मंडळीच्या पुस्तक अभ्यास व्यवस्थेचा आपल्याला फायदा कसा होतो?
१. आपल्या आठवड्याच्या पाच सभा आपल्याला कशाप्रकारे मदत करतात?
१ आठवड्याच्या आपल्या पाचही सभा वेगवेगळ्या प्रकारे संचलित केल्या जातात आणि त्यांचा हेतू देखील वेगवेगळा आहे. तरीपण, सर्व सभा महत्त्वाच्या आहेत; कारण त्या आपल्याला एकमेकांना “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देतात. (इब्री १०:२४, २५) मंडळीच्या पुस्तक अभ्यास व्यवस्थेचे काही अनोखे व लाभदायक पैलू कोणते आहेत?
२. पुस्तक अभ्यासात लहान संख्येने एकत्र आल्याचे फायदे कोणते?
२ आध्यात्मिक प्रगती करण्यास साहाय्य: मंडळीच्या इतर सभांच्या तुलनेत, पुस्तक अभ्यासाची उपस्थिती कमी असते. यामुळे, गटातील सर्वांबरोबर मैत्री जोडून आध्यात्मिक साहाय्य देणे सोपे जाते. (नीति. १८:२४) तुम्ही तुमच्या पुस्तक अभ्यास गटातील प्रत्येकाला जवळून ओळखण्याचा प्रयत्न केला आहे का? त्या प्रत्येकाला तुम्ही, तुमच्याबरोबर सेवेत कार्य करायला बोलवता का? पुस्तक अभ्यास व्यवस्थेमुळे पुस्तक अभ्यास संचालकांना गटातील प्रत्येकाची विशिष्ट परिस्थिती समजून घेणे व त्यांना व्यक्तिगत उत्तेजन देणे शक्य होते.—नीति. २७:२३.
३. पुस्तक अभ्यास व्यवस्थेमुळे उत्तर द्यायला आणि बायबल विद्यार्थ्यांना उपस्थित राहायला सोपे का जाते?
३ तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना तुम्ही कधी पुस्तक अभ्यासाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे का? आपल्या मोठ्या सभांना उपस्थित राहायला घाबरत असलेल्या आस्थेवाईक लोकांना, सहसा खासगी घरात होणाऱ्या लहान सभांना येण्यास सहसा भीती वाटणार नाही. पुस्तक अभ्यास गटात असलेल्या प्रेमळ वातावरणामुळे, तरुणांना व नव्याने सभांना उपस्थित राहत असलेल्यांना उत्तरे द्यायला सोपे वाटेल. आणि गट लहान असल्यामुळे आपल्याला देखील अनेकदा उत्तरे देऊन यहोवाची स्तुती करण्याची संधी मिळते.—स्तो. १११:१.
४. पुस्तक अभ्यास व्यवस्था कोणकोणत्या मार्गांनी सोयीस्कर ठरू शकते?
४ पुस्तक अभ्यास सहसा, प्रचारकांना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी होतात. मंडळीतल्या सर्वांनाच त्यांच्या घराजवळच्या पुस्तक अभ्यास गटात नेमले जाणे शक्य नसले तरीसुद्धा, इतर मंडळीच्या सभांसाठी नेहमी जितका प्रवास करावा लागतो कदाचित तितका प्रवास आपल्याला करावा लागत नाही. पुस्तक अभ्यासाचे ठिकाण हे क्षेत्र सेवेच्या सभेसाठीसुद्धा सोयीस्कर ठिकाण असू शकेल.
५. आपल्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांकडून आपण सेवेत मदत कशाप्रकारे प्राप्त करू शकतो?
५ सेवेत जाण्यासाठी मदत: पुस्तक अभ्यास गटातील प्रत्येकजण सेवेमध्ये नियमित, अर्थपूर्ण व आनंदाने भाग घेत आहे किंवा नाही हे जाणण्यास पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक उत्सुक असतात. त्यामुळे ते गटातील प्रत्येकासोबत कार्य करून त्यांना सेवेतील विविध पैलूत व्यक्तिगत मदत देण्याचा प्रयत्न करतात. सेवेतील एखादा पैलू जसे की पुनर्भेटी करणे तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुमच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना याविषयी सांगा. कदाचित ते तुम्हाला गटातील एखाद्या अनुभवी प्रचारकासोबत जाण्यास सांगतील. पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक जेव्हा पुस्तक अभ्यास संचलित करत असतात तेव्हा त्यांच्या शिकवण्याच्या उत्तम पद्धतींकडे नीट लक्ष दिल्याने तुम्हाला, बायबल अभ्यासात शिकवण्याची तुमची कला सुधारण्यास मदत मिळू शकते.—१ करिंथ. ४:१७.
६. पुस्तक अभ्यासाच्या व्यवस्थेतून आपण पुरेपूर फायदा मिळवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?
६ मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची तरतूद खरोखरच किती प्रेमळ व्यवस्था आहे. यहोवाकडून असलेली ही व्यवस्था, आपण राहत असलेल्या कठीण काळात प्रत्येक पाऊल स्थिर ठेवून न अडखळता चालत राहण्यास आपल्याला मदत करते.—स्तो. २६:१२.