सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यास पुढाकार घ्या
हे का महत्त्वाचे: घरोघरचे साक्षकार्य करताना सहसा बरेच लोक आपल्याला घरी भेटत नाहीत. पण प्रवासात, डॉक्टरच्या क्लिनीकमध्ये, कामातील किंवा शाळेतील जेवणाच्या सुट्टीत आणि इतर ठिकाणी आपण अशा लोकांच्या संपर्कात येतो. सर्वांना राज्याचा संदेश ऐकण्याची संधी मिळावी अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीम. २:३, ४) तेव्हा, अशा लोकांना साक्ष देण्यास आपण पुढाकार घेतला पाहिजे.
हे कसे करावे:
• निवडक असा. एखादी व्यक्ती मैत्रीपूर्ण आहे व तिला बोलायची इच्छा आहे असे दिसते का? निवांतपणे संभाषण करण्यासारखी परिस्थिती आहे का? काही प्रचारक प्रथम व्यक्तीकडे पाहतात आणि स्मितहास्य करतात. त्या व्यक्तीनेही स्मितहास्य केले तर प्रचारक तिच्याशी संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करतात.
• बोलण्याचे धैर्य होत नसेल तर मनातल्या मनात लहानशी प्रार्थना करा.—नहे. २:४; प्रे. कृत्ये ४:२९, ३०.
• एक-दोन शब्दाने, जसे की नमस्ते म्हणून तुम्ही संभाषण सुरू करू शकता. लक्षात घ्या की येशूने शोमरोनी स्त्रीशी थेट राज्याबद्दल बोलून संभाषण सुरू केले नाही. (योहा. ४:७) केव्हाकेव्हा संभाषणाची सुरुवात प्रशंसा करण्याद्वारे केली जाऊ शकते. तुम्ही म्हणू शकता: “तुमच्या मुलांना किती चांगलं वळण आहे!” तसेच, एखादा प्रश्न विचारूनही संभाषणाची सुरुवात होऊ शकते. तुम्ही असे म्हणू शकता: “कालची बातमी ऐकली का?”
• एकदा का संभाषण सुरू झाले की ते सुवार्तेकडे वळवण्याची संधी शोधा. पण असे करताना घाई करू नका. सहजपणे बोलून संभाषण पुढे चालू ठेवा. असे काहीतरी बोला जेणेकरून व्यक्तीच्या मनात उत्सुकता निर्माण होईल आणि ती तुम्हाला प्रश्न विचारण्यास प्रवृत्त होईल. उदाहरणार्थ, संभाषण जर कुटुंबाविषयी असेल तर तुम्ही असे म्हणू शकता, “मुलांचं संगोपन कसं करावं याबद्दल मी खूप चांगली माहिती वाचली ज्यावर आपण विश्वास ठेवू शकतो.” नुकत्याच घडलेल्या एखाद्या घटनेविषयी बोलत असाल तर तुम्ही असे म्हणू शकता, “पण, अलीकडंच मी एक चांगली बातमी वाचली.” साक्ष देण्यापूर्वीच तुमचे संभाषण संपले तर निराश होऊ नका.
• व्यवहारकुशल असा व आवड जाणून घ्या. तुम्ही तुमची मते दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहात असे वाटायला नको. समोरच्या व्यक्तीला शास्त्रवचनातून एखादा मुद्दा सांगण्याआधी तिला प्रश्न विचारा आणि आध्यात्मिक गोष्टींबद्दल तिला कितपत आवड आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
• एखाद्याने आवड दाखवल्यास त्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही प्रकाशने असली पाहिजेत. तेव्हा नेहमी सोबत पत्रिका व इतर प्रकाशने ठेवा.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
• प्रत्येक आठवडी, घरोघरच्या कार्यात न भेटणाऱ्या निदान एका व्यक्तीला साक्ष देण्यासाठी पुढाकार घ्या.