जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
३-९ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति १२-१४
“एक असा करार ज्याचा तुमच्यावरही परिणाम होतो”
इन्साइट-१ पृ. ५२२ परि. ४
करार
अब्राहामसोबत केलेला करार. अब्राम (अब्राहाम) जेव्हा फरात नदी पार करून कनान देशात जायला निघाला तेव्हा हा करार अंमलात आला. याच्या ४३० वर्षांनंतर इस्राएलांना नियमशास्त्र देण्यात आलं. (गल ३:१७) जेव्हा अब्राहाम मेसोपोटेमिया प्रदेशातल्या ऊर इथं राहत होता तेव्हा यहोवाने त्याला एका अशा देशात जायला सांगितलं जो देश तो त्याला दाखवणार होता. (प्रेका ७:२, ३; उत्प ११:३१; १२:१-३) सेप्टुअजिंट बायबलमध्ये निर्गम १२:४०, ४१ या वचनांवरून हे कळतं, की ज्या दिवशी कनान देशात आणि मिसर देशात इस्राएलांना ४३० वर्षं पूर्ण झाली “त्याच दिवशी” मिसरच्या गुलामीतून त्यांची सुटका झाली. हा इ.स.पू. १५१३ सालच्या निसान महिन्यातला १४ वा दिवस होता. याच दिवशी वल्हांडण सण साजरा करण्यात आला. (निर्ग १२:२, ६, ७) यावरून कळतं की याच्या ४३० वर्षांआधी म्हणजे इ.स.पू. १९४३ सालच्या निसान १४ ला अब्राहामने फरात नदी पार केली होती. त्याच दिवसापासून अब्राहामसोबत केलेला करार अंमलात आला. जेव्हा अब्राहाम कनान देशातून प्रवास करत शखेम इथं आला, तेव्हा यहोवाने त्याला पुन्हा दर्शन दिलं आणि आपल्या अभिवचनाबद्दल आणखी माहिती दिली. त्याने अब्राहामला म्हटलं की “हा देश मी तुझ्या संतानाला देणार” आहे. यावरून कळतं की या कराराचा आणि एदेन बागेत सांगितलेल्या संततीचा खूप जवळचा संबंध होता आणि हे संतान मानवी वंशातून येणार होतं. (उत्प १२:४-७) पुढे यहोवाने या संततीबद्दल आणखी माहिती दिली. याबद्दल उत्पत्ति १३:१४-१७; १५:१८; १७:२-८, १९; २२:१५-१८ मध्ये आपल्याला वाचायला मिळतं.
टेहळणी बुरूज८९-E ७/१ पृ. ३ परि. ४
अब्राहामबद्दलचं सत्य तुम्हाला का माहीत असलं पाहिजे?
हे अभिवचन खरंच थक्क करून टाकणारं आहे. यहोवाने अब्राहामला याच अभिवचनाबद्दल दोन वेळा सांगितलं होतं. (उत्पत्ति १८:१८; २२:१८) आपलं हे अभिवचन पूर्ण करण्यासाठी यहोवा अशा लोकांनाही जिवंत करेल ज्यांची कुळं नष्ट झाली आहेत. हा खरंच त्यांच्यासाठी मोठा आशीर्वाद असेल कारण संपूर्ण पृथ्वी पुन्हा एदेन बागेसारखी होईल. आणि मग सदासर्वकाळ जिवंत राहण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे हे त्यांना शिकवलं जाईल.—उत्पत्ति २:८, ९, १५-१७; ३:१७-२३.
इन्साइट-२ पृ. २१३ परि. ३
नियमशास्त्र
ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर काही तज्ञांचं असं म्हणणं आहे की जेव्हा जमिनीची खरेदी-विक्री केली जायची तेव्हा खरेदी करणाऱ्याला एका उंच ठिकाणी नेलं जायचं. आणि तिथून त्याला ती जमीन आणि तिच्या हद्दी दाखवल्या जायच्या. जेव्हा खरेदी करणारा, “मी जागा पाहिली” असं म्हणायचा तेव्हा याचा अर्थ त्याला ही जमीन पसंत आहे आणि त्या जमिनीवर आता त्याचा कायदेशीर हक्क आहे, असा व्हायचा. यहोवाने अब्राहामला कनान देश देण्याचं अभिवचन दिलं, तेव्हा त्याला आपली दृष्टी वर करून हा देश चारी दिशांनी पाहून घ्यायला सांगितला. पण अब्राहामने “मी देश पाहिला” असं म्हटलं नाही. याचं कारण कदाचित हे असावं की देवाने त्याला नाही तर त्याच्या संततीला हा देश देण्याचं अभिवचन दिलं होतं. (उत्प १३:१४, १५) इस्राएल राष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या मोशेलाही देवाने अभिवचन दिलेला देश पाहून घ्यायला सांगितला होता. जर तज्ज्ञांचा अंदाज बरोबर असेल तर याचा अर्थ असा होतो की यहोवा तो देश इस्राएलांना देणार होता आणि यहोशवाच्या नेतृत्वाखाली तो देश ते ताब्यात घेणार होते. (अनु ३:२७, २८; ३४:४; मत्त ४:८ मध्ये सैतानाने येशूला कशा प्रकारे मोहात पाडण्याचा प्रयत्न केला हेसुद्धा पाहा.) याशिवाय, जेव्हा एखादी व्यक्ती जमीन खरेदी करण्याच्या उद्देशाने ती जागा फिरून पाहायची तेव्हासुद्धा ती जागा कायदेशीर रीत्या तिच्या मालकीची व्हायची. (उत्प १३:१७; २८:१३) प्राचीन काळातल्या काही लिखित पुराव्यांनुसार जागा विकताना त्या जागेवर किती झाडं आहेत, याचीसुद्धा नोंद केली जायची.—उत्प २३:१७, १८ सोबत तुलना करा.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. ६८३ परि. १
याजक
मलकीसदेकसारखा दुसरा कोणताच याजक नव्हता कारण तो याजकही (को-हेन) होता आणि शालेमचा राजाही होता. बायबलमध्ये त्याच्या वंशावळीबद्दल, त्याच्या जन्माबद्दल आणि त्याच्या मृत्यूबद्दल काहीच सांगितलेलं नाही. मलकीसदेकला त्याचं याजकपद वारशाने मिळालं नव्हतं आणि त्याच्यानंतरही ते कोणाला वारशाने मिळणार नव्हतं. मलकीसदेकने एकाच वेळी याजक आणि राजा म्हणून कार्य केलं. त्याचं याजकपद लेवी वंशाच्या याजकपदापेक्षा श्रेष्ठ होतं. कारण लेवीने मलकीसदेकला दहावा हिस्सा दिला होता. पण हे कशावरून म्हणता येईल? कारण लेवी खरंतर अब्राहामचा वंशज होता. त्यामुळे अब्राहामने जेव्हा मलकीसदेकला दहावा हिस्सा दिला आणि त्या बदल्यात त्याच्याकडून आशीर्वाद घेतला तेव्हा ही गोष्ट एका अर्थाने लेवीनेच त्याला दहावा हिस्सा दिल्यासारखी होती. (उत्प १४:१८-२०; इब्री ७:४-१०) या गोष्टींच्या बाबतीत मलकीसदेक येशूला सूचित करत होता. कारण मलकीसदेकसारखाच येशूपण याजक होता आणि तो सदासर्वकाळासाठी याजक राहणार होता.—इब्री ७:१७.
टेहळणी बुरूज१२-E १/१ पृ. ८
कोणत्या गोष्टीमुळे सारा इतकी मौल्यवान होती
साराचं लग्न एका अशा व्यक्तीसोबत झालं होतं, ज्याचा विश्वास खूप मजबूत होता. पण विश्वासाच्या बाबतीत तिचंसुद्धा खूप चांगलं उदाहरण आहे. विशेष म्हणजे बायबलमध्ये साराचं नाव तीन वेळा आलं आहे. ती परमेश्वराचं भय मानणारी स्त्री होती आणि तरुण स्त्रियांसाठी ती एक चांगलं उदाहरण होती असं तिच्याबद्दल लिहिलं आहे. (यशया ५१:१, २; इब्री लोकांना ११:११; १ पेत्र ३:३-६) बायबलमध्ये या असामान्य स्त्रीबद्दल जास्त काही लिहिलेलं नाही. पण जे काही लिहिलं आहे त्यावरून तिचं एक सुंदर चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.
उदाहरणार्थ, जेव्हा अब्राहामने साराला सांगितलं की देवाने आपल्याला ऊर देश सोडून जायला सांगितलं आहे, तेव्हा साराला कसं वाटलं असेल याचा विचार करा. आपण कुठं आणि का जात आहोत असा प्रश्न तिच्या मनात डोकावला असेल का? तिला आपल्या गरजा कशा भागतील असा प्रश्न पडला असेल का? आपल्या सोबत्यांपासून आणि नातेवाईकांपासून आपण दूर चाललोय याबद्दल तिला दुःख वाटत असेल का? किंवा या सगळ्यांना आपल्याला पुन्हा भेटता येईल का, अशी चिंता तिला वाटत असेल का? हे सगळे प्रश्न नक्कीच तिच्या मनात आले असतील. पण देव आपल्याला नक्की आशीर्वाद देईल या आशेने, कोणतीही तक्रार न करता तिने यहोवाची आज्ञा मानली.—प्रेषितांची कार्ये ७:२, ३.
सारा देवाची आज्ञा मानणारी स्त्री तर होतीच पण एक चांगली पत्नीसुद्धा होती. अब्राहामपेक्षा आपण चांगल्या प्रकारे घर सांभाळू शकतो, असा विचार तिने कधीही केला नाही. उलट तिने मनापासून आपल्या पतीचा आदर केला आणि तो जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा देऊन सहकार्य केलं. अशा प्रकारे साराने चांगले गुण दाखवून आपल्या व्यक्तिमत्त्वाचं सौंदर्य वाढवलं.—१ पेत्र ३:१-६.
आज सारासारखी मनोवृत्ती दाखवल्यामुळे पत्नींना काय फायदा होतो का? ३० पेक्षा जास्त वर्षांपासून विवाहित असलेली जिल नावाची एक स्त्री म्हणते: “साराच्या उदाहरणातून मी हेच शिकले की कधीही न कचरता मी माझ्या पतीसमोर माझं मत मांडलं पाहिजे. पण यासोबतच मला याचीही जाणीव असली पाहिजे, की कुटुंबाचा प्रमुख या नात्याने अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्या पतीचीच आहे. आणि तो जो काही निर्णय घेईल त्याला मी पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे.”
साराकडून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. ती दिसायला खूप सुंदर जरी असली तरी तिने कधीही आपल्या सौंदर्यांचा गर्व केला नाही. (उत्पत्ति १२:१०-१३) उलट ती नम्र होती. आणि आयुष्याच्या प्रत्येक सुख-दुःखात तिने अब्राहामला साथ दिली.
फेब्रुवारी १०-१६
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति १५-१७
“देवाने अब्राम आणि साराय यांची नावं का बदलली?”
इन्साइट-१ पृ. ८१७
दोष, दोष काढणं
मानवाच्या प्रत्येक गोष्टीत आणि काम करण्याच्या पद्धतीत काही-ना-काही दोष हा असतोच. कारण आदामपासून मानवांना वारशाने पाप मिळालं आहे आणि त्यामुळे ते स्वतः अपरिपूर्ण आहेत. (रोम ५:१२; स्तो ५१:५) पण प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असलेला यहोवा देव मात्र दयाळू आहे. तो आपली प्रकृती जाणतो आणि आपण केवळ माती आहोत ते तो लक्षात ठेवतो. (स्तो १०३:१३, १४) म्हणूनच विश्वासू आणि आज्ञाधारक नोहाला त्याने त्या “काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक” असं ठरवलं. (उत्प ६:९) देवाने अब्राहामला म्हटलं की “तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा.” (उत्प १७:१) नोहा आणि अब्राहाम अपरिपूर्ण होते आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. तरीसुद्धा यहोवाच्या नजरेत ते निर्दोष होते, कारण यहोवा “हृदय पाहतो.” (१शमु १६:७ ची तुलना २रा २०:३ आणि २इत १६:९ सोबत करा.) तसंच इस्राएल राष्ट्रालाही देवाने म्हटलं, की “तू आपला देव परमेश्वर याच्याशी सात्विकतेने वाग.” (अनु १८:१३; २शमु २२:२४) देवाने आपल्या निष्कलंक आणि निर्दोष पुत्राला खंडणी बलिदान म्हणून दिलं. (इब्री ७:२६) या बलिदानावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना तो निर्दोष आणि सात्विक ठरवतो. पण असं करत असताना तो आपल्या स्तरांशी तडजोड करत नाही. कारण तो नीतिमान आणि न्यायी देव आहे.—रोम ३:२५, २६.
इन्साइट-१ पृ. ३१ परि. १
अब्राहाम
बराचसा काळ निघून गेला आहे. अब्राहाम आणि सारा यांना कनान देशात येऊन १० वर्षं झाली आहेत, पण सारा अजून वांझ आहे. म्हणून ती अब्राहामला अशी विनंती करते की त्याने मिसरी दासी हागारद्वारे आपला वंश पुढे चालवावा. अब्राहामने साराची विनंती ऐकली आणि इ.स.पू. १९३२ मध्ये इश्माएलचा जन्म झाला. त्या वेळी अब्राहाम ८६ वर्षांचा होता. (उत्प १६:३, १५, १६.) मग आणखी काही काळ गेल्यानंतर, इ.स.पू. १९१९ मध्ये यहोवाने अब्राहामला अशी आज्ञा दिली की त्याने व त्याच्या घराण्यातल्या सर्व पुरुषांनी सुंता करावी. तेव्हा अब्राहाम ९९ वर्षांचा होता. सुंता, यहोवाने अब्राहामसोबत केलेल्या खास कराराचं चिन्ह होतं. याच वेळी यहोवाने अब्रामचं नाव बदलून अब्राहाम असं ठेवलं. कारण यहोवाने त्याला म्हटलं, की ‘मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केलं आहे.’ (उत्प १७:५, ९-२७; रोम ४:११) यानंतर आणखी थोडा काळ गेल्यानंतर, अब्राहामच्या घरी तीन देवदूत आले आणि त्याने यहोवाच्या नावाने त्यांचा पाहुणचार केला. देवदूतांनी त्याला यहोवाचा संदेश दिला, की पुढच्याच वर्षी सारा गरोदर राहील आणि तिला एक मुलगा होईल.—उत्प १८:१-१५.
टेहळणी बुरूज०९-E २/१ पृ. १३
नावात काही विशेष आहे का?
भविष्यात होणाऱ्या एखाद्या गोष्टीला किंवा घटनेला सूचित करण्यासाठी यहोवाने काही लोकांची नावं बदलली आहेत. उदाहरणार्थ, अब्रामच्या नावाचा अर्थ “श्रेष्ठ पिता” असा होतो. यहोवाने त्याचं नाव बदलून अब्राहाम म्हणजे “राष्ट्रसमूहाचा जनक” असं ठेवलं. या नावाच्या अर्थानुसार अब्राहाम खरोखरच अनेक राष्ट्रांचा पिता बनला. (उत्पत्ति १७:५, ६) त्याचप्रमाणे, अब्राहामच्या पत्नीचं नाव साराय होतं. ज्याचा अर्थ कदाचित भांडखोर असा होत असावा. पण मग यहोवाने तिचं नाव बदलून ‘सारा’ असं ठेवलं, ज्याचा अर्थ “राणी” असा होतो. यावरून कळतं की ती पुढे येणाऱ्या राजांची पूर्वज बनणार होती. हे नवीन नाव मिळाल्यावर सारा किती खूश झाली असेल, याचा विचार करा!—उत्पत्ति १७:१५, १६.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ४६०-४६१
काळाची मोजणी
यहोवाने अब्रामला (अब्राहामला) म्हटलं: ‘तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तिथल्या लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षं त्यांना छळतील.’ (उत्प १५:१३; प्रेका ७:६, ७ सुद्धा पाहा.) यहोवाने ही गोष्ट अभिवचन दिलेल्या संततीच्या जन्माआधी म्हणजे इसहाकच्या जन्माआधी सांगितली होती. इ.स.पू. १९३२ मध्ये मिसरी दासी हागारला एक मुलगा झाला, ज्याचं नाव इश्माएल ठेवण्यात आलं. यानंतर इ.स.पू. १९१८ मध्ये इसहाकचा जन्म झाला. (उत्प १६:१६; २१:५) इ.स.पू. १५१३ मध्ये जेव्हा अब्राहामच्या संततीला मिसरच्या गुलामीतून मुक्त करण्यात आलं तेव्हा छळ करण्याचा हा काळ संपला. (उत्प १५:१४) जर आपण या घटनेपासून ४०० वर्षं मागे मोजणी केली तर आपण इ.स.पू. १९१३ मध्ये येतो. असं दिसतं की त्या वेळी इसहाक परक्या देशात एक “विदेशी” म्हणून राहत होता आणि त्या वेळी तो जवळपास ५ वर्षांचा असावा. याच काळात १९ वर्षांच्या इश्माएलने त्याची चेष्टा केली. आणि भविष्यवाणी केल्याप्रमाणे याच घटनेपासून अब्राहामच्या संततीला छळण्याचा काळ सुरू झाला. (उत्प २१:८, ९) काही जण कदाचित म्हणतील की, इश्माएलने इसहाकची चेष्टा करणं खूप गंभीर गोष्ट थोडीच होती? पण अब्राहामच्या काळात ही सामान्य गोष्ट नव्हती. कारण ही गोष्ट जेव्हा साराने पाहिली तेव्हा तिने लगेच अब्राहामला हागार आणि तिच्या मुलाला घराबाहेर काढायला सांगितलं. (उत्प २१:१०-१३) बायबलमध्ये या घटनेची प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट का सांगितली आहे? कारण यावरून अब्राहामच्या संततीला ४०० वर्षं छळण्याचा काळ कधीपासून सुरू होतो ते कळतं. आणि हा काळ तेव्हा संपला, जेव्हा इस्राएली लोकांना मिसरच्या दास्यत्वातून सोडवण्यात आलं.—गल ४:२९.
इन्साइट-१ पृ. ७७८ परि. ४
मिसरच्या गुलामीतून इस्राएलांची सुटका
‘चौथी पिढी.’ आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यहोवाने अब्राहामला असं सांगितलं होतं की त्याच्या वंशाची चौथी पिढी कनान देशात परत येईल. (उत्प १५:१६) त्या काळातल्या लोकांचं आयुष्य जास्त होतं. पण तरी नमूद केलेल्या अहवालानुसार असं दिसतं की अब्राहामसोबत केलेला करार अंमलात आल्यापासून, इस्राएलची गुलामीतून सुटका होईपर्यंत म्हणजे ४३० वर्षांच्या काळादरम्यान, चारपेक्षा जास्त पिढ्या अस्तित्वात होत्या. पण इस्राएली लोकांनी मिसरमध्ये घालवलेल्या काळाचा विचार केला तर तो काळ फक्त २१५ वर्षांचाच होता. त्यामुळे इस्राएली लोकांनी इजिप्तमध्ये प्रवेश केल्यापासून येणाऱ्या पिढ्यांचा विचार केला तर यहोवाने अब्राहामला सांगितलेली गोष्ट खरी ठरल्याचं दिसून येतं. याचं एक उदाहरण म्हणून इस्राएलच्या लेवी कुळाचा विचार करता येईल. त्या पिढ्या होत्या: (१) लेवी, (२) कहाथ, (३) अम्राम आणि (४) मोशे.—निर्ग ६:१६, १८, २०.
फेब्रुवारी १७-२३
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज८८-E ५/१५ पृ. २३ परि. ४-५
देवाला कोणी कधी पाहिलं आहे का?
मानवी रुप धारण केलेल्या देवदूतासोबत बोलताना अब्राहाम जणू प्रत्यक्ष यहोवासोबत बोलत असल्यासारखं का बोलत होता, हे आता आपण समजू शकतो. या देवदूताला स्वतः यहोवाने पाठवलं होतं. आणि देवाचा प्रतिनिधी या नात्याने यहोवाला जे काही सांगायचं होतं ते जसंच्या-तसं त्याने अब्राहामला सांगितलं. म्हणून बायबलमध्ये असं म्हटलंय, की देवाने अब्राहामला ‘दर्शन दिलं.’—उत्पत्ति १८:१.
फोन किंवा रेडिओद्वारे एका व्यक्तीचा आवाज दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जसाच्या-तसा पोचवला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे देवदूतांद्वारे देवाचा संदेश मानवांपर्यंत जसाच्या-तसा पोचवला जाऊ शकतो. त्यामुळेच अब्राहाम, मोशे, मानोहा आणि देवाचे इतर सेवक देवदूतांसोबत अशा प्रकारे बोलू शकले जणू ते थेट देवासोबत बोलत आहेत. हे खरं आहे की ते मानवी रूप धारण केलेल्या देवदूतांना आणि त्यांच्याद्वारे यहोवाच्या तेजाला पाहू शकले. पण त्यांनी प्रत्यक्ष यहोवाला कधीच पाहिलं नाही. त्यामुळे प्रेषित योहानने म्हटलेली गोष्ट खरी ठरली. त्याने म्हटलं: “कोणत्याही मानवाने कधीही देवाला पाहिले नाही.” (योहान १:१८) यावरून असं म्हणता येईल, की अब्राहाम, मोशे आणि मानोहा यांनी यहोवा देवाला नाही तर त्याचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या देवदूतांना पाहिलं.
२४ फेब्रुवारी–१ मार्च
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज८९-E ७/१ पृ. २० परि. ९
अब्राहाम—देवासोबत मैत्री करणाऱ्यांसाठी एक उदाहरण
९ अब्रामने आणखी एका मार्गाने आपला विश्वास दाखवला. बायबल म्हणतं, की “त्याने तिथे परमेश्वराची एक वेदी बांधली.” (उत्पत्ति १२:७) “वेदी” असं भाषांतर केलेल्या मूळ शब्दाचा अर्थ ‘बलिदान करण्याची जागा’ असा होतो. त्यामुळे अब्रामने या वेदीवर प्राण्याचं अर्पण केलं असावं असं दिसतं. यानंतर अब्रामने ज्या-ज्या ठिकाणी वस्ती केली आणि ज्या-ज्या ठिकाणी तो गेला त्या-त्या ठिकाणी त्याने आपल्या विश्वास दाखवण्यासाठी वेदी बांधली आणि “परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.” (उत्पत्ति १२:८; १३:१८; २१:३३) ज्या इब्री शब्दांचं भाषांतर “नावाने प्रार्थना केली” असं करण्यात आलं आहे, त्यांचा अर्थ “नावाची घोषणा (प्रचार) करणं” असा होतो. अब्रामच्या घराण्याने आणि कनानी लोकांनी नक्कीच अब्रामला यहोवाच्या नावाची धैर्याने घोषणा करताना पाहिलं असेल. (उत्पत्ति १४:२२-२४) त्याच प्रकारे आज ज्या लोकांना देवासोबत मैत्री करायची आहे त्यांनीसुद्धा विश्वासाने “परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली” पाहिजे. यात प्रचारकार्याचाही समावेश होतो. म्हणजे एका अर्थाने आपण देवाला “स्तुतीचे बलिदान” अर्पण केलं पाहिजे, म्हणजेच “त्याच्या नावाची जाहीर रीत्या घोषणा करणाऱ्या आपल्या ओठांचे फळ अर्पण” केले पाहिजे.—इब्री लोकांना १३:१५; रोमकर १०:१०.