आपली प्रांतीय अधिवेशने—सत्याची जोरदार साक्ष देतात
१. वार्षिक सणांमुळे इस्राएल लोकांना कोणत्या काही महत्त्वपूर्ण आध्यात्मिक सत्यांवर मनन व चर्चा करायची संधी मिळत असे?
१ प्राचीन इस्राएली लोक वर्षातून तीनदा सणांच्या निमित्ताने एकत्र येत असत. या सणांना केवळ पुरुषांना उपस्थित राहायचे होते तरीसुद्धा या आनंदी मेळाव्यांना कुटुंबाच्या कुटुंबे उपस्थित राहत असत. (अनु. १६:१५, १६) या प्रसंगी त्यांना महत्त्वपूर्ण आध्यात्मिक सत्यांवर मनन व चर्चा करायची संधी मिळत असे. कोणती आध्यात्मिक सत्ये? एक, यहोवा हा उदार व प्रेमळ दाता आहे. (अनु. १५:४, ५) दुसरे, मार्गदर्शन व संरक्षणासाठी ते त्यांच्यावर भरवसा ठेवू शकत होते. (अनु. ३२:९, १०) इस्राएल लोकांना याही गोष्टीवर मनन करायचे होते, की ते स्वतःला यहोवाचे लोक म्हणत असल्यामुळे त्यांचे आचरण धार्मिक असणे गरजेचे होते. (अनु. ७:६, ११) आज आपल्या वार्षिक प्रांतीय अधिवेशनांतून आपण असाच लाभ घेऊ शकतो.
२. अधिवेशनातील कार्यक्रम बायबलमधील सत्य समजून त्याचा अवलंब करण्यास कशा प्रकारे मदत करेल?
२ अधिवेशनातील कार्यक्रम बायबलमधील सत्य समजायला मदत करतो: प्रांतीय अधिवेशनांत आपण भाषणे, नाटके, प्रात्यक्षिके व मुलाखती ऐकतो. हे सर्व आपल्याला बायबलमधील सत्य समजून त्याचा अवलंब करण्यास मदत करतात. (योहा. १७:१७) येणारे अधिवेशन आयोजित करण्यासाठी बरेच काम करण्यात आले आहे. यहोवाची संघटना खासकरून संपूर्ण जगभरातील लोकांच्या सध्याच्या गरजांनुसार कार्यक्रम तयार करत आहे. (मत्त. २४:४५-४७) या कार्यक्रमात काय सादर केले जाईल ते पाहण्यास व ऐकण्यास तुम्ही उत्सुक आहात का?
३. कार्यक्रमाचा पुरेपूर फायदा घेता यावा म्हणून आपण काय केले पाहिजे?
३ आपण तिन्ही दिवशी उपस्थित राहिलो व सर्व कार्यक्रम लक्ष देऊन ऐकला तरच आपल्याला फायदा होऊ शकेल. अधिवेशनाला हजर राहता यावे म्हणून, तुम्ही अद्याप तुमच्या कंपनीच्या मालकांशी सुटीबाबत बोलला नसाल तर लवकरात लवकर बोला. अधिवेशनादरम्यान सतर्क राहता यावे म्हणून रोज रात्री पुरेशी झोप घ्या. काही लोकांना दिसून आले आहे, की कार्यक्रमादरम्यान वक्त्यावर लक्ष केंद्रित केल्याने व थोडक्यात टिपण घेतल्याने लक्ष देता येते. आपला मोबाईल फोन किंवा पेजर सायलेंट मोडवर ठेवल्यास तुम्हाला व इतरांनाही त्रास होणार नाही. कार्यक्रमादरम्यान, बोलणे, मेसेज पाठवणे व खाणे टाळा.
४. पालक आपल्या मुलांना अधिवेशनाचा लाभ घेण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात?
४ शब्बाथ वर्षांत मंडपांच्या सणाच्या वेळी वाचले जाणारे मोशेचे नियमशास्त्र ऐकायला इस्राएली लोक आपल्या कुटुंबासहित एकत्र जमत तेव्हा ते आपल्या बालकांनाही सोबत आणत जेणेकरून तेही “ऐकून शिकतील.” (अनु. ३१:१२) आज अधिवेशनांत सर्वजण आपापल्या कुटुंबासमवेत बसलेले व लहान मुले जागे राहून लक्षपूर्वक ऐकत असल्याचे पाहून खूप उत्तेजन मिळते. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी तुम्ही घेतलेल्या नोंदींची चर्चा करू शकता व तुम्हाला खासकरून कोणता मुद्दा आवडला ते सांगू शकता. “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते” त्यामुळे पालक आपल्या मुलांना व किशोरवयीनांना मोकळे सोडून देण्याऐवजी दुपारच्या सुटीच्या वेळी व हॉटेलमध्ये असताना त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतात.—नीति. २२:१५; २९:१५.
५. आपल्या आचरणामुळे सत्याची शोभा कशी वाढते?
५ आपल्या आचरणामुळे सत्याची शोभा वाढते: आपल्या उत्तम आचरणामुळे अधिवेशन होणाऱ्या शहरात सत्याची शोभा वाढते. (तीत २:१०) कोणते लोक हॉटेलचे नियम पाळतात व कर्मचाऱ्यांबरोबर धीराने व अदबीने वागतात, हे हॉटेल मालकांच्या व इतरांच्या लक्षात येते. (कलस्सै. ४:६) गेल्या वर्षी शाखा कार्यालयातील काही लोक, हॉटेल मालकाशी खोल्यांच्या आरक्षणासंबंधी बोलाचाल करत होते तेव्हा त्या हॉटेलच्या महिला सेल्स डायरेक्टरने त्यांना सांगितले: “तुम्ही सभ्य लोक आहात त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांना आमच्या हॉटेलमध्ये आलेलं आम्हाला आवडेल. तुम्ही अदबीनं व दयाळूपणे बोलता. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना आदरानं वागवता. सामानांची तोडफोड करत नाही.”
६. अधिवेशनाच्या शहरात असताना आपण ज्याप्रकारे कपडे घालतो त्याने सत्याची शोभा कशी वाढवू शकतो?
६ आपण अधिवेशनाचा बॅज लावतो तेव्हा आपल्या अधिवेशनाची प्रसिद्धी होत असते आणि यामुळे आपले बंधूभगिनी आपल्याला ओळखू शकतात तसेच यामुळे पाहणाऱ्यांनाही साक्ष मिळत असते. अधिवेशन होणाऱ्या शहरातील लोकांना दिसते, की बॅज लावलेल्या लोकांनी, गबाळे किंवा जगात सर्रास दिसून येणारे उत्तेजक कपडे घातलेले नाहीत तर नीटनेटका व सभ्य पेहराव केला आहे. (१ तीम. २:९, १०) यास्तव, अधिवेशन होणाऱ्या शहरात असताना आणि हॉटेलमध्ये राहायला जाता तेव्हासुद्धा आपण आपल्या वेशभूषेकडे व केशभूषेकडे लक्ष दिले पाहिजे. शॉर्ट्स व टी-शर्ट्समध्ये येणे चांगले दिसणार नाही. अधिवेशन ओपन-एअर स्टेडियममध्ये असले तरीसुद्धा आपले कपडे सभ्य असले पाहिजेत. अधिवेशन संपल्यानंतर आपण आपले कपडे बदलून रेस्टॉरंटमध्ये जाऊ इच्छित असलो तर एकदम घरच्या कपड्यात जाऊ नये; हे आठवणीत ठेवले पाहिजे, की आपण अजूनही अधिवेशनाचे प्रतिनिधी आहोत.
७. अधिवेशनादरम्यान ख्रिस्ती ऐक्याचा आनंद लुटण्याचा एक मार्ग कोणता आहे?
७ वार्षिक सणांदरम्यान इस्राएल लोकांना देशाच्या व जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या सहविश्वासू बंधूभगिनींबरोबर सहवास राखण्याची संधी मिळत असे. यामुळे त्यांची उभारणी होत असे शिवाय त्यांच्यातील ऐक्य वाढत असे. (प्रे. कृत्ये २:१, ५) अधिवेशनांदरम्यान आपला अनोखा ख्रिस्ती बंधूसमाज लोकांच्या नजरेतून सुटत नाही. आपल्या आध्यात्मिक नंदनवनाच्या या अप्रतिम पैलूची पाहणाऱ्यांवर छाप पडते. (स्तो. १३३:१) दुपारच्या सुटीत बाहेर जेवायला जाण्याऐवजी आपण आपल्या सोबतच हलका-फुलका आहार आणू शकतो व आपल्या आजूबाजूला बसलेल्या बंधूभगिनींना भेटण्याचा व त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद लुटू शकतो.
८. परिस्थिती अनुमती देत असेल तर अधिवेशनाच्या वेळी स्वयंसेवा करण्याची कोणती कारणे आहेत?
८ आपली सुव्यवस्थित व पद्धतशीर अधिवेशने पाहून पुष्कळ लोक अचंबित होतात; हे सर्व काम स्वयंसेवकांनी केले आहे हे जेव्हा त्यांना कळते तेव्हा तर त्यांना विश्वासच बसत नाही. अधिवेशनाच्या वेळी काम करण्यासाठी तुम्ही “संतोषाने पुढे” येऊ शकाल का? (स्तो. ११०:३) कधीकधी काही कुटुंबे आपल्या मुला-बाळांसह अशी स्वयंसेवा करायला पुढे येतात. इतरांना मदत करण्याचे बाळकडू ते आपल्या मुलांना पाजू इच्छित असतात. तुम्ही जर स्वभावाने लाजाळू असाल तर, अधिवेशनाच्या वेळी काम करता करता तुम्ही इतर बंधुभगिनींशी ओळख वाढवू शकाल. एका बहिणीने म्हटले: “मी अधिवेशनाला गेले तेव्हा माझ्या घरचे लोक व काही मित्र-मैत्रिणी यांच्याव्यतिरिक्त बहुतेकांना मी ओळखत नव्हते. पण साफ-सफाईचं काम करताना मी कितीतरी बंधू-भगिनींना भेटले. मला खूप मजा आली.” अधिवेशनाच्या वेळी काम करून तुम्ही जेव्हा आणखी मित्र बनवाल तेव्हा तुमचा आनंद द्विगुणित होईल. (२ करिंथ. ६:१२, १३) अशा स्वयंसेवेत तुम्ही कधी भाग घेतला नसेल तर ते काम करण्याच्या योग्यतेचे तुम्ही कसे बनू शकाल हे वडिलांना विचारा.
९. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आपण इतरांना आमंत्रित कसे करू शकतो?
९ इतरांना सत्य ऐकण्यास आमंत्रित करा: आपल्या अधिवेशनाच्या तीन आठवड्यांआधी आपण गेल्या वर्षांप्रमाणे याही वर्षी अधिवेशनाच्या आमंत्रण पत्रिकेच्या वाटप मोहिमेत भाग घेणार आहोत. मंडळ्या, त्यांना असलेल्या बहुतेक क्षेत्रात ही आमंत्रण पत्रिका वाटण्याचा प्रयत्न करू शकतात. (“आमंत्रण पत्रिका कशी द्यायची” चौकोन पाहा.) उरलेल्या सर्व आमंत्रण पत्रिका अधिवेशनात आणाव्यात. अधिवेशन होणाऱ्या शहरातील लोकांना, अनौपचारिक साक्ष देताना प्रचारक त्यांचा उपयोग करू शकतात.
१०. दर वर्षी होणाऱ्या आमंत्रण पत्रिका वाटप मोहिमेचा फायदा होतो याची उदाहरणे सांगा.
१० दर वर्षी होणाऱ्या या वाटप मोहिमेचा काही फायदा होतो का? एका अधिवेशनात अटेंडंटने एका जोडप्याला जागा शोधून दिली. त्यांनी त्याला सांगितले, की त्यांना आमंत्रण पत्रिका मिळाली होती व त्यांना हे “अधिवेशन काहीतरी खास असावं” असे वाटल्यामुळे ते ३२० किलोमीटरचा प्रवास करून आले होते. दुसऱ्या एका अनुभवात, एक बहीण घरोघरी आमंत्रण पत्रिका देत असताना एका माणसाला भेटली. हे अधिवेशन कशाच्या संबंधाने आहे ते जाणून घेण्यास हा माणूस खूपच उत्सुक होता. म्हणून तिने त्याच्याबरोबर या आमंत्रण पत्रिकेची चर्चा केली. काही दिवसांनी अधिवेशनात या बहिणीने या माणसाला पाहिले. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता आणि त्यांच्या हातात, त्या अधिवेशनात प्रकाशित झालेले नवीन प्रकाशनदेखील होते!
११. आपल्या वार्षिक प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहणे महत्त्वाचे का आहे?
११ इस्राएल लोकांना यहोवाची सेवा “सात्विकतेने व खऱ्या मनाने” करण्यास मदत मिळावी म्हणून यहोवानेच या वार्षिक सणांचे प्रेमळपणे आयोजन केले होते. (यहो. २४:१४) तसेच, आपल्या वार्षिक प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहिल्याने आपल्याला “सत्याने” चालण्यास मदत मिळते शिवाय अधिवेशनांना उपस्थित राहणे हा आपल्या उपासनेचा महत्त्वपूर्ण भागदेखील आहे. (३ योहा. ३) सत्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांवर यहोवाचा आशीर्वाद राहो व सर्वांना पुरेपूर लाभ होवो!
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
अधिवेशनादरम्यान आपल्या उत्तम आचरणामुळे सत्याची शोभा वाढते
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
आपल्या अधिवेशनाच्या तीन आठवड्यांआधी आपण अधिवेशनाच्या आमंत्रण पत्रिकेच्या वाटप मोहिमेत भाग घेणार आहोत
[६, ७ पानांवरील चौकट]
२०१२ च्या प्रांतीय अधिवेशनासाठी लक्षात ठेवायच्या सूचना
◼ कार्यक्रमाची वेळ: तिन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९:२० वाजता सुरू होईल. सभागृहाचे दरवाजे सकाळी ८:०० वाजता उघडले जातील. सुरुवातीचे संगीत सुरू होते तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीने होईल. कार्यक्रम, शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी ४:५५ वाजता आणि रविवारी ३:४० वाजता संपेल.
◼ पार्किंग: पार्किंगची जागा सभागृहाच्या व्यवस्थापनाने आपल्या ताब्यात दिली असल्यास, गाड्या जसजशा येतील तसतसे त्यांना पार्किंगसाठी जागा दिली जाईल. पार्किंगची जागा सहसा कमी पडत असल्यामुळे, होईल तितके कारपूलींग (प्रत्येकाने आपापल्या गाड्या आणण्यापेक्षा दुसऱ्याच्या गाडीत जागा असल्यास एकाच गाडीने प्रवास) करावा.
◼ बसण्याची व्यवस्था: तुमच्यासोबत एकाच कारमधून आलेल्या किंवा एकाच घरात तुमच्याबरोबर राहणाऱ्यांसाठी तसेच बायबल अभ्यास घेत असलेल्यांसाठीच आसने राखून ठेवली जाऊ शकतात.—१ करिंथ. १३:५.
◼ दुपारचे भोजन: दुपारच्या जेवणासाठी अधिवेशनाचे ठिकाण सोडून बाहेर जाण्याऐवजी कृपया सोबत साधे जेवण आणा. जेवण लहानशा डब्यात आणले तर ते खुर्चीखाली ठेवता येऊ शकेल. जेवणाचे मोठमोठे डब्बे व काचेची भांडी अधिवेशनाच्या ठिकाणी आणण्यास मनाई आहे. अधिवेशन होणाऱ्या ठिकाणी भोजन किंवा अल्पोपहार दिला जाणार नाही.
◼ दान: जगभरात चाललेल्या कार्यासाठी, अधिवेशनात असलेल्या दानपेट्यांमध्ये स्वेच्छेने दान टाकून आपण अधिवेशनाच्या व्यवस्थेकरता कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अधिवेशनात दिलेले चेक “द वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय केले पाहिजे.
◼ अपघात आणि आपत्कालीन प्रसंग: अधिवेशनाच्या ठिकाणी आणीबाणीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास कृपया जवळच्या अटेंडंटला कळवावे. तो लगेच प्रथमोपचार विभागाशी संपर्क साधेल. मग आमचा प्रशिक्षित वैद्यकीय विभाग परिस्थिती किती गंभीर आहे तिचा अंदाज घेतल्यावर त्यानुसार मदत देईल. गरज पडल्यास, प्रथमोपचार विभाग ॲम्ब्युलन्स बोलवेल. यामुळे, तातडीच्या उपचार विभागाला अनेक जणांकडून फोन कॉल येणार नाहीत.
◼ औषधोपचार: तुम्ही जर गोळ्या-औषधे घेत असाल तर ते सोबत आणा कारण अधिवेशनात ती दिली जाणार नाहीत. मधुमेह असणाऱ्या बंधुभगिनींना वेळोवेळी इंजेक्शन घ्यावयाचे असेल तर त्यांनी वापरलेले सिरिंज व सुया अधिवेशन व हॉटेलमध्ये असलेल्या कचरा पेट्यांत टाकू नये तर योग्य ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावावी.
◼ पादत्राणे: उचित पादत्राणे न घातल्यामुळे दर वर्षी अनेक अपघात होतात. अधिवेशनगृहात, पायऱ्यांवरून किंवा जाळी असलेल्या मार्गावर सुरक्षितपणे चालता यावे म्हणून योग्य व आपल्याच मापाची पादत्राणे घालणे उचित असेल.
◼ कर्णबधिर: काही निवडक ठिकाणी संकेत भाषेतदेखील कार्यक्रम सादर केला जाईल.
◼ बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी, शनिवारी सकाळी बाप्तिस्म्याचे भाषण सुरू होण्याआधी, त्यांच्याकरता आरक्षित करून ठेवलेल्या सीट्सवर बसावे. प्रत्येकाने सोबत एक टॉवेल आणि योग्य प्रकारचे कपडे आणावेत. स्टेजसमोरच्या पहिल्या रांगेत बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांच्या आरक्षित जागा असतील. यात काही बदल असेल तर त्याची आगाऊ घोषणा केली जाईल आणि अटेंडंट व माहिती विभागालाही याविषयी माहीत असेल.
◼ अत्तरे: बहुतेक अधिवेशने बंद ठिकाणी होत असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. त्यामुळे, अशा ठिकाणी उग्र वासाची अत्तरे, कोलोन व परफ्यूम वापरण्याचे टाळून, ज्यांना श्वसनाचे व श्वसनसंबंधित इतर विकार असल्यामुळे या गोष्टींचा त्रास होतो त्यांच्याप्रती आपण प्रेम दाखवतो.—१ करिंथ. १०:२४.
◼ प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म्स: अधिवेशनाच्या वेळी आपण अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर जर कोणी आस्था दाखवली तर त्या व्यक्तीविषयीची माहिती देण्याकरता प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा उपयोग केला पाहिजे. प्रचारकांनी अधिवेशनाला येताना एक किंवा दोन फॉर्म्स सोबत आणावेत. पूर्ण भरलेले फॉर्म एकतर पुस्तक विभागाला दिले जाऊ शकतात किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतल्या सचिवांना दिले जाऊ शकतात.—आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००९, पृ. ३ पाहा.
◼ रेस्टॉरंट: हॉटेल्समध्ये व रेस्टॉरंट्समध्ये गेल्यास, आपल्या उत्तम वागणुकीद्वारे यहोवाच्या नावाला गौरव आणा. अनेक ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेनुसार बक्षिसी देण्याची प्रथा असेल तर ती द्या.
◼ हॉटेल्स:
(१) गरजेपेक्षा अधिक खोल्यांचे कृपया आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका खोलीत राहण्याची परवानगी आहे त्यापेक्षा अधिक लोकांना खोलीत राहायला घेऊ नका.
(२) गंभीर परिस्थिती असल्याशिवाय आरक्षण रद्द करू नका आणि रद्द करावे लागलेच तर लवकरात लवकर हॉटेलला कळवा.—मत्त. ५:३७.
(३) हॉटेलमध्ये रूम बुक करताना तुम्ही जर तुमच्या डेबिट किंवा क्रेडीट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्या खात्यात, रूम बुकींगसाठी त्याचबरोबर तुम्ही राहत असताना काही आकस्मिक प्रसंगात उपयोगी पडतील यासाठी पुरेसे पैसे असतील याची खात्री करून घ्या. तुम्ही हॉटेलमधून निघून गेल्यावर काही दिवस खात्यातील पैसा उपयोगात आणू शकणार नाही.
(४) तुम्हाला लागेल तेव्हाच सामान वाहण्याची ट्रॉली (लगेज कार्ट) घ्या आणि काम झाल्यावर लगेच परत करा म्हणजे इतरांची गैरसोय होणार नाही.
(५) हॉटेल कर्मचारी तुमचे सामान उचलून नेत असतील तर त्यांना व हाऊसकीपरला प्रत्येक दिवशी बक्षिसी द्या.
(६) स्वयंपाक करण्याची परवानगी नसलेल्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका.
(७) हॉटेलमध्ये पाहुण्यांकरता नाश्ता, कॉफी किंवा बर्फ यांसारख्या मोफत दिल्या जाणाऱ्या सोयींचा गैरफायदा घेऊ नका. या सोयी फक्त हॉटेलमध्ये राहणाऱ्यांच्याच वापराकरता असतात.
(८) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वागताना सर्ववेळी आत्म्याचे फळ प्रदर्शित करा. त्यांना अनेक पाहुण्यांकडे लक्ष द्यावे लागते. आपण त्यांच्याशी दयाळुपणे, सहनशीलतेने व समजंसपणे वागतो तेव्हा त्यांना बरे वाटते.
(९) हॉटेलमध्ये असताना सर्ववेळी म्हणजे, हॉटेलमध्ये स्वीमिंग पूल असल्यास, लॉबीत असताना, जिममध्ये किंवा इतर ठिकाणी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे.
(१०) सुचवलेल्या हॉटेलांच्या यादीत दाखवलेले खोल्यांचे भाडे हे दर दिवसाचे भाडे आहे, पण यात टॅक्सचा समावेश नाही. जर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी, तुम्ही न मागवलेल्या किंवा न वापरलेल्या गोष्टींचे अतिरिक्त पैसे मागितल्यास ते देऊ नका आणि लवकरात लवकर अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा.
(११) जर तुमच्या हॉटेलच्या खोलीसंबंधी काही समस्या निर्माण झाली तर रूमिंग विभागाला अधिवेशनात याविषयी सांगा.
◼ स्वयंसेवा विभाग: अधिवेशनात काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी स्वयंसेवा विभागाशी संपर्क साधावा. वयाने १६ पेक्षा कमी असलेली मुलेदेखील पालकांच्या किंवा पालकांची अनुमती असलेल्या एखाद्या प्रौढ भावाच्या अथवा बहिणीच्या देखरेखीखाली कामाला हातभार लावू शकतात.
[६ पानांवरील चौकट]
आमंत्रण पत्रिका कशी द्यायची
जास्तीत जास्त लोकांना आमंत्रण पत्रिका द्यायची असेल तर आपल्याला थोडक्यातच संदेश सांगावा लागेल. आपण असे म्हणू शकतो: “नमस्ते. संपूर्ण जगभरात होत असलेल्या या आमंत्रण पत्रिका वाटप मोहिमेत आम्ही भाग घेत आहोत. ही तुमची आमंत्रण पत्रिका. पत्रिकेवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.” पत्रिका देताना उत्साहाने द्या. शनिवार-रविवारी पत्रिका वाटप करताना, उचित असेल तर तुम्ही नियतकालिकेदेखील देऊ शकता.