्मत्यागाचा आत्मा दाखवतात. काहींनी, लांबलांबच्या क्षेत्रांमध्ये सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी किंवा बेथेल कुटुंबाचे सदस्य म्हणून सेवा करण्यासाठी आपली ‘शेती’ अर्थात आपल्या उपजीविकेचे साधन सोडून दिले आहे. काहीजण संस्थेच्या बांधकाम प्रकल्पांवर काम करण्यासाठी परदेशात राहावयास गेले आहेत. अनेकांनी क्षुल्लक समजली जाणारी कामे करणे स्वीकारले आहे. पण, यहोवाची चाकरी करणारा कोणीही क्षुल्लक काम करत नसतो. स्वखुषीने सेवा करणाऱ्‍या प्रत्येकाची यहोवा प्रशंसा करतो आणि आत्म-त्यागाच्या त्यांच्या आत्म्यावर तो आशीर्वाद पाठवेल.—मार्क १०:२९, ३०.

१७-२३ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ राजे २१-२२

“अधिकार चालवताना यहोवासारखं वागा”

यहोवा के करीब अध्या. ६ ¶५

विनाशकारी शक्‍ति—“यहोवा योद्धा है”

५ बाइबल की मूल भाषाओं में, इब्रानी शास्त्र में करीब तीन सौ बार और मसीही यूनानी शास्त्र में दो बार परमेश्‍वर को ‘सेनाओं का यहोवा’ कहा गया है। (१ शमूएल १:११) इस पूरे जहान के महाराजाधिराज, यहोवा के पास अनगिनित स्वर्गदूतों की बड़ी सेना है। (यहोशू ५:१३-१५; १ राजा २२:१९) और ये सेनाएँ इतना विनाश करने के काबिल हैं जिसका कोई हिसाब नहीं। (यशायाह ३७:३६) इनके हाथों इंसानों का विनाश सोचना अच्छा नहीं लगता। लेकिन हमें याद रखना चाहिए कि परमेश्‍वर के युद्ध, इंसानों की लड़ाइयों जैसे नहीं जो छोटी-छोटी बात पर दूसरों को बर्बाद कर देते हैं। चाहे दुनिया के सेनापति और नेता अपने युद्धों को इंसानियत की खातिर लड़ी जानेवाली जंग का दर्जा क्यों ना दें, लेकिन इंसान की हर लड़ाई के पीछे उसका लालच और स्वार्थ छिपा होता है।

टेहळणी बुरूज२१.०२ ४ ¶९

“प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे”

९ नम्रता. अख्ख्या विश्‍वात सगळ्यात बुद्धिमान कोणी असेल तर तो यहोवा आहे. पण तरीसुद्धा तो आपल्या सेवकांची मतं ऐकतो. (उत्प. १८:२३, २४, ३२) एकदा तर त्याने, एक विशिष्ट समस्या कशी हाताळता येईल हे सुचवण्याची संधीही स्वर्गदूतांना दिली. (१ राजे २२: १९-२२) याशिवाय, यहोवा परिपूर्ण असला, तरी तो आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. उलट, आपण अपरिपूर्ण आहोत ही गोष्ट लक्षात ठेवून तो आपल्याला मदत करतो. (स्तो. ११३:६, ७) म्हणूनच बायबलमध्ये यहोवाला “सहायक” असं म्हटलं आहे. (स्तो. २७:९; इब्री १३:६) दावीद राजाने हे कबूल केलं, की यहोवा नम्र असल्यामुळेच त्याने त्याला मदत केली आणि म्हणून तो आपल्या कामात यशस्वी झाला.—२ शमु. २२:३६.

इन्साइट-२ २४५

खोटं

एखाद्या व्यक्‍तीला स्वतःचीच दिशाभूल करून घ्यायची इच्छा असेल तर यहोवा “फसव्या प्रभावामुळे” त्या व्यक्‍तीची दिशाभूल होऊ देतो. आणि मग ती व्यक्‍ती शेवटी खोट्या गोष्टीलाच खरं मानून बसते. (२थेस २:९-१२) अहाब राजाच्या बाबतीतही हेच घडलं. अहाब राजाच्या संदेष्ट्यांना त्याला जे खरं आहे ते नाही तर त्यांच्या मनात जे आहे ते सांगायचं होतं. आणि अहाब राजालाही तेच ऐकायचं होतं. म्हणूनच यहोवाने एका स्वर्गदूताला तसंच करण्यासाठी त्याची ताकद वापरू दिली. अशा प्रकारे अहाबने त्याच्या संदेष्ट्यांकडून स्वतःची दिशाभूल करून घ्यायचं निवडलं. आणि त्यासाठी त्याला आपला जीव गमवावा लागला.—१रा २२:१-३८; २इति १८.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज२१.१० ३ ¶४-६

खरा पश्‍चात्ताप म्हणजे काय?

४ शेवटी, यहोवाची सहनशक्‍ती संपली. त्याने एलीयाद्वारे अहाब आणि ईजबेलला शिक्षा सुनावली. त्यांच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल असं यहोवाने त्यांना सांगितलं. एलीयाचे हे शब्द ऐकून अहाब राजाला धक्काच बसला. आणि आश्‍चर्य म्हणजे, हा उद्धट राजा “नम्र झाला.”—१ राजे २१:१९-२९.

५ सुरुवातीला अहाब राजा जरी नम्र झाला तरी नंतरच्या त्याच्या वागण्यावरून असं दिसून येतं, की त्याने खरा पश्‍चात्ताप दाखवला नव्हता. कारण त्याने त्याच्या राज्यातून बआल उपासना काढून टाकण्याचा प्रयत्न केला नाही आणि लोकांना यहोवाच्या उपासनेकडे वळवलं नाही. याशिवाय, त्याने अशाही काही गोष्टी केल्या ज्यांवरून दिसून आलं, की त्याला जरासुद्धा पश्‍चात्ताप नव्हता. जसं की, त्याने यहूदाचा राजा यहोशाफाट याला सीरियाविरुद्ध युद्ध करायला आपल्यासोबत बोलावलं. यहोशाफाट एक चांगला राजा होता आणि यहोवावर त्याचा पूर्ण भरवसा होता. त्यामुळे त्याने असं सुचवलं, की युद्धावर जाण्याआधी आपण यहोवाच्या एका संदेष्ट्याचा सल्ला घेऊ या.

६ पण अहाबला ही कल्पना मुळीच आवडली नाही. तो म्हणाला, “इथे आणखी एक माणूस आहे; . . . आपण त्याच्याकडूनही यहोवाचा सल्ला घेऊ शकतो, पण मला तो अजिबात आवडत नाही. कारण माझ्या बाबतीत तो कधीच चांगला संदेश देत नाही, नेहमी वाईटच देतो.” अहाबने जरी असं म्हटलं तरी त्यांनी मीखाया संदेष्ट्याचा सल्ला घेतला. पण अहाबने म्हटलं होतं तसंच झालं. मीखायाने अहाबला जो संदेश दिला तो वाईटच होता. तो ऐकून खरंतर दुष्ट राजा अहाबने पश्‍चात्ताप करून यहोवाकडे माफी मागायला पाहिजे होती. पण त्याने असं काहीच केलं नाही. उलट, त्याने त्या संदेष्ट्याला तुरुंगात टाकलं. (१ राजे २२:७-९, २३, २७) पण मीखायाने सांगितलेली भविष्यवाणी मात्र पूर्ण झाली. कारण त्यानंतर जे युद्ध झालं त्यामध्ये अहाब राजा मारला गेला.—१ राजे २२:३४-३८.

२४-३० ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ राजे १-२

“प्रशिक्षणाच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण”

टेहळणी बुरूज१५ ४/१५ १३ ¶१५

वडिलांनो, बांधवांना प्रशिक्षित करा!

१५ आज बांधवांनी मंडळीतील अनुभवी वडिलांना आदर दिला पाहिजे हेदेखील अलीशाच्या अहवालातून पाहायला मिळतं. यरीहोमधील संदेष्ट्यांना भेटल्यानंतर एलीया व अलीशा यार्देन नदीजवळ आले. मग “एलीयाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली, तेव्हा पाणी दुभंग झाले.” त्या दोघांनी कोरड्या जमिनीवरून नदी पार केल्यावर, ते पुढे “बोलत चालले.” एलीयानं जे काही अलीशाला सांगितलं ते सर्व त्यानं लक्षपूर्वक ऐकलं व त्या वेळीदेखील तो त्याच्यापासून शिकून घेण्यास उत्सुक होता. आपल्याला सगळंकाही माहीत आहे असा अलीशानं विचार केला नाही. मग, एलीयाला चमत्कारिक रीत्या दूर नेण्यात आलं आणि अलीशा पुन्हा एकदा यार्देन नदीकाठी आला. एलीयाचा झगा पाण्यावर मारून अलीशाने, “एलीयाचा देव परमेश्‍वर कोठे आहे?” असं म्हटलं तेव्हा पाणी पुन्हा दुभंगलं.—२ राजे २:८-१४.

टेहळणी बुरूज१५ ४/१५ १३ ¶१६

वडिलांनो, बांधवांना प्रशिक्षित करा!

१६ इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? एलीयानं केलेला शेवटला चमत्कार आणि अलीशानं केलेला पहिला चमत्कार यात काहीच फरक नव्हता. यातून आपण काय शिकतो? अलीशानं असा मुळीच विचार केला नाही, की आता जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आहे; म्हणून एलीयाप्रमाणे न करता, सगळंकाही वेगळ्या पद्धतीनं करावं. उलट, एलीयाच्याच पद्धतीनं कार्य केल्यामुळे, त्याच्याबद्दल आपल्या मनात आदर असल्याचं अलीशानं दाखवलं व त्यामुळे इतर संदेष्ट्यांनाही त्याच्यावर विश्‍वास ठेवणं सोपं गेलं. (२ राजे २:१५) अलीशानं ६० वर्षं संदेष्टा म्हणून काम केलं, आणि या सबंध काळात एलीयापेक्षा जास्त चमत्कार करण्याचं सामर्थ्य यहोवानं त्याला दिलं. प्रशिक्षण घेणारे बांधव यातून आज कोणता धडा घेऊ शकतात?

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०५ ८/१ ९ ¶१

दुसरे राजे पुस्तकातील ठळक मुद्दे

२:११—एलीया “वावटळीतून” कोणत्या ‘स्वर्गांत गेला?’ ही, भौतिक विश्‍वातील दूरवर असलेली ठिकाणे नव्हती किंवा देव आणि त्याचे दूत वास करतात ते आत्मिक ठिकाणही नव्हते. (अनुवाद ४:१९; स्तोत्र ११:४; मत्तय ६:९; १८:१०) एलीया ज्या ‘स्वर्गांत’ गेला ते पृथ्वीभोवती असलेले वातावरण होते. (स्तोत्र ७८:२६; मत्तय ६:२६) अग्नीमय रथाने एलीयाला पृथ्वीच्या वातावरणातून उचलून पृथ्वीवरल्याच दुसऱ्‍या एका भागात नेले; तेथे तो काही काळपर्यंत हयात होता. अनेक वर्षांनंतर एलीयाने यहुदाचा राजा यहोराम यास एक पत्र लिहिले.—२ इतिहास २१:१, १२-१५.

३१ ऑक्टोबर–६ नोव्हेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ राजे ३-४

“आपल्या मुलाला उचलून घे”

टेहळणी बुरूज१७.१२ ४ ¶७

तो “उठेल हे मला माहीत आहे”

७ बायबलमध्ये नमूद केलेली पुनरुत्थानाची दुसरी घटना, अलीशा संदेष्ट्याच्या काळात घडली. शूनेम नावाच्या नगरात एक इस्राएली स्त्री राहायची. तिला मूलबाळ नव्हतं. अलीशाला पाहुणचार दाखवल्यामुळे, यहोवाने तिला व तिच्या वयोवृद्ध पतीला आशीर्वाद दिला आणि त्यांना एक मुलगा झाला. पण काही वर्षांनी तो मुलगा मरण पावला. विचार करा, त्या स्त्रीला किती दुःख झालं असेल! इतकं, की अलीशाला भेटण्यासाठी ती ३० किलोमीटरचा प्रवास करून कर्मेल डोंगरावर गेली. अलीशाने त्या मुलाचं पुनरुत्थान करण्यासाठी आपला सेवक गेहजी याला पुढे पाठवलं. पण गेहजी त्या मुलाचं पुनरुत्थान करू शकला नाही. त्यानंतर, दुःखात बुडालेली ती स्त्री अलीशाला सोबत घेऊन घरी पोहोचली.—२ राजे ४:८-३१.

टेहळणी बुरूज१७.१२ ४ ¶८

तो “उठेल हे मला माहीत आहे”

८ मग मृत मुलाला ज्या खोलीत ठेवलं होतं, तिथं अलीशा गेला आणि त्याने प्रार्थना केली. यहोवाने अलीशाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि चमत्कार करून मुलाला जिवंत केलं. आपल्या मुलाला जिवंत झालेलं पाहून त्या स्त्रीला खरंच किती आनंद झाला असेल! (२ राजे ४:३२-३७ वाचा.) त्या वेळी कदाचित तिला हन्‍नाच्या प्रार्थनेतले शब्द आठवले असतील. हन्‍नालाही मूलबाळ नव्हतं, पण यहोवाच्या आशीर्वादाने तिला शमुवेल झाला होता. त्यामुळे यहोवाची स्तुती करताना तिने म्हटलं होतं: “तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो.” (१ शमु. २:६) शूनेममधल्या स्त्रीच्या मुलाचं पुनरुत्थान करण्याद्वारे यहोवाने दाखवून दिलं, की त्याच्याकडे मृतांचं पुनरुत्थान करण्याची क्षमता आहे.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-२ ६९७ ¶२

संदेष्टा

“संदेष्ट्यांचे पुत्र.” या शब्दांचा अर्थ कदाचित “एका विशिष्ट गटाचे सदस्य” असा असावा. किंवा हे शब्द कदाचित संदेष्ट्यांच्या एका प्रशिक्षण वर्गाला सूचित करत असावेत जिथे त्यांना अलीशासारख्या एखाद्या शिक्षकाकडून शिक्षण मिळायचं. किंवा एकत्र राहत असलेल्या संदेष्ट्यांच्या गटालाही ते सूचित करत असावं. यांच्यापैकी एखाद्याला व्यक्‍तिगतपणे जाऊन भविष्यवाणी सांगायचं काम मिळू शकत होतं. बायबलमध्ये त्यांच्याबद्दल जे लिहिलंय, त्यावरून आपण असं म्हणू शकतो की ते खूप साधं जीवन जगायचे.—१रा २०:३५-४२; ६:१-७; ९:१, २; २रा ४:३८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा