“देवाचे प्रेम” या पुस्तकाचा बायबल अभ्यासासाठी उपयोग
१. “देवाचे प्रेम” या पुस्तकाचा उद्देश काय आहे?
१ “देवाच्या प्रेमात टिकून राहा” हे नवीन पुस्तक आपल्याला मिळाले तेव्हा आपल्याला किती आनंद झाला होता, नाही का? हे पुस्तक बायबलच्या मूलभूत शिकवणी देण्यासाठी नव्हे तर वर्तनाविषयी यहोवाचे दर्जे माहीत करून घेऊन त्यांची आवड बाळगण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आपण हे पुस्तक घरोघरच्या कार्यात देणार नाही.
२. हे पुस्तक कसे व कोणासाठी उपयोगात आणले जाईल?
२ बायबल विद्यार्थ्यासोबत बायबल काय शिकवते या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासासाठी दुसरे पुस्तक म्हणून आपण “देवाचे प्रेम” हे पुस्तक वापरणार आहोत. लोकांचा आध्यात्मिक प्रगती करण्याचा वेग कमी जास्त असतो हे ध्यानात ठेवा. प्रत्येक अभ्यास, विद्यार्थ्याच्या गतीनुसार घेतला पाहिजे. अभ्यास केला जाणारा भाग विद्यार्थ्याला योग्य रितीने समजला आहे याची खातरी करा. हे पुस्तक अशा लोकांसाठी वापरू नका ज्यांचा पूर्वी इतर अनेक पुस्तकांतून अभ्यास झाला आहे पण ते सभांना येत नाहीत व स्वतःच्या जीवनात बायबल सत्यानुसार बदल करत नाहीत.
३. जर आपण सध्या देवाची उपासना या पुस्तकातून अभ्यास घेत असू तर आपण काय केले पाहिजे?
३ जर तुम्ही एखाद्यासोबत देवाची उपासना या पुस्तकातून अभ्यास करत असाल व शेवटचे काही अध्याय राहिले असतील तर तुम्ही ते पुस्तक पूर्ण करू शकता आणि “देवाचे प्रेम” हे पुस्तक तुमच्या बायबल विद्यार्थ्याला वैयक्तिक रित्या वाचायला सांगू शकता. पण जर देवाची उपासना या पुस्तकातून अभ्यास नुकताच सुरू झाला असेल तर तो थांबवून “देवाचे प्रेम” या पुस्तकाचा पहिल्यापासून अभ्यास सुरू करणेच उत्तम ठरेल. बायबल काय शिकवते या पुस्तकाच्या बाबतीत होते त्याप्रमाणेच या नव्या पुस्तकातील परिशिष्टातील विषयांची चर्चा करणे आवश्यक आहे किंवा नाही हे ठरवणे तुमच्यावर आहे.
४. बायबल काय शिकवते व “देवाचे प्रेम” या दोन्ही पुस्तकांचा अभ्यास संपण्याआधीच आपल्या विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाल्यास आपण काय करू शकतो?
४ जरी एखाद्या विद्यार्थ्याचा दोन्ही पुस्तके संपायच्या आधीच बाप्तिस्मा झाला तरी “देवाचे प्रेम” या पुस्तकाचा अभ्यास तुम्ही चालू ठेवू शकता. विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झालेला असला तरी तुम्ही अभ्यासाचा तास, पुनर्भेट व अभ्यास मोजू शकता. तुमच्यासोबत येऊन अभ्यासात भाग घेणारा प्रचारकसुद्धा तास मोजू शकतो.
५. प्रचार कार्यात अक्रियाशील बनलेल्या प्रचारकांना मदत करण्याकरता “देवाचे प्रेम” या पुस्तकाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो?
५ तुम्हाला मंडळीच्या सेवा समितीने प्रचार कार्यात अक्रियाशील बनलेल्या एखाद्या सदस्यासोबत बायबल अभ्यास करण्यासाठी नेमले असेल, तर “देवाचे प्रेम” या पुस्तकातील काही खास अध्यायांचा अभ्यास घेण्यास कदाचित तुम्हाला सांगितले जाईल. असे अभ्यास दीर्घकाळापर्यंत घेण्याची गरज नाही. देवाच्या प्रेमात टिकून राहण्यासाठी तयार करण्यात आलेले हे नवीन पुस्तक आपल्यासाठी खरोखरच किती छान तरतूद आहे, नाही का?—यहू. २१.