ही नियतकालिके वाचायला कोणाला आवडतील?
१. आपण जेव्हा टेहळणी बुरूज आणि अवेक! नियतकालिकाची व्यक्तिगत प्रत वाचतो तेव्हा काय लक्षात घेतले पाहिजे आणि का?
१ टेहळणी बुरूज आणि अवेक! ही नियतकालिके संपूर्ण जगभरातील लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात येतात. त्यामुळे त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय आढळतात. आपल्या व्यक्तिगत नियतकालिकातील प्रत्येक लेख वाचताना हा लेख कोणाला आवडेल याचा आपण विचार केला पाहिजे आणि मग तो अंक त्यांना द्यायचा प्रयत्न केला पाहिजे.
२. लोकांना आपल्या नियतकालिकांतील कोणत्या विषयांवरचे लेख वाचायला आवडतील?
२ तुम्ही तुमच्या सहकर्मीसोबत चर्चा केलेला एखादा विषय आत्ताच्या टेहळणी बुरूज अंकात आहे का? तुमच्या एखाद्या नातेवाइकाला मदत करू शकणारा कौटुंबिक जीवनावर आधारित असा लेख आहे का? तुमच्या क्षेत्रातील व्यापारी किंवा सरकारी संस्थांना उपयुक्त ठरेल असे एखादे नियतकालिक आहे का? उदाहरणार्थ, वृद्ध लोकांसमोर येणाऱ्या समस्यांविषयी एखादे नियतकालिक असेल तर ते वृद्धाश्रमातील लोकांना वाचायला आवडेल. गुन्हेगारी किंवा पोलीस या विषयावर असलेले नियतकालिक कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेतील लोकांना वाचायला आवडेल.
३. लोकांना आवडणारे विषय दिल्याने त्याचा काय फायदा होतो त्याबद्दलचा एक अनुभव सांगा.
३ परिणाम: तमीळनाडूच्या एका क्षेत्रात पूर्वी तमीळ भाषेतील अवेक! नियतकालिकामुळे बराच वाद निर्माण झाला होता. पण, “कशी घडवाल जबाबदार मुलं?” या विषयावर ऑक्टोबर २०११ चा अवेक! अंक मिळाला तेव्हा तेथील एका मंडळीने त्या क्षेत्रातील काही भागांत जाण्याचे ठरवले. त्यांनी त्या भागांतील कुटुंबांना भेटी दिल्या आणि त्यांना सांगितले, की “जबाबदार मुलं कशी घडवावी याविषयी माहिती देणाऱ्या अवेक! नियतकालिकाचा एक खास अंक आम्ही लोकांना सादर करत आहोत.” पहिल्याच दिवशी, त्यांनी या नियतकालिकाच्या २०० प्रती सादर केल्या. ज्या क्षेत्रात सहा वर्षांपासून प्रचार कार्य होत नव्हते त्या क्षेत्रातील बऱ्याचशा भागात त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत प्रचार कार्य केले आणि अवेक! नियतकालिकाच्या ६०० हून जास्त प्रती दिल्या.
४. आपण होता होईल तितक्या लोकांना नियतकालिके का देऊ इच्छितो?
४ आपली नियतकालिके सध्याच्या घटना का घडत आहेत त्यामागचे खरे कारण सांगतात आणि आपले लक्ष बायबल व देवाच्या राज्याकडे वेधतात. जगभरात आपली ही एकमेव नियतकालिके आहेत जी “तारण जाहीर” करतात. (यश. ५२:७) त्यामुळे आपण होता होईल तितक्या लोकांना ती देऊ इच्छितो. पण, त्याआधी आपण स्वतःला हे विचारले पाहिजे, की “ही नियतकालिके वाचायला कोणाला आवडतील?”