सेवेतला आवेश आपण टिकवून ठेवला पाहिजे
१ संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांनी १९९२ पासून दरवर्षी प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्यात शंभर कोटी पेक्षा अधिक तास खर्च केले. इतक्या अद्भुत कार्यसिद्धीत आपलाही खारीचा वाटा होता म्हणून आपल्याला किती आनंद होतो!—मत्त. २८:१९, २०.
२ अर्थातच, या ‘कठीण दिवसांत’ सेवेमध्ये आपल्याला टिकवून ठेवल्याबद्दल आपण यहोवाचे आभार मानतो व त्याची स्तुती करतो. (२ तीम. ३:१) या महत्त्वपूर्ण कार्यात आवेशाने भाग घेत राहण्यासाठी आपण काय करणे आवश्यक आहे?
३ आवेशाचे कारण: देव आणि शेजारी यांच्याबद्दल आपल्याला असलेले गहिरे प्रेम तसेच आपण केलेल्या समर्पणानुसार जगण्याची आपली मनापासूनची इच्छा या दोन कारणांमुळे आपण राज्य सेवेत आवेशाने भाग घेण्यास प्रवृत्त होतो. (मत्त. २२:३७-३९; १ योहा. ५:३) हे प्रेम आपल्याला, प्रचार कार्यात पूर्ण सहभाग घेता यावा म्हणून त्याग करण्यास प्रवृत्त करते.—लूक ९:२३.
४ आवेश टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा: सेवेतला आपला आवेश कमकुवत करण्यासाठी दियाबल सैतान त्याच्यापरीने सर्व प्रयत्न करून पाहत आहे. आपल्या क्षेत्रातील लोकांची अनास्था, या जगातील आकर्षणे, दैनंदिन जीवनातील दबाव आणि आपले ढासळत चाललेले आरोग्य या काही गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग सैतान आपल्याला निराश करण्यासाठी करतो.
५ यास्तव, आपला आवेश जिवंत ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जी “पहिली प्रीति” होती ती आपण वाढवणे महत्त्वाचे आहे. पहिली प्रीती वाढवण्यामध्ये, देवाच्या वचनाचे वाचन, मनन आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकडून’ येणाऱ्या सर्व आध्यात्मिक तरतुदींचा फायदा करून घेणे, या गोष्टींचा समावेश आहे.—प्रकटी. २:४; मत्त. २४:४५; स्तो. ११९:९७.
६ बायबल भविष्यवाणींवरून स्पष्ट दिसून येते, की यहोवाचा दिवस अतिशय वेगाने येत आहे. यात अभक्त लोकांचा नाश केला जाईल. (२ पेत्र २:३; ३:१०) हे ध्यानात ठेवून आपण सेवेतला आपला आवेश टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करूया आणि संपूर्ण जगभरात होणाऱ्या राज्य प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कामात पूर्ण सहभाग घेऊ या.