सेवा सभेतील भाग हाताळणाऱ्यांसाठी सूचना
आमची राज्य सेवा याच्या या अंकापासून, सेवा सभा आराखड्याच्या बाबतीत जे शब्द वापरले जायचे ते सोपे केले जात आहेत. आमची राज्य सेवा मे २००९ च्या अंकात, “सेवा सभेची तयारी कशी करावी?” हा लेख आला होता. आता त्यामध्ये काही सुधारणा व फेरफार करण्यात आला आहे. त्याबद्दलच्या नवीन सूचना आणि स्मरणटिपण पुढे देण्यात आले आहे.
▪ भाषण: भाषण असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा नेमलेल्या भागावर भाषण दिले जाते व श्रोते भाग घेत नाहीत. मंडळीला सर्वात जास्त फायदा होईल अशा मुद्द्यांवर वक्त्याने आपले लक्ष केंद्रित करावे.
▪ प्रश्ने व उत्तरे: हा भाग आपल्या टेहळणी बुरूज अभ्यासासारखाच आहे. या भागाच्या सुरुवातीला व शेवटी वक्त्याने जास्त बोलू नये आणि सर्व परिच्छेदांवर प्रश्न विचारावेत. हा भाग हाताळणाऱ्या बांधवाने ज्यादा टिपण देण्याचे टाळले पाहिजे. वेळ असेल तर मुख्य शास्त्रवचनांचे वाचन केले जाऊ शकते. आराखड्यात सांगितले नसेल तर परिच्छेदांचे वाचन करण्याची गरज नाही.
▪ चर्चा: हा भाग, भाषणाप्रमाणे सादर केला जाईल पण वक्ता अधूनमधून श्रोत्यांना काही प्रश्न देखील विचारू शकतो.
▪ प्रात्यक्षिके व मुलाखती: प्रात्यक्षिक दाखवा असे जेव्हा सूचित केले जाते तेव्हा हा भाग हाताळणाऱ्या बांधवाने प्रात्यक्षिकाची व्यवस्था केलीच पाहिजे. प्रात्यक्षिक करण्यासाठी तो निवडत असलेले प्रचारक अनुभवी व उदाहरणीय असावेत; आणि शक्य तर त्याने आधीच प्रात्यक्षिकाचा सराव करून घेतला पाहिजे. प्रात्यक्षिक करण्यासाठी त्याने नवीन व कम अनुभवी प्रचारकांना निवडू नये. स्टेजवर येण्याची त्यांनाही संधी मिळेल, असा विचार त्याने करू नये. पण हवे तर अशा नवीन व कम अनुभवी प्रचारकांपैकी काहींना घरमालक म्हणून निवडले जाऊ शकते. प्रात्यक्षिक करून दाखवणाऱ्या प्रचारकांनी श्रोत्यांकडे तोंड करून प्रात्यक्षिक करावे. ज्यांची मुलाखत घेतली जाते अशा प्रचारकांनी आपल्या जागेवरच बसून बोलण्याऐवजी स्टेजवर येऊन आपली टिपणी द्यावी. प्रात्यक्षिकांची व मुलाखतींची तालीम झाली पाहिजे. सभा जर ओव्हरटाईम जात असेल तर बांधवाने त्याचा भाग कमी करावा पण प्रात्यक्षिके किंवा मुलाखती रद्द करू नयेत. प्रात्यक्षिके व मुलाखती यांसाठी प्रचारक निवडताना, सेवा सेवकांनी, वडील वर्गाच्या संयोजकांशी किंवा इतर वडिलांशी सल्लामसलत करावी.
एखादा भाग विशेष असेल आणि त्यात काही खास सूचना असतील तर त्यांचे काटेकोरपणे पालन करावे. वर सांगितल्याप्रमाणे जर सेवा सभेतील भाग हाताळण्यात आले तर बंधूजन सेवा सभा “शिस्तवार व व्यवस्थितपणे” पार पाडतील.—१ करिंथ. १४:४०.