मी सेवा कशी करत आहे —नावापुरती की पूर्ण मनाने?
१. एका विश्वासू ख्रिस्ती बांधवाला अथवा बहिणीला कोणती चिंता वाटेल?
१ तुम्ही स्वतःला कधी हा प्रश्न विचारला आहे का? वाढत्या वयामुळे, आजारपणामुळे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे कदाचित तुम्ही सेवेमध्ये पहिल्यासारखा भाग घेत नाही. तीन लेकरांची आई असलेल्या एका बहिणीने लिहिले, की कुटुंबाची काळजी घेण्यात तिचा इतका वेळ आणि शक्ती खर्च होते, की सेवेमध्ये तिला जास्त भाग घेता येत नाही आणि यामुळे तिचे मन तिला खाते. तेव्हा, ख्रिस्ती सेवा व इतर गोष्टी यांमध्ये आपण संतुलन कशा प्रकारे राखू शकतो?
२. यहोवा आपल्याकडून काय इच्छितो?
२ यहोवा आपल्याकडून काय इच्छितो: आपल्या सर्वांनाच सेवेमध्ये जास्तीत जास्त भाग घ्यावासा वाटतो. पण, आपल्याला तसे वाटणे आणि वास्तविकतेत आपल्याला तसे करता येणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण, आपल्याला सेवेमध्ये अधिक करावेसे वाटते, यावरून दिसते, की आपण नावापुरती सेवा करण्यात समाधान मानत नाही. यहोवाला आपल्या मर्यादा ठाऊक आहेत आणि आपण जितके करू शकतो त्यापेक्षा जास्त तो आपल्याकडून अपेक्षा करत नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. (स्तो. १०३:१३, १४) तो आपल्याकडून काय इच्छितो? आपण जी सेवा करतो ती दर्जेदार असावी व पूर्ण मनाने केलेली असावी, अशी तो अपेक्षा करतो.—कलस्सै. ३:२३.
३. सेवेमध्ये आपण करत असलेल्या प्रयत्नांची आपण पारख कशी करू शकतो?
३ आपण वास्तविकतेत किती सेवा करू शकतो हे ठरवण्यास काय आपल्याला साहाय्य करू शकेल? आपली परिस्थिती प्रत्यक्षात कशी आहे हे पाहण्यास मदत करावी म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. (स्तो. २६:२) आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे ओळखणारा व आपण सुधारणा करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही हे आपल्याला बिनधास्त सांगू शकणारा एखादा ख्रिस्ती मित्र आपल्याला मदत करू शकतो. (नीति. २७:९) आणि परिस्थिती नेहमी बदलत असते, त्यामुळे आपण वेळोवेळी आपली परिस्थिती पडताळून पाहिली पाहिजे.—इफिस. ५:१०.
४. सेवेविषयी आपल्याला आठवण करून दिल्या जाणाऱ्या बायबल आधारित सूचनांबद्दल आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?
४ सेवेविषयी वारंवार मिळणाऱ्या सूचनांबद्दलचा दृष्टिकोन: शर्यतीत धावपट्टूंचा उत्साह वाढवण्यासाठी शर्यत पाहणारे लोक त्यांना उत्तेजन देत असतात. धावपट्टूंना खचवण्यासाठी किंवा निरुत्साहीत करण्यासाठी नव्हे तर त्यांनी अंतिम-रेषा गाठावी म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच, ‘तातडीने वचनाची घोषणा’ करण्यासाठी आपल्या सभांमध्ये व प्रकाशनांमध्ये मिळणारे बायबल आधारित प्रोत्साहन व आठवण करून देणाऱ्या सूचना, आपण करत असलेले प्रयत्न पुरेसे नाहीत हे दाखवण्यासाठी नसतात तर आपल्याला उत्तेजन देण्यासाठी असतात. (२ तीम. ४:२) आपण दर्जेदार सेवा करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर ही खातरी बाळगू शकतो, की आपण दाखवत असलेले ‘प्रेम’ व आपण करत असलेली ‘कार्ये’ यहोवा कधीही विसरणार नाही.—इब्री ६:१०.