जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
२-८ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल २७-२९
“दावीदची रणनीती”
इन्साइट-१ ४१
आखीश
दोन वेळा शौलपासून पळ काढताना दावीदने आखीश राजाच्या सत्तेखाली असलेल्या प्रदेशात आश्रय घेतला. पहिल्या वेळी जेव्हा दावीद त्या प्रदेशात गेला तेव्हा लोकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला नाही. ते त्याला शत्रू मानत होते. म्हणून दावीदने वेड्याचं सोंग घेतलं. यामुळे आखीश राजाने तो वेडा आणि त्याच्यापासून आपल्याला काही धोका नाही असं समजून त्याला सोडून दिलं. (१शमु २१:१०-१५; स्तो ३४:उपरिलेखन; ५६:उपरिलेखन) जेव्हा दावीद दुसऱ्या वेळी त्या प्रदेशात गेला तेव्हा त्याच्यासोबत ६०० सैनिक आणि त्यांची कुटुंबंही होती. म्हणून आखीशने त्यांना सिक्लाग शहरात राहायला सांगितलं. दावीद आणि त्याची माणसं सिक्लाग शहरात १ वर्ष आणि ४ महिने राहिले. या काळात दावीद आणि त्याची माणसं यहुदीयातल्या शहरांवर हल्ला करून तिथे लुटमार करतात असं आखीशला वाटायचं. पण खरं पाहिलं, तर दावीद गशूरी, गिरजी आणि अमालेकी लोकांच्या शहरांमध्ये लुटमार करायचा. (१शमु २७:१-१२) आखीशला फसवण्यात दावीद इतका यशस्वी झाला, की जेव्हा पलिष्टी लोक शौलवर हल्ला करायची योजना करत होते तेव्हा आखीशने दावीदला आपला अंगरक्षक म्हणून निवडलं. पण दावीदला सोबत नेण्याची पलिष्ट्यांच्या प्रमुखांची इच्छा नसल्यामुळे, शेवटच्या क्षणी दावीद आणि त्याच्या माणसांना सिक्लागला परत पाठवण्यात आलं. (१शमु २८:२; २९:१-११) पुढे दावीद राजा बनल्यानंतर त्याने गथवर हल्ला केला. पण आखीशला ठार मारण्यात आलं नाही. तो शलमोनच्या शासनकाळापर्यंत हयात होता.—१रा २:३९-४१.
तरुण भावांनो, तुम्ही इतरांचा भरवसा कसा मिळवू शकता?
८ दावीदला आणखी एका समस्येचा सामना करावा लागला. यहूदाचा राजा म्हणून त्याचा अभिषेक करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात राज्य करायला सुरुवात करण्यासाठी त्याला बरीच वर्षं थांबावं लागलं. (१ शमु. १६:१३; २ शमु. २:३, ४) या काळादरम्यान त्याला धीर धरायला कोणत्या गोष्टीने मदत केली? अशा वेळी निराश होण्याऐवजी दावीदला जे काही करणं शक्य होतं ते त्याने केलं. उदाहरणार्थ, शौल राजापासून आपला जीव वाचवण्यासाठी दावीद पलिष्ट्यांच्या प्रदेशात राहत होता, तेव्हा त्याने त्या वेळेचा खूप चांगला उपयोग केला. इस्राएलच्या शत्रूंशी लढण्यासाठी त्याने त्या वेळेचा उपयोग केला. असं करून त्याने यहूदाच्या सीमांचं रक्षण केलं.—१ शमु. २७:१-१२.
इन्साइट-२ २४५ ¶६
खोटं बोलणं
बायबल स्पष्टपणे सांगतं की खोटं बोलणं यहोवाला मुळीच आवडत नाही. पण ज्यांना विशिष्ट माहिती जाणून घ्यायचा हक्क नाही त्यांना आपण खरी आणि पूर्ण माहिती दिलीच पाहिजे, असा याचा अर्थ असा होत नाही. येशू ख्रिस्ताने असा सल्ला दिला: “पवित्र गोष्टी कुत्र्यांना देऊ नका आणि तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका. नाहीतर, ते त्यांना पायांखाली तुडवतील आणि उलटून तुमच्यावर हल्ला करतील.” (मत्त ७:६) म्हणून येशूने स्वतःसुद्धा काही वेळा लोकांना पूर्ण माहिती किंवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सरळसरळ उत्तरं दिली नाहीत. कारण असं केल्यामुळे नुकसान होऊ शकत होतं.—मत्त १५:१-६; २१:२३-२७; योह ७:३-१०.
आध्यात्मिक रत्नं
मेलेले लोक जिवंतांना काही मदत करू शकतात का?
बायबलमध्ये सांगितलं आहे, की मेल्यानंतर माणूस “मातीला मिळतो” आणि “त्याच्या विचारांचा शेवट होतो.” (स्तोत्र १४६:४) शौल आणि शमुवेलला चांगलं माहीत होतं, की भूतविद्या करणाऱ्या लोकांशी संपर्क करायला देवाने सक्त मनाई केली होती. त्यामुळे बऱ्याच वर्षांआधी शौलने देशातून भूतविद्या पूर्णपणे काढून टाकली होती.—लेवीय १९:३१.
शमुवेल मेल्यानंतर खरोखरच आत्म्याच्या रुपात जिवंत आहे अशी कल्पना करा. असं असतं तरी शौलशी बोलण्यासाठी भूतविद्या करणाऱ्या एका स्त्रीने त्याला बोलवलं, तेव्हा तो देवाची आज्ञा मोडून तो खरंच आला असता का? शौल देवाकडून मार्गदर्शन मिळवायचा प्रयत्न करत होता. पण देवाने त्याला आधीच स्पष्ट केलं होतं, की तो कोणत्याही प्रकारे त्याला मार्गदर्शन देणार नाही. मग एक भूतविद्या करणारी स्त्री मृत शमुवेलचा वापर करून सर्वसमर्थ देवाला शौलसोबत बोलायला भाग पाडू शकली असती का? नक्कीच नाही. यावरून स्पष्ट होतं, की शमुवेल संदेष्टा असल्याचा दिखावा करणारी व्यक्ती, खरंतर एक दुष्ट स्वर्गदूत होती.
९-१५ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल ३०-३१
“मदतीसाठी यहोवाकडे वळा”
यहोवाचे भय धरा—सुखी व्हा!
१२ देवाच्या भयाने दाविदाला फक्त चूक करण्यापासूनच रोखले नाही, तर आणीबाणीच्या प्रसंगी निर्णायक पाऊल उचलण्यासाठी व सुज्ञपणे वागण्यासाठी त्याला शक्ती दिली. एक वर्ष आणि चार महिन्यांपर्यंत दावीद आणि त्याच्या लोकांनी, सिकलाग नावाच्या पलिष्टी खेडेगावात आश्रय घेतला होता. (१ शमुवेल २७:५-७) एकदा सर्व पुरुष बाहेर गेले असताना, लुटालूट करणाऱ्या अमालेकी लोकांनी शहर अग्नीने जाळून टाकले आणि स्त्रियांना, मुलांना व आणि गुराढोरांना पळवून नेले. दावीद आणि त्याचे लोक पुन्हा नगरात आले आणि त्यांनी हे पाहिले तेव्हा ते खूप रडले. पण या दुःखाचे रुपांतर रागात झाले. दाविदाचे लोक त्याला दगडमार करण्याची भाषा करू लागले. दाविदाला काय करावे समजत नव्हते तरी तो खचला नाही. (नीतिसूत्रे २४:१०) देवाचे भय बाळगल्यामुळे त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि ‘परमेश्वरावर भिस्त ठेवून तो खंबीर राहिला.’ देवाच्या मदतीने मग दावीद आणि त्याच्या लोकांनी अमालेकींचा पाडाव केला आणि जे काही त्यांनी पळवून नेले होते ते सर्व सोडवून आणले.—१ शमुवेल ३०:१-२०.
तारण प्राप्त होण्यासाठी यहोवा आपले रक्षण करतो
१४ दाविदाने जीवनात कितीतरी दुःखदायक परिस्थितींना तोंड दिले. (१ शमु. ३०:३-६) पण यहोवाला त्याच्या भावनांची जाणीव होती. दाविदाने लिहिलेल्या देवप्रेरित शब्दांवरून हे स्पष्ट होते. (स्तोत्र ३४:१८; ५६:८ वाचा.) आपल्याही भावनांची देवाला जाणीव आहे. जेव्हा आपण “भग्नहृदयी” म्हणजेच हताश व दुःखी असतो तेव्हा यहोवा आपल्या अधिक जवळ असतो. नुसता हा विचारदेखील आपल्याला काही प्रमाणात सांत्वन देऊ शकतो. दाविदालाही या विचाराने सांत्वन मिळाल्याचे त्याने एका स्तोत्रात व्यक्त केले: “मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्लास व हर्ष पावेन; कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहे; माझ्या जिवावरील संकटे तुला अवगत आहेत.” (स्तो. ३१:७) पण यहोवा आपले दुःख नुसतेच पाहत नाही; तर, सांत्वन व प्रोत्साहन देऊन तो आपल्याला दुःखातून सावरतो. एक मार्ग ज्याद्वारे यहोवा असे करतो, तो म्हणजे ख्रिस्ती सभा.
आध्यात्मिक रत्नं
पहिले शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे
३०:२३, २४. हा निर्णय गणना ३१:२७ या वचनावर आधारित असून, मंडळीत जे साहाय्यक कार्ये करतात त्यांची यहोवा किती कदर करतो हे यावरून दिसून येते. तर मग आपण जे काही करतो ते ‘माणसांसाठी म्हणून नाही, तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे’ करावे.—कलस्सैकर ३:२३.
१६-२२ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल १-३
“‘धनुष्य’ म्हटलेल्या शोकगीतावरून आपण काय शिकतो?”
तुमच्यावर अधिकार दिलेल्यांना मान द्या
९ दाविदाला गैरवागणूक दिली जात असताना त्याला वाईट वाटले नसेल का? अर्थातच. व्याकूळ होऊन त्याने यहोवाला म्हटले: “दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात.” (स्तोत्र ५४:३) “हे माझ्या देवा, माझ्या वैऱ्यांपासून मला सोडीव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचीव। . . . पाहा, ते माझा जीव घ्यावयाला टपले आहेत; हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा दोष नसता दांडगे लोक माझ्याविरुद्ध एकत्र जमले आहेत. माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत. मला साहाय्य करावे म्हणून तू जागा होऊन पाहा.” (स्तोत्र ५९:१-४) तुम्हालाही कधीकधी असे वाटते का? अधिकारपदावर असलेली एखादी व्यक्ती, तुम्ही तिचे काहीही नुकसान केलेले नसताना उगाचच तुम्हाला वाईट वागणूक देते असे तुम्हाला वाटते का? पण आठवणीत असू द्या, दावीद शेवटपर्यंत शौलाला मान देतच राहिला. शौलाचा मृत्यू झाला तेव्हा आनंदी होण्याऐवजी, दाविदाने एक शोकगीत रचून आपले दुःख व्यक्त केले: “शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; . . . ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. इस्राएली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा.” (२ शमुवेल १:२३, २४) शौलाने कारण नसताना दाविदाला इतके छळले तरीसुद्धा, तो यहोवाचा नियुक्त पुरूष आहे हे लक्षात ठेवून दाविदाने त्याला मनापासून आदर दिला. दाविदाचे उदाहरण खरोखर अनुकरण करण्याजोगे आहे.
विश्वासघात—शेवटल्या काळातील एक अनिष्ट प्रघात!
८ बायबलमध्ये, एकनिष्ठ राहिलेल्यांचीही बरीच उदाहरणे आढळतात. त्यांपैकी दोन उदाहरणे आपण पाहू या आणि त्यांपासून आपण काय शिकू शकतो हेही पाहू या. सर्वात आधी आपण दाविदाप्रती एकनिष्ठ राहिलेल्या एका मनुष्याविषयी पाहू या. तो मनुष्य होता योनाथान; शौल राजाचा ज्येष्ठ पुत्र. शौलानंतर कदाचित योनाथानच राजा बनला असता. पण, यहोवाने मात्र इस्राएलचा पुढचा राजा होण्यासाठी दाविदाला निवडले होते. योनाथानाने देवाच्या या निर्णयाप्रती आदर दाखवला. त्याने दाविदाला आपला शत्रू मानले नाही किंवा त्याच्याविषयी ईर्ष्या केली नाही. उलट, त्याचे “मन दाविदाच्या मनाशी . . . जडले” आणि त्याने दाविदाला एकनिष्ठेचे वचन दिले. त्याने दाविदाला आपली राजसी वस्त्रे, तलवार, धनुष्य व आपला कमरबंद देऊन त्याचा सन्मान केला. (१ शमु. १८:१-४) योनाथानाने दाविदाच्या “हाताला . . . बळकटी” देण्यासाठी जमेल ते सर्व केले. इतकेच काय, तर शौलापुढे दाविदाचे समर्थन करण्यासाठी त्याने स्वतःचा जीवही धोक्यात घातला. योनाथानाने दाविदाला “तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार,” असे म्हणून त्याच्याप्रती एकनिष्ठा दाखवली. (१ शमु. २०:३०-३४; २३:१६, १७) त्यामुळे, योनाथानाच्या मृत्यूनंतर दाविदाने आपले दुःख व प्रेम व्यक्त करण्यासाठी एक विलापगीत लिहिले हे समजण्याजोगे आहे.—२ शमु. १:१७, २६.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-१ ३६९ ¶२
भाऊ
ज्यांचे विचार आणि ध्येयं सारखीच असतात, त्यांच्याबद्दल बोलतानाही बायबलमध्ये “भाऊ” हा शब्द वापरला आहे. दावीदने म्हटलं, “पाहा! भावांनी सोबत मिळून ऐक्याने राहणं, किती चांगलं आणि आनंददायक आहे!” इथे दावीद रक्ताचं नातं असलेल्या भावांबद्दल बोलत नव्हता. यावरून दिसतं की ज्यांचं रक्ताचं नातं नसतं, ते लोकसुद्धा एकमेकांसोबत ऐक्याने आणि प्रेमाने राहू शकतात. (स्तो १३३:१) दावीद आणि योनाथानचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्यांचे विचारही सारखेच होते. त्यामुळे, जरी ते एकाच आईवडिलांची मुलं नव्हते, तरी दावीदने योनाथानला आपला भाऊ म्हटलं.—२शमु १:२६.
२३-२९ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल ४-६
“यहोवाच्या मनाविरुद्ध वागायची भीती बाळगा”
दुसरे शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे
६:१-७. दाविदाचा हेतू चांगला होता तरीसुद्धा, कराराचा कोश एका गाडीत वाहून नेण्याचा त्याचा प्रयत्न देवाच्या आज्ञेच्या विरोधात होता आणि त्यामुळे तो फसला. (निर्गम २५:१३, १४; गणना ४:१५, १९; ७:७-९) उज्जाने कोशाला हात लांब करून धरले त्या घटनेवरूनही हेच दिसून येते की एखाद्याच्या मनातील हेतू कितीही चांगले असले तरीसुद्धा त्यामुळे देवाचे नियम बदलत नाहीत.
यहोवा नेहमी योग्य तेच करतो
२० उज्जाला देवाच्या नियमशास्त्रात काय सांगितले आहे हे माहीत असायला हवे होते. कराराचा कोश यहोवाच्या उपस्थितीचे प्रतीक होते. नियमशास्त्रात स्पष्ट सांगितले होते की ज्यांना अधिकार देण्यात आलेला नव्हता त्यांनी कोशाला स्पर्श करू नये; केल्यास मृत्यूदंड दिला जाईल हे देखील स्पष्टपणे सांगितले होते. (गणना ४:१८-२०; ७:८९) त्यामुळे, या पवित्र कोशाला नेण्याचे कार्य क्षुल्लक समजण्यासारखे कार्य नव्हते. उज्जा (याजक नव्हता तरी) लेवीय वंशाचा होता, त्यामुळे त्याला नियमशास्त्र माहीत असायला हवे होते. शिवाय अनेक वर्षांपूर्वी कराराचा कोश सुरक्षित ठेवण्याकरता तो त्याच्या पित्याच्या घरात ठेवण्यात आला होता. (१ शमुवेल ६:२०-७:१) जवळजवळ ७० वर्षांपर्यंत तो तेथे ठेवला होता; यानंतर दाविदाने त्यास नेण्याचे ठरवले. तेव्हा, लहानपणापासून उज्जाला कोशाशी संबंधित नियमांची कल्पना होती.
यहोवा नेहमी योग्य तेच करतो
२१ याआधी सांगितल्याप्रमाणे, यहोवा एका व्यक्तीच्या मनातले विचारही ओळखू शकतो. त्याच्या वचनात ज्याअर्थी उज्जाच्या कृत्याला “अनादरशील कृत्य” म्हणण्यात आले आहे त्याअर्थी यहोवाने त्याच्या मनातला स्वार्थी हेतू ओळखला असावा, ज्याविषयी या अहवालात स्पष्ट उल्लेख नाही. उज्जा स्वभावानेच गर्विष्ठ, मर्यादा ओलांडून वागण्याची सवय असलेला माणूस असावा का? (नीतिसूत्रे ११:२) आपल्या कुटंबाने ज्या कराराच्या कोशाचे संरक्षण केले होते तो चारचौघांसमोरून नेत असताना त्याला कदाचित याचा गर्व वाटला असावा का? (नीतिसूत्रे ८:१३) यहोवाच्या उपस्थितीचे प्रतीक असणाऱ्या पवित्र कोशाला सांभाळण्याकरता त्याचा हात तोकडा पडणार नाही हे त्याला माहीत नव्हते का, इतकाही त्याला विश्वास नव्हता का? काहीही असो, आपण खात्री बाळगू शकतो की यहोवाने योग्य तेच केले. त्याने उज्जाच्या अंतःकरणात असे काहीतरी पाहिले की ज्यामुळे तो लगेच त्याला शिक्षा देण्यास प्रवृत्त झाला.—नीतिसूत्रे २१:२.
आध्यात्मिक रत्नं
तुम्ही आपला भार नेहमी यहोवावर टाका
यासाठी दावीदाला राजा या नात्याने काही प्रमाणात जबाबदारी उचलावी लागली. त्याची प्रतिक्रिया हे दाखवून देते, की यहोवासोबत चांगला नातेसंबंध असणारे देखील काही वेळा परीक्षेच्या काळात वाईटपणे प्रतिक्रिया दाखवू शकतात. प्रथम दावीदाला क्रोध आला. नंतर मात्र त्याला धाक वाटला. (२ शमुवेल ६:८, ९) यहोवासोबतच्या त्याच्या विश्वासहार्य नातेसंबंधाची कठीण परीक्षा घेण्यात आली. हा असा प्रसंग होता, जेव्हा त्याने यहोवाच्या आज्ञांचे पालन केले नाही. त्यावेळी तो यहोवावर त्याचा भार टाकण्यास अपयशी ठरला असे दिसते. तशाच प्रकारची परिस्थिती काही वेळा आपल्या बाबतीत असू शकते का? यहोवाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल आपण त्याला कधी दोषी ठरवितो का?—नीतिसूत्रे १९:३.
३० मे–५ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल ७-८
“यहोवाने दावीदसोबत करार केला”
‘तुझे राज्य अढळ राहील’
दाविदाला मंदिर बांधण्याची मनापासून इच्छा असल्याचे पाहून यहोवाला आनंद झाला. दाविदाची श्रद्धा पाहून व यहोवाने केलेल्या एका भविष्यवाणीच्या अनुषंगाने यहोवा दाविदाशी असा करार करतो की तो त्याच्या राजघराण्यातूनच एक जण उभा करील जो सदासर्वकाळ राज्य करेल. देवाने दिलेले हे महत्त्वपूर्ण अभिवचन नाथान दाविदाला अशा प्रकारे सांगतो: “तुझे घराणे व तुझे राज्य ही तुजपुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.” (वचन १६) या करारात सांगितलेला सदासर्वकाळ राज्य करणारा कायमचा वारस कोण आहे?—स्तोत्र ८९:२०, २९, ३४-३६.
‘तुझे राज्य अढळ राहील’
नासरेथचा येशू दाविदाच्या वंशातून आला. येशूच्या जन्माची घोषणा करताना एका देवदूताने म्हटले: “प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) यहोवाने दाविदाबरोबर केलेल्या कराराची पूर्णता येशू ख्रिस्तामध्ये झाली. यास्तव, येशू हा कोणा मानवाने त्याला निवडल्यामुळे राज्य करत नाही तर देवाने त्याला तो सदासर्वकाळ राज्य करण्यास योग्य आहे असे महत्त्वपूर्ण अभिवचन दिल्यामुळे करतो. देवाची अभिवचने नेहमीच खरी ठरतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.—यशया ५५:१०, ११.
देवाच्या राज्यावर तुमचा पक्का विश्वास आहे का?
१४ प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याला यहोवाने एक अभिवचन दिले. ते अभिवचन दाविदाशी केलेला करार या नावाने ओळखले जाते. (२ शमुवेल ७:१२, १६ वाचा.) दावीद जेरूसलेममध्ये राज्य करत असताना यहोवाने त्याच्यासोबत हा करार केला. यहोवाने दाविदाला सांगितले की मशीहा त्याच्याच वंशातून येईल. (लूक १:३०-३३) अशा रीतीने, यहोवाने मशीहाच्या वंशावळीसंबंधी आणखी स्पष्ट माहिती दिली. यहोवाने दाविदाला सांगितले की त्याच्या वंशातील एकाला मशीही राज्याचा राजा असण्याचा “हक्क” असेल. (यहे. २१:२५-२७) दाविदाचे राज्य सर्वकाळचे असेल कारण त्याचा वंशज असणारा येशू याचे राज्य “सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन . . . सूर्याप्रमाणे कायम राहील.” (स्तो. ८९:३४-३७) मशीहाचे राज्य कधीही भ्रष्ट होणार नाही आणि त्याच्या राज्यामुळे होणारे फायदे सदासर्वकाळ टिकून राहतील याची पूर्ण खात्री आपण बाळगू शकतो.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-२ २०६ ¶२
शेवटचा काळ
बलामची भविष्यवाणी. इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात जाण्याआधी बलामने मवाबचा राजा बालाक याच्याबद्दल अशी भविष्यवाणी केली: “हे लोक तुझ्या लोकांसोबत पुढे काय करतील, हे मी जाण्याआधी तुला सांगतो। . . . याकोबमधून एक तारा निघेल, इस्राएलमधून एक राजदंड उगवेल. तो मवाबचं कपाळ फोडेल आणि क्रूर योद्ध्यांच्या कवट्या फोडेल.” (गण २४:१४-१७) या भविष्यवाणीच्या पहिल्या पूर्णतेत दावीद तो “तारा” होता ज्याने मवाबी लोकांवर विजय मिळवून त्यांना आपले सेवक बनवलं.—२शमु ८:२.
६-१२ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल ९-१०
“दावीदने एकनिष्ठ प्रेम दाखवलं”
होय, तुम्ही आनंद मिळवू शकता
“जो दारिद्र्याची चिंता करतो तो सुखी आहे,” असे दावीदाने लिहिले. तो पुढे असे लिहितो: “वाईट दिवशी यहोवा त्याला मुक्त करील. यहोवा त्याला राखील आणि वाचवील; तो पृथ्वीत आशीर्वादित होईल.” (स्तोत्र ४१:१, २, पं.र.भा.) मफीबोशेथ हा दावीदाचा जीवलग मित्र योनाथान याचा पांगळा मुलगा होता. दावीदाने त्याच्या बाबतीत जो प्रेमळपणा दाखवला तशाप्रकारची योग्य मनोवृत्ती आपण गरिबांबद्दल दाखवली पाहिजे.—२ शमुवेल ९:१-१३.
दुसरे शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे
९:१, ६, ७. दाविदाने दिलेले वचन पाळले. आपणही दिलेले वचन पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ते त्यांच्या शरीरातल्या काट्यांशी लढले
१० काही वर्षांनंतर राजा दाविदाने योनाथानविषयी त्याला असलेल्या अतीव प्रेमामुळे मफीबोशेथवर दया केली. दाविदाने शौलाची सर्व मालमत्ता त्याला दिली आणि शौलाचा सेवक सीबा याला त्याच्या जमिनीची देखरेख करण्यास नेमले. तसेच दाविदाने मफीबोशेथला सांगितले: “तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे.” (२ शमुवेल ९:६-१०) दाविदाच्या या दयाळु व्यवहारामुळे मफीबोशेथला सांत्वन मिळाले असेल आणि त्याच्या अपंगत्वामुळे वाटत असलेले दुःखही काहीसे सुसह्य झाले असेल यात शंका नाही. हा किती उत्तम धडा आहे! आपण देखील काट्यासमान समस्यांना तोंड देत असलेल्यांशी दयाळूपणे वागले पाहिजे.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-१ २६६
दाढी
बायबल काळात दाढी ठेवणं हे पुरुषत्वाचं आणि प्रतिष्ठेचं चिन्ह मानलं जायचं. तसंच, यहोवाचे उपासक नसलेल्या लोकांमध्ये दाढी कापून टाकण्याची किंवा कोरण्याची एक धार्मिक प्रथा होती. कदाचित याच कारणामुळे देवाच्या नियमशास्त्रात “कल्ले” किंवा दाढीचं टोक कापण्याची मनाई करण्यात आली होती.—लेवी १९:२७; २१:५.
१३-१९ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल ११-१२
“चुकीच्या इच्छांना तुमच्यावर नियंत्रण करू देऊ नका”
आपण सैतानाच्या पाशांतून सुटू शकतो!
१० यहोवाने दावीद राजाला भरपूर धनसंपत्ती दिली होती, मानाचं पद दिलं होतं आणि त्याच्या अनेक शत्रूंवर विजय मिळवून दिला होता. त्याबद्दल दावीद म्हणाला, की यहोवाने त्याला इतके आशीर्वाद दिले, की तो त्यांचं वर्णनसुद्धा करू शकत नाही. (स्तो. ४०:५) पण अशी एक वेळ आली की यहोवाने आपल्याला काय-काय दिलं आहे हे सगळं तो विसरून गेला. तो आहे त्यात समाधानी नव्हता, त्याला आणखी पाहिजे होतं. त्याला अनेक बायका होत्या. पण तरीसुद्धा त्याने दुसऱ्या माणसाच्या बायकोबद्दल मनात चुकीच्या इच्छा आणल्या. ती स्त्री उरीया हित्तीची बायको बथशेबा होती. त्याने तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिली. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने उरीयाला मारून टाकण्याचा कटही रचला. (२ शमु. ११:२-१५) दावीद बऱ्याच वर्षांपासून यहोवाची विश्वासूपणे सेवा करत होता. पण तरीसुद्धा त्याने लोभीपणा दाखवला आणि स्वतःवर बरीच दुःखं ओढवून घेतली. नंतर दावीदने आपली चूक कबूल केली आणि पश्चात्ताप केला. आणि यहोवाने त्याला माफ केलं. याबद्दल त्याने त्याचे खूप आभार मानले.—२ शमु. १२:७-१३.
स्वेच्छेने यहोवाच्या अधीन राहा
१५ यहोवाने दावीदला फक्त आपल्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून नाही, तर संपूर्ण इस्राएल राष्ट्राचा प्रमुख म्हणून नेमलं होतं. एक राजा या नात्याने दावीदकडे मोठा अधिकार होता. काही वेळा त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि गंभीर अपराधही केले. (२ शमु. ११:१४, १५) पण त्याने यहोवाला अधीनता दाखवली. ती कशी? यहोवाने त्याला सुधारलं तेव्हा त्याने शिस्त स्वीकारली. त्याने प्रार्थनेत आपल्या मनातल्या सर्व भावना व्यक्त केल्या. (स्तो. ५१:१-४) त्यासोबतच तो नम्र होता. त्याने फक्त पुरुषांनी दिलेले सल्लेच नाही तर स्त्रियांनी दिलेले सल्लेही स्वीकारले. (१ शमु. १९:११, १२; २५:३२, ३३) दावीद आपल्या चुकांतून शिकला आणि यहोवाच्या सेवेला त्याने आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवलं.
देवाच्या नियमांना व तत्त्वांना तुमच्या विवेकाला प्रशिक्षित करू द्या
७ देवाचे नियम मोडल्यामुळे कोणते वाईट परिणाम घडू शकतात हे जाणण्यासाठी ते आपण स्वतः अनुभवण्याची गरज नाही. गत काळात इतरांनी ज्या चुका केल्या त्यांवरून आपण खूप काही शिकू शकतो. आणि अशी उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. नीतिसूत्रे १:५ मध्ये म्हटलं आहे: “ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे.” हे ज्ञान म्हणजे देवाकडून येणाऱ्या सूचना आहेत आणि त्या सर्वोत्तम आहेत! दावीदच्या उदाहरणावरून आपण ही गोष्ट समजू शकतो. त्याने बथशेबासोबत अनैतिक संबंध ठेवले व यहोवाची आज्ञा मोडली. त्यामुळे त्याला खूपकाही सोसावं लागलं. (२ शमु. १२:७-१४) हा अहवाल वाचल्यावर स्वतःला विचारा: ‘बथशेबासोबत व्यभिचार केल्यामुळे ज्या समस्यांना दावीदला सामोरं जावं लागलं त्यांना तो कसा टाळू शकला असता? मी जर अशा परिस्थितीत असतो तर मी काय केलं असतं? मी दावीदसारखं अनैतिक कार्य केलं असतं की योसेफसारखा तिथून पळ काढला असता?’ (उत्प. ३९:११-१५) जर आपण पापाच्या भयानक परिणामांबद्दल खोलवर विचार करत राहिलो तर आपल्या मनात वाईट गोष्टींबद्दल “द्वेष” वाढत जाईल.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-१ ५९० ¶१
दावीद
पहिली गोष्ट म्हणजे, दावीद आणि बथशेबाने जे केलं ते यहोवाने लपवलं नाही. उलट, तो सगळं काही पाहत होता आणि त्याने सत्य पुढे आणलं. जर यहोवाने मानवी न्यायाधीशांना मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे दावीद आणि बथशेबाचा न्याय करू दिला असता, तर त्या दोघांनाही मृत्युदंड देण्यात आला असता. आणि साहजिकच बथशेबाला होणारं बाळसुद्धा तिच्यासोबत मेलं असतं. (अनु ५:१८; २२:२२) पण यहोवाने त्या दोघांचा न्याय स्वतः करायचं ठरवलं. राज्याच्या करारामुळे यहोवाने दावीदला दया दाखवली. (२शमु ७:११-१६) का? याचं एक कारण म्हणजे, दावीदने स्वतःसुद्धा इतरांना दया दाखवली होती. (१शमु २४:४-७; याक २:१३ सोबत तुलना करा) तसंच, त्याने आणि बथशेबाने केलेला पश्चात्तापही यहोवाने पाहिला असावा. (स्तो ५१:१-४) पण त्यांना कोणतीच शिक्षा झाली नाही असा याचा अर्थ नाही. नाथान संदेष्ट्याद्वारे यहोवाने अशी भविष्यवाणी केली: “मी तुझ्याच घरातून तुझ्यावर संकटं आणीन.”—२ शमु १२:१-१२.
२०-२६ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल १३-१४
“अम्नोनच्या स्वार्थी इच्छेमुळे वाईट परिणाम झाले”
इन्साइट-१ ३२
अबशालोम
अम्नोनची हत्या. अबशालोमची बहीण तामार खूप सुंदर होती. त्यामुळे तिच्यापेक्षा मोठा असलेला तिचा सावत्र भाऊ अम्नोन तिच्याकडे आकर्षित झाला. त्याने आजारी असल्याचं सोंग करून तामारला आपल्याकडे बोलावून घेतलं. तेव्हा ती आली आणि तिने त्याच्यासाठी जेवण बनवलं. अम्नोनने त्या संधीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. पण यानंतर त्याला तिची घृणा वाटू लागली. म्हणून त्याने तिला हाकलून दिलं.—२शमु १३:१-२०.
आत्मसंयम विकसित करा
११ बायबलमध्ये अशाही काही लोकांची उदाहरणं आहेत, ज्यांनी अनैतिक लैंगिक कृत्यं करण्याच्या मोहाचा प्रतिकार केला नाही. तसंच, आत्मसंयम न बाळगल्यामुळे किती वाईट परिणाम घडू शकतात हेसुद्धा बायबलमध्ये सांगितलं आहे. आधी उल्लेख केलेली आपली बहीण किम ज्या परिस्थितीत होती, तशी परिस्थिती कधी तुमच्यासमोर आली, तर नीतिसूत्रे अध्याय ७ मध्ये उल्लेख केलेल्या मूर्ख तरुण मनुष्याच्या उदाहरणाचा विचार करा. तसंच, अम्नोनचा आणि त्याच्या वाईट वर्तनामुळे घडून आलेल्या भयंकर परिणामांचाही विचार करा. (२ शमु. १३:१, २, १०-१५, २८-३२) बायबलमधल्या अशा उदाहरणांची कौटुंबिक उपासनेत चर्चा करून आईवडील आपल्या मुलांना प्रेमसंबंधांच्या बाबतीत आत्मसंयम आणि सुज्ञपणा विकसित करण्यास मदत करू शकतात.
इन्साइट-१ ३३ ¶१
अबशालोम
अम्नोनने तामारचा बलात्कार केल्याच्या घटनेला दोन वर्षं झाली होती. त्या वेळी मेंढरांची लोकर कातरण्याची वेळ होती. म्हणून अबशालोमने यरुशलेमच्या उत्तरपूर्वेकडे २२ किलोमीटरवर असलेल्या बआल-हासोर इथे मेजवानी ठेवली. त्याने दावीदला आणि त्याच्या सगळ्या मुलांनाही या मेजवानीचं आमंत्रण दिलं. पण दावीदने आपण येऊ शकत नाही असं त्याला सांगितलं. तेव्हा अबशालोमने दावीदच्या ऐवजी त्याच्या सर्वात मोठ्या मुलाला, म्हणजे अम्नोनला पाठवण्याचा आग्रह केला. (नीत १०:१८) मेजवानीच्या वेळी जेव्हा अम्नोन “पिऊन धुंद” झाला होता, तेव्हा अबशालोमने आपल्या माणसांना त्याला ठार मारण्याचा हुकूम दिला.—२शमु १३:२३-३८.
आध्यात्मिक रत्नं
तुम्हाला कशा प्रकारची व्यक्ती बनायचे आहे?
आपल्या व्यक्तिमत्त्वात कोणते बदल करण्याची गरज आहे हे ओळखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, बायबलमध्ये वर्णन केलेल्या व्यक्तींच्या गुणांचे परीक्षण करणे. म्हणजेच, ती व्यक्ती कशामुळे चांगली किंवा वाईट ठरली यावर मनन करणे. उदाहरणार्थ, कुलपिता याकोबाचा पुत्र योसेफ याचा विचार करा. त्याच्यावर इतका अन्याय झाला तरीसुद्धा त्याने मनात द्वेष व कटुता उत्पन्न होऊ दिली नाही, तर अशाही परिस्थितीत त्याने आपले आंतरिक सौंदर्य टिकवून ठेवले. (उत्प. ४५:१-१५) दुसरीकडे पाहता, राजा दाविदाचा पुत्र अबशालोम याने लोकांबद्दल खूप कळकळ असल्याचा आव आणला. त्याच्या सौंदर्याचीही लोक खूप प्रशंसा करत. पण खरे पाहता, तो विश्वासघातकी व खूनी होता. (२ शमु. १३:२८, २९; १४:२५; १५:१-१२) यावरून हेच दिसून येते, की चांगुलपणाचा आव आणल्यामुळे किंवा शारीरिक सौंदर्यामुळे एक व्यक्ती खऱ्या अर्थाने आकर्षक बनू शकत नाही.
२७ जून–३ जुलै
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | २ शमुवेल १५-१७
“अबशालोमने गर्वामुळे बंड केलं”
इन्साइट-१ ८६०
राजाच्या रथासमोर धावणारा
बायबल काळात, इस्राएलसारख्या देशांमध्ये राजाच्या रथासमोर सहसा काही माणसं धावायची. ही माणसं राजा येत असल्याची घोषणा करायची, म्हणजे लोकांना राजाच्या आगमनासाठी तयार होता येईल. तसंच, ही माणसं राजाला लागेल ती मदतसुद्धा करायची. (१शमु ८:११) अबशालोम आणि अदोनीया यांनी राजाविरुद्ध बंड केलं होतं. त्याकाळी फक्त राजाच्या रथासमोर माणसं धावायची पद्धत असल्यामुळे, त्यांनीसुद्धा मुद्दाम आपापल्या रथासमोर धावण्यासाठी ५० माणसं ठेवली. त्यांना माहीत होतं, की त्यांच्या रथासमोर धावणाऱ्या या माणसांना पाहून लोक त्यांना आणखी जास्त मानसन्मान देतील आणि तेच राजपदासाठी योग्य आहेत असं समजतील.—२शमु १५:१; १रा १:५.
स्वातंत्र्य देणाऱ्या देवाची सेवा करा
५ बायबलमध्ये अशा बऱ्याच जणांची उदाहरणे आहेत ज्यांनी इतरांवर वाईट प्रभाव पाडला. असेच एक उदाहरण दावीद राजाचा पुत्र अबशालोम याचे आहे. अबशालोम अतिशय देखणा होता. पण कालांतराने सैतानाप्रमाणेच त्यानेही लोभी व महत्त्वाकांक्षी भावनांना आपल्या मनात थारा दिला. आणि यामुळे, हक्क नसतानाही, तो आपल्या पित्याचे राजपद मिळवण्याची इच्छा बाळगू लागला.* राजपद बळकावण्यासाठी त्याने एक कारस्थान रचले. त्याने इस्राएली लोकांबद्दल खूपच आपुलकी असल्याचा आव आणला आणि दावीद राजाला त्यांच्याबद्दल काहीच काळजी नाही असे त्यांना पटवून देण्याचा त्याने मोठ्या चलाखीने प्रयत्न केला. एदेन बागेत दियाबलाने जे केले तेच अबशालोमाने केले. इतरांच्या हिताची फार काळजी असल्याचे भासवून त्याने दुष्टपणे स्वतःच्याच पित्याची निंदा केली.—२ शमु. १५:१-५.
इन्साइट-१ १०८३-१०८४
हेब्रोन
काही वर्षांनी दावीदचा मुलगा अबशालोम याने हेब्रोनला जाऊन आपल्या वडिलांच्या जागी स्वतःला राजा घोषित करायचा प्रयत्न केला. पण त्याला तसं करण्यात यश आलं नाही. (२शमु १५:७-१०) तो हेब्रोनला का गेला? त्याचा जन्म तिथे झाला होता आणि हे शहर पूर्वी यहूदाची राजधानी असल्यामुळे इतिहासात त्याला महत्त्वाचं स्थान होतं. या कारणांमुळे कदाचित तो हेब्रोनला गेला असावा.
आध्यात्मिक रत्नं
तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?
११ कधीकधी लोक कदाचित तुमच्याबद्दल अर्धसत्य सांगतील आणि याचं तुम्हाला खूप वाईट वाटू शकतं. मफीबोशेथसोबत जे झालं त्याचा विचार करा. शौल हा मफीबोशेथचा आजोबा होता आणि त्याची सर्व जमीन दावीद राजाने मफीबोशेथला दिली होती. (२ शमु. ९:६, ७) पण काही काळानंतर दावीदने मफीबोशेथबद्दल काही नकारात्मक गोष्टी ऐकल्या. या गोष्टी खऱ्या आहेत की नाही, याची खात्री न करता दावीदने मफीबोशेथची सर्व संपत्ती परत घेतली. (२ शमु. १६:१-४) नंतर जेव्हा दावीद त्याच्याशी बोलला तेव्हा त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. म्हणून मग त्याने काही संपत्ती मफीबोशेथला परत दिली. (२ शमु. १९:२४-२९) दावीदने लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी संपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, तर मफीबोशेथला हा अन्याय सहन करावा लागला नसता.