“देवाच्या वचनाची प्रस्तावना” पुस्तिकेचा वापर करून संभाषण सुरू करा
१. सेवेत मदत व्हावी म्हणून आपल्यासाठी कोणतं नवीन साधन तयार करण्यात आलं आहे?
१ इंग्रजीतील नवीन जग भाषांतर या बायबल भाषांतराच्या नवीन आवृत्तीत, “देवाच्या वचनाची प्रस्तावना” असं शीर्षक असलेला एक भाग आहे. आणि मराठीत हा भाग पुस्तिकेच्या रूपात आहे. सेवेतील सादरतांची तयारी करताना आपण या नवीन पुस्तिकेचा उपयोग कसा करू शकतो? रिझनिंग पुस्तकाप्रमाणं या पुस्तिकेत विविध विषयांवर शास्त्रवचनं आहेत. त्यामुळं लोकांबरोबर आपण सहजपणे संभाषण सुरू करू शकतो.
२. सेवेमध्ये आपण “देवाच्या वचनाची प्रस्तावना” या पुस्तिकेचा वापर कसा करू शकतो?
२ या पुस्तिकेतील प्रश्न क्रमांक ८ निवडून तुम्ही म्हणू शकता: “आज आम्ही लोकांना भेटून त्यांना एक प्रश्न विचारत आहोत. ‘मानवांना सहन करावं लागणारं दुःख देवामुळं आहे का?’ [कधीकधी घरमालकाला सरळ पुस्तिकेतील प्रश्न दाखवणं योग्य असेल. उत्तरासाठी थांबा.] या प्रश्नाचं मनाला समाधान मिळेल असं उत्तर शास्त्रवचनात दिलं आहे.” पुस्तिकेत दिलेल्या वचनांतून एक किंवा दोन वचनं सरळ बायबलमधून वाचून दाखवा. घरमालक आणखी जाणू इच्छित असेल तर त्याला अनुक्रमणिकेतील २० प्रश्न दाखवा आणि त्यातील एक प्रश्न निवडू द्या. मग त्यावर चर्चा करण्यासाठी तुम्ही पुढच्या वेळी येऊ शकाल असे त्याला सांगू शकता. किंवा, तुम्ही चर्चा केलेल्या विषयावर अधिक माहिती असलेलं आणि आपण ज्यातून बायबल अभ्यास चालवतो असं एखादं प्रकाशन त्याला देऊ शकता.
३. ख्रिश्चन नसलेल्या लोकांबरोबर संभाषण सुरू करण्यासाठी आपण “देवाच्या वचनाची प्रस्तावना” पुस्तिकेचा उपयोग कसा करू शकतो?
३ ख्रिश्चन नसलेल्या लोकांना साक्ष देताना, प्रश्न क्रमांक ४ आणि १३ ते १७ जास्त फायदेकारक ठरू शकतात. जसं की, प्रश्न क्रमांक १७ यातील माहितीचा उपयोग करताना तुम्ही म्हणू शकता: “आम्ही एका सामाजिक कार्यात भाग घेत आहोत आणि विशेषकरून कुटुंबांना भेट देत आहोत. आज कुटुंबांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, नाही का? [उत्तरासाठी थांबा.] अनेक जोडप्यांना ज्याचा फायदा झाला आहे अशी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवली तर चालेल का? [घरमालकानं होकार दिला आणि ती स्त्री असेल तर इफिसकर ५:३३ वचनात काय दिलं आहे ते सांगा.] “पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी,” अर्थात पत्नीनं पतीचा गाढ आदर करावा. [घरमालक पुरूष असेल तर इफिसकर ५:२८ या वचनात काय दिलं आहे ते सांगा.] या सल्ल्याचं पालन केल्यानं कुटुंबाला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का?”
४. ख्रिश्चन नसलेल्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्ही शेवटी काय करू शकता?
४ संभाषणाच्या शेवटी दुसऱ्या वेळेला पुन्हा चर्चा करण्यासाठी व्यवस्था करा. तुम्ही मागच्या वेळी ज्या प्रश्नावर चर्चा केली होती त्या प्रश्नावरील इतर वचनं तुम्ही त्याला दाखवू शकता. आणि एका उचित वेळी तुम्ही त्याला सांगू शकता, की तुम्ही सांगत असलेल्या चांगल्या गोष्टी बायबलमधून आहेत. तुमच्या आधीच्या चर्चांच्या आधारावर आणि बायबलबद्दल असलेल्या त्याच्या दृष्टिकोनाच्या आधारावर त्याला फायदा होईल असं एखादं प्रकाशन तुम्ही त्याला देऊ शकता.—आपली राज्य सेवा डिसेंबर २०१३ मधील पुरवणी पाहा.