नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
खऱ्या उपासनेचा कडाडून विरोध करणाऱ्यांविरुद्ध ठामपणे उभे राहणे कसे शक्य आहे? या अभक्त जगात आपल्याला पुन्हा मागे ओढण्यासाठी सैतान करत असलेल्या अविरत प्रयत्नांना आपण कशा प्रकारे हाणून पाडू शकतो? सन २००९ सेवा वर्षाच्या विभागीय संमेलन कार्यक्रमात या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली जातील. विभागीय संमेलनाचा विषय आहे: ‘बऱ्याने वाइटाला जिंकत राहा.’ (रोम. १२:२१) संमेलनाच्या कार्यक्रमात आणखी काय काय आहे ते पाहूया.
आपले प्रांतीय पर्यवेक्षक, “बऱ्याने वाइटाला जिंकण्यास सज्ज,” “फाजील आत्मविश्वास बाळगण्यापासून सावधान!,” “सर्व दुष्टाईचा लवकरच अंत!,” आणि “जगावर विजय मिळवण्याकरता आपला विश्वास पक्का करणे” या विषयांवर भाषण देतील. आपले विभागीय पर्यवेक्षक, रोमकर १३:११-१३ वचनांवर आधारित “जागे होण्याची हीच वेळ आहे!” आणि नीतिसूत्रे २४:१० वर आधारित “संकटकाली तुमचे धर्य खचवू नका,” ही भाषणे सादर करतील. “विभागाच्या गरजांकडे लक्ष देणे” या विभागीय पर्यवेक्षकांच्या भाषणाची देखील आपण आतुरतेने वाट पाहतो. “पायनियरींग करून तुम्ही ‘सेवेत तत्पर’ असू शकाल का?” असे शीर्षक असलेले भाषण देखील खूप उत्तेजनदायक असेल. दोन परिसंवादांतील पहिल्या परिसंवादाचा विषय, “सैतानाच्या डावपेचांविरुद्ध ठामपणे उभे राहा,” हा असेल. तंत्रज्ञान, मनोरंजन व शिक्षण या क्षेत्रांत, दियाबल वापरत असलेले धूर्त डावपेच ओळखून ते आपण कसे टाळू शकतो, हे या भाषणात दाखवले जाईल. “या दुष्ट दिवसांत प्रतिकार करण्याकरता सामर्थ्य मिळवा,” असे शीर्षक असलेल्या दुसऱ्या परिसंवादात, इफिसकर ६:१०-१८ मधील ईश्वरप्रेरित सल्ला आपण पूर्णार्थाने कसा लागू करू शकतो, हे दाखवले जाईल.
सैतानावर विजय मिळवणे आणि राज्य संदेशाचा प्रचार करणे यांत थेट संबंध आहे. (प्रकटी. १२:१७) म्हणूनच तर यहोवाच्या साक्षीदारांवर हल्ले करण्यास सैतान थकत नाही! (यश. ४३:१०, १२) परंतु आपण ‘बऱ्याने वाइटाला जिंकण्याचा’ चंगच बांधला असल्यामुळे दियाबल तोंडावर पडणार आहे. या विभागीय संमेलनाच्या चारही सत्रांतून पुरेपूर फायदा घेण्यासाठी आतापासूनच निश्चित योजना करायला लागा.