राज्य वार्ता क्र. ३८ चे डिसेंबर महिन्यात वाटप!
१. मृतांबद्दल लोकांच्या मनात कोणते प्रश्न आहेत, आणि त्यांची उत्तरे डिसेंबर महिन्यात कशाद्वारे दिली जातील?
१ लोकांचे धार्मिक विश्वास काहीही असोत मृत्यू हा सर्वांचाच शत्रू आहे. (१ करिंथ. १५:२६) मृत लोक कोठे आहेत आणि आपण त्यांना पुन्हा पाहू शकतो का असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठीच जगभरातील सर्व मंडळ्या एक संपूर्ण महिना राज्य वार्ता क्र. ३८ चे वाटप करतील, ज्याचे शीर्षक आहे: “मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?” ही खास मोहीम १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मोहीम संपल्यानंतर, राज्य वार्ता क्र. ३८ चा एक पत्रिका म्हणून सेवाकार्यात उपयोग केला जाईल.
२. राज्य वार्ता क्र. ३८ ची रचना कशी करण्यात आली आहे?
२ रचना: राज्य वार्ता क्र. ३८ ची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे जेणेकरून शीर्षकातील लक्षवेधक प्रश्न आणि त्यावरील लोकांची निरनिराळी मते वरच्याच पानावर तुम्हाला वाचायला मिळतील. जसे की, “मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? तुम्ही म्हणाल . . . हो, नाही, माहीत नाही.” वाचक जेव्हा राज्य वार्ता उघडेल तेव्हा बायबल या प्रश्नाचे उत्तर कसे देते आणि बायबलमध्ये दिलेल्या अभिवचनाचा त्याच्यासाठी काय अर्थ होतो हे त्याला कळेल. शिवाय, त्याने बायबलवर भरवसा का ठेवला पाहिजे याची कारणेही त्याला मिळतील. राज्य वार्ताच्या मागील पानावर वाचकासाठी एक रोचक प्रश्न विचारण्यात आला आहे ज्यावर तो विचार करू शकतो. तसेच, अधिक माहिती घेण्यासाठी त्याला प्रोत्साहनही देण्यात आले आहे.
३. राज्य वार्ता क्र. ३८ चे वाटप कसे केले जाईल?
३ वाटप: स्मारकविधीच्या आणि प्रांतीय अधिवेशनाच्या आमंत्रण पत्रिका वाटपाची मोहीम जशी असते तशीच ही मोहीम असेल. मंडळीतील वडिलांना १ एप्रिल २०१३ चे जे पत्र मिळाले त्यानुसार मंडळीच्या क्षेत्रात राज्य वार्ता क्र. ३८ चे वाटप कसे करावे याबद्दल ते मार्गदर्शन देतील. ज्या मंडळ्यांकडे कमी क्षेत्र असेल ते जास्त क्षेत्र असलेल्या जवळपासच्या मंडळ्यांना मदत करू शकतात. राज्य वार्ता क्र. ३८ घेताना एका आठवड्याला लागतील तेवढ्याच प्रती घ्या. मोहिमेदरम्यान क्षेत्रातील सर्व घरांमध्ये प्रती वाटून झाल्या असतील तर उरलेल्या प्रती तुम्ही सार्वजनिक साक्षकार्यात वाटू शकता. महिना संपण्याच्या आतच सर्व प्रती वाटून झाल्या असतील तर त्या महिन्याची जी सादरता असेल त्या साहित्याचा तुम्ही उपयोग करू शकता. महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याऐवजी आपण खास मोहिमेत सहभाग घेण्यावर भर देऊ. शनिवारी-रविवारी योग्य वाटेल तेव्हा नियतकालिकेही सादर करावीत. तर मग, या खास मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी तुम्ही योजना करत आहात का?