वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr17 ऑगस्ट पृ. १-३
  • ऑगस्ट—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१७
  • उपशिर्षक
  • ७-१३ ऑगस्ट
  • १४-२० ऑगस्ट
  • २८ ऑगस्ट–३ सप्टेंबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१७
mwbr17 ऑगस्ट पृ. १-३

ऑगस्ट—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ

७-१३ ऑगस्ट

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल २८-३१

“यहोवा मूर्तीपूजक राष्ट्राला प्रतिफळ देतो”

(यहेज्केल २९:१८) “मानवपुत्रा, बाबेलाचा राजा नबुखद्‌नेस्सर याने सोरला वेढा घातला तेव्हा त्याने आपल्या सैन्यास भारी कष्ट करायला लावले; सर्वांच्या डोक्यांस टक्कले पडली, खाद्यांची सालटी निघाली, तरी त्याने जो खटाटोप केला त्याचा त्याला किवा त्याच्या सैन्याला योग्य मोबदला मिळाला नाही.”

इन्साइट-२ पृ. ११३६ परि. ४

सोर

शहराचा विनाश. नबुखदनेस्सर राजाने सोर शहराविरुद्ध वेढा घातला. हा वेढा बऱ्‍याच वर्षांपर्यंत राहिला. यादरम्यान त्याच्या सैनिकांच्या डोक्याला टोप घासल्यामुळे “टक्कले पडली.” शहराला वेढा घालण्यासाठी लागणारं सामान वाहिल्यामुळे त्यांच्या “खांद्यांची सालटी” निघाली. सोर शहराचा नाश करण्यासाठी खरंतर यहोवाने नबुखदनेस्सर राजाचा वापर केला होता. पण या सेवेसाठी त्याला कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे यहोवाने त्याला मिसरची संपत्ती मोबदला म्हणून देण्याचं वचन दिलं. (यहे २९:१७-२०) यहुदी इतिहासकार जोसिफस याने म्हटलं आहे, की हा वेढा १३ वर्षांपर्यंत होता (अगेंस्ट एपिऑन, १, १५६ [२१]). यामुळे बाबेलच्या लोकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं.

(यहेज्केल २९:१९) “यास्तव प्रभू परमेश्‍वर म्हणतो, ‘पाहा, बाबेलाचा राजा नबुखद्‌नेस्सर यास मी मिसरचा मुलूख देईन; तेव्हा तो त्यांचा समुदाय हिरावून नेईल, त्याने लुटलेले तो लुटेल; त्याने हरण केलेले तो हरण करेल, असा त्याच्या सैन्यास मोबदला मिळेल.’”

इन्साइट-१ पृ. ६९८ परि. ५

मिसर, मिसरी

नबुखदनेस्सरच्या ३७ व्या वर्षी लिहिण्यात आलेला बाबेलचा एक लेख सापडला आहे. या लेखात मिसरविरुद्ध केलेल्या लढाईचा उल्लेख आहे. हा उल्लेख बाबेलने मिसरवर पहिल्यांदा केलेल्या हल्ल्याबद्दल होता, की नंतर झालेल्या एखाद्या लढाईबद्दल, हे नक्की सांगता येत नाही. पण काहीही असो, मिसरच्या सैन्याने, देवाच्या लोकांचा विरोध करणाऱ्‍या सोरवर यहोवाचा न्यायदंड आणण्यासाठी त्यांच्याशी लढाई केल्यामुळे, नबुखदनेस्सरला मोबदला म्हणून मिसरची संपत्ती मिळाली.—यहे २९:१८-२०; ३०:१०-१२.

(यहेज्केल २९:२०) “‘त्याच्या श्रमाचा मोबदला म्हणून मी त्यास मिसरचा मुलूख देईन, कारण हे श्रम त्यांनी मजसाठी केले,’ असे प्रभू परमेश्‍वर म्हणतो.”

अवेक!८६ ११/८ पृ. २७ परि. ४-५

सर्व कर भरणं आवश्‍यक आहे का?

या प्रश्‍नाचं उत्तर देण्यासाठी, निर्माणकर्त्या देवाने स्वतः एका राष्ट्राने त्याच्यासाठी केलेल्या सेवेसाठी, त्यांच्या कर्जाची कशा प्रकारे परतफेड केली यावर विचार करू शकतो. प्राचीन काळातल्या सोर शहराच्या दुष्टतेमुळे यहोवाने त्यांचा नाश करण्याचं ठरवलं. हा नाश करण्यासाठी देवाने नबुखदनेस्सर राजाच्या नेतृत्वाखाली बाबेलच्या सैन्याचा वापर केला. त्या लढाईत बाबेलला विजय तर मिळाला, पण त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी त्यांना मोबदला दिला पाहिजे असं यहोवाला वाटलं. यहेज्केल २९:१८, १९ यात आपण यहोवाचे हे शब्द वाचतो: “मानवपुत्रा, बाबेलाचा राजा नबुखद्‌नेस्सर याने सोरेस वेढा घातला तेव्हा त्याने आपल्या सैन्यास भारी कष्ट करावयास लावले; . . . तरी त्याने जो खटाटोप केला त्याचा त्याला किंवा त्याच्या सैन्याला योग्य मोबदला मिळाला नाही. यास्तव प्रभु परमेश्‍वर म्हणतो, ‘पाहा, बाबेलाचा राजा नबुखद्‌नेस्सर यास मी मिसरचा मुलूख देईन; तेव्हा तो त्यांचा समुदाय हिरावून नेईल, त्याने लुटलेले तो लुटेल; त्याने हरण केलेले तो हरण करेल, असा त्याच्या सैन्यास मोबदला मिळेल.’”

नबुखदनेस्सर हा एक गर्विष्ठ, स्वार्थी आणि मूर्तिपूजक राजा होता हे बायबलचा अभ्यास करणाऱ्‍यांना माहीत आहे. बाबेल आणि त्याचं सैन्य युद्धात बंदी बनवलेल्यांशी खूप क्रूरपणे व्यवहार करायचे. या सर्व गोष्टी यहोवाच्या नजरेत योग्य नसल्या, तरी त्यांच्या कर्जाची परतफेड करणं हे त्याला आवश्‍यक वाटलं आणि त्याने त्याची पूर्ण भरपाई केली.

आध्यात्मिक रत्नं शोधा

(यहेज्केल २८:१२-१९) “मानवपुत्रा, सोरच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभु परमेश्‍वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस; तू ज्ञानपूर्ण व सर्वांगसुंदर आहेस. देवाचा बाग एदेन यात तू होतास; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद यास्फे, नीलमणी पाचू, माणिक, व सोने असे अनेक तऱ्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; खंजिऱ्‍या व बासऱ्‍या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे; तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची योजना झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्‍त करूब होतास; मी तुझी तशी योजना केली होती; तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास; तू अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्‍या पाषाणातून हिंडत असस. तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठायी अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकारबुद्धी शिरून तू पातक केले; म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्‍वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणाऱ्‍या करूबा! त्या अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्‍या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला आहे. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली; मी तुला भूमीवर आदळले, राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्यापुढे तुला टाकले. खोटा व्यापार चालवून तू बहुत पातके केली, त्यांनी तू आपली पवित्र स्थाने विटाळली म्हणून तुझ्यातून अग्नी निघून तुला खाऊन टाकेल, असे मी केले आहे आणि तुला पाहणाऱ्‍यांच्या डोळ्यांदेखत मी पृथ्वीवर तुझी राखरांगोळी केली आहे. राष्ट्रांमध्ये तुझ्या ओळखीचे सर्व तुला पाहून विस्मय पावले आहेत, तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे, तू कायमचा नष्ट झाला आहेस.”

इन्साइट-२ पृ. ६०४ परि. ४-५

परिपूर्णता

पहिला पापी आणि सोरचा राजा. मानव पाप करून अपरिपूर्ण होण्याआधी आत्मिक जगात पाप आणि अपरिपूर्णतेची सुरुवात झाली होती. योहान ८:४४ यात येशूच्या शब्दांवरून आणि उत्पत्तिच्या ३ ऱ्‍या अध्यायातल्या अहवालावरून आपल्याला हे कळतं. यहेज्केल २८:१२-१९ यात दिलेलं शोकगीत हे मुळात सोरच्या राजाला उद्देशून असलं, तरी ज्याने सर्वात आधी पाप केलं होतं त्याच्याबद्दलही आपल्याला यांतून कळतं. तो देवाचा एक आत्मिक पुत्र होता. सोरच्या राजाचा गर्विष्ठपणा, त्याचं स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणं, त्याला ‘करूब’ म्हटलं जाणं, तसंच या वचनांमध्ये देवाच्या ‘एदेन बागेचा’ उल्लेख या सर्व गोष्टी बायबलमध्ये दियाबल सैतानाविषयी जे सांगितलं आहे त्याच्याशी जुळतात. तोही गर्वाने फुगला होता. एदेन बागेतल्या सापाशी त्याचा संबंध जोडला जातो आणि त्याला या ‘जगाच्या व्यवस्थेचा देव’ म्हणण्यात आलं आहे.—१ती ३:६; उत्प ३:१-५, १४, १५; प्रक १२:९; २कर ४:४.

या अहवालात सोरच्या राजाचं नाव देण्यात आलेलं नाही. पण तो या शहरात राहत होता. सोर शहर “पूर्णतेची मुद्राच” होतं असं म्हटलं आहे. तसंच हा राजा स्वतः “ज्ञानपूर्ण व सर्वांगसुंदर” होता, आणि “[त्याच्या] ठायी अधर्म दिसून येईपर्यंत [त्याची] चालचलणूक यथायोग्य होती” असं सांगितलं आहे. (यहे २७:३; २८:१२, १५) यहेज्केलमध्ये दिलेलं हे शोकगीत सर्वात आधी किंवा थेटपणे सोरच्या कोणत्याही एका राजाबद्दल नसून ते राजांच्या वंशातल्या अनेक शासकांबद्दल असू शकतं. (यश १४:४-२० यात नाव न दिलेल्या “बाबेलच्या राजासंबंधाने” केलेल्या भविष्यवाणीची तुलना करा.) जर असं असेल, तर सुरुवातीला सोरच्या राजांचे दावीद आणि शलमोन या राजांच्या शासनकाळात देवाच्या लोकांशी जे मैत्रीचे संबंध होते, त्यांचा या अहवालात कदाचित उल्लेख केलेला असावा. त्या काळात, मोरिया डोंगरावरच्या यहोवाच्या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी सोरने सामानही पुरवलं होतं. त्यामुळे सुरुवातीला यहोवाच्या लोकांशी, म्हणजेच इस्राएली लोकांशी सोरचा व्यवहार योग्य होता. (१रा ५:१-१८; ९:१०, ११, १४; २इत २:३-१६) पण नंतर आलेल्या राजांनी हा “यथायोग्य” व्यवहार सोडून दिला आणि त्यामुळे योएल, आमोस, तसंच यहेज्केल या देवाच्या संदेष्ट्यांनी सोरविरुद्ध न्यायदंड घोषित केले.

१४-२० ऑगस्ट

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ३२-३४

“पहारेकऱ्‍यावर असलेली मोठी जबाबदारी”

(यहेज्केल ३३:७) “तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांस सावध कर.”

इन्साइट-२ पृ. ११७२ परि. २

पहारेकरी

लाक्षणिक अर्थाने वापर. इस्राएल राष्ट्रासाठी लाक्षणिक अर्थाने पहारेकरी म्हणून कार्य करण्यासाठी यहोवाने काही संदेष्ट्यांना पाठवलं. (यिर्म ६:१७) आणि या संदेष्ट्यांनीही काही वेळा लोकांना संदेश सांगताना पहारेकऱ्‍याच्या उदाहरणाचा वापर केला. (यश २१:६, ८; ५२:८; ६२:६; होशे ९:८) पहारेकरी म्हणून काम करणाऱ्‍या या संदेष्ट्यांवर दुष्ट लोकांना येणाऱ्‍या नाशाचा इशारा देण्याची जबाबदारी होती. जर त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नाही, तर त्यांना याबद्दल देवाला हिशोब द्यावा लागणार होता. साहजिकच लोकांनी त्यांच्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करून आपली वागणूक बदलली नाही तर याचा रक्‍तदोष त्यांच्यावरच येणार होता. (यहे ३:१७-२१; ३३:१-९) यहोवाने दिलेलं काम विश्‍वासूपणे न करणारा संदेष्टा हा एखाद्या आंधळ्या पहारेकऱ्‍यासारखा किंवा मुक्या कुत्र्यासारखा निरुपयोगी होता.—यश ५६:१०.

आध्यात्मिक रत्नं शोधा

(यहेज्केल ३३:३२, ३३) “पाहा, एखादा मधुर कंठाचा व वाद्ये चांगली वाजवणारा प्रेमगीत गातो तसा तू त्यांस वाटतोस कारण ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत. तरी पण हे घडून येईल, (पाहा, ते आता घडत आहे,) तेव्हा आपल्यात एका संदेष्टा होता, असे त्यांस समजून येईल.”

टेहळणी बुरूज९१-E ३/१५ पृ. १७ परि. १६-१७

यहोवाच्या स्वर्गीय रथासोबत चालत राहा

बेपर्वा वृत्तीने खचून न जाणे

१६ यहेज्केलने आज्ञाधारक राहून व स्वतःला लोकांच्या बेपर्वा वृत्तीमुळे किंवा थट्टेमुळे खचून जाऊ न देण्याविषयी चांगलं उदाहरण मांडलं. त्याच प्रमाणे, शुद्ध वाणीच्या वाढीसोबत प्रगती करत राहिल्यामुळे आपल्याला स्वर्गीय रथ चालवणाऱ्‍या यहोवा देवाचं मार्गदर्शन स्वीकारून त्यानुसार चालणं शक्य होतं. यामुळे आपल्याला त्याच्या आज्ञांचं पालन करता येतं, आणि ज्यांना आपण यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश घोषित करतो त्या लोकांच्या बेपर्वा वृत्तीने व थट्टेने खचून न जाण्याचं बळ मिळतं. यहेज्केलप्रमाणेच देवाने आपल्यालाही आधीच याची ताकीद दिली आहे की, काही लोक विरोध करतील, ते कठीण कपाळाचे आणि कठीण हृदयाचे असतील. इतर काही यहोवाचं ऐकून घेऊ इच्छित नाही, म्हणून ते आपलंही ऐकणार नाहीत. (यहेज्केल ३:७-९) तसंच, आणखी काही लोक ढोंगी असतील, असं यहेज्केल ३३:३१, ३२ ही वचनं सांगतात: “जनसभेतल्याप्रमाणे ते तुजकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुजपुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात, पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे; आणि पाहा, एखादा मधुर कंठाचा व वाद्ये चांगली वाजविणारा प्रेमगीत गातो तसा तू त्यांस वाटतोस, कारण ते तुझी वचन ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत.”

१७ याचा परिणाम काय होणार होता? ३३ वं वचन पुढे म्हणतं: “तरीपण हे घडून येईल—पाहा, ते आता घडत आहे—तेव्हा आपल्यात एक संदेष्टा होता असे त्यांस समजून येईल.” ही वचनं दाखवतात की, लोकांचा प्रतिसाद दिला नाही, तरी यहेज्केलने माघार घेतली नाही. दुसऱ्‍यांच्या बेपर्वा वृत्तीमुळे तो निराश झाला नाही. लोक ऐकोत वा न ऐकोत, त्याने देवाची आज्ञा मानली आणि आपली नेमणूक पूर्ण केली.

२८ ऑगस्ट–३ सप्टेंबर

आध्यात्मिक रत्नं शोधा

(यहेज्केल ३९:७) “मी आपल्या इस्राएल लोकांत माझे पवित्र नाम प्रकट करीन; इतःपर आपल्या पवित्र नामाची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही; तेव्हा मी परमेश्‍वर इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे असे राष्ट्रांना समजून येईल.”

टेहळणी बुरूज१२-E ९/१ पृ. २१ परि. २

“मी परमेश्‍वर इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे असे राष्ट्रांना समजून येईल”

यहोवा म्हणतो, “आपल्या पवित्र नामाची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही.” अन्यायासाठी जेव्हा लोक देवाला दोष देतात तेव्हा ते खरंतर त्याच्या नावाचा अनादर करत असतात. तो कसा? बायबलमध्ये “नाव” हा शब्द सहसा एखाद्या व्यक्‍तीच्या प्रतिष्ठेला सूचित करतो. एका संदर्भ पुस्तकात असं म्हटलं आहे, की देवाचं नाव “आपल्याला त्याच्याबद्दल जे माहीत आहे, म्हणजेच, त्याने स्वतःबद्दल जे प्रकट केलं आहे त्याला सूचित करतं. तसंच, त्याचा नावलौकिक आणि मानसन्मान याच्याशीही त्याच्या नावाचा संबंध आहे.” यहोवाच्या नावातच त्याची प्रतिष्ठा समावलेली आहे. मग, अन्यायाविषयी पाहिलं, तर यहोवाबद्दल आपल्याला काय माहीत आहे? त्याला अन्यायाचा वीट आहे! तसंच, ज्यांच्यावर अन्याय होतो अशा लोकांचा त्याला कळवळा येतो. (निर्गम २२:२२-२४) यहोवाला ज्या गोष्टींचा वीट आहे त्याच गोष्टी करण्याबद्दल जेव्हा लोक त्याला दोषी ठरवतात, तेव्हा ते त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवतात. अशा रीतीने ते त्याच्या नावाची “निंदा” करतात.—स्तोत्र ७४:१०, पं.र.भा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा