२०१५ ईश्वरशासित सेवा प्रशाला आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यास मदत करते
१ स्तोत्रकर्त्या दाविदाने असे लिहिले: “हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.” (स्तो. १९:१४) मंडळीत आणि क्षेत्र सेवेत लोकांना सत्य सांगण्याचा आपल्याला बहुमान मिळाल्यामुळे, आपण जे बोलतो ते देवाला मान्य असावे असे आपल्याला वाटते. याबद्दल आपण खरोखरच खूप आनंदी आहोत. यहोवा आपल्याला अनेक मार्गांनी सेवेत कसे बोलायचे त्याचे प्रशिक्षण देतो आणि ‘ईश्वरशासित सेवा प्रशाला’ ही त्या मार्गांपैकी एक आहे. ही प्रशाला संपूर्ण जगभरातील १,११,००० पेक्षा अधिक मंडळ्यांमध्ये दर आठवडी चालवली जाते. या प्रशालेमुळे जगभरातील बंधुभगिनींना सुवार्तेचे प्रचारक बनण्यास मदत मिळाली आहे. लोकांच्या मनाला पटतील असे मुद्दे त्यांचे मन न दुखावता परंतु, धैर्याने कसे सांगायचे हे या प्रशालेत शिकवले जाते.—प्रे. कृत्ये १९:८; कलस्सै. ४:६.
२ सन २०१५ च्या ईश्वरशासित प्रशालेत, देवाच्या वचनाची प्रस्तावना आणि चर्चेसाठी बायबल विषय यांतील विषयांवर आधारित भाषणे आहेत. तसेच, ‘बायबल वाचनातील ठळक मुद्दे’ आणि ‘नेमणूक क्रमांक १’ या भागांसाठी असलेल्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हे बदल का करण्यात आले आहेत व हे भाग कसे हाताळावेत त्याबद्दल पुढील परिच्छेदांमध्ये समजावण्यात आले आहे.
३ बायबल वाचनातील ठळक मुद्दे: हा भाग हाताळणारा बांधव, साप्ताहिक बायबल वाचनातील एका रोचक व व्यावहारिक मुद्द्यावर दोन मिनिटे चर्चा करू शकतो. त्याने जर चांगली तयारी केली तर दिलेल्या वेळेत मंडळीच्या फायद्यासाठी असलेला मुद्दा त्याला सांगता येईल. यानंतर नेहमीप्रमाणे मग मंडळीतील इतरांसाठी सहा मिनिटे उरतात ज्यात, प्रत्येक जण ३० सेकंदांत त्याला आवडलेला मुद्दा सांगू शकतो. अवघ्या ३० सेकंदांमध्ये अर्थभरीत मुद्दा सांगण्यासाठीसुद्धा चांगली तयारी करणे आवश्यक आहे. एका अर्थाने हे सर्वांकरता एकप्रकारचे प्रशिक्षणच आहे. आपण जर आपला मुद्दा ३० सेकंदांत सांगितला तर बाकीच्यांना त्यांनी संशोधन करून काढलेले मुद्दे सांगण्यास वेळ मिळतो.
४ नेमणूक क्रमांक १: बायबल वाचनाची वेळ कमी करण्यात आली आहे. ती आता तीन मिनिटे किंवा त्याहूनही कमी असेल. या वेळेत कमी माहिती वाचली जाऊ शकते. ज्यांना बायबल वाचनाची नेमणूक मिळते त्यांनी मोठ्याने वाचण्याचा अनेकदा सराव करावा. वाचताना आपण शब्दांचा स्पष्ट उच्चार करत आहोत का, आणि न अडखळता वाचत आहोत का याकडे त्यांनी लक्ष द्यावे. यामुळे वचनांत सांगितलेले विचार ऐकणाऱ्यांना समजतील. खरेतर यहोवाच्या सर्व लोकांना नीट वाचता आले पाहिजे; कारण त्याच्या उपासनेत याला महत्त्व आहे. आपल्या मंडळ्यांतील कितीतरी मुलांना छान वाचता येते. यावरून हेच दिसते, की आपल्या मुलांनी उत्तम वाचक व्हावे यासाठी पालक बरीच मेहनत घेत आहेत.
५ नेमणूक क्रमांक २: हा भाग बहिणीला नेमला जाईल. तिने तो पाच मिनिटांत पूर्ण करावा. दिलेल्या विषयावर तिने आपले भाषण तयार करावे. भाषण जेव्हा देवाच्या वचनाची प्रस्तावना किंवा चर्चेसाठी बायबल विषय या पुस्तिकेवर आधारित असते तेव्हा त्याचे सेटिंग बायबल अभ्यास, पुनर्भेट, अनौपचारिक साक्ष किंवा यांसारख्या क्षेत्र सेवेतील इतर प्रकारांवर आधारित असावे. आणि हे सेटिंग खरे व स्थानिक क्षेत्रात लागू होणारे असावे. भाषण जेव्हा बायबलमधील एखाद्या पात्रावर असते तेव्हा, विद्यार्थीनीने बायबलमध्ये या व्यक्तीबद्दल दिलेल्या माहितीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, उचित शास्त्रवचने निवडावीत व बायबलमधील या व्यक्तीकडून आपण काय शिकू शकतो ते सांगावे. विषयाला धरून असलेल्या अतिरिक्त शास्त्रवचनांचादेखील उपयोग केला जाऊ शकतो. प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थिनीला एक साहाय्यकही नेमतील.
६ नेमणूक क्रमांक ३: हा भाग बांधवाला अथवा बहिणीला नेमला जाईल. त्यांनी तो पाच मिनिटांत पूर्ण करावा. बहीण हा भाग सादर करणार असेल तर तिने नेमणूक क्रमांक २ मध्ये सांगितलेल्या सूचनांनुसार तो सादर करावा. बांधव सादर करणार असेल तर बायबल पात्राविषयीची माहिती त्याने सभागृहातील श्रोत्यांना भाषणाच्या रूपात सादर करावी. विद्यार्थ्याने त्याला दिलेल्या विषयावर आपल्या प्रकाशनांतून माहिती काढावी, विषयाला धरून असलेली वचने निवडावीत आणि बायबलमधील त्या व्यक्तीकडून आपण काय शिकू शकतो ते सांगावे.
७ नेमणूक क्रमांक ३ च्या बांधवांसाठी एक नवीन संधी: देवाच्या वचनातील प्रस्तावना किंवा चर्चेसाठी बायबल विषय या पुस्तिकांच्या आधारावर हे भाषण असते तेव्हा बांधवांनी ते प्रात्यक्षिकाच्या रूपात सादर करावे. त्याचे सेटिंग कौटुंबिक उपासना किंवा क्षेत्र सेवा असे ठेवावे. प्रशाला पर्यवेक्षक सहसा एक साहाय्यक व सेटिंग देतील. हा साहाय्यक विद्यार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा एखादा बांधव असेल. विषयाला धरून असलेल्या व बायबल तत्त्वे ठळकपणे दाखवणाऱ्या अतिरिक्त शास्त्रवचनांचादेखील उपयोग केला जाऊ शकतो. वेळोवेळी एखाद्या वडिलांना हा भाग सादर करण्यासाठी नेमले जाईल व ते स्वतःच साहाय्यक व सेटिंग निवडू शकतात. आपल्याच कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर किंवा दुसऱ्या बांधवाबरोबर प्रात्यक्षिकाच्या रूपात असलेले हे भाषण वडील देत आहेत हे पाहून मंडळीतल्या इतरांना त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीतून पुष्कळ काही शिकायला मिळू शकेल.
८ सल्ला: प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषणानंतर प्रशाला पर्यवेक्षक त्याची प्रशंसा करतील आणि परमेश्वर की सेवा स्कूल से फायदा उठाइए पुस्तकातून व्यावहारिक सल्ला देतील; हे सर्व ते दोन मिनिटांत करतील. प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्याला त्याचे भाषण सादर करण्यासाठी आमंत्रित करतील तेव्हा तो कोणत्या गुणावर काम करत आहे हे सांगणार नाहीत. विद्यार्थ्याने त्याचा भाग सादर केल्यानंतर, प्रशाला पर्यवेक्षक त्याची प्रामाणिकपणे प्रशंसा करतील, तो कोणत्या गुणावर काम करत होता ते सांगतील आणि विद्यार्थ्याने सादर केलेल्या भाषणात तो गुण कसा दिसून आला किंवा, त्या गुणावर विद्यार्थ्याने आणखी प्रगती का करावी हे अगदी प्रेमळपणे सांगतील.
९ विद्यार्थ्याला कोणत्या गुणावर काम करायचे आहे तो सल्ला फॉर्म, त्या विद्यार्थ्याच्या सेवा स्कूल पुस्तकाच्या पृष्ठे ७९-८१ वर आहे. भाषणानंतर प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्याला त्याने नेमलेल्या मुद्द्याचा अभ्यास केला होता किंवा नाही हे खासगीत विचारून त्याच्या पुस्तकावर उचित नोंद करतील. सभेनंतर किंवा इतर वेळी, विद्यार्थ्याची आणखी प्रशंसा केली जाऊ शकते तसेच इतर सल्लाही दिला जाऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष देण्यामागचा हेतू, त्याने आध्यात्मिक प्रगती करावी हा असतो.—१ तीम. ४:१५.
१० विद्यार्थ्याचे भाषण ओव्हरटाईम जात असेल तर प्रशाला पर्यवेक्षकांनी किंवा त्यांच्या साहाय्यकाने, इतरांचे लक्ष विचलित होणार नाही अशा पद्धतीने घंटी वाजवून किंवा बोटाने टकटक आवाज करून त्याची वेळ संपली आहे असा संकेत त्याला द्यावा. तेव्हा विद्यार्थ्याने लगेच आवरते घेऊन स्टेजवरून खाली यावे.—सेवा स्कूल पृ. २८२ परि. ४.
११ आवश्यक असलेल्या अटी पूर्ण करणारे सर्व जण ईश्वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवू शकतात. (सेवा स्कूल पृ. २८२ परि. ६ पाहा.) या प्रशालेत मिळणाऱ्या शिक्षणामुळे यहोवाचे लोक त्याच्या राज्याची सुवार्ता आत्मविश्वासाने, आदराने व प्रेमाने सांगू व शिकवू शकतात. हे शिक्षण खरेतर यहोवाकडूनच येते. या शिक्षणामुळे आपल्याला फायदा होतो आणि आपण त्याची स्तुती करतो तेव्हा तो खूप आनंदित होतो, यात काहीच संशय नाही.—स्तो. १४८:१२, १३; यश. ५०:४.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
प्रगती करण्यासाठी सल्ला स्वीकारा व सुधारणा करा