आध्यात्मिक मेजवानीचा आस्वाद घेण्यास तुम्ही तयार आहात का?
१. एखाद्या मेजवानीआधी कोणकोणती तयारी केली जाते?
१ मेजवानीसाठी खूप तयारी करावी लागते. अन्नसामग्री आणावी लागते, चांगले चविष्ट जेवण तयार करावे लागते, ते आकर्षक पद्धतीने सजवावे लागते. जेवण कसे वाढले जाईल तेही ठरवावे लागते. शिवाय मेजवानी ज्या ठिकाणी होणार आहे ते ठिकाणही नीट सजवावे लागते. आणि पाहुण्यांना देखील तयारी करावी लागते. ते जर लांबचा प्रवास करून येणार असतील तर त्यांना आणखीनच तयारी करावी लागते. अशा प्रकारे मेजवानीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण, आपल्या कुटुंबाबरोबर व मित्रांबरोबर मिळून चवदार, पोषक अन्नाचा आस्वाद घेण्यात जो आनंद मिळतो त्यामुळे या श्रमाचा आपल्याला विसर पडतो. लवकरच जगभरातील यहोवाचे साक्षीदार लहान मोठ्या समुहात एकत्र येऊन एका आध्यात्मिक मेजवानीचा, “जागृत राहा!” या प्रांतीय अधिवेशनाचा आनंद घेणार आहेत. अधिवेशनाचा कार्यक्रम तयार करण्याचे काम खूप आधीपासूनच सुरू झाले आहे. आपल्या सर्वांना या मेजवानीचे निमंत्रण आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी व त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आपल्यालाही वैयक्तिक रीत्या तयारी करणे गरजेचे आहे.—नीति. २१:५.
२. संपूर्ण आध्यात्मिक मेजवानीला उपस्थित राहण्याकरता काय करण्याची गरज आहे?
२ पुरेपूर फायदा घ्या: संपूर्ण आध्यात्मिक मेजवानीदरम्यान उपस्थित राहता यावे म्हणून तुम्ही योजना केल्या आहेत का? तुम्ही या अधिवेशनातील सगळ्या कार्यक्रमांना अगदी पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहात हे कदाचित तुम्हाला तुमच्या मालकांना सांगावे लागेल. प्रवासाची व राहण्याची व्यवस्था तुम्ही केली आहे का? वयस्क किंवा आजारी असणाऱ्या किंवा ज्यांना मदतीची गरज आहे अशांकडे वडिलांनी लक्ष दिले पाहिजे.—यिर्म. २३:४; गलती. ६:१०.
३. आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचे आपल्याला जर आमंत्रण नसेल तर आपण तिथे का जाऊ नये?
३ काही देशांत आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरणार आहेत. काही ठराविक मंडळ्यांना व परदेशातील बांधवाना या अधिवेशनांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. सभागृहात किती लोक बसू शकतात व हॉटेलमध्ये किती रूम उपलब्ध आहेत हे पाहूनच शाखा कार्यालयाने त्यांना आमंत्रित केले आहे. आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचे ज्यांना आमंत्रण मिळाले नाही असे प्रचारक जर तिथे गेले तर उगीचच तेथे गर्दी होईल.
४. प्रत्येक दिवशी कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठी तयार राहायला कोणत्या सूचना आपल्याला मदत करतील?
४ अधिवेशनाच्या ठिकाणी प्रत्येक दिवशी लवकर पोचून कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी बसायची जागा शोधण्याची योजना करा. कार्यक्रम सुरू होण्याआधी काही मिनिटे छापील कार्यक्रमावरून नजर फिरवा. यामुळे सादर केल्या जाणाऱ्या माहितीसाठी तुमचे हृदय तयार करायला तुम्हाला मदत होईल. (एज्रा ७:१०) कार्यक्रम सुरू करणारा बांधव जेव्हा संगीत ऐकण्यास आमंत्रित करेल तेव्हा त्या संगीताचा आनंद घ्या व सुरुवातीच्या गीत व प्रार्थनेसाठी तयार राहा.
५. कार्यक्रमापासून आपल्या कुटुंबाला पुरेपूर फायदा कसा होऊ शकतो?
५ अधिवेशनादरम्यान कुटुंबातील सर्वच सदस्य जर एकत्र बसले तर आपली मुले कार्यक्रम नीट ऐकत आहेत की नाही यावर पालक लक्ष ठेऊ शकतात. (अनु. ३१:१२) शास्त्रवचने वाचली जातात तेव्हा सर्वांनी आपापल्या बायबलमधून ती वचने वाचावीत. लक्षपूर्वक ऐकण्यासाठी तुम्ही छोट्या छोट्या नोट्स घेऊ शकता. नंतर या नोट्समुळे भाषणातील मुख्य मुद्दे आठवायला तुम्हाला मदत मिळेल. कार्यक्रमादरम्यान विनाकारण बोलण्याचा व आपल्या जागेवरून उठण्याचा मोह टाळा. तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर त्यामुळे तुमचे किंवा इतरांचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमानंतर तुम्हाला कार्यक्रमातील कोणती गोष्ट आवडली याबद्दल तुम्ही इतरांशी चर्चा करू शकता.
६. आपल्या अधिवेशनाचा उल्लेखनीय पैलू कोणता आहे व आपण त्याचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकतो?
६ प्रांतीय अधिवेशनादरम्यान आपल्याला आपल्या बंधुभगिनींसोबत जगात कोठेही आढळणार नाही असे अनोखे बंधन अनुभवायची संधी मिळते. (स्तो. १३३:१-३; मार्क १०:२९, ३०) दुपारच्या जेवणाच्या वेळी आपल्या शेजारी बसलेल्यांशी ओळख करून घ्या. हलके भोजन आणल्याचा हा फायदा होतो. बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण्यात वेळ घालवण्यापेक्षा अधिवेशनाच्या ठिकाणीच आपण जेवू शकतो. एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी या संधीचा उपयोग करायला विसरू नका.—रोम. १:११, १२.
७. अधिवेशनात आपण जे कपडे घालणार आहोत त्याबद्दल आधीपासूनच विचार करणे गरजेचे का आहे?
७ पेहराव: यहोवाने इस्राएली लोकांना त्यांच्या वस्त्रांच्या टोकांना गोंडे लावण्याची व प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर निळे फीत लावण्याची आज्ञा दिली होती, ही एक लक्ष देण्याजोगी गोष्ट आहे. (गण. १५:३७-४१) यहोवाच्या उपासनेसाठी निवडलेले असे वेगळे लोक ते आहेत याचे हे चिन्ह होते. आज अधिवेशनात जेव्हा आपण शालीन व नीटनेटका पेहराव घालतो तेव्हा जगापासून आपण वेगळे असल्याचे दिसून येते. आपण कार्यक्रमानंतर बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा आपल्याला पाहणाऱ्या लोकांना यामुळे जबरदस्त साक्ष मिळते. त्यामुळे तुम्ही कोणते कपडे घालणार आहात यावर आधीपासूनच काळजीपूर्वक विचार करा.
८. सीट्स राखून ठेवण्याच्या बाबतीत बायबलमधील कोणती तत्त्वे आपण लक्षात ठेवली पाहिजे?
८ कार्यांतून प्रेम प्रदर्शित करा: असे पाहण्यात आले आहे की काही बांधवांना आपल्या मित्रांसाठी व नातेवाईकांसाठी सभागृहात गरजेपेक्षा जास्त सीट्स राखून ठेवण्याची सवय झाली आहे. काहींनी अटेंडंट्सना सहकार्य करण्यास नकार दिला आहे. काही जण तर, ख्रिश्चनांना शोभणार नाही अशा भाषेत त्यांच्याशी बोलले. निश्चितच, स्वार्थी प्रवृत्तीमुळे, भले करणारे म्हणून आपली ओळख होत नाही. आणि यामुळे यहोवा देवाचीही स्तुती होत नाही. म्हणून, आपण प्रेमळ, सहनशील व सहकार्य करणारे असावे. (गलती. ५:२२, २३, २५) सीट्स राखून ठेवण्याच्या सूचनांचे आपण मनापासून पालन करत आहोत का? आपण असे प्रेम दाखवले पाहिजे जे स्वतःचे “स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथ. १३:५) येशूने म्हटले होते की निःस्वार्थ प्रेम हे आपल्या शिष्यांचे ओळखचिन्ह असेल. (योहा. १३:३५) पण, खूप साऱ्या सीट्स राखून ठेवणे हे आपण ख्रिस्तासारखे प्रेम दाखवत असल्याचे चिन्ह आहे का? ख्रिस्ती प्रेमामुळे आपल्याला ख्रिस्ताच्या या शब्दांनुसार वागण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्त. ७:१२.
९. अधिवेशन असलेल्या शहरात आपण इतरांना साक्ष कशी देऊ शकतो?
९ साक्ष द्या: आधीपासूनच जर पूर्वतयारी केली तर अधिवेशन ज्या शहरात आहे तेथे साक्ष देण्याची आपल्याला संधी मिळू शकते. एक बांधव आपल्या पत्नीसोबत कार्यक्रमानंतर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. तेथे आपले बॅचकार्ड दाखवून त्याने एका वेटरला, “हे कार्ड लावलेल्या अनेक लोकांना तुम्ही पाहिले असेल नाही का?” असा प्रश्न विचारला. त्या वेटरने होय असे उत्तर दिले व म्हटले की हे लोक कोण आहेत हा विचार तो करतच होता. बांधवाने मग त्याला साक्ष दिली व अधिवेशनाला यायचे आमंत्रण दिले.
१०. आपला यजमान, यहोवा याला आपण कृतज्ञता कशी दाखवू शकतो?
१० अधिवेशनात आपले बांधव भाषणे, मुलाखती, प्रात्यक्षिके सादर करत असले, तरी खरेतर आपला स्वर्गीय पिता यहोवा ही वार्षिक आध्यात्मिक मेजवानी आपल्याला प्रेमळपणे देत असतो. (यश. ६५:१३, १४) त्यामुळे अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहून व आपल्यापुढे वाढल्या जाणाऱ्या आध्यात्मिक अन्नाच्या प्रत्येक घासाची चव चाखण्याद्वारे आपण आपल्या यजमानाला कृतज्ञता दाखवतो. तुम्ही तुमची तयारी सुरू केली आहे का?
[४ पानांवरील मथळा]
प्रांतीय अधिवेशनासाठी लक्षात ठेवायच्या सूचना
◼ कार्यक्रमाची वेळ: तिन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९:२० वाजता सुरू होईल. सभागृहाचे दरवाजे सकाळी ८:०० वाजता उघडले जातील. सुरुवातीचे राज्य संगीत सुरू होते तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीने होईल. कार्यक्रम, शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी ४:५५ वाजता आणि रविवारी ४:०० वाजता संपेल.
◼ पार्किंग: पार्किंगची जागा सभागृहाच्या व्यवस्थापनाने आपल्या ताब्यात दिली असल्यास, गाड्या जसजशा येतील तसतसे त्यांना पार्किंगसाठी जागा दिली जाईल. पार्किंगची जागा सहसा कमी पडत असल्यामुळे, होईल तितके कारपूलींग (वेगवेगळ्या गाड्या आणण्यापेक्षा एकाच गाडीने प्रवास) करावे.
◼ आसने राखणे: तुमच्यासोबत एकाच कारमधून आलेल्या किंवा एकाच घरात तुमच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तींसाठीच केवळ आसने राखून ठेवली जावीत.
◼ दुपारचे भोजन: दुपारच्या जेवणासाठी अधिवेशन स्थळ सोडून बाहेर जाण्याऐवजी कृपया सोबत साधे जेवण आणा. जेवनाचे मोठमोठे डब्बे व काचेची भांडी अधिवेशनाच्या ठिकाणी आणण्यास मनाई आहे. अधिवेशन होणाऱ्या ठिकाणी भोजन किंवा अल्पोपहार दिला जाणार नाही.
◼ देणग्या: आपल्या राज्य सभागृहात किंवा अधिवेशनात जगभरात चाललेल्या कार्यासाठी असलेल्या देणग्यांच्या पेट्यांमध्ये देणग्या टाकून आपण अधिवेशनाच्या व्यवस्थेकरता कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अधिवेशनात दिलेले चेक “द वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय केले पाहिजे.
◼ अपघात आणि आपत्कालीन प्रसंग: आणीबाणीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास कृपया जवळच्या अटेंडंटला कळवावे. तो लगेच प्राथमिक उपचार विभागाशी संपर्क साधेल. आमचे प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी परिस्थिती किती गंभीर आहे हे ठरवतील आणि त्यानुसार मदत देतील.
◼ पादत्राणे: अधिवेशनगृहात, पायऱ्यांवरून किंवा जाळी असलेल्या मार्गावर सुरक्षितपणे चालता यावे म्हणून सभ्य व आपल्याच मापाची पादत्राणे घालणे उचित असेल.
◼ कर्णबधिर: पुढे सांगितलेल्या ठिकाणी सांकेतिक भाषेत कार्यक्रम सादर केला जाईल: बेंगळूरू-३ (इंग्रजी); कोइम्बतूर (तामीळ); कोची (मल्याळम); आणि पुणे-चिंचवड (इंग्रजी).
◼ रेकॉर्डिंग: रेकॉर्डिंगची उपकरणे अधिवेशनाच्या इलेक्ट्रिकल किंवा साऊंड सिस्टमशी जोडू नयेत. तुम्हाला ती वापरायचीच असतील तर इतरांना त्याचा त्रास होणार नाही अशा प्रकारे वापरावीत.
◼ बाबागाड्या आणि आराम खुर्च्या: अधिवेशनाच्या ठिकाणी बाबागाड्या आणि आराम खुर्च्या आणण्याची परवानगी नाही. पण, आईवडिलांनी बाळांसाठी असलेल्या चाईल्ड-सेफ्टी सीट्स आपल्या बाजूच्या खुर्चीला अडकवण्यास हरकत नाही.
◼ अत्तरे: काही अधिवेशने बंद ठिकाणी होत असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. त्यामुळे, अशा ठिकाणी आपण खूपच उग्र अत्तरे, कोलोन व परफ्यूम वापरण्याचे टाळून इतरांप्रती दया दाखवतो; ज्यांना श्वसनाचे व श्वसनसंबंधित इतर विकार आहेत त्यांना उग्र स्वरूपाच्या वासांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे.—१ करिंथ. १०:२४.
◼ पुनर्भेटींचे फॉर्म्स: अधिवेशनाच्या वेळी आपण अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर जर कोणी आस्था दाखवली तर त्या व्यक्तीविषयीची माहिती देण्याकरता प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा उपयोग केला पाहिजे. प्रचारकांनी अधिवेशनाला येताना एक किंवा दोन पुनर्भेटींचे फॉर्म्स सोबत आणावेत. पूर्ण भरलेले फॉर्म एकतर बुकरूमला दिले जाऊ शकतात किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतल्या सचिवांना दिले जाऊ शकतात.—आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००५, पृ. ६ पाहा.
◼ रेस्टॉरंट: रेस्टॉरंट्समध्ये गेल्यास, आपल्या उत्तम वागणुकीद्वारे यहोवाच्या नावाला गौरव आणा. अनेक ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी त्यांच्या सेवेनुसार टिप्स देण्याची प्रथा आहे.
◼ हॉटेल्स: (१) तुम्हाला जितक्या खोल्या लागणार आहेत त्याच्यापेक्षा अधिक खोल्यांचे कृपया आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका खोलीत राहण्याची परवानगी आहे त्याच्यापेक्षा अधिक लोकांना खोलीत राहायला घेऊ नका. (२) तुम्हाला जर तुमचे आरक्षण रद्द करायचे असेल तर कृपया हॉटेलला लवकरात लवकर कळवा. (३) तुम्हाला लागेल तेव्हाच कार्ट घ्या आणि काम झाल्यावर लगेच परत द्या म्हणजे इतरांची गैरसोय होणार नाही. (४) स्वयंपाक करण्याची परवानगी नसलेल्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका. (५) प्रत्येक दिवशी हाऊसकीपरला बक्षीस द्या. (६) हॉटेलमध्ये पाहुण्यांकरता नाश्ता, कॉफी किंवा बर्फ यांसारख्या मोफत दिल्या जाणाऱ्या सोयींचा गैरफायदा घेऊ नका. या सोयी फक्त हॉटेलमध्ये असताना वापरण्याकरता असतात. (७) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वागताना सर्ववेळी आत्म्याचे फळ प्रदर्शित करा. त्यांना अनेक पाहुण्यांकडे लक्ष द्यावे लागते. आपण त्यांच्याशी दयाळुपणे, सहनशीलतेने व समजंसपणे वागलो तर त्यांना ते आवडेल. (८) हॉटेलांच्या नावांच्या यादीत दाखवलेले खोल्यांचे भाडे हे दर दिवसाचे भाडे आहे, पण यात टॅक्सचा समावेश नाही. जर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी, तुम्ही न मागवलेल्या किंवा न वापरलेल्या गोष्टींचे अतिरिक्त पैसे मागितल्यास ते देऊ नका आणि लवकरात लवकर अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा. (९) जर तुमच्या हॉटेलच्या खोलीसंबंधी काही समस्या निर्माण झाली तर रूमिंग विभागाला अधिवेशनातच याविषयी सांगा.