ख्रिस्ती जीवन
उपासना स्थळांचं बांधकाम व देखभाल करण्याचा सुहक्क
इस्राएलचं मंदिर बांधताना लोकांनी बरेच श्रम घेतले व खर्चही केला. सर्वांनी या कामात उत्साहानं भाग घेतला. (१इति २९:२-९; २इति ६:७, ८) पण, बांधकामानंतर या मंदिराची इस्राएल लोकांनी केलेल्या देखभालीवरून, या उपासना स्थळाबद्दल त्यांना कृतज्ञता आहे किंवा नाही हे स्पष्ट झालं. (२राजे २२:३-६; २इति २८:२४; २९:३) आज आपणही राज्य सभागृहांचं व संमेलन गृहांचं बांधकाम, स्वच्छता व त्यांची देखभाल करण्यात आपला वेळ खर्च करतो आणि परिश्रम घेतो. या कामात भाग घेऊन आपण जणू काय यहोवासोबत काम करत असतो आणि हा आपल्यासाठी एक सुहक्क आहे; शिवाय तो आपल्या उपासनेचा एक भाग आहे.—स्तो १२७:१; प्रकटी ७:१५.
या उपासना स्थळांची देखभाल करण्यासाठी आपण पुढील गोष्टी करू शकतो:
प्रत्येक सभेनंतर आपण राज्य सभागृह आवरून ठेवू शकतो. तुम्हाला जर साफसफाई करण्यात जास्त वेळ घालवणं शक्य नसेल तर, निदान तुमच्या आजूबाजूला काही कागदाचे तुकडे वगैरे पडले असतील तर ते तुम्ही उचलू शकता.
सभागृहाचं जेव्हा जेव्हा साफसफाईचं किंवा देखभालीचं काही काम असतं तेव्हा तेव्हा त्यात भाग घ्या. अनेक जण मिळून काम करतात तेव्हा सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण राहतं आणि कामाचं ओझंही हलकं होतं.—देवाच्या प्रेमात टिकून राहा पृष्ठ १०५ परि. १८ पाहा.
आर्थिक मदत द्या. मनापासून दिलेल्या कमी किंमतीच्या अगदी दोन टोल्यांचीसुद्धा यहोवा कदर करतो.—मार्क १२:४१-४४.
तुम्हाला जमत असेल तर तुम्ही, उपासना स्थळांच्या बांधकामात व डागडुजीच्या कामात स्वच्छेनं भाग घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बांधकामाचा अनुभव असला पाहिजे, अशी अपेक्षा केली जात नाही.