वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr19 जानेवारी पृ. १-३
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१९
  • उपशिर्षक
  • ७-१३ जानेवारी
  • १४-२० जानेवारी
  • २१-२७ जानेवारी
  • २८ जानेवारी–३ फेब्रुवारी
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१९
mwbr19 जानेवारी पृ. १-३

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

७-१३ जानेवारी

आध्यात्मिक रत्नं शोधा

nwtsty अभ्यासासाठी माहिती-प्रेका २२:१६

त्याच्या नावाने प्रार्थना करून आपली पापे धुऊन टाक: किंवा “त्याच्या नावाने प्रार्थना कर आणि आपली पापे धुऊन टाक.” एखाद्या व्यक्‍तीची पापं बाप्तिस्म्याच्या पाण्याने नाही तर येशूच्या नावाने प्रार्थना केल्यामुळे धुतली जातात. यामध्ये येशूवर विश्‍वास ठेवणं आणि तो विश्‍वास ख्रिस्ती कार्यांनी प्रदर्शित करणं समाविष्ट आहे.​—प्रेका १०:४३; याक २:१४, १८.

सेवाकार्यासाठी तयार व्हा

टेहळणी बुरूज१०-E २/१ पृ. १३ परि. २–पृ. १४ परि. २

ख्रिस्ताने नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन केलं आहे. मग ख्रिश्‍चनांनी आठवड्याचा शब्बाथ पाळणं गरजेचं आहे का? प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने याचं उत्तर दिलं. तो म्हणाला: “म्हणून, खाणे-पिणे किंवा एखादा सण पाळणे, अमावस्या किंवा शब्बाथ पाळणे या गोष्टींवरून कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका. या सर्व येणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत, पण वास्तविकता ही ख्रिस्तामध्ये आहे.”​—कलस्सैकर २:१६, १७.

या प्रेरित शब्दांवरून, देव आपल्या सेवकांकडून करत असलेल्या अपेक्षा थोड्या बदलल्या होत्या हे दिसून येतं. या बदलाचं काय कारण होतं? हेच, की ख्रिस्ती आता एका नवीन नियमाच्या अधीन आहेत. तो नियम म्हणजे: “ख्रिस्ताचा नियम.” (गलतीकर ६:२) यहोवाने मोशेद्वारे इस्राएलांना नियमशास्त्राचा करार दिला होता. येशूच्या मृत्यूमुळे जेव्हा या नियमशास्त्राच्या कराराची पूर्णता झाली, तेव्हा तो करार संपुष्टात आला. (रोमकर १०:४; इफिसकर २:१५) मग यामुळे शब्बाथ पाळण्याची आज्ञाही संपुष्टात आली का? हो. “आपण नियमशास्त्रातून मुक्‍त झालो आहोत,” असं म्हटल्यानंतर पौलने दहा आज्ञांपैकी एका आज्ञेचा उल्लेख केला. (रोमकर ७:६, ७) नियमशास्त्राचा जो करार रद्द झाला त्यामध्ये दहा आज्ञा होत्या. आणि या दहा आज्ञांमध्ये शब्बाथाचा नियमदेखील सामील होता. त्यामुळे आता देवाच्या उपासकांना आठवड्याचा शब्बाथ पाळण्याची गरज नव्हती.

इस्राएलांच्या उपासनेच्या पद्धतीत आणि ख्रिश्‍चनांच्या उपासनेच्या पद्धतीत काय फरक होता हे पुढील उदाहरणातून स्पष्ट होतं: एक देश आपल्या संविधानात बदल करू शकतो. नवीन संविधान कायदेशीर रीत्या लागू केल्यानंतर नागरिकांना जुन्या नियमांच्या अधीन राहण्याची गरज नसते. कदाचित नवीन संविधानात काही जुने नियमही असतील तरी इतर नियम वेगळे असतील. त्यामुळे आता कोणते नियम लागू होतात हे जाणून घेण्यासाठी एका व्यक्‍तीला नवीन संविधानाचा चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासोबतच एका प्रामाणिक नागरिकाला नवीन संविधान कधीपासून अंमलात आलं हेही जाणून घेणं गरजेचं वाटेल.

त्याच प्रकारे यहोवा देवाने इस्राएल राष्ट्राला ६०० नियम दिले होते. त्यामध्ये १० प्रमुख नियम होते. या नियमांमध्ये नैतिकता, बलिदान, आरोग्याशी संबंधित असलेल्या काही गोष्टी आणि शब्बाथ यांबद्दल अनेक नियम सामील होते. पण येशूने म्हटलं होतं की त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांनी मिळून एक नवीन ‘राष्ट्र’ बनेल. (मत्तय २१:४३) आणि इ.स. ३३ पासून या नवीन राष्ट्राला एक नवीन संविधान मिळालं. यात देवावर प्रेम करणं आणि शेजाऱ्‍यावर प्रेम करणं असे दोन मूलभूत नियम होते. (मत्तय २२:३६-४०) त्यामुळे यात आश्‍चर्य करण्यासारखं काहीच नव्हतं की ‘ख्रिस्ताच्या नियमामध्ये’ असलेले नियम इस्राएलांना दिलेल्या नियमांसारखेच असले तरी काही नियम खूप वेगळे होते आणि इतर नियम आता पाळण्याची गरज नव्हती. म्हणून आठवड्याचा शब्बाथ पाळण्यासंबंधी असलेला नियम हा अशा नियमांपैकी एक आहे, जो आता ख्रिश्‍चनांना लागू होत नाही.

१४-२० जानेवारी

आध्यात्मिक रत्नं शोधा

nwtsty अभ्यासासाठी माहिती-प्रेका २३:६

मी एक परूशी: तिथे असणारे काही लोक पौलला ओळखत होते. (प्रेका २२:५) पौलने जेव्हा स्वतःची ओळख परूश्‍यांचा मुलगा अशी करून दिली, तेव्हा तिथे असणाऱ्‍यांना हे नक्कीच समजलं असावं की पौल काही चुकीचं बोलत नव्हता. कारण सध्या जरी तो एक ख्रिस्ती म्हणून आवेशाने कार्यं करत असला तरी मुळात वारश्‍याने तो एक परूशीच होता आणि परूश्‍यांप्रमाणे त्याचाही पुनरुत्थानावर विश्‍वास होता. पण पौलने पुढे म्हटलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याने एक परूशी असल्याचं का म्हटलं असावं ते कळतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे की पौल स्वतःला एक सदुकी नव्हे, तर एक परूशी असल्याचं सांगतो. कारण परूश्‍यांप्रमाणेच आपलाही पुनरुत्थानावर विश्‍वास आहे हे त्याला सांगायचं होतं. त्यामुळे तिथे असणारे परूशी जे मानतात आणि आपण जे मानतो त्यात सारखेपणा आहे आणि आपल्या बोलण्याला समान आधार आहे असं त्याला सुचवायचं होतं. वादाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे यहुदी न्यायसभेचे काही सदस्य आपल्या बाजूला झुकतील असा कदाचित पौलचा उद्देश असावा, असं वाटतं. आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे घडलंसुद्धा. (प्रेका २३:७-९) शिवाय राजा अग्रिप्पाच्या समोर असताना आपली बाजू मांडण्यासाठी त्याने जे म्हटलं तेही प्रेका २३:६ च्या सुसंगतेत आहे. (प्रेका २६:५) तसंच रोममधून फिलिप्पैच्या ख्रिश्‍चनांना पत्र लिहितानाही पौलने आधी तो एक परूशी असल्याचं सांगितलं होतं. (फिलि ३:५) प्रेका १५:५ या वचनातदेखील आधी परूशी असणाऱ्‍या काही ख्रिश्‍चनांचा ज्या प्रकारे उल्लेख करण्यात आला आहे तेदेखील पाहण्यासारखं आहे.

nwtsty अभ्यासासाठी माहिती-प्रेका २४:२४

द्रुसिल्ला: द्रुसिल्ला प्रेका १२:१ या वचनात उल्लेख करण्यात आलेल्या हेरोद अग्रिप्पा पहिला याची तिसरी आणि सर्वात धाकटी मुलगी होती. इ.स. ३८ साली तिचा जन्म झाला होता. अग्रिप्पा दुसरा, बर्णीका आणि मरियमने तिसरी, ही तिची भावंडं होती. (प्रेका २५:१३; शब्दार्थसूची, “हेरोद” पाहा.) राज्यपाल फेलिक्स तिचा दुसरा नवरा होता. तिचा पहिला नवरा इमेसाचा राजा अझिझस होता. तो मूळचा सूरियाचा होता. पण जवळपास इ.स. ५४ साली म्हणजे ती जवळजवळ १६ वर्षांची असताना, तिने त्याला घटस्फोट दिला आणि फेलिक्सशी लग्न केलं. पौल जेव्हा फेलिक्ससमोर “नीतिमत्त्व, संयम आणि येणाऱ्‍या न्यायदंडाविषयी” बोलू लागला तेव्हा ती तिथे उपस्थित असण्याची शक्यता आहे. (प्रेका २४:२५) जेव्हा फेलिक्सने आपलं राज्यपालाचं पद फेस्तला दिलं तेव्हा “यहुद्यांची मर्जी राखण्याची इच्छा असल्यामुळे” त्याने पौलला कैदेतच राहू दिलं. आपल्या यहुदी बायकोला खूश करण्यासाठी त्याने असं केलं असावं असं काही जणांचं मत आहे.​—प्रेका २४:२७.

२१-२७ जानेवारी

आध्यात्मिक रत्नं शोधा

nwtsty अभ्यासासाठी माहिती-प्रेका २६:१४

पराणीवर लाथा मारणं: पराणी म्हणजे प्राण्यांना हाकून नेण्यासाठी वापरली जाणारी एक टोकदार काठी. (शास ३:३१) “पराणीवर लाथा मारणं” ही ग्रीक साहित्यामध्ये सापडणारी एक म्हण आहे. एखाद्या अडेल बैलाला जेव्हा ढोसणी दिली जाते तेव्हा तो पराणीवर लाथा मारून त्याचा प्रतिकार करतो आणि असं करण्याद्वारे तो स्वतःलाच दुखापत करून घेतो. अशा प्रकारे स्वत:लाच दुखापत करून घेण्याच्या बैलाच्या अशा वागण्यावरूनच “पराणीवर लाथा मारणं” ही म्हण आली आहे. ख्रिस्ती बनण्याआधी शौलचं वागणंही तसंच होतं. यहोवा देवाचा पाठिंबा असणाऱ्‍या येशूच्या अनुयायांच्या विरुद्ध जाऊन पौल स्वतःला दुखापत करून घेत होता. (प्रेका ५:३८, ३९; १ती १:१३, १४ पडताळून पाहा.) उप १२:११ मध्ये ‘पराणी’ हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आला आहे. तो बुद्धिमान व्यक्‍तीच्या अशा शब्दांना सूचित करतो, ज्यांमुळे ऐकणाऱ्‍याला त्याचा सल्ला स्वीकारण्याची प्रेरणा मिळते.

२८ जानेवारी–३ फेब्रुवारी

आध्यात्मिक रत्नं शोधा

nwtsty अभ्यासासाठी माहिती-प्रेका २७:९

प्रायश्‍चित्ताच्या दिवसाचा उपास: किंवा “शरद ऋतूतला उपास.” शब्दशः “उपास.” उपास या शब्दासाठी असलेला ग्रीक शब्द मोशेच्या नियमशास्त्रात आज्ञा दिलेल्या एकमेव उपासाला सूचित करतो. हा उपास वर्षाला येणाऱ्‍या प्रायश्‍चित्ताच्या दिवसाशी संबंधित आहे. याला योम किप्पूर (हिब्रू, योहम हाक्किपुरीम, “झाकणांचा दिवस”) असंही म्हटलं आहे. (लेवी १६:२९-३१; २३:२६-३२; गण २९:७; शब्दार्थसूची, “प्रायश्‍चित्ताचा दिवस” पाहा.) तसंच “आपल्या जिवास दुःख द्यावे” हा वाक्यांश प्रायश्‍चित्ताच्या दिवसाशी संबंधित आहे. हा वाक्यांश सहसा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वत्यागाच्या कार्यांना उद्देशून वापरण्यात आला आहे. यामध्ये उपासाचाही समावेश होतो. (लेवी १६:२९, पं.र.भा.) प्रायश्‍चित्ताच्या दिवशी करण्यात येणाऱ्‍या स्वत्यागाच्या मूलभूत पद्धतीत उपासाचाही समावेश होतो. ही गोष्ट प्रेका २७:९ यात वापरण्यात आलेला ‘उपास’ या शब्दावरून स्पष्ट होते. प्रायश्‍चित्ताच्या दिवसाचा उपास सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला यायचा.

nwtsty अभ्यासासाठी माहिती-प्रेका २८:११

झ्यूसच्या पुत्रांचे: ग्रीक आणि रोमी दंतकथेनुसार कॅस्टर आणि पोलक्स हे ‘झ्यूसचे पुत्र’ (ग्रीक, डायओस्काउरोई) होते. ही दोघंही झ्यूस देव (ज्युपिटर) आणि स्पार्टनची राणी लेडा यांची जुळी मुलं होती. इतर गोष्टींशिवाय ते समुद्री खलाश्‍यांचे संरक्षक आहेत आणि संकटात सापडलेल्या खलाश्‍यांना वाचवण्याची ताकद त्यांच्यात आहे असं मानलं जायचं. जहाजाच्या समोरच्या बाजूबद्दल देण्यात आलेल्या माहितीवरून हा अहवाल प्रत्यक्ष पाहणाऱ्‍या साक्षीदाराने लिहिला होता याचा पुरावा मिळतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा