राज्याची आवेशाने साक्ष देणाऱ्यांनी प्रार्थनापूर्वक मनन करणे आवश्यक
१. कोणत्या गोष्टीने येशूला आपल्या प्रमुख कार्यापासून विचलित न होण्यास मदत केली?
१ लोकांना बरे करण्यात व भुते घालवण्यात येशूने संध्याकाळ घालवली होती. दुसऱ्या दिवशी त्याचे शिष्य त्याचा शोध करत गेले आणि तो सापडल्यावर, त्यांनी त्याला अद्भुत कृत्ये अशीच चालू ठेवावीत असे आर्जवून त्याला म्हटले ‘सर्व लोक आपला शोध करीत आहेत.’ पण राज्याची सुवार्ता सांगण्याच्या त्याच्या प्रमुख कार्यापासून येशू कधीच विचलित झाला नाही. तो म्हणाला: “मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दूसरीकडे जाऊ; कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.” कोणत्या कारणामुळे येशूचे मन एकाग्र राहिले? तो प्रार्थना व मनन करण्यासाठी पहाटेच उठायचा. (मार्क १:३२-३९) प्रार्थनापूर्वक मनन केल्याने आपल्यालाही आवेशी प्रचारक बनण्यास कशी मदत होईल?
२. क्षेत्र सेवेतला आपला आवेश टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत करू शकतील अशा कोणत्या गोष्टींवर आपण मनन करू शकतो?
२ कशावर मनन करायचे? येशूने पाहिले की लोक ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, गांजलेले व पांगलेले होते.’ (मत्त. ९:३६) त्याच प्रकारे आज लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणे किती गरजेचे आहे यावर आपण विचार करू शकतो. शिवाय, आपण राहात असलेल्या वेळेचेही आपण भान ठेवले पाहिजे. (१ करिंथ. ७:२९) यहोवाची कार्ये व त्याचे गुण, यहोवाचे साक्षीदार असण्याचा आपल्याला मिळालेला सुहक्क आणि आपल्या क्षेत्रातील लोकांना अद्यापही माहीत नसलेली देवाच्या वचनातील अनमोल खजिन्यासारखी माहिती यांवर आपण मनन करू शकतो.—स्तो. ७७:११-१३; यश. ४३:१०-१२; मत्त. १३:५२.
३. आपण केव्हा मनन करू शकतो?
३ केव्हा मनन करायचे? येशूने जसे केले तसेच काही जण पहाटेच उठून शांत वातावरणात मनन करतात. काहींना रात्री झोपायच्या आधी मनन करणे योग्य वाटते. (उत्प. २४:६३) आपण कितीही व्यस्त असलो तरी, मनन करण्यास आपण वेळ काढू शकतो. काही जण कामाला जातात तेव्हा प्रवासाच्या वेळी मनन करतात. काही बंधू भगिनी त्यांच्या जेवणाच्या सुटीत मन एकाग्र करून मनन करतात. प्रचार कार्यात जाण्याआधी जर आपण काही मिनिटे मनन केले तर आपण पूर्ण आवेशाने व धैर्याने प्रचार करू शकतो असे काहींना वाटते.
४. आपण मनन का केले पाहिजे?
४ प्रार्थनापूर्वक मनन केल्याने आपण यहोवाची सेवा आणखी जास्त करू, व जीवनात त्याची उपासना करणे खूप महत्त्वाची आहे हे जाणू आणि शेवट येईपर्यंत प्रचार कार्य करत राहण्याचा निश्चय करू. देवाचा प्रमुख सेवक, येशू याला मनन केल्याने फायदा झाला आणि म्हणून आपल्याला सुद्धा होईल.