नव्या खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी शक्य तितक्या दूरपर्यंत सुवार्तेचा प्रसार करण्याकरता अतिशय आवेशाने कार्य केले. (प्रे. कृत्ये १:८; कलस्सै. १:२३) २००७ सालच्या खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम ‘वचनात गढून जा’ या विषयावर आधारित असेल व यात आपल्याला सुरुवातीच्या ख्रिश्चनांच्या उत्तम आदर्शाचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन दिले जाईल.—प्रे. कृत्ये १८:५.
देवाच्या वचनाविषयी सांगताना दावीद राजाने म्हटले: “परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो.” (स्तो. १९:७) शास्त्रवचने ‘सुधारणुकीकरता’ किती मोलवान ठरू शकतात याच विषयावर २००७ सालचा खास संमेलन दिवसाचा विचारपूर्वक तयार केलेला कार्यक्रम भर देईल. तसेच देवाच्या वचनाचा उपयोग करण्याचे व काळाची निकड लक्षात घेऊन त्याचा प्रचार करण्याचेही आपल्याला या संमेलनात प्रोत्साहन दिले जाईल. (२ तीम. ३:१६, १७) दररोजच्या जीवनात बायबलच्या तत्त्वांचे पालन केल्याने आपल्याला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो व निरनिराळे धोके आपण कसे टाळू शकतो याविषयीही या नव्या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाईल. तसेच, तरुणांना व नव्या व्यक्तींना आध्यात्मिक प्रगती करण्यास देवाच्या वचनाच्या साहाय्याने आपण कशाप्रकारे मदत करू शकतो यावरही प्रकाश टाकला जाईल.
संमेलनाला अगदी सुरुवातीपासून हजर असण्याकरता निश्चित योजना आखा, आणि कार्यक्रमाकडे पूर्ण लक्ष द्या. वैयक्तिक जीवनात उपयोगात आणण्याजोगे मुद्दे टिपून घ्या. मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता दाखवा आणि शिकलेल्या गोष्टींचा व्यवहारात कशाप्रकारे उपयोग करता येईल यावर मनन करा.
हा खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम निश्चितच देवाच्या वचनाबद्दल आपली कदर वाढवेल. तसेच, राज्याच्या सुवार्तेचे प्रचार कार्य आवेशाने करत राहण्याची व इतरांनाही असे करण्यास मदत करण्याची आपल्याला या संमेलनात आठवण करून दिली जाईल. तेव्हा यहोवाने पुरवलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा कोणताही भाग न चुकवता या संमेलनाचा पूर्ण लाभ करून घेण्याचा आपण निर्धार करू या!—यश. ३०:२०ख, २१.