तुम्ही अनौपचारिक साक्ष देऊ शकता!
१. (क) अनौपचारिक साक्षकार्य म्हणजे काय? (ख) या सभेत उपस्थित असलेल्या किती जणांना अनौपचारिक साक्षीद्वारे सत्य मिळाले होते?
१ तुमच्या मंडळीतल्या किती जणांना, अनौपचारिक साक्षीद्वारे सत्य मिळाले आहे बरे? उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल. अनौपचारिक साक्षकार्य करणे म्हणजे, आपली दररोजची कामे करत असताना आपल्याला भेटणाऱ्या लोकांना साक्ष देणे; जसे की, प्रवास करताना, नातेवाईकांकडे किंवा शेजाऱ्यांकडे गेल्यावर, बाजारात, शाळेत, कामाच्या ठिकाणी इत्यादी, भेटणाऱ्या लोकांना साक्ष देऊ शकतो. बाप्तिस्मा घेतलेल्या २०० साक्षीदारांच्या एका गटापैकी जवळजवळ ४० टक्के साक्षीदारांना अनौपचारिक साक्षीद्वारे सत्य मिळाले होते! त्यामुळे, प्रचार करण्याची ही पद्धत खरोखरच खूप प्रभावी आहे.
२. बायबलमध्ये अनौपचारिक साक्षकार्याची कोणती उदाहरणे आहेत?
२ पहिल्या शतकात सुवार्तेचा प्रचार करणारे, लोकांना अनौपचारिक साक्ष देत असत. जसे की, शोमरोनाला जाताना येशूने याकोबाच्या झऱ्यातून पाणी शेंदत असलेल्या एका शोमरोनी स्त्रीला साक्ष दिली होती. (योहा. ४:६-२६) यशयाचा ग्रंथ वाचत चाललेल्या एका कुशी अधिकाऱ्याला फिलिप्पाने: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” असा प्रश्न करून संभाषणाला सुरुवात केली. (प्रे. कृत्ये ८:२६-३८) फिलिप्पै येथील तुरुंगात असताना प्रेषित पौलाने एका तुरुंगाधिकाऱ्याला साक्ष दिली. (प्रे. कृत्ये १६:२३-३४) नंतर, नजरकैदेत असताना पौल, “जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे, आणि प्रभु येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवीत असे.” (प्रे. कृत्ये २८:३०, ३१) तुम्ही लाजाळू असलात तरीदेखील अनौपचारिक साक्ष देऊ शकता. कसे बरे?
३. आपल्या लाजाळू स्वभावावर तुम्ही कशा प्रकारे मात करू शकता?
३ सुरुवात कशी कराल: आपल्यातील बहुतेकांना अनोळखी लोकांबरोबर संभाषण सुरु करायला कठीण वाटते. आणि कधीकधी तर, ओळखीच्या लोकांनाही सत्याविषयी सांगायला आपण कचरतो. पण, आपण जर यहोवाच्या चांगुलपणावर, त्याने त्याच्या सेवकांना दिलेल्या आध्यात्मिक सत्यांवर, जगातील लोकांच्या दयनीय अवस्थेवर विचार केला तर आपण नक्कीच त्यांना साक्ष देण्यास प्रेरित होऊ. (योना ४:११; स्तो. ४०:५; मत्त. १३:५२) शिवाय, ‘सुवार्ता सांगण्याचे धैर्य’ आपल्याला मिळावे म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. (१ थेस्सलनी. २:२) गिलियड प्रशिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थ्याने असे म्हटले: “मला जेव्हा लोकांबरोबर बोलायला भीती वाटते तेव्हा मी मनातल्या मनात छोटीशी प्रार्थना करतो. आणि थोड्याच वेळात माझ्या मनातली भीती विरून जाते.” तुमची देखील हीच समस्या असेल तर बोलण्याआधी, मनातल्या मनात एक लहानशी प्रार्थना करा.—नहे. २:४.
४. आपण स्वतःपुढे कोणते ध्येय ठेवू शकतो, व का?
४ अनौपचारिक साक्षकार्य या नावावरूनच कळते, की हे साक्षकार्य घरोघरच्या कार्यापेक्षा वेगळे आहे. या साक्षकार्यात आपण, कोणत्याही प्रकारच्या प्रस्तावनेने किंवा वचन दाखवून संभाषण सुरू करत नाही. त्यामुळे, लोकांना भेटल्याबरोबर आपण लगेच त्यांना साक्ष दिली पाहिजे अशा दडपणाखाली न राहता त्यांच्याबरोबर इकडच्या-तिकडच्या विषयावर गप्पा मारून संभाषण सुरू करण्याचे ध्येय आपण ठेवू शकतो. आणि मग हळूहळू आपले संभाषण सुवार्तेकडे वळवू शकतो. हे असे करणे सोपे आहे, असे काही प्रचारकांचे म्हणणे आहे. समोरच्या व्यक्तीला आपल्याबरोबर बोलण्याची इच्छा नसते तेव्हा आपण तिला बळजबरीने बोलते करत नाही. तर, नम्रपणे इथच संभाषण थांबवतो व इतरांबरोबर बोलण्यासाठी निघून जातो.
५. लाजऱ्या स्वभावाची एक बहीण अनौपचारिक साक्षकार्य कसे करते?
५ एक बहीण जी लाजऱ्या स्वभावाची आहे ती, बाजारात जाते तेव्हा आधी लोकांकडे पाहते आणि मग स्मितहास्य करते. समोरची व्यक्ती तिला पाहून हसली की मग आपली बहीण काहीतरी बोलते. त्या व्यक्तीने तिचे उत्तर दिले, की मग आपल्या बहिणीला संभाषण पुढे वाढवण्याचे धैर्य मिळते. ती त्या व्यक्तीचे बोलणे लक्ष देऊन ऐकते जेणेकरून, त्या व्यक्तीच्या आवडत्या विषयानुसार साक्ष देण्यासाठी तिला एखादा मुद्दा सापडेल. या पद्धतीचा अवलंब करून आपल्या बहिणीने पुष्कळ प्रकाशने लोकांना वाचायला दिली आहेत; एवढेच नव्हे तर तिने एक बायबल अभ्यासही सुरू केला आहे!
६. आपण संभाषण कसे सुरू करू शकतो?
६ संभाषण सुरू करणे: आपण संभाषण कसे सुरू करू शकतो? याकोबाच्या झऱ्याजवळ भेटलेल्या स्त्रीला येशूने फक्त, पाणी देण्याची विनंती करून संभाषणाला सुरुवात केली. (योहा. ४:७) आपणही लोकांची ख्याली-खुशाली विचारून किंवा एखादा प्रश्न विचारून संभाषणाची सुरुवात करू शकतो. पण याचा असा अर्थ होत नाही, की आपण आपले संभाषण लगेचच देवाच्या राज्याकडे वळवले पाहिजे किंवा बायबलमधून लगेच एखादे वचन वाचून दाखवले पाहिजे. लोकांच्या मनात आपल्याविषयी पूर्वग्रह असतात तेव्हा तर विशेषकरून आपण त्यांच्याबरोबर आणखी गोडीगुलाबीने बोलण्याची गरज आहे. आणि मग बोलत असताना तुम्हाला, बायबलमधून एखादे वचन दाखवण्याची व सत्याचे बी रोवण्याची संधी मिळेल. (उप. ११:६) काहीजण, लोकांची जिज्ञासा वाढेल असे एखादे वाक्य बोलतात. आणि मग समोरच्या व्यक्तीच्या मनात आणखी माहिती जाणून घ्यायची इच्छा उत्पन्न होऊन ती प्रश्न विचारते. जसे की, दवाखान्यात बसल्यावर संभाषण सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला फक्त म्हणू शकता: “आपण आजारीच पडलो नाही, तर किती बरं होईल, नाही का?”
७. आजूबाजूच्या परिस्थितीचे बारकाईने परीक्षण केल्यास आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?
७ आजूबाजूच्या परिस्थितीचे बारकाईने परीक्षण केल्यास आपल्याला लोकांबरोबर संभाषण सुरू करण्याची संधी मिळू शकते. तुम्ही जर, एखाद्या आईबरोबर तिची शांतपणे वागणारी मुले पाहिली की तुम्ही तिची अशा प्रकारे प्रशंसा करू शकता: “तुम्ही मुलांना खरचं किती छान वळण लावलय.” एक बहीण, कामाच्या ठिकाणी लोकांमध्ये ज्या विषयावर चर्चा चालते तो विषय नीट ऐकते आणि मग तिच्या सहकर्मींना आवडेल अशी त्याच विषयावरील अधिक माहिती ती त्यांना सांगते. तिच्यासोबत काम करणाऱ्या एका तरुणीचे लग्न आहे, असे जेव्हा या बहिणीला समजले तेव्हा तिने तिला, विवाहाची योजना कशी करायची हा विषय असलेला सावध राहा! मासिकाचा अंक दिला. यामुळे त्या तरुणीबरोबर बायबलवर आधारित आणखी चर्चा झाल्या.
८. संभाषण सुरू करण्यासाठी आपण आपल्या प्रकाशनांचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो?
८ लोकांबरोबर संभाषण सुरू करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, लोक आपल्याला पाहू शकतात अशा ठिकाणी आपली प्रकाशने वाचत बसणे. एक बांधव, टेहळणी बुरूज किंवा मग सावध राहा! नियतकालिक उघडतो आणि लोकांचे लक्ष आकर्षित होईल असे शीर्षक असलेला एखादा लेख गुपचूप वाचत बसतो. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्या नियतकालिकात डोकावून पाहत आहेत असे त्याला दिसले की मग तो त्यांना एखादा प्रश्न विचारतो आणि त्या लेखाबद्दल थोडसं सांगतो. अशाने संभाषण सुरू होते आणि मग लोकांना साक्षही मिळते. कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत बाकावर दिसेल अशा ठिकाणी आपली प्रकाशने ठेवल्याने, लोक ती मासिके चाळण्यासाठी घेतात आणि मग आपल्याला प्रश्न विचारतात.
९, १०. (क) अनौपचारिक साक्ष देण्यासाठी आपण संधी कशा निर्माण करू शकतो? (ख) तुम्हाला कोणकोणते मार्ग सुचले आहेत?
९ संधी निर्माण करणे: आपण राहत असलेल्या दिवसांत प्रचार कार्य हे अत्यंत महत्त्वाचे काम असल्यामुळे, लोक आपल्याला भेटतील तेव्हाच आपण त्यांना साक्ष देऊ, असा विचार करून आपण अनौपचारिक साक्षकार्याला क्षुल्लक लेखू नये. तर, आपले दैनंदिन काम करत असताना, लोकांना साक्ष देता यावी म्हणून आपण संधी निर्माण केल्या पाहिजेत. तुम्ही कोणाकोणाला भेटणार आहात आणि तुम्ही त्यांच्याबरोबर एक मैत्रिपूर्ण संभाषण कसे सुरू करू शकता, यावर आधीच विचार करा. आणि जे आवड दाखवतात त्यांना बायबलमधून एखादे वचन दाखवता यावे व प्रकाशने देता यावीत म्हणून आपल्याजवळ सतत एक बायबल आणि प्रकाशने बाळगा. (१ पेत्र ३:१५) काही प्रचारकांना, वेगवेगळ्या भाषांच्या व विषयांवरच्या पत्रिका सोबत बाळगणे उपयोगी ठरत असल्याचे वाटते.—km ६/०७ पृ. ७.
१० कल्पक असल्यामुळे पुष्कळ प्रचारकांनी अनौपचारिक साक्ष देता यावी म्हणून वेगवेगळे मार्ग शोधून काढले आहेत. कडक सुरक्षा असलेल्या अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये राहणारी एक भगिनी, संकुलाच्या आतमध्ये मनोरंजनासाठी असलेल्या भागात, सुंदरसुंदर निसर्ग देखाव्यांचे चित्रकोडे तयार करते. लोक जेव्हा जुळवलेले चित्र थांबून पाहतात व त्या सुंदर चित्रावर काहीतरी बोलतात तेव्हा ती लगेच संभाषण सुरू करण्यासाठी त्या संधीचा फायदा घेते आणि बायबलमध्ये प्रतिज्ञा केलेल्या “नवे आकाश व नवी पृथ्वी” याबद्दल त्यांना सांगते. (प्रकटी. २१:१-४) अनौपचारिक साक्ष देण्यासाठी संधी निर्माण करण्याचे तुम्हाला कोणकोणते मार्ग सुचतात?
११. अनौपचारिक साक्ष कार्यात आवड दाखवणारे लोक भेटतात तेव्हा आपण त्यांची आवड कशी वाढवू शकतो?
११ आवड वाढवणे: एखाद्या व्यक्तीने आवड दाखवल्यास तुम्ही तिची आवड आणखी वाढवू शकता. उचित असेल तर तुम्ही तिला म्हणू शकता: “तुमच्याबरोबर बोलून मला खरंच खूप छान वाटलं. आपण पुन्हा कुठं भेटू शकतो?” काही भागांमध्ये सेवा कार्य करताना आपण विशेष खबरदारी घेतली पाहिजे. घरमालकांना खरोखरच आवड आहे का, हे आपण योग्यरीतीने ताडले पाहिजे. संदेश ऐकण्यात आपल्याला खूपच आवड आहे, असे ढोंग करून विरोधकांनी काही प्रचारकांना धरून ठेवले होते. आवड दाखवलेल्या व्यक्तीला तुम्हाला प्रत्यक्ष भेटता येणार नसेल तर तिचा पत्ता प्लीज फॉलोअप फॉर्मवर (S-४३) लिहून तो तुमच्या मंडळीच्या सचिवांना द्या.
१२. (क) अनौपचारिक साक्षकार्यात आपण खर्च करत असलेला वेळ आपण का मोजला पाहिजे? (ख) अनौपचारिक साक्षकार्यामुळे बांधवांना कोणते अनुभव आले आहेत? (“अनौपचारिक साक्षकार्यामुळे आलेले अनुभव!” हा चौकोन पाहा)
१२ अनौपचारिक साक्षकार्यात आपण खर्च करत असलेल्या वेळेचा रिपोर्ट घातला पाहिजे. त्यामुळे तुम्ही दिवसाला अगदी काही मिनिटांसाठी जरी अनौपचारिक साक्षकार्य केले असेल तर तो वेळ लिहून ठेवा. विचार करा: जर प्रत्येक प्रचारकाने दिवसाला फक्त पाच मिनिटे जरी अनौपचारिक साक्षकार्य केले असले तरी एक महिन्याच्या अहवालात १७ लाखापेक्षा अधिक तासांची भर पडू शकते!
१३. कोणत्या गोष्टीने प्रवृत्त होऊन आपण अनौपचारिक साक्षकार्य करतो?
१३ अनौपचारिक साक्षकार्य करण्यासाठी आपल्याजवळ सर्वोत्कृष्ट कारणे आहेत—देव आणि शेजारी यांच्याबद्दल प्रेम असल्यामुळे आपण अनौपचारिक साक्षकार्य करतो. (मत्त. २२:३७-३९) यहोवाचे गुण आणि त्याचे उद्देश यांबद्दल आपले हृदय कृतज्ञतेने जेव्हा ओतप्रोत भरते तेव्हा आपण त्याच्या ‘राज्याच्या वैभवयुक्त ऐश्वर्याविषयी’ बोलण्याचे थांबू शकत नाही. (स्तो. १४५:७, १०-१२) लोकांबद्दल आपल्याला खरोखरच कळकळ असल्यामुळे, वेळ आहे तोपर्यंत त्यांना सुवार्ता ऐकण्याच्या संधीचा फायदा घेण्यास आपण मदत करत राहू. (रोम. १०:१३, १४) थोडीशी सावधगिरी बाळगली, आधीच थोडासा विचार करून पूर्वतयारी केली की आपण सर्वच जण अनौपचारिक साक्षकार्य करू शकतो आणि प्रामाणिक मनाच्या लोकांना सत्य सांगितल्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घेऊ शकतो.
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
लोकांबरोबर इकडच्या-तिकडच्या विषयावर गप्पा मारून संभाषण सुरू करण्याचे ध्येय आपण ठेवू शकतो
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
कल्पक असल्यामुळे पुष्कळ प्रचारकांनी, अनौपचारिक साक्ष देता यावी म्हणून वेगवेगळे मार्ग शोधून काढले आहेत
[५ पानांवरील चौकट]
संभाषण सुरू करण्यासाठी काही सूचना
▪ संभाषण सुरू करण्याचे धैर्य मिळावे म्हणून प्रार्थना करा
▪ मैत्रिपूर्ण व निवांत वाटणाऱ्या लोकांबरोबर बोला
▪ आधी त्यांच्याकडे पाहा, स्मितहास्य करा आणि मग दोघांच्या आवडीच्या विषयावर काहीतरी बोला
▪ समोरची व्यक्ती बोलत असताना तिचे लक्षपूर्वक ऐकून घ्या
[६ पानांवरील चौकट]
अनौपचारिक साक्षकार्यामुळे आलेले अनुभव!
• एक बांधव, गॅरेजमध्ये त्याची कार दुरुस्त होईपर्यंत थांबला होता. त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना त्याने साक्ष द्यायला सुरुवात केली आणि हस्तपत्रिका वाटून त्याने अधिवेशनातील जाहीर भाषणाला येण्याचे आमंत्रण दिले. एक वर्षानंतर एका अधिवेशनात एक बांधव त्याच्याजवळ आला आणि त्याने त्याचे प्रेमळपणे अभिवादन केले. गॅरेजमधल्या ज्या लोकांना या बांधवाने आमंत्रण पत्रिका वाटल्या होत्या त्या लोकांपैकी हा एक होता! तो ते जाहीर भाषण ऐकण्यासाठी गेला आणि त्यानंतर बायबल अभ्यासासाठी त्याने आपले नाव दिले. कालांतराने त्याने व त्याच्या पत्नीने बाप्तिस्मा घेतला.
• अनौपचारिक साक्षकार्याद्वारे सत्य मिळालेल्या एका बहिणीचे एक खास क्षेत्र आहे; आपल्या तीन मुलांमुळे ती ज्या लोकांच्या संपर्कात येते त्या लोकांना साक्ष देते. म्हणजे, शेजाऱ्यांना किंवा मग शाळेत काही कामानिमित्ताने आलेल्या अथवा पालकांसाठी असलेल्या सभेला आलेल्या पालकांना ती अनौपचारिक साक्ष देते. मुलांचे संगोपन करताना बायबलमुळे तिला अमूल्य मदत मिळाली आहे, असे एक साधेसेच पण प्रामाणिक विधान करून ती स्वतःची ओळख करून देते आणि मग दुसऱ्या विषयावर बोलायला लागते. पण तिने तर आधीच चर्चेला सुरुवात केली असल्यामुळे, नंतरच्या चर्चांमध्ये ती अगदी सहजरीत्या बायबल विषयांवर बोलते. अशा प्रकारे तिने १२ जणांना बाप्तिस्मा घेण्यास मदत केली आहे.
• एकदा विम्याचे काम करणाऱ्या एका मनुष्याने एका बहिणीला कामानिमित्ताने बोलवले होते तेव्हा तिने संधीचा फायदा घेऊन त्याला साक्ष दिली. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद व सार्वकालिक जीवनाची हमी हवी आहे का, असे तिने त्याला विचारले. तो तिला म्हणाला, की अशी हमी मला नक्कीच आवडेल, पण तुम्ही कोणत्या प्रकारच्या विम्याची गोष्ट करताहात? तिने मग त्याला बायबलमधली वचने वाचून दाखवली आणि वाचायला आपले एक प्रकाशन दिले. त्याने एका रात्रीत ते प्रकाशन वाचून काढले. थोड्याच दिवसांत, त्याच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू झाला, तो सभांना येऊ लागला आणि नंतर त्याचा बाप्तिस्मा झाला.
• एकदा प्रवास करत असताना आपल्या एका बहिणीने तिच्या शेजारी बसलेल्या एका स्त्रीबरोबर बोलायला सुरुवात केली आणि मग तिला साक्ष दिली. प्रवासाच्या शेवटी आपल्या बहिणीने त्या स्त्रीला आपला पत्ता आणि फोन नंबर दिला आणि तिला उत्तेजन दिले, की पुढच्या वेळी तिच्या घरी जर यहोवाचे साक्षीदार आले तर तिने त्यांच्याकडून बायबलचा अभ्यास घ्यावा. अगदी दुसऱ्याच दिवशी दोन साक्षीदार या स्त्रीच्या घरी गेले. या स्त्रीने त्यांच्याबरोबर अभ्यास सुरू केला, लवकरच प्रगती केली, बाप्तिस्मा घेतला आणि स्वतः तीन अभ्यास घेऊ लागली.
• शंभर वर्षांचे एक अंध बंधू वृद्धाश्रमात राहतात. ते नेहमी म्हणत राहतात: “आपल्याला देवाचं राज्य हवं आहे.” हे देवाचं राज्य म्हणजे नेमकं काय, याविषयी तिथे काम करणाऱ्या अनेक नर्सेसना व रूग्णांना प्रश्न पडतो तेव्हा या बांधवाला त्यांना समजावून सांगायची संधी मिळते. एकदा, तिथे काम करणाऱ्या एका स्त्रीने बांधवाला विचारले, नंदनवनात तुम्ही काय कराल. ते म्हणाले: “नंदनवनात मी पाहू शकेन, चालू शकेन आणि ही माझी चाकांची खुर्ची मी जाळून टाकेन.” बांधवाची दृष्टी गेल्यामुळे, ते या स्त्रीला नियतकालिकातील काही लेख वाचून दाखवायला सांगतात. एकदा, या बांधवाची मुलगी त्यांना भेटायला आली तेव्हा त्या स्त्रीने तिला, मी ती मासिकं वाचायला घरी नेऊ का, असे विचारले. आणि वृद्धाश्रमातल्या एका नर्सने बांधवाच्या मुलीला सांगितले: “आमच्या वृद्धाश्रमाचं नवीन ब्रीदवाक्य आहे: ‘आपल्याला देवाचं राज्य हवं आहे.’”
• एकदा आपली एक बहीण रेस्टॉरंटमध्ये गेली होती. पण रेस्टॉरंट गच्च भरल्यामुळे तिला जागा मिळेपर्यंत थांबून राहावे लागले. ती थांबली होती तेव्हा, जवळच्याच एका टेबलापाशी बसलेल्या वृद्ध मंडळीच्या राजकारणावर गप्पा चालल्या होत्या. त्यातल्या एकाने म्हटले, की सरकार आपल्या समस्या सोडवू शकत नाही. हे ऐकल्याबरोबर आपल्या बहिणीने स्वतःला म्हटलं, ‘साक्ष द्यायची ही चांगली संधी आहे.’ तिने मनातल्या मनात लहानशी प्रार्थना केली आणि ती या वृद्धांजवळ गेली. स्वतःची ओळख करून दिल्यावर तिने त्यांना, मानवजातीच्या समस्यांचे निरसन करणाऱ्या सरकारविषयी अर्थात देवाच्या राज्याविषयी सांगितले आणि तिच्याजवळ असलेले एक माहितीपत्रक दिले. तेवढ्यात रेस्टॉरंटचा मालक तिथे आला. बहिणीला वाटले, की आता हा आपल्याला इथून हाकलणार. पण त्याने तसे केले नाही. उलट, तो तिला म्हणाला, की मी मघापासून तुमचं बोलणं ऐकत होतो, मलाही असं माहितीपत्रक पाहिजे. रेस्टॉरंटमध्ये काम करणारी एक स्त्रीसुद्धा हे सर्व ऐकत होती. ती त्यांच्या जवळ आली. तिला रडू आवरले नाही. ही स्त्री पूर्वी बायबलचा अभ्यास करत होती व तिने तो अभ्यास बंद केला होता. पण आता तिला पुन्हा तो सुरू करायचा होता.