घरमालकाला तर्क करण्यास मदत करा
१. क्षेत्र सेवेत कोणती पद्धत सर्वात प्रभावशाली ठरू शकते?
१ क्षेत्र सेवेत कोणती पद्धत जास्त प्रभावशाली ठरू शकते—स्वतःचेच मत ठामपणे मांडणे, की घरमालकाला तर्क करायला लावून योग्य निष्कर्षावर पोहचण्यास मदत करणे? प्रेषित पौलाने थेस्सलनीका येथील यहुद्यांशी बोलताना दुसरी पद्धत वापरली, आणि त्यामुळे तेथील काही जणांनी सत्य स्वीकारले. (प्रे. कृत्ये १७:२-४) इतरांशी तर्क करण्यात कोणती गोष्ट समाविष्ट आहे?
२. इतरांना सुवार्ता सांगताना आपण पौलाचे अनुकरण कसे करू शकतो?
२ इतरांच्या भावना आणि पार्श्वभूमी लक्षात घ्या: तुमच्या क्षेत्रातील लोकांना तर्क करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेणे खूप गरजेचे आहे. अरीयपगा येथे प्रेषित पौलाने विश्वासात नसलेल्या ग्रीक लोकांना दिलेल्या भाषणाच्या सुरुवातीला, त्यांना माहीत असणाऱ्या आणि ते मानत असणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला. (प्रे. कृत्ये १७:२२-३१) तेव्हा, सादरीकरणाची तयारी करत असताना तुमच्या क्षेत्रातील लोकांचे सर्वसाधारण विश्वास आणि पूर्वग्रह विचारात घ्या. (१ करिंथ. ९:१९-२२) घरमालकाने आक्षेप घेतल्यास असा विषय निवडा ज्यावर तुमचे आणि घरमालकाचे एकमत आहे, आणि त्याच्या आधारावर संभाषण सुरू ठेवा.
३. कुशलतेने प्रश्न विचारून आपण इतरांशी अधिक परिणामकारक रीतीने तर्क कसा करू शकतो?
३ कुशलतेने प्रश्नांचा उपयोग करा: एखाद्या व्यक्तीला तिच्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी मार्गदर्शन देण्याअगोदर, ती व्यक्ती सध्या कुठे आहे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्याच प्रकारे, घरमालकाला योग्य निष्कर्षापर्यंत पोहचण्यास मदत करण्यासाठी त्याचे सध्याचे मत काय आहे हे माहीत असणे गरजेचे आहे. आपल्या श्रोत्यांशी तर्क करण्याअगोदर येशू त्यांच्या मनात काय विचार आहेत हे जाणून घेण्यासाठी सहसा त्यांना प्रश्न करायचा. उदाहरणार्थ, जेव्हा एकाने येशूला विचारले, “काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?,” तेव्हा येशूने त्याला उत्तर देण्याआधी त्याचा दृष्टिकोन जाणून घेतला. (लूक १०:२५-२८) आणखी एका प्रसंगी, पेत्राने चुकीचे उत्तर दिले त्यावेळी येशूने त्याला कुशलतेने प्रश्न विचारून त्याचा दृष्टिकोन सुधारला. (मत्त. १७:२४-२६) तसेच, घरमालक आपल्याला प्रश्न विचारतो किंवा चुकीचे मत मांडतो तेव्हा त्याला तर्क करण्यास मदत करण्यासाठी आपण त्याला प्रश्न विचारू शकतो.
४. आपण घरमालकाला तर्क करण्यासाठी मदत का केली पाहिजे?
४ आपण जेव्हा घरमालकाला तर्क करण्यास मदत करतो तेव्हा आपण महान शिक्षक येशूचे आणि त्याचबरोबर पहिल्या शतकातील कुशल सुवार्तिकांचे अनुकरण करत असतो. आपण घरमालकाबद्दल आदर व्यक्त करतो. (१ पेत्र ३:१५) त्यामुळे घरमालक पुनर्भेटीसाठी तयार होण्याची जास्त शक्यता आहे.