साध्या-सोप्या पद्धतीने शिकवा
१. इतरांना शिकवताना कोणती पद्धत अत्यंत प्रभावशाली ठरते?
१ इतरांना शिकवताना, साधी व सोपी पद्धत अत्यंत प्रभावशाली ठरते. थोर शिक्षक येशू याच्या शिकवण्याच्या पद्धतीचे आपणही अनुकरण केले तर “बोध” करण्यात अर्थात शिकवण्याच्या आपल्या कलेत आपण सुधारणा करू शकू.—२ तीम. ४:२; योहा. १३:१३.
२. सोप्या भाषेत शिकवण्याचा काय अर्थ होतो व अशा प्रकारे शिकवल्याचा काय परिणाम होतो?
२ सोपी भाषा वापरा: डोंगरावरील प्रवचनात आपल्याला, सर्वात गहन सत्ये अगदी सोप्या भाषेत मांडलेली आढळतात. (मत्त. अध्या. ५-७) येशूने दिलेले हे प्रवचन ऐकणारा लोक समुदाय, ‘त्याच्या शिक्षणावरून थक्क झाला.’ नंतर मग, येशूला पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना त्याचे बोलणे ऐकल्यावर राहावले नाही. ते म्हणाले: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” (मत्त. ७:२८, २९; योहा. ७:४६) लोकांना सत्याची खातरी पटवून देण्याकरता मोठमोठ्या व कठीण शब्दांचा उपयोग करण्याची गरज नाही किंवा जसा कापूस पिंजून पिंजून सुटा केला जातो तसे कोणतेही उदाहरण अगदीच सविस्तर सांगण्याची गरज नाही. ओळखीच्या शब्दांचा, वाक्यांचा उपयोग करून आपण स्पष्ट शब्दांत सत्य समजावून सांगू शकतो.
३. काही प्रचारकांना, खूप माहिती देण्याचा मोह का होऊ शकतो, व आपण हा मोह कसा टाळू शकतो?
३ एका वेळी किती शिकवायचे हे ठरवा: येशूने ज्या लोकांना शिकवले त्यांच्या आकलन शक्तीनुसार त्यांना एका वेळी किती माहिती द्यायची हे ठरवले. (योहा. १६:१२) आपणही नातेवाईकांना, नव्याने आवड दाखवणाऱ्यांना किंवा मुलांना त्यांची आकलन शक्ती ओळखून त्यानुसार माहिती दिली पाहिजे. ते आपले बोलणे लक्ष देऊन ऐकत असले तरीसुद्धा आपण त्यांना एका वेळी खूप माहिती देण्याची गरज नाही. कारण, यहोवाविषयी खरोखरच शिकू इच्छिणारे प्रामाणिक मनाचे लोक यहोवाविषयीचे ज्ञान घेण्याचे मधेच थांबवणार नाहीत.—योहा. १७:३; १ करिंथ. ३:६.
४. अनावश्यक माहिती देण्यापेक्षा मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे का फायदेकारक आहे?
४ मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा: येशूने लोकांना शिकवले तेव्हा त्याने त्यांना अनावश्यक माहिती दिली नाही. ‘कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील,’ असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा तिथे त्याने, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पुनरुत्थानांची अतिरिक्त माहिती देऊन आपली शिकवण आणखी क्लिष्ट बनवली नाही. (योहा. ५:२८, २९) बायबल अभ्यास घेताना आपणही, मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे व पुस्तकात नसलेली अतिरिक्त व अनावश्यक माहिती सांगण्याचा मोह टाळला पाहिजे.
५. साध्या व सरळ पद्धतीने शिकवल्याने आपण कोणता आनंद अनुभवू शकू?
५ आपल्याला हवी असलेली सर्व माहिती यहोवाने साध्या व सरळ पद्धतीने शिकवल्याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! (मत्त. ११:२५) आपणही यहोवाचे अनुकरण करून असेच शिकवू या आणि फलदायक सेवेचा आनंद लुटू या.