प्रश्न पेटी
▪ एखाद्या घरमालकाने, यहोवाच्या साक्षीदारांनी त्याच्या घरी परत भेट देण्यास येऊ नये असे आग्रहाने सांगितले तर, अशा बाबींना कसे हाताळावे?
धार्मिक प्रकारच्या भेटींना मनाई असल्याचे किंवा यहोवाच्या साक्षीदारांना स्पष्टपणे उल्लेखणारे एखादे चिन्ह दरवाजावर आढळल्यास, घरमालकाच्या इच्छेचा आदर करून दरवाजा न ठोठावणे उत्तम असेल.
कधीकधी फिरत्या विक्रेत्यांना किंवा वर्गणी गोळा करणाऱ्यांना मनाई करणारे चिन्ह आम्हास आढळते. आम्ही उदारतेचे धार्मिक कार्य करत असल्यामुळे ते आम्हाला लागू होत नाही. पुढे होऊन दार ठोठावणे उचित असेल. घरमालकाने आक्षेप घेतल्यास, ही चिन्हे आम्हास का लागू होत नाहीत ते आपण चतुराईने समजावू शकतो. त्यानंतर, घरमालकाने ती मनाई, यहोवाच्या साक्षीदारांसाठी देखील आहे असे स्पष्टपणे सांगितल्यास, आम्ही त्याच्या इच्छेचा आदर करू.
काही बाबतीत, आम्ही घरमालकाच्या घरी भेट दिल्यास, तो अस्वस्थ झाल्याचे दिसेल आणि आम्हाला पुन्हा भेट न देण्याबद्दल स्पष्टपणे सांगेल. आम्ही त्याच्या विनंतीनुरुप वागले पाहिजे. क्षेत्र नकाशाच्या लिफाफ्यात तारीख असलेली सूचना घालावी, जेणेकरून भविष्यात त्या क्षेत्रात कार्य करणारे प्रचारक त्या घरी भेट देण्याचे टाळतील.
तथापि, आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, अशी घरे अनिश्चित काळासाठी टाळली जाऊ नयेत. सध्याचे मालक घर सोडून जाऊ शकतील. अनुकूलरितीने प्रतिसाद देणाऱ्या दुसऱ्या कौटुंबिक सदस्याशी आपण संपर्क साधू शकतो. आम्ही ज्याच्याशी बोललो त्या घरमालकाच्या अंतःकरणाचे परिवर्तन होण्याची संभावना आहे आणि आम्हाला भेट देण्याचे तो मान्य करील. यासाठी, कालांतराने, तेथे राहणाऱ्यांच्या सध्याच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांची चातुर्याने चौकशी केली पाहिजे.
क्षेत्राच्या फाईलची वर्षातून एकदा उजळणी करावी आणि आम्हाला भेटी न देण्यास सांगितलेल्या घरांची यादी करावी. सेवा पर्यवेक्षकाच्या निर्देशनाखाली, त्यांना भेटी देण्यासाठी काही चतुर आणि अनुभवी प्रचारकांना नेमून दिले जाऊ शकते. तोच घरमालक तेथे अजूनही राहात आहे का हे विचारण्यास आम्ही परत आलो, हे स्पष्ट केले जाऊ शकते. प्रचारकाने रिझनिंग पुस्तकातील पाने १५-२४ वरील “हाऊ यू माईट रेस्पाँड टू पोटेंशियल कन्व्हर्झेशन स्टॉपर्स,” या शिर्षकाखालील साहित्याशी परिचित असले पाहिजे. योग्य प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात, नेहमीप्रमाणे भेटी देता येतील. घरमालक अजूनही विरोधकच असेल तर, पुढील वर्षापर्यंत भेटी देऊ नयेत. एखाद्या विशिष्ट प्रकारात, परिस्थितींमुळे ती बाब वेगळ्या प्रकारे हाताळणे योग्य असेल तर, याबाबत वडील वर्ग निर्णय घेऊ शकतात.