शिकवण्याची कला सुधारण्याचे तीन मंत्र
१. शिकवण्याची कला सुधारण्याचा आपण प्रयत्न का केला पाहिजे?
१ यहोवाचे सर्व साक्षीदार शिक्षक आहेत. आपण पहिल्यांदाच एखाद्याला भेटत असलो, एखाद्याची पुनर्भेट घेत असलो किंवा बायबल अभ्यास चालवत असलो, तरी आपण इतरांना माहिती देत असतो. आणि आपण जी माहिती लोकांना शिकवतो, ती साधी-सुधी नाही. आपण लोकांना “पवित्र शास्त्राची माहिती” देत आहोत व या माहितीमुळे ते “तारणासाठी ज्ञानी” होतात. (२ तीम. ३:१५) किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! तेव्हा, शिकवण्याची कला सुधारण्याचे तीन मंत्र खाली सुचवण्यात आले आहेत.
२. आपण साध्या-सुध्या शब्दांत कसे शिकवू शकतो?
२ साधेपणा: आपल्याला एखादा विषय चांगल्या प्रकारे समजतो तेव्हा तो आपल्याला सोपा वाटतो. पण ज्यांना तो समजलेला नसतो त्यांना अवघड वाटू शकतो, या गोष्टीचा आपल्याला कधीकधी विसर पडतो. त्यामुळे, तुम्ही जेव्हा एखाद्याचा बायबल अभ्यास घेत असता तेव्हा त्याला अनावश्यक माहिती देऊन गोंधळात पाडू नका. त्याऐवजी, फक्त जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांवर जोर द्या. खूप बोलल्याने आपण चांगले शिक्षक बनत नाही. (नीति. १०:१९) अभ्यास घेत असताना, सहसा बायबलची फक्त मुख्य वचने वाचणे सर्वात चांगले. वचन वाचल्यानंतर, ज्या मुद्द्यावर चर्चा चालली आहे त्याजशी संबंधित असलेल्या वचनातल्या मजकूरावर चर्चा करा. मत्तयाच्या ५ ते ७ अध्यायांत सांगितलेल्या डोंगरावरील प्रवचनात अतिशय गहन सत्ये आहेत. तरीपण येशूने ते साध्या-सुध्या व मोजक्याच शब्दांत शिकवले.
३. उदाहरणांचा काय उपयोग आहे व कोणत्या प्रकारची उदाहरणे सहसा प्रभावी ठरू शकतात?
३ उदाहरणे: उदाहरणांमुळे विचारांना चालना मिळते, भावना जागृत होतात व सांगितलेली गोष्ट लक्षात राहते. पण, जे लोक खूप बोलतात फक्त त्यांनाच चांगली उदाहरणे देता येतात, असा समज करून घेऊ नका. येशूने दिलेली बहुतेक उदाहरणे संक्षिप्त व समजायला सोपी होती. (मत्त. ७:३-५; १८:२-४) कधीकधी तर, तुम्ही कागदावर चित्रे काढूनसुद्धा शिकवू शकता. अभ्यासाच्या आधी तुम्ही जर थोडा विचार केलात तर तुम्हीदेखील प्रभावी उदाहरणे देऊ शकाल.
४. आपण प्रश्नांचा प्रभावीपणे उपयोग कसा करू शकतो?
४ प्रश्न: तुमच्या बायबल विद्यार्थ्याला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा त्याला विचार करणे भाग पडते. त्यामुळे प्रश्न विचारल्यावर थोडा वेळ थांबा. प्रश्न विचारल्यावर तुम्हीच उत्तर दिले, तर तुमच्या विद्यार्थ्याला तो शिकत असलेली गोष्ट समजली आहे किंवा नाही, हे तुम्हाला समजणार नाही. त्याने चुकीचे उत्तर दिले तर नुसतेच बरोबर उत्तर सांगण्याऐवजी, त्याला आणखी प्रश्न विचारा जेणेकरून तो स्वतःहूनच बरोबर उत्तर देऊ शकेल. (मत्त. १७:२४-२७) अर्थात आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण शिक्षक नाही. त्यामुळे आपण आपल्या शिकवण्याकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे, असे बायबल आपल्याला उत्तेजन देते. असे केल्याने आपल्याला आणि जे आपले ऐकतात त्यांना सदासर्वकाळासाठी फायदे मिळत राहतील.—१ तीम. ४:१६.