परिणामकारक असलेले रस्त्यावरील साक्षकार्य
१. येशूचे अनुकरण करण्याचा एक मार्ग कोणता?
१ पृथ्वीवर सेवा करताना येशू, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी भेटणाऱ्या लोकांशी बोलायला कचरला नाही. (लूक ९:५७-६१; योहा. ४:७) शक्य तितक्या लोकांना हा महत्त्वाचा संदेश सांगायची त्याची इच्छा होती. आज लोकांना देवाबद्दलचे ज्ञान घेण्यास मदत करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे, रस्त्यावरील साक्षकार्य. (नीति. १:२०) विवेकबुद्धीचा उपयोग करून आपण स्वतःहून जर लोकांकडे बोलायला गेलो तर या साक्षकार्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल.
२. रस्त्यावरील साक्षकार्य करताना आपण स्वतःहून लोकांशी कसे बोलू शकतो?
२ स्वतःहून लोकांशी बोला: एका ठिकाणी उभे राहून किंवा बसून, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी आपल्याकडे यावे अशी अपेक्षा करण्याऐवजी स्वतःहूनच लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करू शकता. अशा वेळी तुमची हालचाल शांत व मैत्रीपूर्ण वाटली पाहिजे. तुमच्याबरोबर इतर प्रचारक असतील तर एकत्र मिळून लोकांकडे जाण्याऐवजी तुम्ही एक-एकटे जाऊ शकता. तुमचे बोलणे संपल्यानंतर, त्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क कसा साधता येईल हे तुम्ही विचारू शकता. काही प्रचारक नेमाने एकाच ठिकाणी रस्त्यावरील साक्षकार्य करतात. त्यामुळे त्यांना तेच लोक वारंवार भेटतात. आणि या लोकांशी पुन्हा पुन्हा बोलून त्यांची आस्था वाढवणे त्यांना शक्य होते.
३. रस्त्यावर साक्षकार्य करताना आपण विवेकबुद्धीचा उपयोग कसा करू शकतो?
३ विवेकबुद्धीचा उपयोग करा: रस्त्यावर कोठे उभे राहायचे व कोणाशी बोलायला जायचे, हे ठरवताना आपल्या विवेक बुद्धीचा उपयोग करा. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाशी बोलण्याची गरज नाही. सभोवार लक्ष ठेवा. जसे की, जर कोणी घाईत असेल तर त्याच्याशी न बोललेले बरे. एखाद्या दुकानासमोर तुम्ही साक्षकार्य करत असाल तर, तुम्हाला पाहून दुकानदाराला टेन्शन तर येत नाही ना याची खबरदारी घ्या. लोक दुकानात शिरायच्या आधी त्यांच्याशी बोलण्याऐवजी, ते दुकानातून बाहेर येतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. आणि लोकांबरोबर तुम्ही बोलायला जाता तेव्हा ते घाबरतील किंवा चकित होतील अशा प्रकारे त्यांच्याकडे जाऊ नका. तसेच, प्रकाशनेसुद्धा नीट विचार करून द्या. लोक जास्त आवड दाखवत नसतील तर नियतकालिके देण्याऐवजी पत्रिका द्या.
४. रस्त्यावरील साक्षकार्य ही क्षेत्र सेवेच्या अनेक पद्धतींपैकी एक आनंददायक व परिणामकारक पद्धत का आहे?
४ रस्त्यावरील साक्षकार्याद्वारे आपण कमी वेळात सत्याचे अनेक बी पेरू शकतो. (उप. ११:६) आपण तिथे अशाही लोकांना भेटू, ज्यांना घरोघरचे साक्षकार्य करत असताना आपण कदाचित भेटू शकत नाही. होय, रस्त्यावरील साक्षकार्य ही क्षेत्र सेवेच्या इतर अनेक पद्धतींपैकी एक आनंददायक व परिणामकारक पद्धत आहे. तेव्हा, यात भाग घ्यायला तुम्हाला आवडणार नाही का?