सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—आवड दाखवणाऱ्या लोकांच्या नोंदी घ्या
“आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव.” (१ तीम. ४:१६) प्रेषित पौलाने तीमथ्याला दिलेल्या या सल्ल्यावरून हे दिसून येते की आपण प्रगती करत राहिले पाहिजे, मग आपण नवीन प्रचारक असोत अथवा अनुभवी. असे करण्यासाठी आपल्याला मदत व्हावी म्हणून आपली राज्य सेवा यात “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी” असे शीर्षक असलेली एक नवीन शृंखला सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक लेखात एका महत्त्वाच्या कौशल्यावर चर्चा करण्यात येईल आणि ते कौशल्य कसे सुधारावे याविषयी काही सूचना दिल्या जातील. त्या महिन्यादरम्यान, सर्वांनी या सूचनांचे पालन करावे असे आम्ही प्रोत्साहन देत आहोत. तो महिना संपल्यानंतर, सेवा सभेत एक भाग हाताळला जाईल, ज्यात सूचनांचे पालन केल्यामुळे आपल्याला कसा फायदा झाला ते विचारले जाईल. या महिन्यात, आवड दाखवणाऱ्या लोकांच्या नोंदी घेण्याचे प्रोत्साहन आपल्याला देण्यात आले आहे.
हे का महत्त्वाचे: आपल्यावर सोपवण्यात आलेल्या कार्यात लोकांना केवळ प्रचार करणेच समाविष्ट नाही. तर ज्यांनी आपल्या संदेशाप्रती आवड दाखवली आहे त्यांना पुन्हा भेटणे आणि त्यांना शिकवणे समाविष्ट आहे. त्यांच्या मनात पेरलेल्या सत्याच्या बियांना आपण पाणी घातले पाहिजे. (मत्त. २८:१९, २०; १ करिंथ. ३:६-९) यासाठी आवड दाखवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा भेट देणे, तिला कोणते प्रश्न भेडसावतात त्यांबद्दल बोलणे आणि पहिल्या भेटीत आपण ज्या विषयावर बोललो त्या विषयाला धरून पुढे संभाषण सुरू ठेवणे गरजेचे आहे. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती आवड दाखवते तेव्हा नोंदी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
हे कसे करावे:
• नोंदी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तुमच्या बॅगेत आहेत याची खात्री करा. तुमच्या नोंदी नीटनेटक्या, सुवाच्य आणि अद्ययावत ठेवा. एखाद्या व्यक्तीने आवड दाखवल्यास, संभाषण संपल्यानंतर लगेच नोंद करून घ्या.
• घरमालकाबद्दलची माहिती लिहा. जसे की त्याचे नाव, संपर्काचा पत्ता, फोन नंबर, ई-मेल इत्यादी. घरमालकाबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट खास वाटते तेदेखील लिहा.
• तुम्ही कशावर चर्चा केली त्याविषयी तपशीलवारपणे लिहा. तुम्ही बायबलमधून कोणते वचन वाचले; घरमालक त्याच्या विश्वासांविषयी काय बोलला; तुम्ही त्याला कोणते प्रकाशन दिले; तुम्ही त्याला कोणत्या वेळी, कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला भेटला याची नोंद करा.
• पुढच्या भेटीत तुम्ही कशाविषयी बोलणार; तुम्ही कोणत्या गोष्टीविषयी चर्चा करण्याचे वचन दिले; तुम्ही पुन्हा केव्हा भेट देणार हे लिहून ठेवा
• तुम्ही जितक्यांदा भेट देता तितक्यांदा नोंदी करत राहा. गरजेपेक्षा जास्त माहिती लिहिण्यात काहीच गैर नाही.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
• नोंदी करताना, तुम्ही ज्या बंधुभगिनींसोबत प्रचार कार्य करत आहात त्यांना तुम्ही जे काही लिहित आहात त्याविषयी सांगा.