“यथाकाळी” मिळणारे आध्यात्मिक अन्न
१. या वेळेच्या खास दिवसीय संमेलनाने तुम्हाला आणि इतरांना कशा प्रकारे मदत केली?
१ आपल्या खास दिवसाच्या संमेलनाला उपस्थित राहिल्यानंतर आपण बहुतेकदा असे म्हणतो: “आजचा कार्यक्रम आपल्याला अगदी वेळेवर मिळाला, नाही का?” एका विभागीय पर्यवेक्षकांनी सांगितले, की संमेलन कार्यक्रम ऐकल्यानंतर त्यांच्या विभागातील काहींनी, क्षेत्र सेवेत आपला भाग वाढवण्याची आपली इच्छा व्यक्त केली. एक प्रवासी पर्यवेक्षक म्हणाले: “आपण कोणत्या दिवसांत जगतोय आणि आपण जीवनात कोणते निर्णय घेतोय, हे अजमावून पाहण्यास आपल्याला या खास दिवसीय संमेलनाने मदत केली.” आणखी एका प्रवासी पर्यवेक्षकांनी म्हटले: “आपले लक्ष सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवरच म्हणजे क्षेत्र सेवेवरच केंद्रित आहे किंवा नाही, हे पडताळून पाहण्यासाठी या संमेलनाने जणू काय आम्हाला गदागदा हलवून जागे केल्यासारखे वाटले, असे काही प्रचारकांनी म्हटले.” खास दिवसीय संमेलनाचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला आहे?
२. पुढील सेवा वर्षादरम्यान होणाऱ्या खास दिवसीय संमेलनात दिल्या जाणाऱ्या भाषणांचे काही विषय कोणते आहेत?
२ येणाऱ्या सेवा वर्षातला कार्यक्रमही तुम्हाला असाच अत्यावश्यक वाटेल. येणाऱ्या खास दिवसीय संमेलनाचा विषय स्तोत्र ११८:८, ९ (पं.र.भा.) वचनावर आधारित आहे: ‘यहोवाच्या ठायी आश्रय घ्या.’ कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या काही भाषणांचे विषय पुढील प्रमाणे आहेत: “संकटकाळी यहोवा आपला आश्रयदुर्ग कसा असतो,” “यहोवाच्या पंखांखाली आश्रय घेण्यास इतरांनाही मदत करा,” “आश्रय देण्याच्या बाबतीत यहोवाचे अनुकरण करा,” “तरुणांनो, यहोवावर भरवसा टाका” आणि “आपले आध्यात्मिक नंदनवन—आश्रितांसाठी यहोवाची एक तरतूद.”
३. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने आपल्याला पुरेपूर फायदा कसा मिळू शकतो?
३ कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ व्हावा म्हणून: तारीख घोषित केल्याबरोबर संमेलनाला उपस्थित राहण्याच्या योजना बनवा आणि आपल्या बायबल विद्यार्थ्यांनाही तुमच्याबरोबर येण्याचे आमंत्रण द्या. “धीराने फळ देत” राहण्यासाठी आपण, जे ऐकतो ते आपल्या मनात जतन करून ठेवले पाहिजे. (लूक ८:१५) त्यासाठी, कार्यक्रम सुरू असतो तेव्हा लक्ष देऊन ऐका, मुख्य मुद्दे व काही विशिष्ट सूचना दिल्या जातात त्या आपल्या वहीत टिपून घ्या आणि नंतर त्याचा आपल्या जीवनात व सेवेत अवलंब करा. संमेलनानंतर, कुटुंब या नात्याने झालेल्या कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी वेळ काढा आणि कार्यक्रमाद्वारे दिलेल्या माहितीचा तुम्ही व तुमचे कुटुंब कोणत्या विशिष्ट मार्गांनी अवलंब करू शकते त्यावर चर्चा करा.
४. येणाऱ्या एक दिवसीय संमेलनाची आपण आतुरतेने वाट का पाहिली पाहिजे?
४ तोंडाला पाणी सुटेल अशा चविष्ट व पौष्टिक भोजनाप्रमाणे या वर्षाचा खास संमेलन दिवसीय कार्यक्रम खूप प्रेमळपणे व विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे. तेव्हा, या संमेलनाला उपस्थित राहण्याकरता तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवाचे आशीर्वाद राहोत आणि ख्रिस्ती सेवकांचे आध्यात्मिकरीत्या पोषण व्हावे म्हणून “यथाकाळी” तयार करण्यात आलेल्या आध्यात्मिक अन्नाचा तुम्हाला फायदा होवो!—मत्त. २४:४५.