सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—संभाषण मधेच तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी कसे बोलाल?
हे का महत्त्वाचे: अशी कल्पना करा की लवकरच एक नैसर्गिक विपत्ती येणार असल्याचे तुम्हाला समजते. त्यापासून वाचण्यासाठी लोकांनी सुरक्षित स्थळी जाणे खूप महत्त्वाचे आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडे जाता; पण तो तुमचे बोलणे मधेच तोडत म्हणतो की ‘मी खूप कामात आहे.’ अशा वेळी तुम्ही लगेच तेथून निघून जाणार का? नक्कीच नाही. क्षेत्रात बऱ्याचदा आपल्याला असे लोक भेटतात. आपण जो जीवनदायी संदेश त्यांना सांगू इच्छितो तो किती महत्त्वाचा आहे याची त्यांना जाणीव नसते. आपण त्यांच्या घरी जातो तेव्हा कदाचित ते खूप कामात असतील. (मत्त. २४:३७-३९) किंवा आपल्याबद्दल असलेल्या गैरसमजुतींमुळे ते आपले ऐकण्यास तयार नसतील. (मत्त. ११:१८, १९) किंवा मग, इतर धर्मांप्रमाणे आपणही लोकांची फसवणूक करतो असे कदाचित त्यांना वाटत असेल. (२ पेत्र २:१, २) पण, घरमालकाने आवड दाखवली नसेल आणि तो विरोधही करत नसेल तर आपण लगेच तेथून निघून जाऊ नये.
हे कसे करावे:
• घरोघरच्या कार्यात जाण्याआधी, लोक कोणकोणत्या कारणांमुळे आपले संभाषण मधेच तोडू शकतील आणि आपण त्यांच्याशी व्यवहारचातुर्याने कसे बोलू शकतो याचा थोडा विचार करा.
• झोपेत असलेल्या व्यक्तीला आपण सहसा प्रेमळपणे उठवतो; त्याच प्रकारे आध्यात्मिक रीत्या झोपेत असलेल्या व्यक्तीलाही आपण प्रेमळपणे उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, जर घरमालक आपल्यावर रागावला तर त्याच्या भावनांची आपल्याला जाणीव आहे हे प्रेमळपणे कबूल करा. त्याला काय वाटते हे त्याने स्पष्टपणे सांगितल्याबद्दल त्याचे आभार मानून शांतपणे तेथून निघून जा. (नीति. १५:१; १७:१४; २ तीम. २:२४) काही वेळा, घरमालकाच्या भावनांचा आदर केल्याने किंवा त्याची परिस्थिती समजून घेतल्यानेही संभाषण चालू ठेवणे आपल्याला शक्य होऊ शकते. उदाहरणार्थ, तो जर म्हणाला की, “आता माझ्याकडे वेळ नाही,” तर तुम्ही म्हणू शकता: “मी समजू शकतो. पण जाण्याआधी तुम्हाला काही वाचायला दिलं तर चालेल का?” दुसरा एक पर्याय म्हणजे त्याला प्रश्न विचारणे. जसे की, घरमालकाने जर म्हटले की त्याला आवड नाही तर तुम्ही त्याला असे विचारू शकता: “तुम्हाला असं म्हणायचंय का की तुम्हाला बायबलमध्ये आवड नाही, की तुम्हाला धर्माबद्दलच बोलायला आवडत नाही?” कौशल्य, प्रेमळपणा व चिकाटी दाखवल्याने आपल्याला अशा प्रश्नांचा उपयोग करणे शक्य होईल ज्यामुळे घरमालक विचार करायला प्रवृत्त होऊ शकतो. आणि यामुळे आध्यात्मिक गोष्टींबद्दलची त्याची आवड जागृत होऊ शकते.—कलस्सै. ४:६.
• समजबुद्धीचा वापर करा. लक्षात असू द्या, की लोकांनी आपले ऐकावे अशी बळजबरी यहोवा करत नाही. (अनु. ३०:१९) ज्याने-त्याने आपल्या आध्यात्मिक जबाबदारीचा भार स्वतःच वाहिला पाहिजे. (गलती. ६:५) आपले म्हणणे किंवा बायबलमधील संदेश ऐकायला घरमालक तयारच नसेल, तर तेथून निघून जाणे शहाणपणाचे ठरेल. आपण त्याच्या भावनांचा आदर केल्यास, पुढेमागे दुसरा कोणी प्रचारक त्याच्या घरी गेला तर तो ऐकण्याची शक्यता आहे.—१ पेत्र ३:१५.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
• तुमचे संभाषण मधेच तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घरमालकाशी बोलून झाल्यानंतर, तुम्ही त्याच्याशी आणखी चांगल्या प्रकारे कसे बोलू शकला असता याची आपल्या जोडीदारासोबत चर्चा करा.