वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 ऑक्टोबर पृ. २४-२८
  • आपली आशा नेहमी डोळ्यांसमोर ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपली आशा नेहमी डोळ्यांसमोर ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपली आशा नांगरासारखी आहे
  • आपली आशा सैनिकाच्या टोपासारखी आहे
  • आपली आशा पक्की करा
  • आपल्या आशेमुळे आनंदी राहा
  • आशेने यहोवाची प्रतीक्षा करा व धैर्यवान व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • निराश न होता आपल्या आशेबद्दल आनंदी असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • २०२३ नव्या आशेचं वर्ष​—बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 ऑक्टोबर पृ. २४-२८

अभ्यास लेख ४४

आपली आशा कायम डोळ्यांसमोर ठेवा

“यहोवावर आशा ठेव.”​—स्तो. २७:१४.

गीत २४ ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

सारांशa

१. यहोवाने आपल्याला कोणती आशा दिली आहे?

यहोवाने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाची एक अद्‌भुत आशा दिली आहे. काही जणांना स्वर्गात अमर जीवनाची आशा आहे. (१ करिंथ. १५:५०, ५३) पण बहुतेक जणांना पृथ्वीवर कायमचं निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची आशा आहे. (प्रकटी. २१:३, ४) आपली आशा कुठलीही असो, स्वर्गातली किंवा पृथ्वीवरची, ती आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे.

२. आपली आशा कशावर आधारलेली आहे, आणि आपण असं का म्हणू शकतो?

२ “आशा” यासाठी बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या शब्दाचा अर्थ “पुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची अपेक्षा” असा होऊ शकतो. भविष्याबद्दलच्या आशेची आपल्याला पक्की खातरी आहे, कारण ती स्वतः यहोवाने आपल्याला दिली आहे. (रोम. १५:१३) त्याने आपल्याला काय वचन दिलंय हे आपल्याला माहीत आहे. आणि दिलेलं वचन तो नेहमी पूर्ण करतो हेही आपल्याला माहीत आहे. (गण. २३:१९) तसंच, आपल्याला याचीही खातरी आहे, की त्याने जे वचन दिलंय, ते पूर्ण करायची इच्छा आणि ताकदही त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपली ही आशा एक सुंदर कल्पना किंवा स्वप्न नाही, तर ती पुराव्यांवर आणि वस्तुस्थितीवर आधारलेली आहे.

३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत? (स्तोत्र २७:१४)

३ आपल्या स्वर्गीय पित्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण त्याच्यावर भरवसा ठेवावा असं त्याला वाटतं. (स्तोत्र २७:१४ वाचा.) यहोवावर आपली आशा पक्की असेल, तर आपल्याला परीक्षांना धीराने तोंड देता येईल आणि धैर्याने आणि आनंदाने भविष्याचा सामना करता येईल. तर चला, आशेमुळे आपलं कसं संरक्षण होतं, ते आपण पाहू या. त्यासाठी सगळ्यात आधी आपण आपली आशा जहाजाच्या नांगरासारखी आणि सैनिक संरक्षणासाठी घालत असलेल्या टोपासारखी कशी आहे, ते पाहू या. आणि मग आपण आपली आशा आणखी पक्की कशी करू शकतो यावर चर्चा करू या.

आपली आशा नांगरासारखी आहे

४. आपली आशा एका नांगरासारखी कशी आहे? (इब्री लोकांना ६:१९)

४ इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलने आपल्या आशेची तुलना जहाजाच्या नांगरासोबत केली. (इब्री लोकांना ६:१९ वाचा.) प्रेषित पौलने बऱ्‍याच वेळा समुद्रातून प्रवास केला. त्यामुळे जहाजाला स्थिर ठेवण्यासाठी नांगराचा वापर किती महत्त्वाचा आहे हे त्याला माहीत होतं. एकदा तो असंच जहाजातून प्रवास करत असताना समुद्रात एक मोठं वादळ आलं. त्या वेळी त्याने पाहिलं की जहाज खडकावर आदळून फुटू नये म्हणून खलाशी समुद्रात नांगर टाकत आहेत. (प्रे. कार्यं २७:२९, ३९-४१) ज्याप्रमाणे नांगर जहाजाला स्थिर राहायला मदत करतं, त्याचप्रमाणे आपली आशा आपल्याला स्थिर राहायला मदत करते. जीवनात वादळासारख्या समस्या येतात तेव्हा आपण यहोवापासून भरकटून जाऊ नये तर त्याच्या जवळ राहावं म्हणून ही आशा आपल्याला मदत करते. पुढे सगळं काही ठीक होईल अशी खातरी असल्यामुळे समस्यांमध्येही मन शांत ठेवायला आशा आपल्याला मदत करते. लक्षात असू द्या, येशूनेही सांगितलं होतं की आपला छळ केला जाईल. (योहा. १५:२०) त्यामुळे भविष्यासाठी यहोवाने जे अभिवचन दिलंय त्यावर मनन केलं तर धीराने यहोवाची सेवा करत राहायला आपल्याला मदत होईल.

५. आपण मरणार आहोत हे माहीत असतानासुद्धा आशेमुळे येशूला स्थिर राहायला कशी मदत झाली?

५ आपल्याला पुढे वेदनादायक मृत्यू सहन करावा लागणार आहे हे माहीत असतानासुद्धा विश्‍वासात स्थिर राहायला येशूला आशेमुळे कशी मदत झाली त्याचा विचार करा. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्रने स्तोत्र पुस्तकातल्या एका भविष्यवाणीचा उल्लेख केला. त्या भविष्यवाणीत येशू जणू म्हणत होता: “मी आशा बाळगीन. कारण तू मला कबरेत सोडून देणार नाहीस आणि तुझ्या एकनिष्ठ सेवकाचं शरीर तू कुजू देणार नाहीस . . . आणि तुझ्या सहवासात तू माझं मन खूप आनंदाने भरून टाकशील.” (प्रे. कार्यं २:२५-२८; स्तो. १६:८-११) या भविष्यवाणीतून त्या कठीण परिस्थितीत येशूचं मन किती स्थिर होतं आणि त्याचा आत्मविश्‍वास किती भक्कम होता, हे दिसून येतं. आपण मरणार आहोत, हे येशूला माहीत होतं. पण त्यासोबतच, देव आपल्याला पुन्हा जिवंत करेल आणि स्वर्गातल्या आपल्या पित्यासोबत आपण पुन्हा असू या गोष्टीची त्याला पक्की आशा होती.​—इब्री १२:२, ३.

६. आशेबद्दल एका भावाने काय म्हटलं?

६ आपल्या बऱ्‍याच भाऊबहिणींना ख्रिस्ती आशेमुळे समस्यांमध्ये टिकून राहायला मदत झाली आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान इंग्लंडमध्ये राहणाऱ्‍या लेनर्ड चीन नावाच्या एका विश्‍वासू भावाचंच उदाहरण घ्या. लष्करात भरती व्हायला नकार दिल्यामुळे त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याला दोन महिने अंधारकोठडीत टाकण्यात आलं. आणि त्यानंतर सक्‍तमजुरीची शिक्षा देण्यात आली. याबद्दल त्याने नंतर असं लिहीलं: “या अनुभवातून कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आशेचं काय महत्त्व आहे, हे मी शिकलो. आपल्यासमोर येशूचं, प्रेषितांचं आणि संदेष्ट्यांचं उदाहरण आहे. तसंच आपल्याकडे बायबलची सुंदर अभिवचनंसुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे भविष्याची एक पक्की आशा आणि समस्येचा सामना करायची ताकदही आपल्याला मिळते.” लेनर्डसाठी त्याची आशा एका नांगरासारखी होती. आणि आपल्यासाठीसुद्धा ती एका नांगरासारखीच असू शकते.

७. परीक्षांमुळे आपली आशा आणखी पक्की कशी होते? (रोमकर ५:३-५; याकोब १:१२)

७ आपण पहिल्यांदा सत्य स्वीकारलं तेव्हा आपल्याला एक आशा मिळाली. पण आपण जेव्हा परीक्षांचा सामना करतो आणि यहोवाची मदत अनुभवतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्याला यहोवाची स्वीकृती आहे. आणि या गोष्टीमुळे आपली आशा आणखी पक्की होते. (रोमकर ५:३-५; याकोब १:१२ वाचा.) सैतानाला वाटतं की आपण आपल्या समस्यांमुळे खचून जावं. पण यहोवाच्या मदतीने आपण प्रत्येक समस्येचा सामना धीराने करू शकतो.

आपली आशा सैनिकाच्या टोपासारखी आहे

८. आपली आशा सैनिकाच्या टोपासारखी कशी आहे? (१ थेस्सलनीकाकर ५:८)

८ बायबलमध्ये आपल्या आशेची तुलना सैनिकाच्या टोपासोबतसुद्धा केली आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:८ वाचा.) युद्धात शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सैनिक आपल्या डोक्यावर टोप घालायचे. आपणही एका अर्थाने सैतानाविरुद्ध युद्धच लढत आहोत. आणि सैतानाच्या हल्ल्यापासून आपण आपल्या डोक्याचं, म्हणजेच आपल्या विचारांचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. आपली विचारसरणी दूषित करण्यासाठी तो आपल्यावर अनेक प्रलोभनं आणतो आणि जगातल्या वेगवेगळ्या विचारसरणींचा आपल्यावर भडिमार करतो. सैनिकाचा टोप जसं त्याच्या डोक्याचं संरक्षण करतो, तसंच आपली आशासुद्धा आपल्या विचारांचं संरक्षण करते आणि त्यामुळे आपल्याला यहोवाला विश्‍वासू राहणं शक्य होतं.

९. भविष्याची आशा नसली तर काय होतं?

९ आपण जर नेहमी सर्वकाळच्या जीवनावर विचार करत राहिलो, तर आपल्याला योग्य निर्णय घ्यायला आणि योग्य गोष्टींवर विचार करायला मदत होईल. याउलट आपण जर या आशेवर विचार करत राहिलो नाही, तर आपण स्वतःच्याच इच्छा पूर्ण करत राहू आणि यहोवाने जे सुंदर अभिवचन दिलंय, त्याचा आपल्याला विसर पडेल. प्राचीन करिंथमध्ये राहणाऱ्‍या काही ख्रिश्‍चनांचाच विचार करा. देवाने दिलेल्या एका महत्त्वाच्या अभिवचनाचा, म्हणजे पुनरुत्थानाच्या आशेवरचा त्यांचा विश्‍वास उडाला होता. (१ करिंथ. १५:१२) ज्यांना भविष्याच्या जीवनाची आशा नाही, ते फक्‍त आजच्यापुरतं जगतात असा तर्क पौलने त्यांच्यापुढे मांडला. (१ करिंथ. १५:३२) आजसुद्धा बरेच जण असे आहेत, ज्यांना देवाच्या अभिवचनांबद्दल माहीत नाही. त्यामुळे ते फक्‍त आजच्यापुरतं जगतात आणि त्यांचं लक्ष फक्‍त मौजमजा करण्याकडे असतं. आपला भरवसा मात्र देवाने जे सुंदर भविष्याचं अभिवचन दिलंय त्यावर आहे. ही आशा एका सैनिकाच्या टोपासारखी आपलं संरक्षण करते. त्यामुळे यहोवासोबतचं आपलं नातं कमकुवत करेल अशी स्वार्थी जीवनशैली टाळायला आणि आपल्या विचारांचं संरक्षण करायला आपल्याला मदत होते.​—१ करिंथ. १५:३३, ३४.

१०. आपली आशा चुकीच्या विचारसरणीपासून आपलं संरक्षण कसं करते?

१० आपल्याला यहोवाला कधीच खूश करता येणार नाही, अशा विचारांपासूनही आशेचा हा टोप आपलं संरक्षण करतो. उदाहरणार्थ काही जण असा विचार करतील: ‘मला तर सर्वकाळाचं जीवन कधीच मिळणार नाही. मी त्या लायकीचा नाही आणि मला कधीच यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगता येणार नाही.’ ईयोबचं खोटं सांत्वन करायला आलेल्या अलीफजनेसुद्धा ईयोबच्या मनात असाच विचार घालायचा प्रयत्न केला. त्याने म्हटलं: “शेवटी नाशवंत मानव शुद्ध कसा असू शकतो?” आणि पुढे तो देवाबद्दल असं म्हणतो, “बघ, देवाला तर आपल्या स्वर्गदूतांवरही भरवसा नाही, त्याच्या नजरेत आकाशही शुद्ध नाही.” (ईयो. १५:१४, १५) खरंच, किती खोटं होतं हे! हे लक्षात ठेवा की अशा विचारांच्या मागे सैतान आहे. त्याला माहीत आहे, की तुम्ही जर अशाच गोष्टींवर विचार करत राहिला, तर तुमची आशा अंधूक होत जाईल. म्हणून आपण असले खोटे विचार आपल्या मनातून काढून टाकले पाहिजे. आणि यहोवाच्या अभिवचनांवर लक्ष लावलं पाहिजे. आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी यहोवाची इच्छा आहे. आणि ते मिळवण्यासाठी तो आपल्याला मदत करेल, यावर आपण कधीच शंका घेऊ नये.​—१ तीम. २:३, ४.

आपली आशा पक्की करा

११. आपली आशा पूर्ण होण्याची वाट पाहत असताना आपण धीर का धरला पाहिजे?

११ आपली आशा कायम डोळ्यांपुढे ठेवणं नेहमीच सोपं नसतं. कारण देव आपली अभिवचनं पूर्ण करेपर्यंत वाट पाहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की यहोवा सदासर्वकाळापासून जिवंत आहे. आणि वेळेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा खूप वेगळा आहे. (२ पेत्र ३:८, ९) तो अगदी योग्य वेळी आपला उद्देश पूर्ण करेल. पण ती वेळ कदाचित आपल्या अपेक्षेप्रमाणे नसेल. मग देवाची अभिवचनं पूर्ण होण्याची धीराने वाट पाहत असताना आपण आपली आशा कशी मजबूत ठेवू शकतो?​—याको. ५:७, ८.

१२. इब्री लोकांना ११:१, ६ मध्ये सांगितल्याप्रमाणे आशा आणि विश्‍वास यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे?

१२ सर्वकाळाच्या जीवनाची आशा यहोवाने आपल्याला दिली आहे आणि तोच ती पूर्ण करणार आहे. त्यामुळे आपण जर त्याच्या जवळ राहिलो, तर आपली आशा आणखी मजबूत होईल. खरंतर बायबल आपल्याला सांगतं, की आपल्याला जर आपली आशा मजबूत ठेवायची असेल तर यहोवा अस्तित्वात आहे, आणि “त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो” असा विश्‍वास आपण ठेवला पाहिजे. (इब्री लोकांना ११:१, ६ वाचा.) यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती आहे, या गोष्टीवर आपला जितका जास्त विश्‍वास असेल तितकी जास्त आपल्याला या गोष्टीची खातरी होईल, की त्याने दिलेली सगळी अभिवचनं तो नक्की पूर्ण करेल. तर मग, यहोवासोबतचं नातं आपण मजबूत कसं करू शकतो आणि आपली आशा पक्की कशी करू शकतो, याचे काही व्यावहारिक मार्ग आता आपण पाहू या.

प्रार्थना आणि मनन केल्यामुळे आपला विश्‍वास मजबूत होतो (परिच्छेद १३-१५ पाहा)b

१३. आपण यहोवासोबत एक जवळचं नातं कसं जोडू शकतो?

१३ यहोवाला प्रार्थना करा आणि बायबल वाचा.  आपण यहोवाला पाहू शकत नसलो, तरी त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडू शकतो. आपण प्रार्थनेत त्याच्याशी बोलू शकतो आणि तो नक्की ऐकेल अशी खातरी बाळगू शकतो. (यिर्म. २९:११, १२) तसंच, बायबलचं वाचन करून आणि त्यावर मनन करून आपण त्याचं ऐकू शकतो. प्राचीन काळात यहोवाने त्याच्या सेवकांची कशी काळजी घेतली याबद्दल जेव्हा आपण वाचू तेव्हा आपली आशा आणखी पक्की होईल. कारण बायबलमध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी “आपल्याला शिक्षण देण्यासाठी लिहून ठेवण्यात आल्या होत्या. या शास्त्रवचनांमुळे आपल्याला आशा मिळते, कारण ती आपल्याला धीर धरायला मदत करतात आणि सांत्वन देतात.”​—रोम. १५:४.

१४. बायबल अहवालांवर आपण मनन का केलं पाहिजे?

१४ यहोवाने आपली अभिवचनं कशी पूर्ण केली यावर मनन करा.  यहोवाने अब्राहाम आणि सारासाठी काय केलं त्याचा विचार करा. त्यांचं वय झालं होतं आणि त्यामुळे त्यांना मुलं होऊ शकत नव्हती. तरी त्यांना एक मुलगा होईल असं अभिवचन यहोवाने त्यांना दिलं होतं. (उत्प. १८:१०) अब्राहामने या गोष्टीवर विश्‍वास ठेवला का? बायबल म्हणतं, की त्याने “असा विश्‍वास ठेवला की तो पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल.” (रोम. ४:१८) मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर ही अशक्य गोष्ट वाटते. पण यहोवा आपलं अभिवचन नक्की पूर्ण करेल असा विश्‍वास अब्राहामला होता. आणि अब्राहामची मुळीच निराशा झाली नाही. (रोम. ४:१९-२१) बायबलमधले काही अहवाल दाखवून देतात, की यहोवाने दिलेली अभिवचनं कितीही अशक्य वाटत असली तरी तो ती नक्की पूर्ण करेल.

१५. यहोवाने आपल्यासाठी जे काही केलंय त्यावर आपण मनन का केलं पाहिजे?

१५ यहोवाने तुमच्यासाठी काय-काय केलंय त्याचा विचार करा.  यहोवाने त्याच्या वचनात दिलेली अभिवचनं पूर्ण केल्यामुळे तुम्हाला त्याचा कसा फायदा झालाय याचा विचार करा. उदाहरणार्थ, येशूने सांगितलं होतं, की त्याचा पिता आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करेल. (मत्त. ६:३२, ३३) तसंच, येशूने अशी खातरी दिली होती की जर आपण यहोवाकडे त्याची पवित्र शक्‍ती मागितली तर तो ती नक्की आपल्याला देईल. (लूक ११:१३) यहोवाने ही सगळी अभिवचनं पूर्ण केली आहेत. यहोवाने तुमच्यासाठी आणखी कोणती अभिवचनं दिली आहेत याचाही विचार करा. जसं की त्याने तुम्हाला क्षमा करायचं, तुमचं सांत्वन करायचं आणि तुम्हाला आध्यात्मिक अन्‍न पुरवायचं वचन दिलंय. (मत्त. ६:१४; २४:४५; २ करिंथ. १:३) यहोवाने आपल्यासाठी जे काही केलंय त्यावर आपण मनन करतो, तेव्हा भविष्यात तो जे करणार आहे त्यावरची आपली आशा आणखी पक्की होते.

आपल्या आशेमुळे आनंदी राहा

१६. आपल्याला मिळालेली आशा एक मौल्यवान भेट आहे असं का म्हणता येईल?

१६ सर्वकाळाच्या जीवनाची आशा देवाकडून मिळालेली एक मौल्यवान भेट आहे. त्या सुंदर भविष्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. कारण यहोवा आपलं अभिवचन पूर्ण करेल अशी आपल्याला खातरी आहे. ही आशा एका नांगरासारखी  आहे. कारण ती आपल्याला परीक्षांचा सामना करायला, छळात टिकून राहायला आणि मृत्यू समोर असतानाही स्थिर राहायला मदत करते. तसंच ही आशा सैनिकाच्या टोपासारखीसुद्धा  आहे. कारण ती आपल्या विचारांचं संरक्षण करते. आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टी सोडून द्यायला आणि चांगल्या गोष्टी करायला मदत होते. बायबलवर आधारित असलेल्या या आशेमुळे आपल्याला देवासोबत एक जवळचं नातं जोडता येतं. आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हेसुद्धा दिसून येतं. आपली आशा पक्की आणि मजबूत ठेवल्यामुळे आपल्याला नक्कीच खूप फायदा होतो.

१७. आपल्या आशेमुळे आपण आनंद का मानतो?

१७ “आपल्या आशेमुळे आनंदी राहा,” असं उत्तेजन पौलने रोम इथल्या ख्रिश्‍चनांना दिलं. (रोम. १२:१२) पौल आनंदी होता, कारण त्याला माहीत होतं की आपण जर शेवटपर्यंत विश्‍वासू राहिलो तर स्वर्गात आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल. आपणही आपल्या आशेमुळे आनंदी असलं पाहिजे, कारण यहोवा आपलं वचन पूर्ण करेल अशी खातरी आपल्याला आहे. स्तोत्रकर्त्याने म्हटलं, की “जो आपला देव यहोवा याची आशा धरतो, तो सुखी आहे!” कारण ‘तो नेहमी विश्‍वासू राहतो.’​—स्तो. १४६:५, ६.

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपली आशा नक्की पूर्ण होईल याची आपल्याला खातरी का आहे?

  • आपली आशा एका नांगरासारखी आणि सैनिकाच्या टोपासारखी कशी आहे?

  • आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

गीत ५५ चिरकालाचे जीवन!

a यहोवाने आपल्याला भविष्याची एक सुंदर आशा दिली आहे. त्यामुळे आपल्या जीवनाला एक उद्देश मिळालाय. आणि सध्या तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्यांकडे न पाहता आपण भविष्याकडे आशेने पाहू शकतो. शिवाय सध्या कितीही समस्यांचा सामना करावा लागला, तरी या आशेमुळे आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहायचं बळ मिळतं. तसंच, आपल्या मनाला दूषित करणाऱ्‍या विचारांना बळी पडण्यापासून या आशेमुळे आपलं संरक्षण होतं. आपली ख्रिस्ती आशा मजबूत करण्याची ही काही कारणं आहेत. या कारणांबद्दलच आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

b चित्राचं वर्णन: ज्याप्रमाणे टोप एका सैनिकाच्या डोक्याचं रक्षण करतो आणि नांगर जहाजाला स्थिर ठेवतं त्याप्रमाणे आपली आशा आपल्या विचारांचं संरक्षण करते आणि परीक्षेच्या काळात स्थिर राहायला मदत करते. एक बहीण विश्‍वासाने यहोवाला प्रार्थना करत आहे. देवाने अब्राहामला दिलेलं वचन कसं पूर्ण केलं यावर एक भाऊ विचार करत आहे. आणखी एक भाऊ, देवाने आपल्याला दिलेली अभिवचनं कशी पूर्ण केली आहेत यावर विचार करत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा