सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—वैयक्तिक आवड घ्या
हे का महत्त्वाचे: येशूने प्रत्येक व्यक्तीमध्ये आवड घेतली. जसे की, एकदा येशूने एका बहिऱ्या माणसाला बरे केले तेव्हा त्याने त्याला लोकांपासून जरा बाजूला नेले. या मनुष्याला संकोच वाटत होता, हे येशूला जाणवले असावे. (मार्क ७:३१-३५) आपल्या शिष्यांना काही गोष्टी समजणार नाहीत हे त्याने ओळखल्यामुळे त्यांना भरमसाट माहिती सांगितली नाही. (योहा. १६:१२) तो स्वर्गात होता तेव्हाही त्याने पृथ्वीवरील लोकांमध्ये आवड घेतली. (२ तीम. ४:१७) आपण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत त्याअर्थी आपण त्याचे अनुकरण केले पाहिजे. (१ पेत्र २:२१; १ योहा. ३:१६, १८) आपण घरमालकाच्या परिस्थितीचा, त्याच्या आवडी-निवडींचा आणि त्याला असलेल्या काळजींचा विचार केला तर आपण आपल्या सेवेत आणखी प्रभावी ठरू शकू. आपण नुसतीच पुस्तके वाटत नाही किंवा लोकांना तोंडपाठ केलेला संदेश सांगत नाही तर आपल्याला त्यांच्याबद्दल खरोखरच काळजी वाटते हे जेव्हा घरमालकाला जाणवेल तेव्हा ते आपले बोलणे लक्ष देऊन ऐकतील.
हे कसे करावे:
• चांगली तयारी करा. बोलताना घाबरू नका. चेहरा हसतमुख ठेवून मैत्रीपूर्ण बोला.
• आजूबाजूचे निरीक्षण करा. घरात मुले आहेत का? घरमालकाला बागेची किंवा प्राण्यांची आवड आहे का? त्याचे काही विशिष्ट धार्मिक विश्वास आहेत का? त्याच्या परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या प्रस्तावनेत बदल करू शकता.
• त्याचे मत विचारा आणि तो बोलत असताना विनाकारण त्याचे बोलणे मधेच तोडू नका. त्याच्याकडे बघून बोला जेणेकरून तुम्ही त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत आहात हे त्याला समजेल. त्याने त्याचे मत व्यक्त केल्यानंतर त्याचे आभार माना आणि प्रामाणिकपणे त्याची प्रशंसा करा. वाद घालू नका.
• परिस्थितीनुसार वागा. गरज भासल्यास त्याला वाटत असलेल्या काळजीच्या विषयावर बोला. असे करणे खूप सोपे आहे कारण आपल्याजवळ वेगवेगळ्या विषयांवर पत्रिका, माहितीपत्रके व मासिके आहेत. तुम्ही जर चुकीच्या वेळी, जसे की घरमालक घाईत असताना गेला असाल तर क्षमा मागा आणि अगदी थोडक्यात बोला.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
• घरमालकाने व्यक्त केलेल्या मतानुसार आपल्या सादरतेत आपण बदल कसा करू शकतो याचा कौटुंबिक उपासनेदरम्यान सराव करा.
• क्षेत्र सेवेची सभा घेणारा बांधव, आपण कोणकोणत्या मार्गांनी घरमालकात वैयक्तिक आवड घेऊ शकतो त्याची चर्चा करेल.