वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr20 जानेवारी पृ. १-६
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
  • उपशिर्षक
  • ६-१२ जानेवारी
  • १३-१९ जानेवारी
  • २०-२६ जानेवारी
  • २७ जानेवारी-२ फेब्रुवारी
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
mwbr20 जानेवारी पृ. १-६

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

६-१२ जानेवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं   |उत्पत्ति १-२

“यहोवा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करतो”

इन्साइट-१ पृ. ५२७-५२८

निर्मिती

निर्मितीच्या पहिल्या दिवशी देवाने म्हटलं, की “प्रकाश होवो,” तेव्हा नक्कीच पृथ्वीच्या दाट वातावरणातून मंद असा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पसरला असेल. पण तरीसुद्धा पृथ्वीच्या दाट वातावरणातून येणाऱ्‍या प्रकाशाचा उगम कुठं आहे, हे पाहात येत नव्हतं. याबद्दल जे. डब्लू. वॉट्‌स नावाच्या एका भाषांतरकाराने म्हटलं, की मग पृथ्वीच्या वातावरणात “हळूहळू प्रकाश दिसू लागला.” (उत्प १:३, अ डिस्टिंक्टिव ट्रान्सलेशन ऑफ जेनेसिस) यावरून दिसून येतं की ही एक हळूवार घडत जाणारी क्रिया होती. मग देवाने प्रकाश आणि अंधार यांना वेगळं केलं आणि त्यांना दिवस आणि रात्र अशी नावं दिली. ही गोष्ट दाखवते की पृथ्वी आता सूर्याभोवती फिरत-फिरत स्वतःभोवती फिरत होती. आणि त्यामुळे पृथ्वीच्या अर्ध्या भागावर दिवस तर अर्ध्या भागावर रात्र असा दिवस-रात्रीचा क्रम सुरू झाला.—उत्प १:३, ४.

दुसऱ्‍या दिवशी देवाने पृथ्वीवर असलेल्या पाण्याला दोन भागात वेगळं केलं. पाण्याचा काही भाग पृथ्वीवर राहिला, पण पाण्याचा मोठा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वर उचलण्यात आला. त्यामुळे या दोन्ही भागांच्या मधे पोकळी निर्माण झाली. देवाने या पोकळीला अंतराळ म्हटलं. पण अंतराळ म्हटलेला हा भाग फक्‍त पृथ्वीच्या संदर्भातच होता. कारण या अंतराळात पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असणारे ग्रह-तारेसुद्धा होते असं म्हटलेलं नाही.—उत्प १:६-८.

तिसऱ्‍या दिवशी देवाने आपल्या शक्‍तीने पृथ्वीवर असणाऱ्‍या पाण्याला एका ठिकाणी जमा केलं आणि कोरडी जमीन दिसू लागली. कोरड्या जमिनीला देवाने पृथ्वी म्हटलं. आणि मग याच दिवशी देवाने स्वतःच्या शक्‍तीने अणू-रेणूंमध्ये एक अशी प्रक्रिया घडवून आणली ज्यामुळे जीवनाची सुरवात झाली. तेव्हा पृथ्वीवर आपापल्या जातींप्रमाणे गवत, आणि फळं देणारी झाडं निर्माण झाली. ही गोष्ट कोणत्याही योगायोगाने किंवा कोणत्याही उत्क्रांतीच्या प्रक्रियेमुळे झाली नाही.—उत्प १:९-१३.

इन्साइट-१ पृ. ५२८ परि. ५-८

निर्मिती

हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की उत्पत्ति १:१६ मध्ये, “उत्पन्‍न करणे” असा अर्थ असणाऱ्‍या इब्री क्रियापदाचा वापर केलेला नाही. याउलट इथं एक असं क्रियापद वापरण्यात आलं आहे, ज्याचा अर्थ “होणे” असा होतो. कारण उत्पत्ति १:१ मध्ये जेव्हा देवाने आकाश उत्पन्‍न केलं, तेव्हाच त्याने सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केले होते. त्यामुळे त्यांची निर्मिती चौथ्या दिवसाच्या खूप आधीच करण्यात आली होती. म्हणून चौथ्या दिवशी जेव्हा देवाने “पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत” असं म्हटलं, तेव्हा याचा अर्थ असा होता की या ज्योती पृथ्वीवरून स्पष्टपणे दिसतील असं देवाने केलं. शिवाय या सर्व ज्योती पुढे मानवांकरता ऋतू, दिवस व वर्षं दाखवण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी मार्गदर्शक ठरणार होत्या.—उत्प १:१४.

पाचव्या दिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे देवाने पृथ्वीवर प्राणी निर्माण केले. देवाने एका प्राण्यापासून अनेक प्राण्यांची उत्क्रांती केली नाही तर आपल्या शक्‍तीने असंख्य प्राण्यांची निर्मिती केली. असं म्हटलंय, की “प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी [पक्षी] देवाने निर्माण केले.” आणि निर्माण केलेल्या गोष्टी पाहून देवाला आनंद झाला आणि त्याने “बहुगुणित व्हा” असा आशीर्वाद दिला. आपापल्या जातीप्रमाणे प्रजनन करण्याची क्षमता देवाने त्यांना दिल्यामुळे हे शक्य होतं.—उत्प १:२०-२३.

सहाव्या दिवशी “प्रत्येक जातीचे वनपशू, ग्रामपशू व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले,” देवाने आधी निर्माण केलेल्या गोष्टींसारखंच हेसुद्धा चांगलं होतं.—उत्प १:२४, २५.

सहाव्या दिवसाच्या शेवटी देवाने एका खास प्राण्याची निर्मिती केली. हा प्राणी इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ होता, पण देवदूतांसारखा नव्हता. हा देवाच्या प्रतिरूपाचा आणि त्याच्यासारखा असणारा मानवप्राणी होता. उत्पत्ति १:२७ मध्ये मानवाबद्दल असं म्हटलंय, की देवाने त्यांना “नर व नारी” असं निर्माण केलं. पण याच गोष्टीबद्दल उत्पत्ति २:७-९ मध्ये म्हटलंय, की देवाने मातीपासून माणूस बनवला आणि त्याच्या नाकपुड्यांमध्ये जीवनाचा श्‍वास फुंकला आणि मानव एक जिवंत प्राणी बनला. देवाने त्याला एक सुंदर घर म्हणून बाग दिली आणि खाण्यासाठी अन्‍नही पुरवलं. मानवाला निर्माण करताना देवाने पृथ्वीच्या मूलतत्त्वांचा वापर केला. आणि अशा प्रकारे पुरुषाची निर्मिती केल्यानंतर, त्याच्याच फासळीने स्त्रीची निर्मिती केली. (उत्प २:१८-२५) आणि मग स्त्रीला बनवल्यामुळे मानवजातीची निर्मिती पूर्ण झाली.—उत्प ५:१, २.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१५-E ६/१ पृ. ५

आपल्या जीवनावर परिणाम करणारी वैज्ञानिक माहिती

विश्‍वाचं आणि पृथ्वीचं वय

बायबलमध्ये विश्‍वाच्या निर्मितीची कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही. आणि असंही म्हटलेलं नाही की पृथ्वीला निर्माण करून फक्‍त काही हजार वर्षंच झाली आहेत. उलट बायबलच्या पहिल्या वचनात फक्‍त इतकंच म्हटलंय की “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” (उत्पत्ति १:१) बायबलच्या या विधानामुळे या विश्‍वाचं आणि पृथ्वीचं वय काय असेल याबद्दल शास्त्रज्ञांना उत्सुकता होती. आणि त्यासाठी त्यांनी वैज्ञानिक माहितीच्या आधारावर शोध घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांचा असा अंदाज आहे, की हे संपूर्ण विश्‍व १३ ते १४ अब्ज वर्षांआधी आणि पृथ्वी ४ अब्ज वर्षांआधी अस्तित्वात आली असावी.

इन्साइट-२ पृ. ५२

येशू ख्रिस्त

निर्माणकर्ता नाही. सृष्टीच्या निर्मितीमध्ये येशूचा सहभाग असला तरी याचा अर्थ असा होत नाही की तो सह-निर्माणकर्ता आहे. कारण सृष्टीची निर्मिती करण्यासाठी लागणारी शक्‍ती देवाकडूनच होती. (उत्प १:२; स्तो ३३:६) शिवाय यहोवा हाच जीवनाचा स्रोत असल्यामुळे सर्व दृश्‍य आणि अदृश्‍य जीवसृष्टीवर फक्‍त त्याचाच हक्क आहे. (स्तो ३६:९) त्यामुळे येशू एक सह-निर्माणकर्ता नाही तर देवाचं एक असं माध्यम होता, ज्याचा वापर करून यहोवाने निर्मिती केली. इतर शास्त्रवचनं सांगतात त्याप्रमाणे येशूनेसुद्धा निर्माण करण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचं श्रेय देवालाच दिलं.—मत्त १९:४-६.

१३-१९ जानेवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं   |उत्पत्ति ३-५

“एदेन बागेत खोटं बोलल्यामुळे झालेले दुष्परिणाम”

टेहळणी बुरूज१२-E ९/१ पृ. ४ परि. २

देवाला खरंच स्त्रियांची काळजी आहे का?

देवाने स्त्रियांना शाप दिला होता का?

नाही. उलट देवाने “मोठ्या अजगराला” म्हणजे दियाबल सैतानाला शाप दिला होता. (प्रकटीकरण १२:९; उत्पत्ति ३:१४) जेव्हा देवाने म्हटलं की आदाम त्याच्या पत्नीवर अधिकार चालवेल तेव्हा देवाने पुरुषाला स्त्रीवर जुलूम करण्याची किंवा तिला क्रूरतेनं वागवण्याची परवानगी दिली नव्हती. (उत्पत्ति ३:१६) तर तो फक्‍त इथे पहिल्या जोडप्यावर होणाऱ्‍या पापाच्या परिणामांबद्दल बोलत होता.

इन्साइट-२ पृ. १८६

प्रसूती वेदना

प्रसूती वेदना म्हणजे बाळाला जन्म देताना स्त्रीला होणाऱ्‍या वेदना. पहिल्या स्त्रीने म्हणजे हव्वाने पाप केल्यानंतर मुलांना जन्म देताना तिला वेदना होतील हे देवाने अगोदरच सांगितलं होतं. जर तिने देवाची आज्ञा पाळली असती तर त्याचा आशीर्वाद तिच्यावर कायम राहिला असता आणि मुलांना जन्म देण्याचा खरा आनंद ती अनुभवू शकली असती. कारण बायबलमध्ये असं म्हटलं आहे, की “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” (नीत १०:२२) पण साहजिकच आता अपरिपूर्ण शरीर असल्यामुळे तिला वेदना सहन कराव्या लागणार होत्या. म्हणून (सहसा देव ज्या गोष्टींना घडू देतो त्या गोष्टी देवानेच केल्या आहेत असं म्हटलं जात असल्यामुळे) देवाने म्हटलं: “मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील.”—उत्प ३:१६.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-२ पृ. १९२ परि. ५

लामेख

लामेखने त्याच्या पत्नींसाठी जी कविता केली होती (उत्प ४:२३, २४) त्यातून त्याच्या काळातल्या लोकांची हिंसक वृत्ती दिसून येते. त्याने म्हटलं: “तुम्ही माझी वाणी ऐका लामेखाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या; एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले. काइनाबद्दल सातपट सूड घ्यावयाचा तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट घेण्यात येईल.” यावरून कळतं की लामेख इथं हे सांगायचा प्रयत्न करत होता की त्याने काइनसारखा जाणूनबुजून खून केला नव्हता, तर स्वतःच्या बचावासाठी त्याच्या हातून हा खून झाला होता. तो म्हणतो की तो माणूस त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करायचा प्रयत्न करत होता. म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी त्याने त्या माणसाला ठार मारलं. त्यामुळे जर कोणी त्या माणसाचा सूड घेण्यासाठी लामेखला मारायचा प्रयत्न करत असेल तर ही कविता त्याचं संरक्षण करण्यासाठी एक माध्यम होती.

इन्साइट-१ पृ. ३३८ परि. २

निंदा

अनोशच्या काळात म्हणजे जलप्रलयाआधीच्या काळात “लोक परमेश्‍वराच्या नावाने प्रार्थना करू लागले” किंवा लोक यहोवाला नावाने हाक मारू लागले असं म्हटलंय. याचा अर्थ लोकांनी देवाचं नाव वापरून त्याला प्रार्थना करायला सुरुवात केली असा होत नाही. कारण खूप आधीपासूनच हाबेल देवाच्या पवित्र नावाचा वापर करून त्याला प्रार्थना करत होता. (उत्प ४:२६; इब्री ११:४) त्यामुळे लोक परमेश्‍वराच्या नावाने प्रार्थना करू लागले असं जे म्हटलंय ते नक्कीच योग्य प्रकारे नसेल. काही तज्ज्ञांच्या मते याचा अर्थ लोक देवाच्या नावाचा वापर चुकीच्या पद्धतीने करून मानवांना किंवा मूर्तीपूजक वस्तूंना देवाचं नाव देऊ लागले असा होतो. हे जर खरं असेल तर मग साहजिकच ती देवाची निंदा करणारी गोष्ट होती.

२०-२६ जानेवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं   |उत्पत्ति ६-८

“त्याला जे काही सांगितलं ते त्याने केलं”

टेहळणी बुरूज१३-E ४/१ पृ. १४ परि. १

तो “खऱ्‍या देवासोबत चालला”

तारू बांधायला सुमारे ४० ते ५० वर्षं लागली. या काळात त्यांना झाडं तोडून बांधकामाच्या ठिकाणी आणायची होती. तसंच ती कापून, योग्य तो आकार देऊन जोडायची होती. हा तारू तीन मजली असणार होता आणि त्यात बऱ्‍याच खोल्या आणि बाजूला एक दरवाजा असणार होता. वरच्या मजल्यावर खिडक्या होत्या आणि छतावरून पाणी सहज वाहून जावं म्हणून त्याला मधोमध हलकासा उंचवटा देण्यात आला होता.—उत्पत्ति ६:१४-१६.

२७ जानेवारी-२ फेब्रुवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं   |उत्पत्ति ९-११

“सर्व पृथ्वीची एकच भाषा होती”

इन्साइट-१ पृ. २३९

मोठी बाबेल

प्राचीन बाबेल शहराची वैशिष्ट्यं. शिनार प्रांतात जेव्हा बाबेलचा बुरूज बांधायचं काम सुरू होतं, तेव्हाच बाबेल शहराचाही पाया घातला जात होता. (उत्प ११:२-९) देवाच्या नावाचा गौरव व्हावा म्हणून बाबेलचे लोक तो बुरूज आणि ते शहर बांधत नव्हते, तर त्यामुळे आपलं नाव मोठं होईल असं त्यांना वाटत होतं. बाबेल शहराच्या अवशेषांमध्ये बुरुजासारख्या काही उंच इमारतींचं बांधकाम बघायला मिळतं. यांना झिगुरात म्हटलं जायचं आणि या इमारती उपासनेची ठिकाणं होती. अशा प्रकारच्या इमारती फक्‍त बाबेल शहरातच नाही तर मेसोपटेम्याच्या इतर भागातसुद्धा बघायला मिळतात. यावरून कळतं की निम्रोद राजाने बांधलेला बुरूजसुद्धा अशाच कारणासाठी बांधला गेला असावा. पण यहोवाने या बुरुजाचं बांधकाम बंद पाडलं. ही गोष्ट दाखवून देते की तो बुरुज खोट्या धर्माशी संबंधित होता. शिवाय बाबेल शहराला देण्यात आलेल्या इतर नावांवरूनही कळतं की या शहराचा संबंध खोट्या धर्माशी होता.

इन्साइट-२ पृ. २०२ परि. २

भाषा

जलप्रलयानंतर काही मानवी कुटुंबांनी एकत्र येऊन देवाच्या उद्देशांच्या विरुद्ध असणारं एक काम हातात घेतलं, असं उत्पत्तीच्या अहवालात सांगितलं आहे. नोहा आणि त्याच्या मुलांना देवाने दिलेल्या आशीर्वादाच्या विरोधात ही गोष्ट होती. (उत्प ९:१) संपूर्ण ‘पृथ्वीला व्यापून टाकण्याऐवजी’ त्यांनी सगळ्या मानवजातीला एकाच ठिकाणी गोळा करून मेसोपटेम्याच्या शिनार प्रातांतच एक शहर वसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे शहर खोट्या उपासनेचं केंद्र बनणार होतं, ज्यामध्ये हा उपासनेसाठी असलेला बुरुजपण होता.—उत्प ११:२-४.

इन्साइट-२ पृ. २०२ परि. ३

भाषा

सर्वोच्च देवाने त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण केला. आणि त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन जी महत्त्वाकांक्षी योजना आखली होती त्यात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे एकमताने काम करणं त्यांना अशक्य झालं आणि ते संपूर्ण पृथ्वीवर पांगले. भाषेच्या गोंधळामुळे त्यांची एकत्र येऊन विचार करण्याची आणि काम करण्याची क्षमता आता कमी झाली आणि त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची महत्त्वाकांक्षी योजना ते पुन्हा राबवू शकणार नव्हते. तसंच वेगवेगळ्या भाषेच्या गटांनी स्वतःच्या अनुभवाने आणि संशोधनाने मिळवलेलं ज्ञान (जे देवाकडून नव्हतं) वापरणं आता त्यांना शक्य होणार नव्हतं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे देवाच्या इच्छेच्या विरोधात ते ज्या गतीने काम करत होते ते आता भविष्यात त्यांना शक्य होणार नव्हतं. किंवा त्यांनी तसा प्रयत्न जरी केला तरी त्यांना या कामात अडथळे निर्माण होणार होते. (उप ७:२९; अनु ३२:५ या वचनांशी तुलना करा.) हे खरं आहे की भाषेच्या गोंधळामुळे लोक वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले. पण एका अर्थाने मानवजातीला याचा फायदाच झाला आहे असं म्हणता येईल. कारण त्यामुळे धोकादायक आणि नुकसान करणाऱ्‍या ध्येयांपासून त्यांचं संरक्षण झालं. (उत्प ११:५-९ ची तुलना यश ८:९, १० सोबत करा.) माणसाकडे आज बरंच ज्ञान आहे, पण त्याचा वापर त्याने घातक गोष्टींसाठीच केला आहे. यावरून, देवाने बाबेलच्या बुरुजाचं काम का थांबवलं होतं ते आपल्याला कळतं. कारण जर देवाने असं केलं नसतं तर माणसाने त्याच्या बुद्धीचा वाईट वापर करून घातक गोष्टीच केल्या असत्या.

इन्साइट-२ पृ. ४७२

राष्ट्रं

एकमेकांशी बोलता येणं शक्य नसल्यामुळे भाषेच्या वेगवेगळ्या गटांनी आपापली संस्कृती, कला, परंपरा, चालीरिती आणि धर्म निर्माण केले. (लेवी १८:३) आणि अशा प्रकारे देवापासून दूर गेलेल्या या लोकांनी स्वतःसाठी काल्पनिक दैवतांच्या मूर्ती घडवल्या.—अनु १२:३०; २रा १७:२९, ३३.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. १०२३ परि. ४

हाम

हे खरं आहे की कनानने केलेल्या चुकीकडे त्याच्या बापाने म्हणजे हामने दुर्लक्ष केलं होतं. पण असं दिसतं की नोहासोबत झालेल्या घटनेला स्वतः कनानच जबाबदार होता. नोहाने हे ओळखलं होतं की कनानमध्ये दिसून आलेली वाईट वृत्ती जरी त्याचा बापाकडून त्याला वारशाने मिळालेली होती तरी हीच वाईट वृत्ती पुढे कनानच्या संततीलासुद्धा वारशाने मिळणार होती. म्हणून देवाच्या प्रेरणेनं भविष्यवाणी करत नोहाने कनानला शाप दिला.

इन्साइट-२ पृ. ५०३

निम्रोद

निम्रोदने राज्य करायला सुरुवात केली तेव्हा शिनार देशातली बाबेल, एरक, आक्काद आणि कालने ही शहरं त्याच्या सत्तेखाली होती. (उत्प १०:१०) त्यामुळे बाबेल शहर आणि त्यातल्या बुरुजाचं बांधकाम त्याच्या मार्गदर्शनाखालीच सुरू झालं असावं असं दिसतं. यहुदी लोकसुद्धा पूर्वीपासून हेच मानत असल्यामुळे या गोष्टीला आणखी आधार मिळतो. जोसिफस नावाच्या एका इतिहासकाराने असं लिहिलं, की “[निम्रोदला] असं वाटत होतं की लोकांच्या मनातून देवाची भीती काढून टाकायची असेल तर त्यांना त्याच्या ताकदीवर अवलंबून राहायला भाग पाडणं गरजेचं आहे. म्हणून त्याने हळूहळू या सगळ्या घडामोडींचा फायदा घेत स्वतःची हुकूमशाही लोकांवर लादली. त्याला असं वाटायचं की तो इतका मोठा बुरूज बांधू शकतो की जलप्रलय जरी आला तरी त्याचं पाणी इतक्या उंचावर पोचू शकणार नाही. आणि त्यामुळे जलप्रलयात मेलेल्या आपल्या पूर्वजांचा बदला त्याला घेता येईल. म्हणून जर देवाने पुन्हा जलप्रलय आणायचा प्रयत्न केला तर तो त्याचा बदला देवाकडून घेतल्या शिवाय राहणार नाही अशी धमकी त्याने दिली. देवाला अधीन राहणं गुलामीसारखं आहे असं वाटत असल्यामुळे लोकसुद्धा [निम्रोदचा] हा सल्ला मानायला आतुर होते. म्हणून त्यांनी हा बुरूज बांधायला सुरवात केली ... आणि अपेक्षाही करता येणार नाही इतक्या वेगाने ते बांधकाम वाढत गेलं.”—जुइश ॲन्टिक्विटिझ, I, ११४, १५५ (iv, २, ३).

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा