जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
१३-१९ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति ३१
“याकोब आणि लाबान शांतीचा करार करतात”
इन्साइट-१ पृ. ८८३ परि. १
गलेद
याकोब आणि लाबान यांनी आपसातले मतभेद मिटवून एकमेकांसोबत शांतीचा करार केला. मग याकोबने एक मोठा दगड स्मारक म्हणून उभा केला. आणि त्याने आपल्या भाऊबंदांना दगडांची रास करायला सांगितली. आणि या दगडांच्या राशीचा टेबलासारखा वापर करून ते त्यावर कराराचं जेवण जेवले. मग लाबानने त्या ठिकाणाचं नाव अरामी भाषेत “यगर-सहदूथा” असं ठेवलं. तर याकोबने त्याचं नाव इब्री भाषेत “गलेद” असं ठेवलं. या दोन्ही नावांचा एकच अर्थ होता. लाबानने म्हटलं: “ही रास तुझ्यामाझ्यामध्ये साक्षीला आहे.” (उत्प ३१:४४-४८) त्यामुळे दगडांची रास (आणि उभा केलेला दगड) तिथून ये-जा करणाऱ्या लोकांना या कराराची आठवण करून देणारं एक चिन्ह होतं. तसंच, ४९ वचनात सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणाचं नाव “मिस्पा” [म्हणजे टेहळणी बुरूज] असंही ठेवण्यात आलं. कारण याकोब आणि लाबान, तसंच त्यांच्या कुटुंबांमध्ये कायम शांती टिकून राहील या गोष्टीचा तो एक पुरावा असणार होता. (उत्प ३१:५०-५३) नंतरच्या काळातसुद्धा अशाच प्रकारे साक्षीसाठी दगडांचा वापर केला गेला.—यहो ४:४-७; २४:२५-२७.
इन्साइट-२ पृ. ११७२
मिस्पा (टेहळणी बुरूज असा अर्थ असलेला इब्री शब्द)
याकोबने दगडांची एक रास केली आणि त्याला “गलेद” (म्हणजे “साक्षीची रास”) आणि “मिस्पा” असं नाव दिलं. मग लाबान म्हणाला: “आम्ही एकमेकांपासून दूर असता यहोवा माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये पहारा करो.” (उत्प ३१:४५-४९, पं.र.भा.) याकोब आणि लाबान यांच्यात झालेला शांतीचा करार ते पाळतात की नाही, याकडे यहोवाचं नेहमी लक्ष राहील या गोष्टीला ही दगडांची रास सूचित करत होती.
२०-२६ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति ३२-३३
“तुम्ही आशीर्वाद मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहात का?”
इन्साइट-२ पृ. १९०
लंगडा, लंगडणं
याकोब लंगडत चालू लागला. याकोब जवळपास ९७ वर्षांचा होता, तेव्हा त्याने मानवी रूप धारण केलेल्या एका देवदूताशी रात्रभर कुस्ती केली. आणि जोपर्यंत त्या देवदूताने त्याला आशीर्वाद दिला नाही तोपर्यंत त्याने त्याला जाऊ दिलं नाही. लढत असताना देवदूताने याकोबच्या मांडीच्या सांध्याला स्पर्श केला आणि त्यामुळे त्याचा सांधा निखळला. त्यानंतर याकोब नेहमी लंगडत चालू लागला. (उत्प ३२:२४-३२; होशे १२:२-४) यामुळे त्याला या गोष्टीची नेहमी आठवण राहिली, की त्याने देवदूताला खरोखर हरवलं नव्हतं. पण मग देवदूताने तो “देवाशी [देवदूताशी] व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला” असं का म्हटलं? कारण, फक्त देवाच्या परवानगीमुळे आणि त्याच्या उद्देशामुळेच याकोब देवदूतासोबत लढू शकला होता. आणि देवाच्या आशीर्वादासाठी त्याच्या मनात किती कदर होती, हे तो दाखवू शकला होता.
इन्साइट-१ पृ. १२२८
इस्राएल
१. याकोब जवळपास ९७ वर्षांचा होता, तेव्हा देवाने त्याला हे नाव दिलं होतं. हे नाव त्याला कधी देण्यात आलं? याकोब आपला भाऊ एसाव याला भेटायला यब्बोक नदी पार करून गेला. त्यानंतर त्या रात्री त्याने मानवी रूप धारण केलेल्या देवदूतासोबत कुस्ती केली, तेव्हा देवाने त्याला हे नाव दिलं होतं. याकोब आशीर्वादासाठी लढत राहिला आणि त्याने चिकाटी दाखवली, त्यामुळे देवाने त्याला आशीर्वाद दिला आणि चिन्ह म्हणून त्याचं नाव बदलून इस्राएल ठेवलं. या घटनेची आठवण म्हणून याकोबने त्या जागेचं नाव पनिएल (पनुएल) असं ठेवलं. (उत्प ३२:२२-३१) नंतर बेथेलमध्ये देवाने पुन्हा एकदा याकोबच्या बदललेल्या नावाचा उल्लेख केला आणि त्यानंतर याकोब मरेपर्यंत बऱ्याच वेळा याच नावाने ओळखला गेला. (उत्प ३५:१०, १५; ५०:२; १ कर १:३४) बायबलमध्ये २,५०० पेक्षा जास्त वेळा इस्राएल या नावाचा उल्लेख येतो. पण अनेक वेळा हे नाव याकोबच्या वंशजांनी बनलेल्या राष्ट्राला उद्देशून वापरलं गेलं आहे.—निर्ग ५:१, २.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ९८०
देव, इस्त्राएलचा देव
पनिएल इथे देवदूतासोबत झालेल्या लढाईनंतर, याकोबला इस्राएल हे नाव देण्यात आलं. आपला भाऊ एसाव याच्यासोबत झालेल्या शांतीपूर्ण भेटीनंतर याकोब सुक्कोथ आणि त्यानंतर शेखेममध्ये राहू लागला. तिथे त्याने हमोरच्या मुलांकडून जमिनीचा काही भाग विकत घेतला आणि त्या ठिकाणी आपले तंबू ठोकले. (उत्प ३२:२४-३०; ३३:१-४, १७-१९) तिथे त्याने एक वेदी बांधून तिचं नाव “एल-एलोहो-इस्त्राएल” म्हणजे ‘देव, इस्त्राएलचा देव’ असं ठेवलं. (उत्प ३३:२०) पण याकोबने आपल्या नावावरून वेदीला हे नाव का दिलं? कारण त्याला हे दाखवून द्यायचं होतं, की त्याला मिळालेलं हे नवीन नाव त्याने स्वीकारलं आहे आणि देवाने त्याला वचन दिलेल्या देशात सुखरूप परत आणल्याबद्दलही त्याला कदर आहे. याकोबने वेदीला दिलेलं हे नाव बायबलमध्ये फक्त एकदाच आलं आहे.
२७ एप्रिल–३ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति ३४-३५
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ६०० परि. ४
दबोरा
१. रिबकाची दाई. इसहाकसोबत लग्न करण्यासाठी रिबका जेव्हा आपल्या वडिलांचं घर सोडून पॅलेस्टाईनमध्ये गेली तेव्हा दबोराही तिच्यासोबत होती. (उत्प २४:५९) दबोराने अनेक वर्षं इसहाकच्या घरी सेवा केली आणि रिबकाच्या मृत्यूनंतर याकोबच्या घराण्याचीही सेवा केली. रिबकाचं लग्न झालं त्याच्या जवळपास १२५ वर्षांनंतर दबोराचा मृत्यू झाला आणि तिला बेथेलमधल्या एका मोठ्या झाडाखाली पुरण्यात आलं. या झाडाला “अल्लोन-बाकूथ” म्हणजे ‘रडणारं झाडं’ असं नाव देण्यात आलं. यावरून याकोबच्या कुटुंबासाठी ती किती प्रिय होती हे दिसून येतं.—उत्प ३५:८.