वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr20 मे पृ. १-७
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
  • उपशिर्षक
  • ४-१० मे
  • ११-१७ मे
  • १८-२४ मे
  • २५-३१ मे
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
mwbr20 मे पृ. १-७

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

४-१० मे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  उत्पत्ति ३६-३७

“योसेफला आपल्या भावांचा द्वेष सहन करावा लागतो”

टेहळणी बुरूज१४-E ८/१ पृ. १२-१३

“मला पडलेले स्वप्न ऐका”

बायबल सांगतं की, जेव्हा योसेफच्या भावांनी आपल्या वडिलांचं योसेफवर जास्त प्रेम असल्याचं पाहिलं, तेव्हा “ते त्याचा द्वेष करू लागले.” आणि त्यांनी योसेफशी प्रेमाने बोलायचंसुद्धा सोडून दिलं. (उत्पत्ति ३७:४) योसेफ त्याच्या वडिलांचा आवडता असल्यामुळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करायचे, ही गोष्ट समजण्यासारखी आहे. पण द्वेषाच्या या विषारी भावनेला स्वतःच्या मनात पोसत राहणं शहाणपणाचं नव्हतं. (नीत १४:३०; २७:४) तुमच्याही मनात कधी अशा प्रकारची ईर्ष्या निर्माण झाली आहे का? खासकरून आपल्यापेक्षा दुसऱ्‍याला जास्त मान-सन्मान मिळतो तेव्हा? योसेफच्या भावांच्या बाबतीत काय झालं ते आठवा. द्वेषाच्या भावनेत त्यांनी जे केलं, त्याचा नंतर त्यांना खूप पस्तावा झाला. त्यांचं हे उदाहरण, ख्रिश्‍चनांना या गोष्टीची आठवण करून देतं की त्यांनी ‘आनंद करणाऱ्‍यांसोबत आनंद करणंच’ जास्त शहाणपणाचं आहे.—रोम १२:१५

आपले भाऊ आपल्यावर जळतात, ही गोष्ट योसेफने नक्कीच ओळखली असेल. पण म्हणून आपल्या भावांबरोबर असताना, वडिलांनी दिलेला तो खास झगा योसेफ लपवून ठेवायचा का? कदाचित तसं करावं, असं त्याला वाटलंसुद्धा असेल. पण आपल्या वडीलांचं म्हणजे याकोबचं आपल्यावर जिवापाड प्रेम आहे आणि तो झगा त्या प्रेमाची एक निशानी आहे, हे त्याला माहीत होतं. तेव्हा, वडिलांचा आपल्यावर असलेला भरवसा त्याला काहीही करून तोडायचा नव्हता. म्हणून त्याच्या भावांची प्रवृत्ती माहीत असतानाही, तो वडिलांनी दिलेला झगा घालत राहिला. त्याचं उदाहरण आपल्यासाठी फायद्याचं आहे. हे खरं आहे, की आपला स्वर्गीय पिता यहोवा, कधीच भेदभाव करत नाही. पण कधीकधी तो आपल्या विश्‍वासू सेवकांना इतरांपासून वेगळं करून त्यांच्यावर आपली जास्त मर्जी असल्याचं दाखवतो. एवढंच नाही, तर त्यांनी या भ्रष्ट आणि अनैतिक जगापासून स्वतःला वेगळं करावं अशीही त्याची अपेक्षा असते. योसेफच्या त्या खास झग्याप्रमाणे, खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं आचरणच त्यांना जगातल्या लोकांपासून वेगळं करतं. पण अशा आचरणामुळे जगातल्या लोकांना आपल्याबद्दल ईर्ष्या वाटते किंवा ते आपला द्वेष करतात. (१पेत्र ४:४) पण म्हणून खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी आपली ओळख लपवावी का? नाही. कारण योसेफनेसुद्धा तो खास झगा लपवला नव्हता.—लूक ११:३३.

टेहळणी बुरूज१४-E ८/१ पृ. १३ परि. २-४

“मला पडलेले स्वप्न ऐका”

ही स्वप्नं थेट यहोवाकडून होती, आणि ती भविष्याबद्दल होती. शिवाय त्यातला संदेश योसेफने इतरांपर्यंत पोचवावा, अशी यहोवाची इच्छा होती. थोडक्यात, योसेफला तेच करायचं होतं जे नंतर येणाऱ्‍या संदेष्ट्यांनी केलं. त्यांनी देवाच्या आज्ञेविरूद्ध वागणाऱ्‍या लोकांना देवाचा न्यायदंड सुनावला.

योसेफ आपल्या भावांना म्हणाला: “मला पडलेले स्वप्न ऐका.” जेव्हा त्याच्या भावांनी ते स्वप्न ऐकलं आणि त्यांना त्याचा अर्थ कळाला, तेव्हा तो त्यांना तो बिलकुल आवडला नाही. त्यांनी म्हटलं: “काय, तू आमच्यावर राज्य करणार? तू आमच्यावर सत्ता चालवणार?” आणि त्यामुळे “ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले.” पुन्हा जेव्हा योसेफने त्याचं दुसरं स्वप्न आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितलं, तेव्हासुद्धा त्यांची प्रतिक्रिया सारखीच होती. पुढे म्हटलंय, की “त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय, मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करायला तुझ्यापुढे येणार.” पण पुढे, याकोब मनातल्या मनात या गोष्टीचाही विचार करत राहिला, की यहोवानेच जर या मुलाला ही गोष्ट कळवली असेल तर?—उत्पत्ति ३७:६, ८, १०, ११.

यहोवाला योसेफद्वारे जो संदेश कळवायचा होता, तो इतरांसाठी चांगला नव्हता आणि त्यामुळे योसेफलाही छळ सहन करावा लागला. पण असा संदेश सांगणारा योसेफ हा पहिलाच किंवा शेवटला संदेष्टा नव्हता. संदेश सांगणाऱ्‍यांमध्ये येशूचं उदाहरण सर्वात श्रेष्ठ आहे. त्याने आपल्या शिष्यांना म्हटलं होतं: “जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील.” (योह १५:२०) आज आपण कोणत्याही वयोगटातले असलो, तरी योसेफने दाखवलेल्या धैर्यातून आणि त्याच्या विश्‍वासातून आपण बरंच काही शिकू शकतो.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. ६७८

अदोम

(अदोम) [तांबडा], अदोमी.

अदोम, हे याकोबचा जुळा भाऊ एसावला दिलेलं दुसरं नाव किंवा टोपणनाव आहे. (उत्प ३६:१) तांबड्या वरणाच्या बदल्यात त्याने आपला जेष्ठत्त्वाचा हक्क विकला, त्यामुळे त्याला हे नाव देण्यात आलं. (उत्प २५:३०-३४) आणि योगायोग असा की जन्माच्या वेळीसुद्धा एसावचा रंग तांबूसच होता. (उत्प २५:२५) शिवाय, तो आणि त्यांचे वंशज ज्या भागात नंतर स्थायिक झाले, तिथल्या जमिनीचा आणि खडकांचा रंगसुद्धा तांबूसच होता.

इन्साइट-१ पृ. ५६१-५६२

ताबा

पूर्वीच्या काळात जेव्हा एखादा मेंढपाळ कळपाची राखण करायची जबाबदारी घ्यायचा, तेव्हा त्या कळपातल्या प्राण्याची जबाबदारी कायद्यानी त्याच्यावर असायची. कारण त्यामुळे मालकाला, प्राणी चोरीला जाणार नाहीत आणि त्यांची योग्य काळजी घेतली जाईल या गोष्टीची हमी मिळायची. पण ही गोष्ट प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असं नव्हतं. उदाहरणार्थ, जर प्राण्याने कळपावर हल्ला केला, तर मेंढपाळाला जबाबदार धरलं जात नव्हतं. कारण अशा घटनांना तोंड देणं त्याच्या आवाक्याबाहेर होतं. पण अशा वेळी त्याला, जगली प्राण्याने खाल्लेलं मृत शरीर, पुरावा म्हणून मालकाला दाखवणं गरजेचं होतं. तेव्हाच त्याला या कायदेशीर जबाबदारीतून सूट मिळायची. यासोबतच, पुराव्याची पाहणी केल्यानंतर मालकालासुद्धा तो मेंढपाळ निर्दोष असल्याचं नियमाने जाहीर करावं लागायचं.

एखाद्याला सोपवलेल्या कोणत्याही मालमत्तेच्या बाबतीतही हाच नियम लागू व्हायचा. एवढंच नाही, तर कुटुंबामध्येही हाच नियम पाळला जायचा. उदाहरणार्थ लहान भाऊ-बहिणींची जबाबदारीसुद्धा या नियमानुसार मोठ्या मुलावर असायची. यावरून रऊबेनला योसेफच्या जीवाची इतकी काळजी का वाटत होती, हे समजण्यासारखं आहे. जेव्हा इतर भाऊ योसेफला ठार मारायचा कट रचत होते, तेव्हा उत्पत्ति ३७:१८-३० मध्ये असं म्हटलं आहे की, “तो त्यांस म्हणाला, आपण त्याला जिवे मारु नये . . . रक्‍त्‌तपात करु नका . . . त्याजवर हात टाकू नका. त्यांच्या हातातून सोडवून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला.” आणि योसेफ खाड्यात नाही हे जेव्हा रऊबेन पाहतो, तेव्हा तो ‘आपली वस्त्रे फाडतो’ आणि मोठ्याने ओरडून म्हणतो की ‘मुलगा तर नाही, आता मी कुठं जाऊ?’ कारण योसेफच्या जिवाबद्दल आपल्याला जाब द्यावा लागेल हे त्याला माहित होतं. त्यामुळे या जबाबदारीतून रऊबेनला सुटता यावं म्हणून, योसेफला जगली प्राण्याने ठार मारल्याचे खोटा पुरावा, त्याच्या भावांनी धूर्तपणे तयार केला. त्यासाठी त्यांनी त्याचा फाटलेला झगा बकऱ्‍याच्या रक्‍तात भिजवला. आणि पुरावा म्हणून तो त्यांच्या वडिलांना म्हणजे याकोबला दाखवला. आणि मग याकोबनेही या आधारावर, योसेफ खरंच मेला आहे असं समजून, रऊबेनला त्या दोषापासून मुक्‍त केलं.—उत्प ३७:३१-३३.

११-१७ मे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  उत्पत्ति ३८-३९

“यहोवाने योसेफला कधीच सोडलं नाही”

टेहळणी बुरूज१४-E ११/१ पृ. १२ परि. ४-५

“एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू?”

“इकडे योसेफास मिसरात नेले तेव्हा ज्या इश्‍माएली लोकांनी त्याला तिथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिसर्‌याने विकत घेतले; तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता.” (उत्पत्ति ३९:१) बायबल अहवालातल्या या शब्दांवरूनच, त्या तरूण व्यक्‍तीला पुन्हा विकलं जातं असताना किती अपमानास्पद वाटलं असेल याची कल्पना येते. त्यांच्यासाठी तो फक्‍त एका वस्तूसारखा होता! गजबजलेल्या बाजारातून आपल्या नवीन मालकाच्या पाठोपाठ, त्याच्या घरी जात असतानाचं दृश्‍य आपल्या डोळ्यासमोर उभं केलं तर त्याला कसं वाटलं असेल याची कल्पना आपण करू शकतो.

टेहळणी बुरूज१४-E ११/१ पृ. १४-१५

“एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू?”

त्या काळात इजिप्तमधले तुरुंग कसे होते याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. पण उत्खननात मिळालेले प्राचिन अवशेष दाखवतात, की या तुरुंगांची रचना खोल्या आणि अंधारकोठड्या असलेल्या एका किल्ल्यासारखी होती. नंतर योसेफने या जागेचं वर्णन करण्यासाठी असा शब्द वापरला ज्याचा शब्दशः अर्थ “खड्डा” किंवा “कुंड” असा होतो. यावरून कळतं की बंदिवानांसाठी असलेल्या या काळोख्या जागांमध्ये उजेड तर नव्हताच पण काही आशाही दिसत नव्हती. (उत्पत्ति ४०:१५, तळटीप) स्तोत्राच्या पुस्तकात आपल्याला असं वाचायला मिळतं की योसेफला पुढे आणखी छळ सहन करावा लागला, कारण “त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली. त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकवले.” (स्तो १०५:१७, १८) इजिप्तचे लोक कधीकधी त्यांच्या कैद्यांना बंदी बनवण्यासाठी त्यांच्या हाताचे कोपरे मागच्या बाजूला बांधायचे. किंवा त्यांच्या गळात लोखंडी कडे अडकवायचे. विचार करा काही केलेलं नसतानाही इतकी वाईट वागणूक सहन करावी लागल्यामुळे योसेफला कसं वाटत असेल!

पण गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही. अहवाला पुढे सांगतो, की “तो त्या बंदिशाळेत राहिला.” त्याने कित्येक वर्षं त्या भयानक कोठडीतच काढली! आणि यातून पुढे आपली सुटका होईल की नाही, हेसुद्धा त्याला माहीत नव्हतं. दिवसांचे आठवडे झाले, आणि आठवड्यांचे महिने झाले, पण आशेचा एकही किरण त्याला दिसत नव्हता. मग अशा कोठडीत पडून राहणं त्याला कसं शक्य झालं असेल?

बायबलचा अहवालच याचं उत्तर आपल्याला देतो: “परमेश्‍वर योसेफबरोबर असून,” तो त्याला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला. (उत्प ३९:२१) कारण तुरुंगाच्या कोणत्याही भिंती, ना बेड्या, ना त्या अंधारलेल्या कोठड्या यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाला त्याच्या सेवकांपर्यंत पोचण्यापासून अडवू शकत होत्या.—रोम ८:३८, ३९.

टेहळणी बुरूज१४-E ११/१ पृ. १५ परि. २

“एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू?”

बायबलचा अहवालच याचं उत्तर आपल्याला देतो: “परमेश्‍वर योसेफबरोबर असून,” तो त्याला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला. (उत्प ३९:२१) कारण तुरुंगाच्या कोणत्याही भिंती, ना बेड्या, ना त्या अंधारलेल्या कोठड्या यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाला त्याच्या सेवकांपर्यंत पोचण्यापासून अडवू शकत होत्या. (रोम ८:३८, ३९) कल्पना करा की योसेफ, अशा अवस्थेत आपल्या स्वर्गीय पित्याला आपल्या वेदना व्यक्‍त करत असेल. आणि त्याने केलेल्या प्रार्थनेच्या बदल्यात त्याला एक वेगळ्याच प्रकारची शांती अनुभवायला मिळत असेल. एक अशी शांती, जी फक्‍त “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव” यहोवाच देऊ शकतो. (२कर १:३, ४; फिलि ४:६, ७) पण यासोबतच यहोवाने योसेफसाठी आणखी एक गोष्ट केली. अहवाल सांगतो, की त्याने ‘तुरुंगाच्या अधिकाऱ्‍यांची त्याच्यावर कृपा होईल’ असं केलं.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-२ पृ. ५५५

ओनान

(ओनान) [“उत्पादनशील शक्‍ती, गतिमान उर्जा“ असा मूळ अर्थ असलेला शब्द.]

शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याच्या मुलीपासून यहूदाला झालेला हा दुसरा मुलगा. (उत्प ३८:२-४; १इत २:३) ओनानचा मोठा भाऊ एर, याने केलेल्या वाईट गोष्टीमुळे, यहोवा त्याला ठार मारतो. एर याला एकही मुल नव्हतं. तेव्हा यहूदाने ओनानला त्याच्या भावाची विधवा बायको तामार हिच्यासोबत लग्न करून दिराचं कर्तव्य पूर्ण करायला सांगितलं. जर त्याच्यापासून तामारला मुलगा झाला असता तर त्याने ओनानचा नाही, तर एरचा वंश चालवला असता. आणि त्यामुळे जेष्ठ पुत्राचा वारसाहक्क ओनानला नाही तर त्याला मिळला असता. पण तेच जर ओनानला तामारपासून काहीच संतती झाली नसती तर आपल्या वडिलांच्या मालमत्तेचा पूर्ण हक्क ओनानलाच मिळाला असता. जेव्हा ओनान तामारशी संबंध ठेवायचा, तेव्हा तो ‘आपले वीर्य जमिनीवर पाडायचा.’ यावरून तो हे जाणूनबुजून करत होता हे समजतं. अशा प्रकारे, ओनानला स्वत:लाही काही मुल नसताना, आपल्या वडिलांची आज्ञा न मानल्याबद्दल, मालमत्तेसाठी असलेल्या त्याच्या लोभाबद्दल आणि देवाने केलेल्या लग्नाच्या पवित्र व्यवस्थेविरूद्ध पाप केल्याबद्दल, यहोवाने त्याला ठार मारलं.—उत्प ३८:६-१०; ४६:१२; गण २६:१९.

१८-२४ मे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  उत्पत्ति ४०-४१

“यहोवा योसेफची सुटका करतो”

टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. १४ परि. ४-५

“अर्थ सांगणे देवाकडे आहे ना?”

राजाचा प्यालेबरदार योसेफला विसरला असला, तरी यहोवा त्याला विसरला नव्हता. एके दिवशी त्याने फारोला दोन भयंकर स्वप्न दाखवली. पहिल्या स्वप्नात तो सात सुंदर व धष्टपुष्ट गायींना आणि त्यांच्या पाठोपाठ कुरूप आणि दुबळ्या गायींना नाईल नदीतून बाहेर येताना पाहतो. तर दुसऱ्‍या स्वप्नात तो सात चांगली कणसं आणि सात बारीक व वाळलेली कणसं पाहतो. दुसऱ्‍या दिवशी फारो या स्वप्नांमुळे खूप अस्वस्थ होतो. आणि या स्वप्नांचा अर्थ समजून घेण्यासाठी दरबारातल्या सगळ्या मंत्रतंत्र करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांना आणि विद्वानांना बोलवतो. पण त्यापैकी एकालाही त्या स्वप्नांचा अर्थ सांगता येत नाही. (उत्प ४१:१-८) फारोच्या हाती शेवटी निराशाच लागते. पण त्यामुळे या गूढ स्वप्नांचा अर्थ समजून घ्यायला तो आणखीनच आतुर होतो.

शेवटी, त्या प्यालेबरदारलाच योसेफची आठवण होते, आणि त्याचा विवेक त्याला बोचू लागतो. तो फारोला तुरूंगात असलेल्या योसेफबद्दल सागंतो, ज्याने दोन वर्षांआधी त्याला आणि मुख्य आचाऱ्‍याला त्यांच्या स्वप्नांचा अर्थ अगदी अचूक सांगितला होता. त्यानंतर फारो तोबडतोब योसेफला त्याच्या समोर हजर करण्याची आज्ञा देतो.—उत्प ४१:९-१३.

टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. १४-१५

“अर्थ सांगणे देवाकडे आहे ना?”

नम्र आणि विश्‍वासू लोकांवर यहोवा प्रेम करतो. त्यामुळेच त्याने योसेफला त्या स्वप्नाचा अर्थ कळवला. एक अशी गोष्ट कळवली, जी दरबारातल्या सर्वात ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांनाही समजणं शक्य नव्हती. मग योसेफने फारोला सांगितलं की त्या दोन्ही स्वप्नाचा एकच अर्थ होतो. एकच संदेश दोनदा कळवण्यामागे यहोवाला हे सूचवायचं होतं, की हे स्वप्न कोणत्याही परिस्थितीत अगदी खात्रीने पूर्ण होईल. स्वप्नातल्या सात धष्टपुष्ट गायी आणि सात चांगली कणसं इजिप्तवर येणाऱ्‍या सात भरभराटीच्या वर्षांना सूचित करत होती. तसंच सात कुरूप व दुबळ्या गायी आणि सात सुकलेली कणसं इजिप्तवर त्यानंतर येणाऱ्‍या सात दुष्काळाच्या वर्षांना सूचित करत होती. आणि या दुष्काळामुळे तो संपूर्ण देश उद्ध्‌वस्त होणार होता.—उत्प ४१:२५-३२.

टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. १५ परि. ३

“अर्थ सांगणे देवाकडे आहे ना?”

फारोने दिलेला शब्द पाळला. आणि लगेच योसेफला तलम तागाची वस्त्रे घालण्यात आली. फारोने त्याच्या गळ्यात सोन्याचा हार घातला. त्याच्या बोटात मुद्रेची अंगठी घातली आणि त्याला राजाचा एक शाही रथ दिला. तसंच त्याला संपूर्ण इजिप्त देशात, त्याची योजना राबण्याचा अधिकार दिला. (उत्प ४१:४२-४४) एका दिवसातच योसेफ तुरुंगातून थेट राज दरबारात पोचला होता. त्या दिवसाची सुरवात त्याच्यासाठी एक आरोपी म्हणून झाली होती पण दिवस मावळला तेव्हा तो फारोखालचा सर्वात मोठा अधिकारी बनला होता. योसेफने यहोवावर दाखवलेल्या विश्‍वासाचं ते प्रतिफळ होतं! कित्येक वर्षांच्या त्या सबंध काळात त्याच्या या सेवकावर झालेला अन्याय यहोवाच्या नजरेतून सुटला नव्हता. यहोवाने अगदी योग्य वेळला आणि अगदी योग्य पद्धतीने त्याला न्याय मिळवून दिला होता. यहोवाने त्याच्यावर झालेल्या अन्यायाची भरपाईच केली नव्हती तर त्यासोबत येणाऱ्‍या इस्राएल राष्ट्राचं भविष्यही सुरक्षित केलं होतं.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१५-E ११/१ पृ. ९ परि. १-३

तुम्हाला माहित होतं का?

योसेफ फारोसमोर जाण्याआधी मुंडन का करतो?

फारोने ताबडतोब योसेफला आपल्यासमोर हजर करण्याची आज्ञा दिलेली असतानासुद्धा, योसेफ आपल्या केसांचं मुंडन करण्यासाठी वेळ काढतो. (उत्प ३९:२०-२३; ४१:१, १४) असं दिसतं की लेखकाला इजिप्तच्या चालीरितींची चांगली माहिती होती. म्हणूनच त्याने या अगदी छोट्याशा गोष्टीचाही उल्लेख केला.

प्राचीन काळात इतर राष्ट्रांमध्ये आणि इब्री लोकांमध्येही दाढी वाढवणं एक सर्वसामान्य गोष्ट होती. पण मॅक्लिंटॉक आणि स्ट्राँग यांच्या सायक्लोपीडियामध्ये असं म्हटलं आहे, की याउलट “प्राचिन इजिप्त हे त्या काळच्या राष्ट्रांमध्ये एकमेव राष्ट्र होतं ज्यात दाढी वाढवण्यावर आक्षेप घेतला जायचा.”

पण मुंडन करणं फक्‍त दाढी काढण्यापुरतं मर्यादित होतं का? बिब्लिकल आर्कियोलॉजी रिव्ह्यू नावाच्या एका मासिकात म्हटलं आहे की ज्याप्रमाणे एका व्यक्‍तीला मंदिरात जाण्याआधी, स्वतःला शुद्ध करण्यासाठी काही रीतसर गोष्टी पूर्ण कराव्या लागायच्या, त्याचप्रमाणे फारोसमोर जाण्याआधीसुद्धा त्याला काही गोष्टी करणं गरजेचं होतं. म्हणूनच कदाचित योसेफने आपल्या डोक्यावरचे आणि शरीरावरचे सर्व केस काढले असतील.

२५-३१ मे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  उत्पत्ति ४२-४३

“योसेफ जबरदस्त आत्मसंयम दाखवतो”

इन्साइट-२ पृ. १०८ परि. ४

योसेफ

काही वर्षांआधी योसेफच्या सावत्र भावांनी योसेफला गुलाम म्हणून विकलं होतं. त्यामुळे या गोष्टीचाच बदला देव आता आपल्याकडून घेत आहे असं त्यांना वाटू लागलं. तेव्हा ते, आपल्या अपराधाबद्दल योसेफसमोर आपसात बोलू लागले. कारण त्यांनी तो योसेफ आहे, हे अजून ओळखलं नव्हतं. योसेफ मात्र त्यांचं हे बोलणं ऐकत होता. जेव्हा आपल्या भावांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांना पस्तावा होत असल्याचं योसेफला कळतं, तेव्हा त्याला इतकं दाटून येतं की तो दुसऱ्‍या खोलीत जाऊन रडू लागतो. मग तो बाहेर येऊन त्यांच्या सर्वात लहान भावाला घेऊन यायला सांगतो आणि तोपर्यंत शिमोनला स्वतःकडे बांधून ठेवतो.—उत्प ४२:२१-२४.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-२ पृ. ७९५

रऊबेन

जेव्हा योसेफच्या भावांनी योसेफला ठार मारायचा कट केला, तेव्हा रऊबेनने त्यांना रोखलं. तो आपल्या भावांना त्याला ठार मारण्याऐवजी रानातल्या खड्यात टाकायला सांगतो. कारण नंतर गुपचूप येऊन त्याला त्या खड्यातून बाहेर काढावं, असा त्याचा विचार होता. या गोष्टीवरून रऊबेनमध्ये चांगले गुण होते, हे दिसून येतं. (उत्प ३७:१८-३०) याच्या जवळपास २० वर्षांनंतर योसेफचे भाऊ जेव्हा इजिप्तमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर, ते हेर असल्याचा आरोप लावला जातो. यामुळे योसेफच्या भावांना असं वाटतं की त्यांनी योसेफवर जो अन्याय केला होता, त्याचंच फळ त्यांना आता अशा प्रकारे भोगावं लागत आहे. तेव्हा रऊबेन त्यांना आठवण करून देतो, की योसेफला मारण्याचा जो कट त्यांनी केला होता, त्यात त्याचा हात नव्हता. (उत्प ४२:९-१४, २१, २२) पुढे जेव्हा दुसऱ्‍या वेळेस ते इजिप्तला जात असतात, तेव्हा याकोब बन्यामीनला त्यांच्यासोबत जाऊ देत नाही. तेव्हासुद्धा रऊबेनच पुढे येऊन याकोबला म्हणतो, की जर मी बन्यामीनला परत आणलं नाही, तर “तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका.”—उत्प ४२:३७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा