ज्ञान्यांसारखे चाला
१ येशूने जेव्हा चार कोळ्यांना त्याचे अनुयायी होण्याचे आमंत्रण दिले तेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय लांबणीवर टाकला नाही तर “लागलेच ते . . . त्याला अनुसरले.” (मत्त. ४:१८-२२) तार्ससच्या शौलाने सुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर व त्याला पुन्हा दृष्टी मिळाल्यानंतर उशीर लावला नाही तर “लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली.” (प्रे. कृत्ये ९:२०) वेळ कधी कोणासाठी थांबत नसते; आणि एकदा वेळ सरली की ती कायमचीच सरते. यास्तव आपण आपल्या वेळेचा उपयोग कसा करतो याबाबतीत ‘ज्ञान्यासारखे चालणे’ महत्त्वाचे आहे.—इफिस. ५:१५, १६.
२ समय व प्रसंग: यहोवाची सेवा करण्याची आज आपल्याजवळ असलेली संधी कदाचित उद्या राहणार नाही. (याको. ४:१४) “समय व प्रसंग” यातून कोणीच सुटलेला नाही. (उप. ९:११, पं.र.भा.) शिवाय, आपण सर्व वृद्धावस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. या सद्य व्यवस्थीकरणात आपण, वृद्धावस्थेसोबत येणारे “अनिष्ट दिवस” आणि आपल्या हालचालींतील मर्यादा टाळू शकत नाही अर्थात पूर्वीसारख्या आवेशाने आपण यहोवाची सेवा करू शकत नाही. (उप. १२:१) यास्तव, देवाला आपले जीवन समर्पित करण्याचे लांबणीवर टाकण्यात किंवा सध्या शक्य आहे तितक्या प्रमाणात ख्रिस्ती सेवा वाढवण्याची योग्य संधी मिळेपर्यंत थांबण्यात सुज्ञपणा नाही. (लूक ९:५९-६२) अब्राहामाला त्याच्या आयुष्याच्या उतारवयात शांतचित्त लाभले. त्याने आपले संपूर्ण जीवन यहोवाच्या सेवेसाठी सुज्ञपणे वाहिल्यामुळे तो “चांगला म्हातारा होऊन मरण पावला.”—उत्प. २५:८.
३ वेळही कमी उरला आहे: “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे,” म्हणून देखील आपण आपला वेळ सुज्ञपणे खर्च करू इच्छितो. (१ करिंथ. ७:२९-३१) लवकरच या जुन्या व्यवस्थीकरणाचा नाश होणार आहे. ‘पृथ्वीच्या पीकाच्या कापणीदरम्यान’ मेंढरासमान लोकांना एकत्र करण्याच्या महान कार्यात भाग घेण्याच्या संधी देखील बंद होतील. (प्रकटी. १४:१५) सेवेमध्ये उपयोगी पडू शकणारा वेळ जीवनाच्या चिंतांमध्ये व विकर्षणांमध्ये आपण वाया घालवत नाहीत, याची आपण खबरदारी बाळगली पाहिजे. (लूक २१:३४, ३५) अंत आल्यावर, आपण कापणीच्या हंगामात सक्रिय होतो, याची जेव्हा आपल्याला आठवण होईल, तेव्हा आपल्याला किती समाधान वाटेल!
४ आपल्याला मिळणारे सेवेचे विशेषाधिकार आपण चुकवत तर नाही, याबाबतीत आपण सतर्क राहिले पाहिजे. “जोपर्यंत ‘आज’ म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत” यहोवाची सेवा करण्याचा आपण आपल्या परीने होता होईल तितका प्रयत्न करण्याचा निश्चय करू या. (इब्री ३:१३) असे केल्याने आपण दाखवून देऊ की आपण खरोखरच ‘ज्ञान्यासारखे चालत’ आहोत; कारण, “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहा. २:१७.