देवाने दिलेल्या महान देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे
१. आपण विशेषकरून यहोवाचे कृतज्ञ का आहोत?
१ यहोवाने आपल्याला दिलेल्या अनेक ‘उत्तम देणग्यांपैकी’ त्याच्या प्रिय पुत्राची खंडणी ही सर्वात महान देणगी आहे. (याको. १:१७) या देणगीमुळे आपल्याला खूप आशीर्वाद मिळतात आणि आपल्या पापांबद्दलची क्षमाही मिळते. (इफिस. १:७) याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ आहोत. स्मारकदिनाच्या काळात आपण या मौल्यवान देणगीवर मनन करण्यासाठी खास वेळ काढतो.
२. खंडणीबद्दल आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची कदर कशी वाढवू शकतो?
२ कृतज्ञता वाढवा: कुटुंबातील प्रत्येक सदस्याची कदर वाढवण्याकरता मार्च ३० च्या स्मारक विधीच्या आधी येणाऱ्या आठवड्यांमध्ये आपल्या कौटुंबिक उपासनेच्या सायंकाळी आपण खंडणीबद्दलच्या माहितीवर मनन का करू नये? स्मारक विधीचे खास बायबल वाचन दररोज कुटुंब मिळून करण्याचे आपण ठरवू शकतो. खंडणीमुळे तुम्हाला स्वतःला कसा फायदा झाला आहे व यहोवा, तुम्ही स्वतः, इतर जण व तुमचे भवितव्य यांबद्दलच्या तुमच्या दृष्टिकोनावर कसा परिणाम झाला आहे याचा विचार करा.—स्तो. ७७:१२.
३. आपण आपली कृतज्ञता कशी दाखवू शकतो?
३ कृतज्ञता व्यक्त करण्याचे मार्ग: खंडणीबद्दल आपल्याला असलेल्या कृतज्ञतेमुळे आपण यहोवाबद्दल व आपल्या पुत्राला पाठवण्याद्वारे त्याने दाखवलेल्या प्रेमाबद्दल इतरांना सांगण्यास प्रेरित होतो. (स्तो. १४५:२-७) मार्च, एप्रिल व मे महिन्यांदरम्यान कुटुंबातील कमीत कमी एका सदस्याला तरी साहाय्यक पायनियरिंग करता यावी म्हणून योजना करण्याद्वारे काही कुटुंबे आपली कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्हाला जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही सेवेतील तुमचा सहभाग वाढवण्याद्वारे “वेळेचा सदुपयोग” करू शकता का? (इफिस. ५:१६) आपल्याला असलेल्या कृतज्ञतेमुळे आपण स्मारकदिनाला आपल्यासोबत उपस्थित राहण्यासाठी इतरांनाही मदत करू शकतो. (प्रकटी. २२:१७) आतापासूनच तुम्ही ज्यांची पुनर्भेट घेता त्यांची, तुमच्या बायबल विद्यार्थ्यांची, नातेवाइकांची, तुमच्यासोबत काम करणाऱ्यांची व तुमच्या शेजाऱ्यांची एक यादी बनवा आणि त्यानंतर स्मारक विधीचे आमंत्रण देण्याच्या खास मोहिमेत पूर्ण आवेशाने भाग घ्या.
४. आपण स्मारक विधीच्या काळाचा सुज्ञतेने कसा उपयोग करू शकतो?
४ स्मारक विधीच्या काळादरम्यान यहोवाने मानवजातीसाठी दिलेल्या देणगीबद्दल आपल्याला किती कदर आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळते. या काळाचा आपण खंडणीबद्दल व ‘ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीबद्दल’ आपली कृतज्ञता वाढवण्यासाठी व व्यक्त करण्यासाठी उपयोग करू शकतो.—इफिस. ३:८.