प्रांतीय अधिवेशने —आनंदाने उपासना करण्याचा समय
१ योसेफ, मरीया, त्यांची मुले आणि इतर जण नित्य-नियमाने जेरुसलेमला वार्षिक सण साजरा करण्यासाठी जात असत. यासाठी ते, त्यांच्या दररोजच्या चिंता मागे सोडून जीवनातील अधिक महत्त्वाच्या आध्यात्मिक गोष्टींवर आपले लक्ष एकाग्र करत असत. या सणांदरम्यान त्यांना, यहोवाच्या चांगुलपणावर मनन करण्याची तसेच नियमशास्त्रावर विचार-विनिमय करण्याची संधी मिळत असे. आपल्या आगामी अधिवेशनांमुळे आपल्याला देखील, यहोवाची आनंदाने उपासना करण्याची संधी मिळणार आहे.
२ आगाऊ तयारी करणे आवश्यक: येशूच्या कुटुंबाला नासरेथ ते जेरुसलेम असा दोन्हीकडील सुमारे २०० किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. येशूला तेव्हा किती भावंडे होती हे आपल्याला माहीत नाही. पण, योसेफ आणि मरीयेला आपल्या सर्व मुलांना सोबत नेण्यासाठी बरीच आगाऊ तयारी व मेहनत करावी लागत असावी, याची आपण कल्पना करू शकतो. येणाऱ्या अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहण्याकरता तुम्ही आवश्यक ती तयारी केली आहे का? सुट्ट्यांसाठी तुम्हाला, तुमच्या कंपनीच्या मालकांशी किंवा तुमच्या मुलांच्या शाळेतील शिक्षकांशी बोलावे लागेल. तुम्ही जर हॉटेलमध्ये राहणार असाल तर तुम्ही रूमचे बुकींग केले आहे का? मंडळीतल्या एखाद्या गरजू भावाला अथवा बहिणीला अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता काही मदत हवी असेल तर ती देण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकाल का?—१ योहा. ३:१७, १८.
३ उत्तेजनदायक सहवास: यहुदी सणांना जाणाऱ्या इस्राएली लोकांना सहउपासकांबरोबर उत्तेजनदायक सहवास राखण्याची किती उत्तम संधी मिळत असेल! आपल्या जुन्या मित्रांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला येशूचे कुटुंब नक्कीच आतुर होत असेल. शिवाय, जेरुसलेमधील मंदिरात जमलेल्या किंवा जेरुसलेमला जाऊन-येऊन करणाऱ्या यहुदी व गैरयहुदी यहोवाच्या उपासकांपैकी त्यांनी नवीन मित्र बनवले असतील.
४ प्रांतीय अधिवेशनांमध्ये भाषणांद्वारे सादर केली जाणारी माहिती छापील रूपातही आपल्याला दिली जाऊ शकते. पण विश्वासू व बुद्धिमान दास प्रांतीय अधिवेशनांची योजना करतो जेणेकरून आपण तेथे एकत्र जमून एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो. (इब्री १०:२४, २५) यास्तव, कार्यक्रमाचे अध्यक्ष संगीताची घोषणा करून सर्वांना आपापल्या जागी बसण्याची सूचना देण्याआधी, बंधूभगिनींना भेटता यावे म्हणून अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी सकाळी लवकर या. मध्यांतरात जेवणासाठी अधिवेशन संकुल सोडून बाहेर जाण्याऐवजी सोबत साधेच जेवण आणा जेणेकरून तुम्हाला आपल्या अवती-भोवती असलेल्या बंधूभगिनींबरोबर बोलता येईल. आपला संयुक्त ख्रिस्ती समाज ही यहोवाकडून आपल्याला मिळालेली देणगी आहे. त्यामुळे या बंधुसमाजाची आपण कदर केली पाहिजे.—मीखा २:१२.
५ शिकून घेण्याची वेळ: येशूने लहानपणापासूनच या वार्षिक सणांमध्ये, आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल शिकण्याच्या संधीचा फायदा घेतला. (लूक २:४१-४९) अधिवेशनामध्ये सादर केल्या जाणाऱ्या भाषणांतून पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपण आणि आपले कुटुंब काय करू शकते? कार्यक्रमाच्या वेळी आपल्या जागेवर बसून राहा आणि विनाकारण बोलू नका. मोबाईल फोन, पेजर किंवा अशा प्रकारची इतर उपकरणे तुमच्याजवळ असतील तर, कार्यक्रमाच्या वेळी तुम्हाला आणि इतरांना त्यांचा त्रास होणार नाही याची खातरी करा. वक्ता भाषण देत असतो तेव्हा त्याच्याकडे बघा आणि थोडक्यात मुद्दे लिहून घ्या. कुटुंब मिळून एकत्रच बसा जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुलांवर लक्ष ठेवता येईल. आणि संध्याकाळी, संपूर्ण दिवसभरात तुम्हाला आवडलेल्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी वेळ काढा.
६ आपले कपडे आणि आपले स्वरूप: रस्त्यावरून जाणारे विदेशी व्यापारी, सणांना जाणाऱ्या व तेथून पुन्हा घरी परतणाऱ्या येशूच्या कुटुंबाला आणि इतर यहुदी उपासकांना सहज ओळखू शकत होते. का? कारण त्यांच्या वस्त्रांच्या टोकांना गोंडे लावलेले असायचे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर निळी फीत लावलेली असायची. (गण. १५:३७-४१) आज आपण विशिष्ट प्रकारचे कपडे घालत नसलो तरी, आपला पेहराव सभ्य व स्वच्छ असतो हे सर्वांना माहीत आहे. अधिवेशन असलेल्या शहरात, अधिवेशनाला जाता-येता आपण आपल्या स्वरूपाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रम झाल्यावर आपण कपडे बदलतो तेव्हाही आपले कपडे, यहोवाच्या नावाचा आदर होईल असेच असावेत आणि आपण अधिवेशनाचा बॅजही लावला पाहिजे. अशा प्रकारे आपण इतरांपासून वेगळे दिसू आणि पाहणाऱ्यांवर चांगली छाप पाडू शकू.
७ स्वयंसेवकांची गरज: अधिवेशनाचा कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी पुष्कळ स्वयंसेवकांची गरज असते. तुम्ही स्वयंसेवक म्हणून सेवा करू शकाल का? (स्तो. ११०:३) अधिवेशनांमध्ये केले जाणारे कोणत्याही स्वरुपाचे काम ही पवित्र सेवा आहे आणि यामुळे आपण इतरांना चांगली साक्ष देऊ शकतो. अधिवेशन झालेले सभागृह स्वच्छ करत असलेल्या स्वयंसेवकांना पाहून प्रभावीत झालेल्या त्या सभागृहाच्या मॅनेजरने असे लिहिले: “या सभागृहामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांपैकी मला तुमचा कार्यक्रम जास्त आवडला. यहोवाचे साक्षीदार खास लोक आहेत, आणि ते भाड्याने घेत असलेले सभागृह, कार्यक्रम संपल्यानंतर पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ करून देतात अशी त्यांची ख्याती आहे, हे मी नेहमी ऐकले होते. तुम्ही आणि तुमच्या संघटनेने सर्वात विनम्र लोकांच्या मदतीने हे ठिकाण, समाजासाठी एक उत्तम ठिकाण बनवले आहे. अशा लोकांबरोबर ओळख करून घेण्याचा सुयोग आम्हाला लाभला.”
८ साक्ष देण्याच्या संधी: अधिवेशन होणार असलेल्या शहरातील पुष्कळ लोक, शालीन कपडे घातलेल्या, बॅज कार्ड लावलेल्या लोकांना पाहतील तेव्हा त्यांच्या मनात खूप प्रश्न येतील. आणि आपल्याला मग अधिवेशनाबद्दल त्यांना सांगण्याची संधी मिळू शकेल. एकदा, एका चार वर्षांच्या मुलाने अधिवेशन संपल्यानंतर, रेस्टॉरंटमधील एका महिला वेटरला अधिवेशनात प्रकाशित झालेले प्रकाशन दाखवले. यामुळे त्या मुलाच्या आईवडिलांना, त्या महिलेला अधिवेशनाचे आमंत्रण देण्याची संधी मिळाली.
९ चांगली कृत्ये: प्रांतीय अधिवेशनांच्या वेळी पुष्कळ लोकांना आपली ‘चांगली कृत्ये’ दिसून येतात. (१ तीम ५:२५) उत्तर भारतात, अनेक वर्षांपासून आपली अधिवेशने भरवली जातात अशा एका शहरातील एका हॉटेल मालकाने कबूल केले: “आम्हाला तुमचं वर्तन फार आवडतं, कारण इतर लोकांप्रमाणे आम्हाला तुमच्या लोकांमध्ये कोणीही असा दिसत नाही जो जागोजागी थुंकतो, विनाकारण बाहेर फिरतो किंवा घाण करतो.” दुसऱ्या एका शहरात, इतर लोकांमुळे व कार्यक्रम करणाऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासांबद्दल सांगितल्यानंतर आणखी एका हॉटेलच्या मालकाने, आपल्या बांधवांनी हॉटेलमध्ये राहताना दाखवलेले सहकार्य, धीर यांबद्दल त्यांची स्तुती केली. तो म्हणाला: “आमच्याकडे येणारे सर्वच पाहुणे यहोवाचे साक्षीदार असले तर किती बरं होईल!” आपल्या बांधवांच्या उत्तम आचरणामुळेच हे असे व अशाच प्रकारचे इतर प्रशंसोद्गार लोकांच्या तोंडून निघतात व या सर्वामुळे आपला देव यहोवा याला किती आनंद होत असेल, याची कल्पना करा!
१० प्राचीन काळी होणारे सण, हे आनंदाचे प्रसंग होते आणि यहोवाबद्दल आणखी शिकू इच्छिणारे यहुदी या सणांची आतुरतेने वाट पाहत असत. (अनु. १६:१५) या सणांना उपस्थित राहता यावे व त्यांतून पुरेपूर लाभ घेता यावा म्हणून येशूचे कुटुंब कोणतेही त्याग करायला तयार होते. येशूच्या कुटुंबाप्रमाणेच आपल्यालाही आपल्या प्रांतीय अधिवेशांची कदर वाटते. ही अधिवेशने आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याकडून मिळणाऱ्या देणगीप्रमाणे आहेत. (याको. १:१७) यहोवाची उपासना आनंदाने करण्यासाठी या वार्षिक संधीची तयारी करण्याची हीच वेळ आहे!
[अभ्यासाचे प्रश्न]
१. इस्राएलमधील सण आणि आपली आधुनिक प्रांतीय अधिवेशने यांत कोणत्या साम्यता आहेत?
२. आगामी प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता तुम्ही कोणकोणती तयारी केली पाहिजे?
३. यहुदी सणांमुळे, इस्त्राएली लोकांना कोणकोणत्या संधी मिळाल्या असाव्यात?
४. आपण आपल्या संयुक्त ख्रिस्ती बंधुसमाजाची कदर करतो हे आपण कसे दाखवून देऊ?
५. अधिवेशन कार्यक्रमातून पुरेपूर फायदा घेता यावा म्हणून आपण काय काय करू शकतो?
६. आपले कपडे आणि स्वरूप यांच्याबाबतीत आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
७. अधिवेशनाच्या वेळी आपण स्वयंसेवक म्हणून सेवा का केली पाहिजे?
८. अधिवेशन होणार असलेल्या शहरात आपल्याला साक्ष देण्याच्या कोणकोणत्या संधी मिळू शकतील?
९. आपल्या बांधवांचे उत्तम आचरण पाहून काही हॉटेल मालकांनी कोणते प्रशंसोद्गार काढले?
१०. यहोवाविषयी शिकून घेण्यासाठी येशूच्या कुटुंबाने दाखवलेल्या मनोवृत्तीचे आज आपणही कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?
[५, ६ पानांवरील चौकट]
प्रांतीय अधिवेशनासाठी लक्षात ठेवायच्या सूचना
◼ कार्यक्रमाची वेळ: तिन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९:२० वाजता सुरू होईल. सभागृहाचे दरवाजे सकाळी ८:०० वाजता उघडले जातील. सुरुवातीचे संगीत सुरू होते तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीने होईल. कार्यक्रम, शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी ४:५५ वाजता आणि रविवारी ३:४० वाजता संपेल.
◼ पार्किंग: पार्किंगची जागा सभागृहाच्या व्यवस्थापनाने आपल्या ताब्यात दिली असल्यास, गाड्या जसजशा येतील तसतसे त्यांना पार्किंगसाठी जागा दिली जाईल. पार्किंगची जागा सहसा कमी पडत असल्यामुळे, होईल तितके कारपूलींग (प्रत्येकाने आपआपल्या गाड्या आणण्यापेक्षा दुसऱ्याच्या गाडीत जागा असल्यास एकाच गाडीने प्रवास) करावे.
◼ बसण्याची व्यवस्था: तुमच्यासोबत एकाच कारमधून आलेल्या किंवा एकाच घरात तुमच्याबरोबर राहणाऱ्यांसाठी तसेच बायबल अभ्यास घेत असलेल्यांसाठीच आसने राखून ठेवली जाऊ शकतात.—१ करिंथ. १३:५.
◼ दुपारचे भोजन: दुपारच्या जेवणासाठी अधिवेशनाचे ठिकाण सोडून बाहेर जाण्याऐवजी कृपया सोबत साधे जेवण आणा. जेवण लहानशा डब्यात आणले तर ते खुर्चीखाली ठेवता येऊ शकेल. जेवणाचे मोठमोठे डब्बे व काचेची भांडी अधिवेशनाच्या ठिकाणी आणण्यास मनाई आहे. अधिवेशन होणाऱ्या ठिकाणी भोजन किंवा अल्पोपहार दिला जाणार नाही.
◼ दान: जगभरात चाललेल्या कार्यासाठी, आपल्या राज्य सभागृहात किंवा अधिवेशनात असलेल्या दानपेट्यांमध्ये स्वेच्छेने दान टाकून आपण अधिवेशनाच्या व्यवस्थेकरता कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अधिवेशनात दिलेले चेक “द वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय केले पाहिजे.
◼ अपघात आणि आपत्कालीन प्रसंग: अधिवेशनाच्या ठिकाणी आणीबाणीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास कृपया जवळच्या अटेंडंटला कळवावे. तो लगेच प्रथमोपचार विभागाशी संपर्क साधेल. आमचा प्रशिक्षित वैद्यकीय विभाग परिस्थिती किती गंभीर आहे तिचा अंदाज घेतल्यावर त्यानुसार मदत देईल.
◼ पादत्राणे: उचित पादत्राणे न घातल्यामुळे दर वर्षी अनेक अपघात होतात. अधिवेशनगृहात, पायऱ्यांवरून किंवा जाळी असलेल्या मार्गावर सुरक्षितपणे चालता यावे म्हणून योग्य व आपल्याच मापाची पादत्राणे घालणे उचित असेल.
◼ कर्णबधिर: पुढे सांगितलेल्या ठिकाणी सांकेतिक भाषेत कार्यक्रम सादर केला जाईल: बेंगळूरू (इंग्रजी); कोइम्बतूर (तामीळ); कोची-२ (मल्याळम); आणि पुणे-चिंचवड (इंग्रजी).
◼ रेकॉर्डिंग: रेकॉर्डिंगची उपकरणे अधिवेशनाच्या इलेक्ट्रिकल किंवा साऊंड सिस्टमशी जोडू नयेत. तुम्हाला ती वापरायची असतील तर इतरांना त्यांचा त्रास होणार नाही अशा प्रकारे वापरावीत.
◼ बाबागाड्या आणि आराम खुर्च्या: अधिवेशनाच्या ठिकाणी बाबागाड्या आणि आराम खुर्च्या आणण्याची परवानगी नाही. पण, बाळांसाठी असलेल्या खास (चाईल्ड-सेफ्टी) सीट्स, आईवडील आपल्या शेजारच्या खुर्चीवर ठेवू शकतात.
◼ अत्तरे: बहुतेक अधिवेशने बंद ठिकाणी होत असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. त्यामुळे, अशा ठिकाणी उग्र वासाची अत्तरे, कोलोन व परफ्यूम वापरण्याचे टाळून, ज्यांना श्वसनाचे व श्वसनसंबंधित इतर विकार असल्यामुळे या गोष्टींचा त्रास होतो त्यांच्याप्रती आपण प्रेम दाखवतो.—१ करिंथ. १०:२४.
◼ पुनर्भेटींचे फॉर्म्स: अधिवेशनाच्या वेळी आपण अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर जर कोणी आस्था दाखवली तर त्या व्यक्तीविषयीची माहिती देण्याकरता प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा उपयोग केला पाहिजे. प्रचारकांनी अधिवेशनाला येताना एक किंवा दोन पुनर्भेटींचे फॉर्म्स सोबत आणावेत. पूर्ण भरलेले फॉर्म एकतर पुस्तक विभागाला दिले जाऊ शकतात किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतल्या सचिवांना दिले जाऊ शकतात.—आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००९, पृ. ३ पाहा.
◼ रेस्टॉरंट: हॉटेल्समध्ये व रेस्टॉरंट्समध्ये गेल्यास, आपल्या उत्तम वागणुकीद्वारे यहोवाच्या नावाला गौरव आणा. अनेक ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेनुसार बक्षिसी देण्याची प्रथा आहे.
◼ हॉटेल्स: (१) तुम्हाला जितक्या खोल्या लागणार आहेत त्याच्यापेक्षा अधिक खोल्यांचे कृपया आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका खोलीत राहण्याची परवानगी आहे त्यापेक्षा अधिक लोकांना खोलीत राहायला घेऊ नका. (२) तुम्हाला जर तुमचे आरक्षण रद्द करायचे असेल तर कृपया लवकरात लवकर हॉटेलला कळवा. (३) तुम्हाला लागेल तेव्हाच सामान वाहण्याची ट्रॉली (लगेज कार्ट) घ्या आणि काम झाल्यावर लगेच परत करा म्हणजे इतरांची गैरसोय होणार नाही. (४) स्वयंपाक करण्याची परवानगी नसलेल्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका. (५) प्रत्येक दिवशी हाऊसकीपरला बक्षिसी द्या. (६) हॉटेलमध्ये पाहुण्यांकरता नाश्ता, कॉफी किंवा बर्फ यांसारख्या मोफत दिल्या जाणाऱ्या सोयींचा गैरफायदा घेऊ नका. या सोयी फक्त हॉटेलमध्ये राहणाऱ्यांच्या वापराकरता असतात. (७) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वागताना सर्ववेळी आत्म्याचे फळ प्रदर्शित करा. त्यांना अनेक पाहुण्यांकडे लक्ष द्यावे लागते. आपण त्यांच्याशी दयाळुपणे, सहनशीलतेने व समजंसपणे वागलो तर त्यांना ते आवडेल. (८) सुचवलेल्या हॉटेलांच्या यादीत दाखवलेले खोल्यांचे भाडे हे दर दिवसाचे भाडे आहे, पण यात टॅक्सचा समावेश नाही. जर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी, तुम्ही न मागवलेल्या किंवा न वापरलेल्या गोष्टींचे अतिरिक्त पैसे मागितल्यास ते देऊ नका आणि लवकरात लवकर अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा. (९) जर तुमच्या हॉटेलच्या खोलीसंबंधी काही समस्या निर्माण झाली तर रूमिंग विभागाला अधिवेशनात याविषयी सांगा.
◼ स्वयंसेवा विभाग: अधिवेशनात आवश्यक असलेले काम करण्यासाठी स्वेच्छेने पुढे आल्यामुळे, अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने मिळणारा आनंद द्विगुणीत होतो. (प्रे. कृत्ये २०:३५) काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी अधिवेशनातील स्वयंसेवा विभागाशी संपर्क साधावा. वयाने १६ पेक्षा कमी असलेली मुले देखील पालकांच्या किंवा पालकांची अनुमती असलेल्या एखाद्या प्रौढ भावाच्या अथवा बहिणीच्या देखरेखीखाली कामाला हातभार लावू शकतात.