परिणामकारक प्रस्तावना कशा तयार कराव्यात?
१. चांगल्या प्रस्तावना तयार करणे इतके महत्त्वाचे का आहे?
१ ज्याप्रमाणे एखाद्या खमंग पदार्थाच्या वासामुळे आपली भूक आपोआप वाढते, त्याचप्रमाणे परिणामकारक प्रस्तावनांमुळे लोकांची आध्यात्मिक भूक वाढू शकते. दुसऱ्या शब्दांत, आध्यात्मिक गोष्टींवर सकारात्मक चर्चा करण्याचा मार्ग मोकळा होतो. प्रस्तावना लहान किंवा मोठ्या असू शकतात आणि त्यांचे विषयदेखील वेगवेगळे असू शकतात. पण, ज्याप्रमाणे स्वादिष्ट जेवण बनवण्याआधी पुरेसा विचार व तयारी करण्याची गरज असते, त्याचप्रमाणे परिणामकारक प्रस्तावना तयार करण्याआधीसुद्धा पूर्वविचार व पूर्वतयारी करण्याची गरज आहे. (नीति. १५:२८) तर मग, कोणत्या गोष्टींमुळे प्रस्तावना परिणामकारक बनू शकते?
२. आपण आवड निर्माण करणारी प्रस्तावना कशी तयार करू शकतो?
२ लोकांच्या आवडीचे विषय निवडा: आपल्या प्रस्तावनेमुळे घरमालकाची आवड जागृत झाली पाहिजे; असे जर झाले नाही तर कदाचित संभाषण तेथेच संपेल. म्हणून तयारी करताना, क्षेत्रातील लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घ्या. तुमच्या क्षेत्रातील लोकांना चांगले सरकार, सुखी कौटुंबिक जीवन किंवा युद्धांचा अंत यांविषयी जाणून घ्यायला आवडेल का? सहसा लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल आपले मत मांडण्यास आवडते. तेव्हा असा एखादा प्रश्न तयार करा ज्यामुळे लोक विचार करण्यास व आपले मत मांडण्यास प्रवृत्त होतील. आपली राज्य सेवा यात दिलेल्या एखाद्या नमुना सादरीकरणाचा तुम्ही उपयोग करू शकता का? किंवा त्यात थोडाफार बदल करून ते आपल्या क्षेत्रात वापरू शकता का? तुम्ही अधूनमधून तुमच्या कौटुंबिक उपासनेत काही प्रस्तावनांचा सराव करू शकता का?
३. लोकांची संस्कृती व पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण आपल्या प्रस्तावनेत फेरबदल कसा करू शकतो?
३ संस्कृती आणि पार्श्वभूमी विचारात घ्या: काही ठिकाणी आपण लोकांची भेट का घेत आहोत याचे कारण सुरुवातीलाच सांगावे अशी अपेक्षा आपल्याकडून केली जाते. तर इतर ठिकाणी सर्वप्रथम घरमालकाची विचारपूस केली नाही आणि स्वतःविषयी कोणतीही माहिती दिली नाही तर ही गोष्ट अपमानास्पद मानली जाते. काही ठिकाणी, लोकांची धार्मिक पार्श्वभूमी विचारात घेऊन आपण सर्रासपणे आपल्या प्रस्तावनेत बायबलचा उल्लेख करू शकतो. (प्रे. कृत्ये २:१४-१७) पण, जेथे लोक ख्रिस्ती धर्माचे नाहीत किंवा कोणत्याच धर्माला मानत नाहीत अशा ठिकाणी बायबलचा उल्लेख सुरुवातीलाच न करता पुनर्भेटीदरम्यान करणे योग्य ठरेल.—प्रे. कृत्ये १७:२२-३१.
४. प्रस्तावनेच्या सुरुवातीला आपण जे काही बोलतो त्याकडे आपण लक्ष का दिले पाहिजे?
४ सुरुवातीचे शब्द: आपण सुरुवातीला जे काही बोलतो ते विचारपूर्वक बोलले पाहिजे. सहसा लोकांना लहान व सोपी वाक्ये चटकन कळतात. शिवाय आपण ज्या प्रकारे बोलतो तेही महत्त्वाचे आहे. तेव्हा उत्साहाने बोला. मैत्रीपूर्ण व मनापासून स्मितहास्य करा. यामुळे आपल्याला घरमालकाबद्दल वैयक्तिक आस्था आहे हे दिसून येईल. या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यास आपल्याला रोचक प्रस्तावना तयार करणे शक्य होईल आणि त्यामुळे लोकांना यहोवाच्या “मेजावरचे” अन्न ग्रहण करण्याचे उत्तेजन मिळेल.—१ करिंथ. १०:२१.