“सर्व माणसांबरोबर . . . शांतीने राहा”
१. घरमालक जेव्हा आपल्यावर चिडतो तेव्हा आपण बायबलचा कोणता सल्ला लागू केला पाहिजे?
१ यहोवाचे सेवक शांतीप्रिय आहेत आणि आपण जे कार्य करतो तेही शांतीचेच आहे. (यश. ५२:७) पण कधीकधी क्षेत्र सेवेत आपल्याला असे काही लोक भेटतात जे आपल्यावर चिडतात. अशा वेळी शांतीने वागण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?—रोम. १२:१८.
२. परिस्थिती समजून घेणे गरजेचे का आहे?
२ परिस्थिती समजून घ्या: काही लोक आपल्या संदेशाचा तिरस्कार करतात म्हणून ते आपल्यावर चिडतात, तर इतर बरेच जण इतर कारणांमुळे आपल्यावर चिडतात. कदाचित आपण चुकीच्या वेळी त्यांच्या घरी गेलो असू. घरमालक कदाचित काही वैयक्तिक बाबींमुळे आधीपासूनच त्रस्त असेल. आणि जरी घरमालक आपल्या कार्यामुळे आपल्यावर चिडला असेल तरी आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की त्याची दिशाभूल करण्यात आली आहे आणि म्हणून तो या प्रकारे वागत आहे. (२ करिंथ. ४:४) आपण जर समजून घेतले तर अशा परिस्थितीतही आपण शांतीने वागू व त्याचे बोलणे मनाला लावून घेणार नाही.—नीति. १९:११.
३. आपण घरमालकाबद्दल आदर कसा दाखवू शकतो?
३ आदराने वागा: आपल्या क्षेत्रात बऱ्याच जणांचे आपआपल्या धर्माबद्दल ठाम विश्वास असतात. (२ करिंथ. १०:४) आपला संदेश ऐकायचा की नाही हे ठरवण्याचा हक्क घरमालकाला आहे. आपण कधीच घरमालकाच्या धार्मिक विश्वासांना कमी लेखू नये किंवा आपल्याला जास्त ज्ञान आहे असे भासवू नये. घरमालकाची जर ऐकायची इच्छा नसेल तर आपण आदराने तेथून निघून जातो.
४. प्रेमळपणे बोलण्याचा काय अर्थ होतो?
४ प्रेमळपणे बोला: घरमालक चिडून आपल्याला जरी काही वाईट बोलला तरी आपले उत्तर आदरपूर्वक व सौम्य असले पाहिजे. (कलस्सै. ४:६; १ पेत्र २:२३) घरमालकाशी वाद घालण्याऐवजी आपण अशा मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे ज्यावर घरमालकाचे व आपले एकमत असेल. घरमालकाला आपल्या कार्याविषयी असे का वाटते ते आपण प्रेमळपणे विचारू शकतो. पण कधीकधी संभाषण चालू ठेवून घरमालकाला आणखी चीड आणण्याऐवजी तेथून निघून जाणेच योग्य राहील.—नीति. ९:७; १७:१४.
५. क्षेत्र सेवेत शांतीने वागल्यामुळे आपल्याला कोणते फायदे मिळतात?
५ आपण जर शांतीने वागलो तर कदाचित घरमालकाच्या मनावर आपल्याविषयी चांगली छाप पडेल आणि पुढच्या वेळी तो शांतीने आपला संदेश ऐकेल. (रोम. १२:२०, २१) घरमालक कितीही कठोर वाटत असला तरी एक दिवस तो आपला बांधव होण्याची शक्यता आहे. (गलती. १:१३, १४) घरमालक सत्य स्वीकारो अथवा न स्वीकारो, आपण जर शांतीने वागलो व आत्मसंयम बाळगला तर आपण यहोवाचा आदर करू व आपल्या वागणुकीमुळे इतरांना साक्ष देऊ.—२ करिंथ. ६:३.