मे—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ
१-७ मे
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ३२–३४
“इस्राएलला पुन्हा स्थापण्यात येईल याचं एक चिन्ह”
(यिर्मया ३२:६-९) “यिर्मया म्हणाला, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, पाहा, तुझा चुलता शल्लूम याचा पुत्र हानामेल तुजकडे येऊन म्हणेल, अनाथोथ इथले माझे शेत विकत घे; कारण ते सोडवून घेण्याचा हक्क तुझा आहे. तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल मजकडे पहारेकऱ्यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ इथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे. मग मी अनाथोथातले ते शेत माझा चुलतभाऊ हानामेल याजपासून विकत घेतले व त्याला त्याचे मोल सतरा शेकेल रुपे तोलून दिले.”
(यिर्मया ३२:१५) “कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, घरेदारे, शेते, द्राक्षांचे मळे यांची या देशात पुनः खरेदी चालू होईल.”
इन्साइट-१ पृ. १०५ परि. २
अनाथोथ
यरुशलेमचा नाश होण्याआधी यिर्मयाने आपला कायदेशीर हक्क वापरून अनाथोथ इथलं त्याच्या चुलत भावाचं शेत विकत घेतलं. बंदिवासातून लोकांची सुटका होईल याला ते सूचित करत होतं. (यिर्म ३२:७-९) जरुब्बाबेलसोबत बंदिवासातून जे सुरुवातीला परत आले, त्यात अनाथोथचे १२८ पुरुषही होते. तसंच, ज्या नगरांचं पुनर्वसन झालं त्यात अनाथोथचासुद्धा समावेश होता. यावरून यिर्मयाची भविष्यवाणी पूर्ण झाली हे दिसून येतं.—एज २:२३; नहे ७:२७; ११:३२.
(यिर्मया ३३:७, ८) “मी यहूदाचा बंदिवास व इस्राएलाचा बंदिवास उलटवीन व त्यांस पूर्ववत स्थापीन. त्यांनी जे दुष्कर्म करून मजविरुद्ध पाप केले त्या सर्वांचे मी क्षालन करेन; त्यांनी जी दुष्कर्मे करून मजविरुद्ध पाप व अपराध केला त्या सर्वांची मी क्षमा करेन.”
जेरमाया पृ. १५२ परि. २२-२३
“हेच मला जाणणे नव्हे काय?”
जेव्हा एखादी व्यक्ती अविचारीपणे बोलण्याद्वारे किंवा कार्याद्वारे तुमचं मन दुखावते, तेव्हा तुम्ही यहोवाचं अनुकरण कराल का? प्राचीन यहूदी लोकांच्या बाबतीत देवाने म्हटलं, की ज्यांना त्याने माफ केलं त्यांचं तो “क्षालन” किंवा त्यांना शुद्ध करेल. (यिर्मया ३३:८ वाचा.) एखाद्या पश्चात्तापी व्यक्तीचे पाप यहोवा मागे टाकतो आणि त्याला सेवा करण्याची एक नवीन संधी देतो, तेव्हा तो एका अर्थाने तिला शुद्ध करतो. पण देव क्षमा करतो याचा अर्थ असा होत नाही, की वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेपासून ती व्यक्ती मुक्त होते आणि आता ती परिपूर्ण झाली आहे किंवा तिच्यात पाप नाही.
आध्यात्मिक रत्नं शोधा
(यिर्मया ३३:१५) “त्या दिवसात व त्या समयी दाविदाला धार्मिकतेचा एक अंकुर फुटेल असे मी करेन, तो देशात न्याय व धार्मिकता चालवेल.”
जेरमाया पृ. १७३ परि. १०
नव्या करारातून तुम्ही फायदा मिळवू शकता
दावीदचा “अंकुर” येणाऱ्या मसीहाला सूचित करतो, असं यिर्मयाने म्हटलं आणि ते योग्यसुद्धा होतं. यिर्मया संदेष्टा म्हणून सेवा करत असताना दावीदचं शाही घराणं छाटून टाकण्यात आलं पण त्याचं खोड जिवंतच राहिलं. कालांतराने राजा दावीदच्या वंशातून येशूचा जन्म झाला. त्याला “परमेश्वर आमची धार्मिकता” असं म्हटलं जाणार होतं. यावरून धार्मिकता हा गुण देवासाठी किती महत्त्वाचा आहे हे दिसून येतं. (यिर्मया २३:५, ६ वाचा.) यहोवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या पृथ्वीवर यातना सहन करू दिल्या आणि त्याचा मृत्यू होऊ दिला. यहोवा न्यायी परमेश्वर असल्यामुळे, तो मानवांना दावीदच्या अंकुराने दिलेल्या खंडणी बलिदानाच्या आधारावर क्षमा करू शकत होता. (यिर्म. ३३:१५) यामुळे काही मानवांसाठी “जीवनाकरता नीतिमान” होण्यास आणि पवित्र आत्म्याने अभिषिक्त होण्यास मार्ग खुला झाला. ते नव्या कराराचे भागीदार बनले. देवासाठी धार्मिकता किती महत्त्वाची आहे, याचा पुरावा म्हणजे जे या कराराचे भागीदार नाहीत त्यांनासुद्धा याचा फायदा आता आणि पुढेही मिळेल.—रोम. ५:१८.
८-१४ मे
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ३५–३८
“एबद-मलेख—धैर्य आणि दया दाखवण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण”
(यिर्मया ३८:४-६) “मग सरदार राजाला म्हणाले, या मनुष्याला जिवे मारा; कारण असले भाषण करून या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचे व सर्व लोकांचे हात तो निर्बळ करतो; हा मनुष्य या लोकांचे हित नव्हे तर नुकसान करावयास पाहतो. तेव्हा सिद्कीया राजा म्हणाला पाहा, तो तुमच्या हाती आहे; राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही. मग राजपुत्र मल्कीया याची पहारेकऱ्यांच्या चौकात विहीर होती. तीत त्यांनी यिर्मयास नेऊन टाकले; त्यानी यिर्मयाला दोरांनी खाली उतरवले. त्या विहिरीत पाणी नव्हते. चिखल होता; यिर्मया त्या चिखलात रुतला.”
इन्साइट-२ पृ. १२२८ परि. ३
सिद्कीया
सिद्कीया हा शूर शासक नव्हता. शहराला वेढा घातलेला असताना यिर्मया लोकांना घाबरवत आहे, असं सरदारांनी सिद्कीयाला सांगितलं. तसंच त्या सरदारांना यिर्मयाला जिवे मारायचं होतं. तेव्हा सिद्कीया त्यांचं ऐकून म्हणाला: “पाहा, तो तुमच्या हाती आहे; राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही.” त्यानंतर एबद-मलेखने यिर्मयाला सोडून देण्याची विनंती केली तेव्हा सिद्कीयाने त्याला परवानगी दिली आणि त्याची सुटका करण्यासाठी त्याच्यासोबत ३० लोकांना घेऊन जाण्यास सांगितलं. मग सिद्कीयाने पुन्हा यिर्मयाला एकटंच बोलवून त्याच्याशी चर्चा केली. त्याने संदेष्टा यिर्मयाला आश्वासन दिलं, की तो त्याला मारून टाकणार नाही किंवा त्याला जे मारू इच्छितात त्यांच्या हातीही देणार नाही. देवाने यिर्मयाद्वारे त्याला बाबेलच्या राजाच्या सरदारांना शरण जावं असं सांगितलं. पण काही यहूदी लोकांना सिद्कीया घाबरला, कारण ते खास्दी लोकांच्या बाजूने झाले होते आणि त्याला भीती होती की ते त्याचा सूड घेतील. त्यामुळे त्याने यिर्मयाचं ऐकलं नाही. तसंच त्याने यिर्मयाला विनंती केली, की त्यांच्यात जी चर्चा झाली आहे ती त्याने सरदारांना सांगू नये. यावरुन दिसून येतं की सिद्कीया शूर नव्हता.—यिर्मया ३८:१-२८.
(यिर्मया ३८:७-१०) “त्यांनी यिर्मयाला विहिरीत टाकले असे राजगृहातला एबद-मलेख कुशी खोजा याने ऐकले; त्या प्रसंगी राजा बन्यामिनी वेशीत बसला होता. एबद-मलेख राजगृहातून निघाला व राजाकडे जाऊन म्हणाला, स्वामीमहाराज, या लोकांनी यिर्मया संदेष्ट्याला जे सर्व केले ते फार वाईट केले; त्यांनी त्याला विहिरीत टाकले; तो आहे तिथे उपासमार होऊन मरेल, कारण नगरात काही अन्न उरले नाही. तेव्हा राजाने एबद-मलेख कुशी याला आज्ञा केली की, इथून तीस माणसे बरोबर घेऊन जा आणि यिर्मया संदेष्ट्याला मृत्यु प्राप्त झाला नाही तो त्याला विहिरीतून काढ.”
टेहळणी बुरूज१२ ५/१ पृ. ३१ परि. २-३
त्याची सेवा करणाऱ्या सर्वांना तो आशीर्वाद देतो
एबद-मलेख कोण होता? तो यहूदामध्ये सिद्कीया राजाच्या दरबारात एक अधिकारी होता आणि यिर्मयाच्या काळात जगला. जरी इतर सरदार देवाचं भय मानत नव्हते, तरी तो देवाचं भय मानायचा आणि यिर्मयाचाही आदर करायचा. दुष्ट सरदारांनी यिर्मयावर देशद्रोहाचा खोटा आरोप लावला आणि त्याला चिखल असलेल्या एका विहिरीत मरण्यासाठी टाकून दिलं. (यिर्मया ३८:४-६) मग एबद-मलेखने काय केलं?
एबद-मलेखने धैर्य दाखवून पटकन योग्य पावलं उचलली. सरदार त्याचं काही बरंवाईट करतील, अशी त्याने भीती बाळगली नाही. त्याने चारचौघात सिद्कीया राजाला सांगितलं, की यिर्मयाच्या बाबतीत अन्याय झाला आहे. यिर्मयाला ज्या दुष्ट लोकांमुळे विहिरीत टाकण्यात आलं, त्यांना उद्देशून एबद-मलेख राजाला म्हणाला: “या लोकांनी यिर्मया संदेष्ट्याला जे सर्व केले ते फार वाईट केले.” (यिर्मया ३८:९) सिद्कीया राजाने एबद-मलेखचं ऐकलं आणि यिर्मयाला सोडवायला आपल्यासोबत ३० लोकांना घेऊन जाण्याचं मार्गदर्शन दिलं.
(यिर्मया ३८:११-१३) “एबद-मलेख बरोबर माणसे घेऊन खजिन्याच्या राजगृहात गेला; तिथून त्याने जुनीपुराणी फडकी व कुजट चिंध्या घेतल्या, आणि दोरांनी त्या विहिरीत यिर्मयाकडे पोहचवल्या. एबद-मलेख कुशी यिर्मयाला म्हणाला, ही जुनीपुराणी फडकी व कुजट चिंध्या दोरांच्या आत ठेवून आपल्या बगलांखाली लाव; तसे यिर्मयाने केले. तेव्हा त्यांनी यिर्मयाला दोरांनी विहिरीतून वर ओढून घेतले; मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला.”
टेहळणी बुरूज१२ ५/१ पृ. ३१ परि. ४
त्याची सेवा करणाऱ्या सर्वांना तो आशीर्वाद देतो
एबद-मलेखने आणखी एक चांगला गुण दाखवला. त्याने दया दाखवली. त्याने फडकी व कपड्याच्या चिंध्या दोरांच्या साहाय्याने यिर्मयापर्यंत पोहचवल्या. पण त्याने असं का केलं? कारण चिखलाच्या खोल विहिरीतून यिर्मयाला वर खेचताना त्याला खरचटू नये, म्हणून त्याने त्या चिंध्या त्याच्या काखेत ठेवण्यासाठी दिल्या.—यिर्मया ३८:११-१३
आध्यात्मिक रत्नं शोधा
(यिर्मया ३५:१९) “म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझ्या सेवेस हजर राहण्यासाठी रेखाबाचा पुत्र योनादाब याच्या घराण्यात कोणा पुरुषाची उणीव कधीच पडणार नाही.”
इन्साइट-२ पृ. ७५९
रेखाब वंशातील लोक
रेखाब वंशातील लोकांनी आज्ञापालन करून आदर दाखवला आणि यामुळे यहोवाला आनंद झाला. यहूदी लोकांनी आपल्या सृष्टिकर्त्याची अवज्ञा केली. पण रेखाब वंशातल्या लोकांनी मात्र कुठलीही तडजोड न करता आपल्या मानवी पित्याची आज्ञा मानली. (यिर्म ३५:१२-१६) त्यामुळे देवाने त्यांना वचन दिलं: “माझ्या सेवेस हजर राहण्यासाठी रेखाबाचा पुत्र योनादाब याच्या घराण्यात कोणा पुरुषाची उणीव कधीच पडणार नाही.”—यिर्म ३५:१९.
१५-२१ मे
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ३९–४३
“यहोवा प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे फळ देईल”
(यिर्मया ३९:४-७) “हे पाहून यहूदाचा राजा सिद्कीया व सर्व योद्धे यांनी पलायन केले; ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने, दोहो तटांमधल्या वेशीने नगराबाहेर निघून गेले; राजा अराबाच्या मार्गाने गेला. खासद्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून यरीहोच्या मैदानात सिद्कीयास गाठले; त्यांनी त्याला पकडून हमाथ प्रांतातले रिब्ला इथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याजपुढे आणले; त्याने त्याची शिक्षा ठरवली. रिब्ला इथे बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत त्याचे पुत्र वधले; त्याप्रमाणेच बाबेलच्या राजाने यहूदाचे सर्व मानकरी वधले; आणखी त्याने सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बाबेलास रवाना करण्यासाठी बेड्यांनी जखडले.”
इन्साइट-२ पृ. १२२८ परि. ४
सिद्कीया
यरुशलेमचा नाश. इ.स.पू. ६०७ मध्ये म्हणजे सिदकीया राजाच्या कारकीर्दीत, अकराव्या वर्षातील चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरुशलेममध्ये शत्रू सैन्य शिरले. त्या रात्री सिद्कीया आणि त्याची सेना तिथून पळून गेले. त्यांनी सिद्कीयाला यरीहोच्या मैदानात गाठलं आणि त्याला रिब्ला इथे नबुखदनेस्सरकडे नेण्यात आलं. सिद्कीयाच्या मुलांना त्याच्यासमोर मारून टाकण्यात आलं. त्या वेळी सिद्कीया फक्त ३२ वर्षांचा होता. याचाच अर्थ त्या वेळी त्याची मुलं जास्त मोठी नसतील. त्यानंतर त्याचे डोळे फोडून टाकण्यात आले आणि त्याला बेड्यांत जखडून बाबेलला नेण्यात आलं आणि तो तिथे बंदी असतानाच मरून गेला.—२रा २५:२-७; यिर्म ३९:२-७; ४४:३०; ५२:६-११; ही वचनंसुद्धा पडताळून पाहा: २४:८-१०; यहे १२:११-१६; २१:२५-२७.
(यिर्मया ३९:१५-१८) “यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात कैदी होता तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले ते असे: जा, एबद-मलेख कूशी याला सांग की, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी आपल्या वचनाप्रमाणे या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन; त्या दिवशी तुझ्यादेखत ती वचने पूर्ण होतील. तुला तर त्या दिवशी मी मुक्त करेन, असे परमेश्वर म्हणतो; ज्यांची तुला भीती वाटते त्यांच्या हाती तुला देणार नाहीत. मी खात्रीने तुझा बचाव करेन; तू तरवारीने पडणार नाहीस, तू जिवानिशी सुटशील; कारण तू मजवर भिस्त ठेवली, असे परमेश्वर म्हणतो.”
टेहळणी बुरूज१२ ५/१ पृ. ३१ परि. ५
त्याची सेवा करणाऱ्या सर्वांना तो आशीर्वाद देतो
एबद-मलेखने जे केलं ते यहोवाने पाहिलं. त्याने त्याची कदर कशी केली? यहूदाचा नाश होणार होता, पण त्याचा जीव वाचेल असं देवाने यिर्मयाद्वारे एबद-मलेखला सांगितलं. यहोवाने त्याला म्हटलं: “तुला तर त्या दिवशी मी मुक्त करेन, . . . त्यांच्या हाती तुला देणार नाहीत. मी खात्रीने तुझा बचाव करेन; तू तरवारीने पडणार नाहीस, तू जिवानिशी सुटशील.” एबद-मलेख सुरक्षित राहील असं वचन यहोवाने का दिलं? कारण यहोवाने म्हटलं: “तू मजवर भिस्त ठेवली” म्हणजेच, विश्वास ठेवला. (यिर्मया ३९:१६-१८) एबद-मलेखने यिर्मयाची काळजी असल्यामुळेच नव्हे तर देवावर विश्वास असल्यामुळे यिर्मयाला वाचवलं होतं, हे यहोवाला माहीत होतं.
(यिर्मया ४०:१-६) “गारद्यांचा नायक नबूजरदान याने यरुशलेम व यहूदा यातील जे लोक बंदिवान करून बाबेलास नेले त्या सर्वांबरोबर यिर्मयासही बेड्या घालून रामा इथे आणले होते; तिथे त्याने यिर्मयाची सुटका केल्यानंतर यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे: गारद्यांचा नायक यिर्मयाला बोलावून म्हणाला, तुझा देव परमेश्वर याने हे अरिष्ट या स्थळावर येईल असे जाहीर केले; परमेश्वराने ते आणले व आपल्या म्हणण्याप्रमाणे केले; तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची वाणी मानली नाही म्हणून हे तुमच्यावर आले. आता पाहा, आज तुझ्या हातात असलेल्या बेड्यांपासून मी तुला मुक्त करतो; तुला मजबरोबर बाबेलास येणे बरे वाटले तर ये, मी तुझी चांगली व्यवस्था ठेवेन; पण मजबरोबर बाबेलास येणे तुला बरे न वाटले तर येऊ नको; पाहा, सगळा देश तुजपुढे आहे; तुला बरे व सोईचे वाटेल तिकडे जा. तो परतला नाही तोच तो त्याला म्हणाला, गदल्या बिन अहीकाम बिन शाफान यास बाबेलच्या राजाने यहूदाच्या नगरांवर अधिपती नेमले आहे त्याजकडे परत जा, व त्याच्याबरोबर लोकांमध्ये जाऊन वस्ती कर; किंवा तुला सोईचे वाटेल तिथे जा. मग गारद्यांच्या नायकाने त्याला अन्नसामग्री व इनाम देऊन रवाना केले. तेव्हा यिर्मया निघून मिस्पा इथे गदल्या बिन अहीकाम याजकडे गेला व देशात जे लोक उरले होते त्यांच्यामध्ये जाऊन राहिला.”
इन्साइट-२ पृ. ४८२
नबूजरदान
राजा नबुखद्नेस्सरने दिलेल्या आज्ञेनुसार नबूजरदानने यिर्मयाची सुटका केली आणि तो त्याच्याशी प्रेमळपणे बोलला. तसंच त्याने यिर्मयाला त्याच्या मनाप्रमाणे वागू दिलं, त्याची काळजी घेतली आणि त्याला काही आवश्यक वस्तूही पुरवल्या.
आध्यात्मिक रत्नं शोधा
(यिर्मया ४३:६, ७) “पुरुष, स्त्रिया, मुले, राजकन्या, यांस गारद्यांचा नायक नबूजरदान याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान याच्या हवाली केलेल्या सर्व लोकांस आणि यिर्मया संदेष्टा आणि बारूख बिन नेरीया यांस त्यांनी नेले; ते मिसर देशास गेले; त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही; ते तहपन्हेस इथे जाऊन पोहचले.”
इन्साइट-१ पृ. ४६३ परि. ४
कालक्रम
सिद्कीयाच्या कारकीर्दीच्या ९व्या वर्षी (इ.स.पू. ६०९) यरुशलेमला वेढा घालण्यात आला. त्याच्या कारकीर्दीच्या ११व्या वर्षी (इ.स.पू. ६०७) यरुशलेम शहराचा नाश झाला. ही घटना घडली तेव्हा नबुखदनेस्सरच्या कारकीर्दीचे १९वे वर्ष सुरू होते. (इ.स.पू. ६२५ मध्ये तो राजा बनला तेव्हापासून मोजल्यावर) (२रा २५:१-८) त्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात (आब महिना म्हणजे जुलै-ऑगस्ट दरम्यान) शहराला आग लावण्यात आली, त्याच्या भिंती पाडण्यात आल्या तसंच, बहुतेक लोकांना बंदीवासात नेण्यात आलं. पण काही गरीब लोकांना तिथंच राहू देण्यात आलं. पण नबुखदनेस्सरचा अधिकारी, गदल्याची हत्या झाल्यानंतर तेसुद्धा मिसर देशात पळून गेले. त्यानंतर यहूदा पूर्णपणे ओसाड झालं. (२रा २५:९-१२, २२-२६) हे सर्व सातव्या महिन्यात म्हणजे एथानीम महिन्यात (किंवा तिशरी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये) घडलं. यावरून हे दिसून येतं, की ७० वर्षांचा काळ १ ऑक्टोबर इ.स.पू. ६०७ मध्ये सुरू झाला असेल आणि इ.स.पू. ५३७ मध्ये संपला असेल. पुढे इ.स.पू. ५३७ या वर्षाच्या सातव्या महिन्यात यहूदी लोक यहूदाला परतले. याचाच अर्थ ते यहूदा पूर्णपणे ओसाड पडल्याच्या ७० वर्षांनंतर परतले.—२इत ३६:२१-२३; एज ३:१.
२२-२८ मे
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ४४-४८
“मोठमोठ्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागू नको”
(यिर्मया ४५:२, ३) “हे बारुखा, परमेश्वर, इस्राएलाचा देव तुला असे म्हणतो: तू म्हणालास, हाय हाय! परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही.”
जेरमाया पृ. १०४-१०५ परि. ४-६
“मोठाल्या गोष्टी” मिळवण्याच्या मागे लागू नको
बारूखला कदाचित प्रसिद्धी आणि अधिकार मिळवण्याची चिंता असावी. तो यिर्मयासाठी लेखनिक म्हणून काम तर करायचाच, शिवाय यिर्मया ३६:३२ या वचनात सांगितल्यानुसार तो एक “लेखक” म्हणजे सचिव होता. उत्खननात मिळालेल्या पुराव्यांवरून दिसून येतं, की त्याचं राजदरबारात उच्च पद होतं.
यहूदामधल्या एका मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला, वारंवार यहूदाच्या नाशाबद्दल लिहावं लागलं असेल तर ती किती निराश झाली असेल हे आपण समजू शकतो. आणि अशीच काहीशी स्थिती बारूखची होती. देवाचा संदेष्टा यिर्मया याचं समर्थन केल्याने बारूखचं पद धोक्यात येण्याचीही शक्यता होती. तसंच यिर्मया ४५:४ या वचनात सांगितल्यानुसार यहोवाने उभारलेल्या गोष्टी जेव्हा तो मोडून टाकणार होता तेव्हा त्याचा काय परिणाम होणार होता? बारूखच्या मनात असलेल्या “मोठाल्या गोष्टी” म्हणजेच, राजदरबारातलं आणखीन मोठं पद किंवा भौतिक गोष्टी व्यर्थ ठरणार होत्या. पण यहोवाने त्याला वेळीच सावध करून योग्यच केलं, कारण लवकरच यहूदी व्यवस्था ढासळणार होती.
कदाचित बारूखच्या मनात असणाऱ्या “मोठाल्या गोष्टी” यांत खूप साऱ्या भौतिक गोष्टी मिळवणं हेदेखील सामील होतं. पण त्याला असं का वाटलं असावं? कारण, यहूदाच्या आसपासच्या राष्ट्रांचा भौतिक गोष्टींवर आणि धनसंपत्तीवर खूप जास्त भरवसा होता. मवाबचा “कर्मे व निधी” यांवर भरवसा होता. अम्मोनचंही तसंच मत होतं. त्यासोबतच, बाबेल हे “समृद्ध भांडार” आहे असं यहोवाने यिर्मयाद्वारे सांगितलं होतं. (यिर्म. ४८:१, ७; ४९:१, ४; ५१:१, १३) पण यहोवाने या सर्व राष्ट्रांची निंदा केली.
(यिर्मया ४५:४, ५क) “यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकेन, मी जे लावले ते उपटून टाकेन; सर्व पृथ्वीची हीच वाट. तू आपणासाठी मोठाल्या गोष्टीची वांच्छा करतोस काय? ती करू नको.”
जेरमाया पृ. १०३ परि. २
“मोठाल्या गोष्टी” मिळवण्याच्या मागे लागू नको
बारूख म्हणतो: “हाय हाय! परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे.” कदाचित तुम्हालाही असं वाटलं असेल. मग तुम्ही या भावना मनात ठेवल्या असतील किंवा कोणाला बोलून दाखवल्या असतील. बारूखनेही कदाचित तसंच काहीतरी केलं असावं. पण एक गोष्ट मात्र नक्की की यहोवाला त्याच्या भावना कळल्या. मानवांची मने पारखणाऱ्या यहोवाने बारूखच्या मनाची स्थिती ओळखली आणि यिर्मयाद्वारे प्रेमळपणे त्याची चुकीची समज सुधारली. (यिर्मया ४५:१-५ वाचा.)
आध्यात्मिक रत्नं शोधा
(यिर्मया ४८:१३) “आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्याच्यासंबंधाने इस्राएल फजित झाला तसा मवाब कमोशासंबंधाने फजित होईल.”
इन्साइट-१ पृ. ४३०
कमोश
मवाबच्या नाशाविषयी भविष्यवाणी करताना यिर्मया संदेष्ट्याने सांगितलं, की त्यांचा मुख्य देवता कमोश, त्याचे याजक व सरदार बंदिवासात जातील. दहा गोत्राच्या राज्यातील इस्राएली लोकांना, वासराची उपासना केल्यामुळे जशी बेथेलची लाज वाटली होती, तशीच मवाबी लोकांना त्यांच्या देवतांची लाज वाटणार होती कारण ते त्यांचा बचाव करू शकणार नव्हते.—यिर्म ४८:७, १३, ४६.
(यिर्मया ४८:४२) “मवाब नाश पावून राष्ट्ररूप राहणार नाही, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई केली आहे.”
इन्साइट-२ पृ. ४२२ परि. २
मवाब
मवाबविषयी केलेली भविष्यवाणी तंतोतंत पूर्ण झाली यात काहीच शंका नाही. बऱ्याच शतकांआधी मवाबी लोकाचं अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं. (यिर्म ४८:४२) नबो, हेशबोन, अरोएर, बेथ-गामूल आणि बाल-मौन ही मवाबी लोकांची शहरं एकेकाळी अस्तित्वात होती. पण आता त्यांचे फक्त अवशेष राहिले आहेत.
२९ मे–४ जून
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ४९-५०
“यहोवा नम्र लोकांना आशीर्वाद, तर गर्विष्ठ लोकांना शिक्षा देतो”
(यिर्मया ५०:२९-३२) “बाबेलावर तिरंदाज, सर्व धनूर्धारी यांस जमवा, त्याच्या सभोवती तळ द्या; त्याचा काही निभाव लागू देऊ नका; त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या; जे सर्व त्याने केले तसे त्याला करा; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरवला आहे. यामुळे त्याचे तरुण त्याच्या चवाठ्यांवर पडतील, त्याचे सर्व वीर त्या दिवशी स्तब्ध होतील असे परमेश्वर म्हणतो. हे गर्विष्ठा! पाहा, मी तुजविरुद्ध आहे असे प्रभु, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण तुझा दिवस, मी तुझा समाचार घेण्याची वेळ आली आहे. गर्विष्ठ ठोकर खाऊन पडेल, त्याला कोणी उचलणार नाही; मी त्याच्या नगरांना आग लावून देईन, ती त्याच्या भोवतालचे सर्व काही खाऊन टाकेल.”
इन्साइट-१ पृ. ५४
शत्रू
देवाच्या लोकांनी जेव्हा त्याचं ऐकलं नाही तेव्हा त्याने शत्रूंना त्यांना लुटू दिलं आणि त्यांच्यावर विजयी होऊ दिलं. (स्तो ८९:४२; विल १:५, ७, १०, १७; २:१७; ४:१२) पण यावरून शत्रूंनी चुकीचा निष्कर्ष काढला; त्यांनी विजयाचं श्रेय स्वतःला आणि त्यांच्या दैवतांना दिलं. तसंच त्यांना असंही वाटलं, की त्यांनी देवाच्या लोकांशी जो वाईट व्यवहार केला आहे त्यासाठी त्यांना शिक्षा मिळणार नाही. (अनु ३२:२७; यिर्म ५०:७) पण यहोवाने या घमेंडी व फुशारकी मारणाऱ्या शत्रूंना नम्र बनण्यास भाग पाडलं. (यश १:२४; २६:११; ५९:१८; नहू १:२) आणि देवाने हे सर्व त्याच्या पवित्र नावासाठी केलं.—यश ६४:२; यहे ३६:२१-२४.
(यिर्मया ५०:३८, ३९) “त्याच्या जलप्रवाहास झळ लागेल व ते सुकून जातील; कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे, त्यातल्या लोकांस मूर्तीचे वेड लागले आहे. यास्तव वनपशु रानकुत्र्यांसह तिथे राहतील, शहामृग तिथे राहतील; तिथे कदाकाळी वस्ती होणार नाही; पिढ्यानपिढ्या तिथे कोणी वस्ती करणार नाही.”
जेरमाया पृ. १६१ परि. १५
“परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे”
मिसरवर विजय मिळवलेल्या बाबेलचा अंत होईल अशी भविष्यवाणी यिर्मयाने बऱ्याच वर्षांआधी केली होती. त्याने अचूकपणे सांगितलं, की बाबेलचा अचानक नाश होईल. देवाच्या संदेष्ट्याने भविष्यवाणी केली होती, की बाबेल ज्यामुळे सुरक्षित होतं, ते पाणी “सुकून” जाईल आणि त्याचे शूर सैन्य लढणार नाहीत. (यिर्म. ५०:३८; ५१:३०) ही भविष्यवाणी अगदी तंतोतंत पूर्ण झाली. मेदी आणि पारसी यांनी फरात नदीच्या पाण्याचा प्रवाह दुसऱ्या दिशेला वळवला आणि त्यामुळे ते नदी ओलांडून शहरात शिरले व अचानक हल्ला केला. बाबेल शहर ओसाड पडून राहील अशीसुद्धा भविष्यवाणी करण्यात आली होती; आणि तसंच घडलं. (यिर्म. ५०:३९; ५१:२६) एकेकाळी शक्तिशाली असणारं बाबेल शहर आजही ओसाड आहे; यावरून हे दिसून येतं की त्याच्याविषयी केलेली भविष्यवाणी अगदी अचूक होती.
आध्यात्मिक रत्नं शोधा
(यिर्मया ४९:१, २) “अम्मोनी लोकांविषयी: परमेश्वर म्हणतो, काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरातून का वस्ती करून आहेत? यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात अम्मोन्यांच्या राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकावयास लावेन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांस अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.”
इन्साइट-१ पृ. ९४ परि. ६
अम्मोनी लोक
तिग्लथपिलेसर तिसरा आणि त्यानंतरच्या एका राजाने, उत्तरेकडील इस्राएलच्या राज्यातील लोकांना पकडून नेलं. त्यानंतर अम्मोनी लोकांनी गाद वंशजाच्या नगरांवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली. (२रा १५:२९; १७:६) यासाठी आधीही त्यांनी इफ्ताहसोबत लढाई केली होती, पण ते अयशस्वी ठरले. (स्तो ८३:४-८ पडताळून पाहा.) यहोवाने यिर्मयाद्वारे जी भविष्यवाणी केली, त्यात त्याने अम्मोनी लोकांची निंदा केली. कारण वारशाने मिळालेल्या गादच्या लोकांच्या जमिनीवर त्यांनी ताबा मिळवला होता. म्हणून यहोवाने यिर्मयाद्वारे ताकीद दिली, की अम्मोन आणि त्यांचा दैवत मिलकोम यांचा नाश होईल. (२रा २४:२, ३) पण अम्मोनी इथवरच थांबले नाहीत. यहूदा राज्याच्या शेवटच्या वर्षांदरम्यान, म्हणजे यहोयाकीमच्या कारकिर्दीत त्यांनी लुटारूंच्या टोळ्या पाठवून यहूदाच्या लोकांना त्रासही दिला.—२रा २४:२, ३.
(यिर्मया ४९:१७, १८) “अदोम भयावह होईल; प्रत्येक येणाराजाणारा तिला पाहून विस्मय पावेल, तिच्या सर्व पीडा पाहून तिचा उपहास करेल. परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांजवळचे गाव जसे उद्ध्वस्त झाले त्याप्रमाणे तिथे कोणी राहावयाचा नाही; एकही मनुष्य तिथे बिऱ्हाड करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”
जेरमाया पृ. १६३ परि. १८
“परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे”
पहिल्या शतकात आणखीन एक भविष्यवाणी पूर्ण झाली. देवाने अगोदरच सांगितलं होतं की बाबेल हे अदोम या राष्ट्रालाही काबीज करेल. (यिर्म. २५:१५-१७, २१; २७:१-७) पण भविष्यवाणीत इतकंच सांगितलं नव्हतं. अदोमची दशा सदोम व गमोरा या शहरांसारखी होईल असंही सांगण्यात आलं होतं. याचाच अर्थ अदोम हे शहर ओसाड पडून ते अस्तित्वहीन होणार होतं. (यिर्म. ४९:७-१०, १७, १८) आणि नेमकं तसंच घडलं. आज नकाशावर तुम्हाला कुठंही अदोम हा देश दिसतो का? किंवा अदोमी लोक असल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? नाही. प्राचीन पुस्तकांमध्ये, बायबलच्या इतिहासात आणि त्या काळाच्या नकाशांवरच त्यांचा उल्लेख असल्याचं समजतं. फ्लेवियस जोसिफस यांच्यानुसार दुसऱ्या शतकात अदोमी लोकांवर यहूदी धर्म स्वीकारण्याची बळजबरी करण्यात आली. शेवटी, इ.स. ७० मध्ये यरुशलेमचा नाश झाल्यानंतर, अदोमी लोकांचं अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं.