खंडणीचा लाभ करून घेण्यास इतरांना मदत करणे
ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी १२ एप्रिल रोजी साजरा केला जाईल
१. देवाचे लोक खंडणीबद्दल आपली कृतज्ञता कोणत्या एका मार्गाने व्यक्त करतात?
१ “देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुति होवो.” (२ करिंथ. ९:१५) देवाने आपल्या पुत्राच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने आपल्या लोकांबद्दल जो चांगुलपणा व प्रेमदया व्यक्त केली आहे, त्याबद्दल आपली कृतज्ञता वरील शब्दांतून व्यक्त होते. १२ एप्रिल रोजी ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याकरता आपण एकत्र येऊ तेव्हा ही कृतज्ञता अधिकच स्पष्टपणे व्यक्त होईल.
२. यहोवाच्या साक्षीदारांसोबतच आणखी कोण स्मारकविधीला उपस्थित राहतात आणि खंडणीचा लाभ मिळवण्याकरता त्यांना काय करण्याची गरज आहे?
२ यहोवाच्या साक्षीदारांसोबतच, दर वर्षी जवळजवळ १ कोटी लोक स्मारकविधीला उपस्थित राहतात. असे करण्याद्वारे ते दाखवतात की ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल त्यांनाही थोडीबहुत कृतज्ञता आहे. पण खंडणीचा लाभ मिळवण्याकरता त्यांना या बलिदानावर विश्वास ठेवण्याची व त्यानुसार कार्य करण्याची गरज आहे. (योहा. ३:१६, ३६) अशाप्रकारचा विश्वास उत्पन्न करण्यास आपण त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो? यंदाच्या स्मारकविधीच्या काळात आपण त्यांना बायबल अभ्यास करण्याचे व दर आठवड्याच्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन देऊ शकतो. पुढील काही सूचनांवर विचार करा.
३. स्मारकविधीचे निमंत्रण देताना आपण बायबल अभ्यास कसा सुरू करू शकतो?
३ बायबल अभ्यास: सुवार्तेबद्दल आस्था व्यक्त करणाऱ्यांना स्मारकविधीकरता आमंत्रित करताना, बायबल काय शिकवते या पुस्तकातून त्यांच्यासोबत अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे? त्यांना स्मारकविधीविषयी समजावून सांगण्याकरता पृष्ठे २०६-८ वरील “प्रभूचे सांज भोजन—देवाचा आदर करणारा सण” या विषयाचा तुम्ही उपयोग करू शकता. या विषयावर तुम्ही एक किंवा दोन भेंटीदरम्यान चर्चा करू शकता. दारावरच उभे राहून बायबल अभ्यासाच्या रूपात तुम्ही ही चर्चा करू शकता. हा विषय संपल्यावर कदाचित ती व्यक्ती अध्याय ५, “खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट” यावर चर्चा करण्यास तयार होईल. नियमित बायबल अभ्यास सुरू झाल्यावर तुम्ही पुस्तकातील पहिल्या चार अध्यायांचा अभ्यास करू शकता.
४. स्मारकविधीच्या काळात आपण कोणासोबत बायबल अभ्यास सुरू करू शकतो?
४ या पद्धतीने आपण कोणासोबत बायबल अभ्यास सुरू करू शकतो? कदाचित तुमच्यासोबत काम करणारे सहकर्मचारी, शाळासोबती किंवा शेजाऱ्यांपैकी काही व्यक्ती अशाप्रकारे चर्चा करण्यास तयार होतील. बांधव, मंडळीतल्या भगिनींच्या विश्वासात नसलेल्या पतींशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू शकतात. शिवाय तुमचे स्वतःचे नातेवाईक साक्षीदार नसतील तर त्यांच्याकडेही दुर्लक्ष करू नका. तसेच, ज्या व्यक्ती एकेकाळी मंडळीत सक्रिय सहभाग घेत होत्या पण काही कारणाने मागे पडल्या आहेत, अशांनाही स्मारकविधीचे निमंत्रण देण्याचा आपण खास प्रयत्न करावा. (लूक १५:३-७) या सर्व लोकांना खंडणीचा लाभ करून घेण्यास मदत करण्याचा आपण प्रयत्न करू या.
५. बायबल विद्यार्थी व इतर आस्थेवाईक व्यक्तींना आपण मंडळीच्या साप्ताहिक सभांना उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन कशाप्रकारे देऊ शकतो?
५ मंडळीच्या सभा: स्मारकविधी ही बऱ्याच बायबल विद्यार्थ्यांची व इतर आस्थेवाईक व्यक्तींची पहिलीच सभा असते. पण आपण त्यांना मंडळीच्या इतर सभांनाही येण्याचे प्रोत्साहन कशाप्रकारे देऊ शकतो? एप्रिल २००५ आमची राज्य सेवा अंकाच्या पृष्ठ ८ वर पुढील सूचना दिल्या होत्या: “पुढील जाहीर भाषणाचा विषय त्यांना सांगा. टेहळणी बुरूज अभ्यासात कोणत्या लेखाची चर्चा केली जाईल आणि मंडळीच्या पुस्तक अभ्यासात कोणत्या भागावर विचार केला जाईल ते त्यांना दाखवा. ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा यांच्याविषयी त्यांना सांगा. प्रशालेत तुम्हाला एखादी नेमणूक असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर सराव करू शकता. सभांमध्ये सादर केलेले उल्लेखनीय मुद्दे त्यांना सांगा. सभांमध्ये काय काय होत असते त्याची कल्पना देण्यासाठी आपल्या प्रकाशनांतील चित्रांचा उपयोग करा. अगदी पहिल्या अभ्यासापासूनच त्यांना सभेला उपस्थित राहण्याचे उत्तेजन द्या.”
६. प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्तींना आपण कोणत्या दोन मार्गांनी खंडणीचा लाभ करून घेण्यास मदत करू शकतो?
६ प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्तींसोबत नियमित बायबल अभ्यास घेतला जात असेल, आणि अशा व्यक्ती मंडळीच्या सभांना नियमित उपस्थित राहात असतील तर सहसा ते वेगाने आध्यात्मिक प्रगती करतात. तेव्हा आपण त्यांना या सर्व आध्यात्मिक तरतुदींचा उपयोग करण्याचे व देवाचे सर्वात मोठे दान अर्थात खंडणीपासून लाभ करून घेण्याचे प्रोत्साहन देऊ या.