बी वाढण्यासाठी पाणी घालण्याची गरज आहे
१. वाढ होण्याकरता आपण कशाला पाणी घालणे गरजेचे आहे?
१ बागेत पेरलेले बी वाढण्यासाठी पाणी घालणे गरजेचे आहे. हीच गोष्ट, आपल्या क्षेत्रातील लोकांच्या अंतःकरणात आपण रुजवलेले सत्याचे बी वाढण्याच्या बाबतीतही खरी आहे. (१ करिंथ. ३:६) या लाक्षणिक बीयांनी मूळ धरावे, ते अंकुरावेत, आणि वाढावेत म्हणून आपण पुनर्भेटी देऊन देवाच्या वचनाचे पाणी त्यांना घालणे गरजेचे आहे.
२. पुढच्या भेटीसाठी आपण घरमालकाच्या मनात कुतूहल कसे निर्माण करू शकतो?
२ प्रश्न विचारा: सादरता तयार करत असताना, घरमालकाच्या मनात कुतूहल निर्माण होईल, असा एखादा प्रश्नही तयार करा जेणेकरून पुढच्या भेटीत तुम्ही त्यावर चर्चा करू शकाल. पहिल्या भेटीच्या शेवटी हा प्रश्न विचारा आणि पुढच्या वेळी तुम्ही केव्हा व किती वाजता येणार याची निश्चित योजना करा. पुष्कळ बंधूभगिनी, बायबल काय शिकवते पुस्तकातला एखादा मुद्दा निवडतात ज्यामुळे त्यांना, बायबल अभ्यास कसा करता येईल ते दाखवता येते.
३. घरमालक आवड दाखवतो तेव्हा तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची नोंद करून ठेवू शकता?
३ नोंद करून ठेवा: घरमालकाच्या घरातून निघाल्यावर होता होईल तितक्या लवकर, तुम्ही जे काही बोलला आहात त्याची नोंद करून ठेवा. घरमालकाचे नाव, त्याचा पत्ता, त्या दिवसाची तारीख, वेळ, तुम्ही कोणत्या विषयावर बोलला होता, त्याला कोणते प्रकाशन दिले होते, ते सर्व लिहून ठेवा. तो कोणत्या धर्माचा आहे, याचा त्याने उल्लेख केला होता का? त्याचे कुटुंब आहे का? त्याने त्याच्या आवडी-निवडी, त्याला असलेल्या चिंता यांचा उल्लेख केला होता का? पुढच्या वेळी तुम्ही त्याला भेट द्यायला जाल तेव्हा या सर्व माहितीच्या आधारावर चर्चा करणे सोईस्कर होईल. आणि, तुम्ही पुन्हा कोणत्या दिवशी व किती वाजता जायचे ठरवले आहे, कोणत्या प्रश्नाचे उत्तर देणार आहात तेही लिहायला विसरू नका.
४. लोकांना पुनर्भेट देण्याच्या कामात आपण चिकाटी का दाखवली पाहिजे?
४ चिकाटी दाखवा: एखाद्याच्या अंतःकरणात आपण सत्याचे बी पेरतो तेव्हा सैतान गप्प बसत नाही. ते बी “हिरावून” घेण्याकरता तोही लगेच कामाला लागतो. (मार्क ४:१४, १५) त्यामुळे, घरमालक तुम्हाला पुन्हा घरी सापडत नाही तेव्हा हार मानू नका. तो तुम्हाला घरी भेटत नाही तेव्हा तुम्ही त्याला एखादे पत्र लिहू शकता किंवा मग तुम्ही येऊन गेला होता हे एखाद्या चिटोऱ्यावर लिहून तो त्याच्या दाराखालून आत सरकवू शकता. एका पायनियर बहिणीने एका स्त्रीबरोबर बायबल अभ्यास सुरू केला होता. पण दुसऱ्यांदा गेल्यावर तिला ती स्त्री भेटली नाही. मग पायनियर बहिणीने तिला एक पत्र पाठवले. काही दिवसांनंतर या बहिणीला ती स्त्री घरी भेटली. तेव्हा या स्त्रीने तिला सांगितले, की तुम्ही माझ्यात घेत असलेली वैयक्तिक आस्था पाहून मी खूप भारावून गेले आहे. सत्याचे बी पेरल्यानंतर आपण जेव्हा त्यांना नियमाने पाणी घालू तेव्हा आपल्याला, ते अंकुरून त्यांचे मोठे झाड होऊन ‘तीसपट, साठपट, शंभरपट अशी त्यांची फळे’ पाहण्याचा आनंद मिळू शकतो.—मार्क ४:२०.