जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
४-१० फेब्रुवारी
सेवाकार्यासाठी तयार व्हा
टेहळणी बुरूज०६-E ६/१ पृ. १२-१३
समाधानी राहण्यासाठी आपण स्वतःच्या आणि इतरांच्या मर्यादांबद्दल वाजवी दृष्टिकोन बाळगला पाहिजे. प्रेषित पौलने रोममधल्या बांधवांना पत्र लिहिताना म्हटलं: “सर्वांनीच पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला कमी पडतात.” (रोमकर ३:२३) यहोवाच्या गुणांचे कित्येक असे पैलू आहेत जे आपल्या समजशक्तीच्या पलीकडे आहेत. याचं एक उदाहरण उत्पत्ति १:३१ या वचनात दिलं आहे. यात म्हटलं आहे: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” यहोवा जेव्हा त्याने केलेल्या गोष्टींकडे पाहतो तेव्हा तो नेहमीच असं म्हणू शकतो की ते “फार चांगले आहे.” पण कोणत्याच मनुष्याला असं नेहमीच म्हणता येणार नाही. तेव्हा अशा मर्यादा ओळखणं हीच समाधानी असण्याची पहिली पायरी आहे. पण एवढंच करणं पुरेसं नाही. एखाद्या गोष्टीबद्दल देवाचा दृष्टिकोन समजून घेणं आणि तो स्वीकारणंही गरजेचं आहे.
ज्या ग्रीक शब्दाचं ‘पाप’ असं भाषांतर करण्यात आलं आहे, त्याच्या मूळ शब्दाचा अर्थ थोडक्यात निशाणा चुकणं असा होतो. (रोमकर ३:९) हे समजण्यासाठी एका उदाहरणाकडे लक्ष द्या: अशी कल्पना करा की एका खेळाडूला बक्षीस जिंकण्यासाठी एका निशाण्यावर बाण मारायचा आहे. त्याच्याकडे तीन बाण आहेत. निशाणा साधण्यासाठी तो पहिला बाण हातात घेतो आणि नेम धरून मारतो. पण त्याचा नेम चुकतो आणि बाण तीन फुटांच्या अंतरावर जाऊन लागतो. तो दुसरा बाण घेतो आणि त्याचा नेम पुन्हा चुकतो. तो बाण एक फुटाच्या अंतरावर जाऊन लागतो. आता तो आपलं चित्त एकाग्र करून शेवटचा बाण मारतो. तो लागणारच असं दिसतं पण हा बाणसुद्धा फक्त एका इंचाने हुकतो. हा खेळाडू आपल्या सर्व संधी गमावतो. त्याचा शेवटचा बाण निशाण्याच्या इतक्या जवळ असूनही तो हुकतो. पण आता जे झालं ते झालं!
आपण सर्व जण त्या हताश झालेल्या खेळाडूसारखे आहोत. कधीकधी आपला बाण निशाण्यावर न लागता जास्तच दूरच्या अंतरावर जाऊन लागतो. तर कधी आपण निशाणाच्या अगदी जवळ असूनही थोडक्यात चुकतो. इतके प्रयत्न करूनही जेव्हा नेम लागत नाही तेव्हा साहजिकच आपण वैतागून जातो. पण उदाहरणात पुढं काय होतं पाहा.
आता तो खेळाडू खूप निराश होतो आणि माघार घ्यायचं ठरवतो. आपल्याला बक्षीस मिळावं अशी त्याची मनापासून इच्छा होती. पण अचानक तिथला अधिकारी त्याला आपल्याकडे बोलवतो आणि त्याच्या हातात बक्षीस ठेवतो आणि म्हणतो: “मला हे बक्षीस तुला द्यायचं आहे, मला तूच या बक्षिसासाठी योग्य वाटतोस. तू किती कसून प्रयत्न करत होतास ते मी पाहिलं आहे.” हे ऐकल्यावर तो खेळाडू खूप खूश होतो आणि त्याचं मन कृतज्ञतेनं भरून जातं.
त्याचप्रमाणे जेव्हा देवाकडून परिपूर्ण अवस्थेतलं सर्वकाळचं जीवन एक “कृपादान” म्हणून किंवा एक बक्षीस म्हणून आपल्याला मिळेल तेव्हा आपल्याही भावना या खेळाडूप्रमाणेच असतील. (रोमकर ६:२३) त्यानंतर आपण परिपूर्ण अवस्थेत जे काही करू ते सर्वकाही चांगलंच असेल आणि आपला निशाणाही पुन्हा कधी हुकणार नाही. म्हणजेच आपण खऱ्या अर्थाने समाधानी असू. पण तोपर्यंत जर ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली तर स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला दृष्टिकोन बाळगणं आपल्याला शक्य होईल.
११-१७ फेब्रुवारी
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज१४-E ६/१ पृ. ११ परि. १
माझ्या पूर्वजांसाठी काय आशा आहे?
अनीतिमान लोकांचं पुनरुत्थान झाल्यानंतर, त्यांचा न्याय त्यांनी भूतकाळात केलेल्या चुकांच्या आधारावर केला जाईल का? नाही. रोमकर ६:७ मध्ये म्हटलं आहे: “कारण जो कोणी मरण पावला, त्याला त्याच्या पापापासून निर्दोष ठरवण्यात आले आहे.” या वचनाप्रमाणे एखाद्याचा मृत्यू त्याच्या पापांची भरपाई आहे. त्यामुळे पुनरुत्थान झालेल्या अनीतिमान लोकांनी आपल्या पापांची किंमत आधीच चुकवलेली असेल. तेव्हा अशा अनीतिमान लोकांनी मरण्याआधी अजाणतेत जे काही केलं होतं त्याच्या आधारावर नव्हे, तर पुनरुत्थानानंतर ते जे काही करतील, त्याच्या आधारावर त्यांचा न्याय केला जाईल. मग त्यांना याचा कसा फायदा होईल?
२५ फेब्रुवारी–३ मार्च
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. १२६० परि. २
आवेश
चुकीचा आवेश. एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी एका व्यक्तीच्या मनात जबरदस्त आवेश असू शकतो. पण म्हणून हा आवेश योग्य असेल किंवा देवाला मान्य असेल असं म्हणता येणार नाही. पहिल्या शतकातल्या बऱ्याच यहुदी लोकांच्या बाबतीत हीच गोष्ट होती. मोशेच्या नियमशास्त्रात दिलेल्या गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळून ते स्वतःच्या प्रयत्नांवर देवाच्या नजरेत नीतिमान ठरण्याचा प्रयत्न करत होते. पण पौलने नंतर दाखवून दिलं की, अचूक ज्ञानाच्या अभावामुळे त्यांच्या या आवेशाला चुकीची दिशा मिळाली होती. याचा परिणाम म्हणजे देवाकडून असणाऱ्या खऱ्या नीतिमत्त्वापासून ते खूप दूर गेले. याऐवजी खरंतर त्यांनी आपल्या चुकांकडे लक्ष द्यायला हवं होतं. आणि यासोबतच नीतिमत्त्व प्राप्त करता यावं म्हणून आणि नियमशास्त्राच्या बंधनातून मुक्तता मिळावी म्हणून, त्यांनी ख्रिस्ताद्वारे देवाकडे वळण्याचा प्रयत्न करायला हवा होता. (रोम १०:१-१०) याबाबतीत स्वतः पौलचंच उदाहरण घेता येईल. यहुदी धर्माकरता त्याला जबरदस्त आवेश होता. त्याचा हा आवेश इतक्या टोकाला गेला की त्यासाठी त्याने “देवाच्या मंडळीचा खूप छळ केला आणि तिचे पुष्कळ नुकसान केले.” नियमशास्त्राचं तो इतक्या काटेकोरपणे पालन करायचा की त्यातल्या नियमांच्या बाबतीत तो जणू “निर्दोष” आहे असं म्हणण्यात आलं. (गल १:१३, १४; फिलि ३:६) तरीही यहुदी धर्मासाठी असणारा त्याचा आवेश चुकीचा होता. पण त्याच्या या आवेशामागे त्याच्या मनातला खरेपणा यहोवाने पाहिला आणि ख्रिस्ताद्वारे असणारं आपलं अपार प्रेम त्याच्यावर प्रकट केलं आणि खऱ्या उपासनेकडे त्याला वळवलं.—१ती १:१२, १३.