आपली राज्य आशा आपण इतरांनाही सांगतो
१ या शेवटल्या कठीण दिवसांत जगातील अनेक लोक आशाहीन आहेत. (इफिस. २:१२) इतर जण भौतिक संपत्ती, मानवी शासक, आधुनिक विज्ञान, वगैरेंवर भरवसा ठेवतात जे योग्य नाही. पण आपल्याला भवितव्याची एक आशा असल्यामुळे आपण किती आनंदी आहोत! ही आशा “जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ” आहे.—इब्री ६:१९.
२ देवाच्या राज्य शासनात, पृथ्वीचे नंदनवनात रूपांतर होईल. मृत प्रिय जनांचे पुनरुत्थान केले जाईल. (प्रे. कृत्ये २४:१५) गरिबी, अन्याय, आजारपण, म्हातारपण, आणि मृत्यूला नाहीसे केले जाईल. (स्तो. ९:१८; मत्त. १२:२०, २१; प्रकटी. २१:३, ४) ही यहोवाने दिलेली काही वचने आहेत जी लवकरच पूर्ण केली जातील. आपल्याला असलेल्या आशेपैकी कोणत्या एका विशिष्ट आशेची तुम्ही आतुरतेने वाट पाहात आहात?
३ सुवार्तेचा प्रचार: आपल्याला असलेली राज्य आशा आपण आपल्यापुरतीच ठेवू नये. देवाबद्दल आणि शेजाऱ्यांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आपण येशूचे अनुकरण करण्यास व ‘दीनास सुवार्ता सांगण्यास . . . धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करण्यास, ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावयास,’ प्रवृत्त होतो. (लूक ४:१८) प्रेषित पौलाने बाजारपेठेत आणि जेथे कोठे लोक भेटतील तेथे सुवार्तेचा प्रचार केला. तो देवाचे वचन सांगण्यात गढून गेला होता. (प्रे. कृत्ये १८:५) सेवेमध्ये आवेशाने भाग घेण्याच्या बाबतीत त्याचे अनुकरण केल्यास, “प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ” यांच्यामुळे आपली ख्रिस्ती आशा धुसर होणार नाही.—मार्क ४:१९.
४ आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करणारे, राज्य संदेशात वरवर आस्था दाखवणारे किंवा आपला उघडपणे विरोध करणारे लोक जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपली आशा धुसर होत नाही. ‘आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरून’ ठेवतो. (इब्री १०:२३) आपल्याला “सुवार्तेची लाज वाटत नाही.” (रोम. १:१६) आपल्या बोलण्यातील ठामपणा व चिकाटी पाहून कदाचित काही जण आपला संदेश ऐकण्यास प्रवृत्त होतील.
५ बायबल भविष्यवाणीची पूर्ती करणाऱ्या जगाच्या ढासळत चाललेल्या परिस्थितीकडे आपण लोकांचे लक्ष वेधून उचित कार्य करत असलो तरी आपण विनाशाचे प्रचारक नाही. तर, आपली सेवा राज्य आशेवर केंद्रित आहे—देवाच्या राज्याच्या सुवार्तेवर केंद्रित आहे. तेव्हा, आपण ही सुवार्ता पूर्ण खात्रीने व आवेशाने प्रचार करूया जेणेकरून आपण ‘आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करू शकू.’—इब्री ६:११.