सप्टेंबर—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ
४-१० सप्टेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ४२-४५
“शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात येईल!”
(यहेज्केल ४३:१०-१२) “हे मानवपुत्रा, इस्राएल घराण्यास हे मंदिर दाखव, म्हणजे ते आपल्या पातकांबद्दल लज्जित होतील व त्यांनी या नमुनेदार इमारतीचे माप घ्यावे. त्यांनी केलेल्या सर्व कृत्यांबद्दल ते लज्जित झाले म्हणजे त्यांस या मंदिराचा आकार, त्याची रचना, त्यात जाण्यायेण्याचे मार्ग, त्यातील सर्व आकृती, त्याचे सर्व विधी, व त्याचे सर्व नियम त्यांस दाखव व त्यांच्यासमोर लिहून ठेव म्हणजे त्यांच्या सर्व नियमांचे व विधींचे अवलंबन करून त्याप्रमाणे ते वागतील. मंदिराचा हा नियम आहे; पर्वताच्या माथ्यावरील भोवतालचा सर्व प्रदेश अत्यंत पवित्र आहे. पाहा, मंदिराचा हा नियम आहे.”
इन्साइट-२ पृ. १०८२ परि. २
मंदिर
यहेज्केलला दिसलेला मंदिराचा दृष्टान्त. यरुशलेम आणि त्यात असलेल्या शलमोन राजाच्या मंदिराचा विनाश झाल्यानंतर १४ व्या वर्षी, म्हणजेच इ.स.पू. ५९३ मध्ये, याजक आणि संदेष्टा असलेल्या यहेज्केलने एक दृष्टान्त पाहिला. त्यात त्याला एका उंच पर्वतावर नेण्यात आलं आणि तिथे त्याने यहोवाचं एक भव्य मंदिर पाहिलं. (यहे ४०:१, २) बंदिवासात असलेल्या यहुद्यांना त्यांनी केलेल्या पापांची जाणीव व्हावी आणि त्यांनी पश्चात्ताप करावा; तसंच, विश्वासू यहुद्यांना सांत्वन मिळावं म्हणून यहेज्केलला, त्याने पाहिलेल्या सर्व गोष्टी “इस्राएल घराण्यास” सांगण्याची आज्ञा देण्यात आली. (यहे ४०:४; ४३:१०, ११)
आध्यात्मिक रत्नं शोधा
(यहेज्केल ४३:८, ९) “त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्याशेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वरास्तंभा शेजारी उभारले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती; अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून मी रागाने त्यांचा नाश केला. आता त्यांनी आपला व्यभिचार व त्यांच्या राजांनी स्थापलेल्या प्रेतवत् मूर्ती मजपासून दूर घालवाव्या, मग मी त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहीन.”
इन्साइट-२ पृ. ४६७ परि. ४
नाव
इस्राएली लोक देवाच्या नावाने ओळखले जायचे. त्यामुळे जेव्हा त्यांनी त्याचे नीतिनियम मोडले, तेव्हा देवाच्या नावाची निंदा झाली आणि त्याच्या नावाला कलंक लागला. (यहे ४३:८; आम २:७) इस्राएली लोक विश्वासू न राहिल्यामुळे, देवाने त्यांना शिक्षा केली आणि यामुळेही इतर राष्ट्रांच्या लोकांना देवाच्या नावाची निंदा करण्याची संधी मिळाली. (पडताळा स्तो ७४:१०, १८; यश ५२:५.) हे ताडन खरंतर यहोवानेच केलं होतं, ही गोष्ट या राष्ट्रांनी ओळखली नाही. त्यामुळे त्यांनी असा चुकीचा निष्कर्ष काढला, की यहोवा त्याच्या लोकांना वाचवू शकला नाही आणि म्हणून त्यांच्यावर संकटं आली. आपल्या नावावर लागलेला हा कलंक मिटवण्यासाठी, यहोवाने यहुद्यांमधल्या शेष जनांना पुन्हा त्यांच्या देशात आणून वसवलं. हे त्याने त्याच्या नावासाठी केलं.—यहे ३६:२२-२४.
(यहेज्केल ४५:९, १०) “प्रभू परमेश्वर म्हणतो, ‘इस्राएलाच्या अधिपतींनो, झाले ते पुरे; आता तुम्ही बलात्कार व जुलूम यापासून दूर राहा, न्याय व नीती यांचे पालन करा, आणि माझ्या लोकांस त्यांच्या वतनातून घालवून देण्याचे सोडा,’ असे प्रभू परमेश्वर म्हणतो. खरी तागडी, खरी एफा व खरी बथ वापरा.”
इन्साइट-२ पृ. १४०
न्याय
यहोवाची पसंती मिळवण्याची इच्छा असलेल्यांकडून त्याने सुरवातीपासून हीच अपेक्षा केली आहे, की लोकांनी त्याचे न्यायाचे स्तर जाणून घ्यावे आणि त्या स्तरांप्रमाणे वागावं. (यश १:१७, १८; १०:१, २; यिर्म ७:५-७; २१:१२; २२:३, ४; यहे ४५:९, १०; आम ५:१५; मीख ३:९-१२; ६:८; जख ७:९-१२)
११-१७ सप्टेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ४६-४८
(यहेज्केल ४७:६) “तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तू हे पाहिले ना? मग त्याने मला नदीतीराने माघारी नेले.”
इन्साइट-२ पृ. १००१
मानवपुत्र
इब्री शास्त्रवचनांमध्ये, हा शब्द यहेज्केलच्या पुस्तकात सर्वात जास्त वेळा आढळतो. या पुस्तकात देव ९० पेक्षा जास्त वेळा यहेज्केलला “मानवपुत्रा” असं म्हणतो. (यहे २:१, ३, ६, ८) संदेष्टा यहेज्केल हा केवळ एक माणूस आहे या गोष्टीवर जोर देण्यासाठी या शब्दाचा अशा प्रकारे वापर करण्यात आला आहे. मुळात संदेश देणारा हा सर्वशक्तिमान देव आहे, आणि संदेश सांगण्यासाठी तो एका मानवाचा उपयोग करत आहे, हेही या शब्दावरून आणखी स्पष्ट होतं. दानीएल ८:१७ यात दानीएल संदेष्ट्यासाठीही हा शब्द वापरण्यात आला आहे.
१८-२४ सप्टेंबर
(दानीएल १:५) “राजा खात असे त्या मिष्टान्नांतून व पीत असे त्या द्राक्षारसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून तीन वर्षांपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे; ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे, अशी राजाने आज्ञा केली.”
(दानीएल १:८) “राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस यांचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानीएलाने मनाचा निश्चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदारास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा.”
इन्साइट-२ पृ. ३८२
मेशख
राजा खात असलेलं अन्न, त्या इब्री तरुणांच्या दृष्टीने अशुद्ध होतं याची तीन कारणं असू शकतात: (१) बाबेलचे लोक, मोशेच्या नियमशास्त्रात अशुद्ध म्हटलेल्या काही प्राण्यांचं मांस खायचे; (२) ते प्राण्याचं मांस खाण्याआधी, त्याचं रक्त नीट वाहू देण्याची काळजी घेत नव्हते, कदाचित ते प्राण्यांना गळा दाबून मारत असावेत; (३) ते मूर्तिपूजक असल्यामुळे, ते बऱ्याचदा आपल्या देवांना बलिदान म्हणून वाहिलेल्या प्राण्यांचं मांस खायचे. अशा प्राण्यांचं मांस खाणं त्यांच्या दृष्टीने उपासनेचा भाग होता.—दान १:८; पडताळा १कर १०:१८-२०, २८.
२५ सप्टेंबर–१ ऑक्टोबर
(दानीएल ५:१७) “तेव्हा दानीएलाने राजास उत्तर दिले की, तुझ्या देणग्या तुजजवळच राहू दे, तुझी इनामे दुसऱ्या कोणास दे, तथापि मी हा लेख राजास वाचून दाखवतो व त्याचा अर्थ करून त्याला सांगतो.”
(दानीएल ५:२९) “तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानीएलास जांभळ्या रंगाचा पोषाख लेवविला. त्याच्या गळ्यात सेन्याचा गोफ घातला व त्याच्यासंबंधाने सर्वत्र द्वाही फिरवली की हा राज्यातील तिघा अधिपतीतला एक आहे.”
टेहळणी बुरूज८८-E १०/१ पृ. ३० परि. ३-५
वाचकांचे प्रश्न
दानीएल नावाच्या इब्री तरुणाला राजासमोर आणण्यात आलं, तेव्हा राजाने पुन्हा एकदा त्याला इनाम म्हणून जांभळा पोशाख घालण्याची आणि त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालून, त्याला राज्यातला तिसरा अधिपती घोषित करण्याची इच्छा व्यक्त केली. पण दानीएल संदेष्ट्याने आदरपूर्वक उत्तर दिलं: “तुझ्या देणग्या तुजजवळच राहू दे, तुझी इनामे दुसऱ्या कोणास दे, तथापि मी हा लेख राजास वाचून दाखवतो व त्याचा अर्थ करून त्याला सांगतो.”—दानीएल ५:१७.
दानीएलला भिंतीवरच्या शब्दांचा अर्थ सांगण्यासाठी कोणतीही लाच किंवा मोबदला नको होता. म्हणून, राजाने त्या वस्तू आपल्याजवळच ठेवाव्यात किंवा दुसऱ्या कोणाला द्याव्यात असं तो म्हणाला. दानीएल कोणताही इनाम मिळवण्यासाठी त्या शब्दांचा अर्थ सांगणार नव्हता. खरा देव यहोवा, जो लवकरच बाबेलवर न्यायदंड आणणार होता, त्याच्याच मदतीने तो भिंतीवरच्या शब्दांचा अर्थ सांगणार होता.
दानीएल ५:२९ यात सांगितल्याप्रमाणे, दानीएलने भिंतीवर लिहिलेले शब्द वाचून त्यांचा अर्थ सांगितल्यावर राजाने असा हुकूम दिला, की दानीएलला त्या वस्तू इनाम म्हणून दिल्या जाव्यात. दानीएलने स्वतःहून जांभळा पोशाख किंवा सोन्याचा गोफ घातला नाही. तर त्या काळातला सर्वात शक्तिशाली राजा बेलशस्सर याच्या हुकमानुसार त्याला त्या वस्तू घालण्यात आल्या. पण हे दानीएल ५:१७ यात जे म्हटलं आहे त्याच्या विरोधात नाही. कारण त्या वचनात दानीएलने आपल्या शब्दांतून हे स्पष्ट केलं की भिंतीवरच्या शब्दांचा अर्थ सांगण्यामागे त्याचा कोणताही स्वार्थी हेतू नव्हता.