जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
४-१० मार्च
सेवाकार्यासाठी तयार व्हा
टेहळणी बुरूज११-E ९/१ पृ. २१-२२
खरं पाहायला गेलं तर पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना जो कर भरायला सांगण्यात आलं होता, त्यातला काही भाग हा लष्करासाठी वापरला जायचा. त्यामुळे या गोष्टीचा संबंध एका व्यक्तीच्या विवेकाशी होता. म्हणूनच पुढे गांधी आणि थोरो यांच्यासारख्या विचारवंतांनी कर भरण्याच्या सक्तीचा विरोध केला.
पण तुमच्या असं लक्षात येईल की रोमकर १३ अध्यायात सांगितलेल्या आज्ञेचं पालन करून त्यावेळचे खिश्चन कर भरत होते. कर न भरल्यामुळे होणाऱ्या शिक्षेला टाळण्यासाठी फक्त त्यांनी कर भरला नाही, तर हा निर्णय त्यांनी त्यांच्या ‘विवेकामुळे’ घेतला होता. (रोमकर १३:५) यावरून कळतं, की एका ख्रिस्ती व्यक्तीनं कर भरणं हे त्याच्या ख्रिस्ती विश्वासावर आधारलेल्या विवेकानुसार आवश्यक आहे. मग तो कर त्याला योग्य वाटणार नाहीत अशा कारणांसाठी वापरला जात असला, तरीही. हे समजून घेणं कदाचित थोडं किचकट वाटेल. पण विवेकाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे विवेक ही एक अशी जाणीव आहे जी आपण केलेली एखादी गोष्ट बरोबर की चूक ते सांगते.
आपल्यातल्या प्रत्येकाच्या मनात अशी जाणीव असतेच. पण थोरोने असं परीक्षण केलं की ही जाणीव आपल्याला नेहमीच योग्य सांगेल असं नाही. थोडक्यात आपला विवेक जे सांगतो त्यावर आपल्याला नेहमीच विश्वास ठेवता येणार नाही. म्हणूनच आपल्याला जर देवाचं मन खूश करायचं असेल तर आपला विवेक त्याच्या नैतिक तत्त्वांनुसार असला पाहिजे. देवाचे विचार हे मानवांपेक्षा कैक पटीनं श्रेष्ठ आहेत. त्यामुळे त्याच्या विचारसरणीच्या एकमतात आपले विचार किंवा आपला दृष्टिकोन राखण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला त्याच्यात योग्य तो बदल करावा लागू शकतो. (स्तोत्र १९:७) साहजिकच मानवी सरकारांच्या बाबतीतही देवाचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. मग या बाबतीत देवाचा दृष्टिकोन काय आहे?
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रेषित पौलने मानवी सरकारांना “देवाचे जनसेवक” असं म्हटलं. (रोमकर १३:६) याचा काय अर्थ होता? अगदी सरळ सांगायचं तर ही सरकारं समाजाच्या हितासाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि समाजात सुव्यवस्था राखण्याचं काम करतात असं त्याला म्हणायचं होतं. खूप भ्रष्ट असलेली सरकारंदेखील टपाल सेवा, शिक्षणव्यवस्था, अग्निप्रतिबंधक योजना आणि कायद्याची अंमलबजावणी यासारख्या सेवा-सुविधा जनतेसाठी पुरवत असतात. मानवांनी बनवलेल्या या अधिकारव्यवस्थेत किती दोष आहेत, हे देवाला चांगलं माहीत आहे, पण तरीसुद्धा त्यानं या सर्व गोष्टींना काही काळासाठी राहू दिलं आहे. आणि मानवजातीवर अधिकार चालवण्यासाठी त्याने दिलेल्या या अनुमतीला आपण आदरानं पाहतो हे दाखवण्यासाठी आपण ते मागत असलेला कर भरावा अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो.
या मानवी सरकारांना देवाने दिलेली ही अनुमती फक्त तात्पुरत्या स्वरूपाची आहे. कारण या सर्व गोष्टींना काढून त्या जागी आपलं स्वर्गीय राज्य स्थापन करण्याचा त्याचा उद्देश आहे. आणि त्याद्वारे तो या मानवी सरकारांनी कित्येक शतकं आपला अधिकार चालवून जे नुकसान केलं आहे ते भरून काढण्याची त्याची इच्छा आहे. (दानीएल २:४४; मत्तय ६:१०) पण तोपर्यंत, कर भरायला नकार देऊन किंवा इतर मार्गांनी या सामाजिक व्यवस्थांचा अनादर करून त्यांचा विरोध करायचा अधिकार देवानं ख्रिश्चनांना दिलेला नाही.
पण समजा, तरीही कर भरल्यामुळे आपण युद्धाला पाठिंबा देतोय आणि हे करणं चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर काय? ज्याप्रमाणे आपण उंच ठिकाणी चढत जातो तसतसा जास्त व्यापक परिसर पाहणं आपल्याला शक्य होतं. त्याचप्रमाणे आपल्यापेक्षा देवाचा दृष्टिकोन खूप श्रेष्ठ किंवा उंच आहे हे लक्षात घेण्याद्वारे, आपण आपल्या दृष्टिकोनात बदल केला पाहिजे. कारण यशया संदेष्ट्याद्वारे देवाने म्हटलं: “आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत.”—यशया ५५:८, ९.
११-१७ मार्च
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज८९-E १२/१ पृ. २४ परि. ३
“तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा”
त्यांची ही दशा पाहून यहुदी नसलेल्या त्यांच्या बांधवांना त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळायला हवी होती. खरंतर यरुशलेम इथल्या ख्रिश्चनांचे ते “ऋणी” होते. कारण विदेशी लोकांना यरुशलेम इथल्या यहुदी लोकांकडूनच आनंदाची बातमी ऐकायला मिळाली होती. म्हणूनच पौलने तर्क मांडला: “जर विदेशी राष्ट्रे या पवित्र जनांच्या आध्यात्मिक गोष्टींत सहभागी झाले, तर भौतिक गोष्टींत त्यांची मदत करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे.”—रोमकर १५:२७.
इन्साइट-१ पृ. ८५८ परि. ५
पूर्वज्ञान
पृथ्वीवर असणाऱ्या सर्व नीतिमान लोकांना ज्या वचन दिलेल्या संततीद्वारे आशीर्वाद मिळणार होता, ती संतती ख्रिस्त म्हणजे मसीहा होती. (गल ३:८, १४) या संततीचा सर्वात पहिला उल्लेख, एदेन बागेतल्या बंडाळीनंतर पण हाबेलचा जन्म होण्याआधी करण्यात आला होता. (उत्प ३:१५) ही गोष्ट मसीहा म्हणून येणाऱ्या या ‘संततीची’ स्पष्टपणे ओळख देऊन, “पवित्र रहस्य” प्रकट करण्याच्या जवळजवळ ४,००० वर्षांआधीची आहे. त्यामुळे हे रहस्य “पुरातन काळापासून गुप्त ठेवण्यात आले होते” असं जे म्हटलं आहे, ते योग्यच आहे.—रोम १६:२५-२७; इफि १:८-१०; ३:४-११.
१८-२४ मार्च
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. ११९३ परि. १
बुद्धी
बुद्धिमान लोकांनी म्हणजे जगाची न्यायव्यवस्था लावून देणाऱ्या शासकांनी “गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले.” (१कर १:१८; २:७, ८) आणि त्याद्वारे जणू या जगाच्या बुद्धीने ख्रिस्ताद्वारे देवाने केलेल्या तरतुदीला मूर्खपणाचं ठरवलं. पण याउलट देव आता या जगाच्या बुद्धीला मूर्ख ठरवत आहे. कारण जगातल्या या बुद्धिमान लोकांनी देवाच्या तरतुदीला ‘मूर्खपणाच्या’ गोष्टी असं म्हटलं. आणि त्याच्या निवडलेल्या लोकांना मूर्ख आणि दुर्बल असं ठरवलं. पण या गोष्टींद्वारेच त्याने या लोकांना शरमेनं मान खाली घालायला लावली आहे. यासाठी की त्याचा उद्देश पूर्ण व्हावा. (१कर १:१९-२८) म्हणून पौलने करिंथमधल्या ख्रिश्चनांना याची आठवण करून दिली, की “जगाच्या व्यवस्थेची बुद्धी” आणि “या जगाच्या व्यवस्थेचे शासक” नाहीसे होतील. त्यामुळे अशा प्रकारची बुद्धि प्रेषितांच्या आध्यात्मिक संदेशाचा भाग नव्हती. (१कर २:६, १३) यासोबतच पौलने कलस्सै इथल्या ख्रिश्चनांनाही जगाच्या ‘तत्त्वज्ञानात’ [फिलॉसफायस, शब्दशः बुद्धीबद्दलचं प्रेम] आणि ‘निरर्थक अशा फसव्या गोष्टीत’ अडकून स्वतःला कैद करून घेऊ नये म्हणून इशारा दिला.—कल २:८; २०-२३ पडताळून पाहा.
२५-३१ मार्च
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. २११
नियम
देवदूतांकरता नियम. मानवांपेक्षा श्रेष्ठ दर्जा असणाऱ्या देवदूतांनाही देवाने दिलेल्या नियमांच्या आणि त्याच्या आज्ञांच्या अधीन राहावं लागतं. (इब्री १:७, १४; स्तो १०४:४) यहोवाने आपल्या विरोधकाला, सैतानालाही आज्ञा देऊन मर्यादा घातली. (ईयो १:१२; २:६) सैतानाविरुद्ध वाद सुरू असताना आद्यदेवदूत असणाऱ्या मीखाएलने त्याला “यहोवा तुझा न्याय करो” असं म्हटलं. आणि त्यावरून त्याने सर्वोच्च न्यायाधीश म्हणून यहोवाच्या अधिकाराला मानत असल्याचं आणि त्याबद्दल आदर असल्याचं दाखवून दिलं. (यहू ९; जखऱ्या ३:२ पडताळून पाहा.) यहोवा देवाने सर्व देवदूतांवर गौरवी येशू ख्रिस्ताला अधिकार दिला आहे. (इब्री १:६; १पेत्र ३:२२; मत्त १३:४१; २५:३१; फिलि २:९-११) त्यामुळेच, येशूची आज्ञा ऐकून योहानकडे संदेश देणारा देवदूत आला होता. (प्रक १:१) तरीसुद्धा, १ करिंथकर ६:३ मध्ये प्रेषित पौलने येशूच्या आत्मिक बांधवांना, ते देवदूतांचा न्याय करणार आहेत असं म्हटलं आहे. कारण दुष्ट देवदूतांवर न्यायदंड बजावण्याच्या कामात त्यांचाही सहभाग असणार होता.