नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
२००८ सालच्या सेवा वर्षाच्या खास संमेलन दिवस कार्यक्रमाचे शीर्षक असे आहे: “आपण माती आहोत—यहोवा आपला कुंभार आहे.” हे यशया ६४:८ वर आधारित आहे. या कार्यक्रमाद्वारे दिल्या जाणाऱ्या शास्त्र आधारित सल्ल्यामुळे, आपला महान कुंभार यहोवा याची बुद्धी, न्याय, शक्ती आणि प्रीती यांच्याबद्दलची आपली कदर आणि समज वाढेल.
“सेवेमध्ये मानाची पात्रे म्हणून सेवा करणे,” हे विभागीय पर्यवेक्षकांचे भाषण दाखवून देईल, की अधिकाधिक लोक सत्य जाणल्यामुळे त्यांना मिळालेल्या समृद्ध आशीर्वादाचा आनंद कशाप्रकारे लुटत आहेत व इतरांनाही ते सत्य कशाप्रकारे सांगत आहेत. “मनन केल्याने तुमचे संरक्षण होईल,” असे शीर्षक असलेल्या भाषणात, यहोवाच्या धार्मिक दर्जांचे गंभीरपणे मनन केल्याने आपले संरक्षण कसे होते हे दाखवण्यात येईल. पाहुणा वक्ता श्रोत्यांना: “‘युगाबरोबर समरुप होऊ नका,’” आणि “महान कुंभाराकडून स्वतःला आकार लावून घ्या,” या विषयांवर भाषणे ऐकवतील. “यहोवा ज्यांचा उपयोग करून घेत आहे असे तरुण,” आणि “घडवण्याच्या प्रक्रियेत पालकांची भूमिका,” या भागांतून पालक आणि मुले या दोघांनाही फायदा मिळेल. प्रात्यक्षिके आणि मुलाखतींद्वारे आपण, आपले बंधूभगिनी ख्रिस्ती सेवेद्वारे काय साध्य करत आहेत हे ऐकू व पाहू शकू. पाण्याने बाप्तिस्मा घेऊन जे देवाला आपले जीवन समर्पित करू इच्छितात त्यांनी होता होईल तितक्या लवकर आपली ही इच्छा अध्यक्षीय पर्यवेक्षकांना कळवावी. खास संमेलन दिवस ज्या आठवड्यात येतो त्या आठवड्यातील अभ्यासाचा तुमचा टेहळणी बुरूज नियतकालिकाचा व्यक्तिगत अंक आणायला विसरू नका.
महान कुंभार जे काही उद्देशितो ते तो पूर्ण करतो. पण तो आपल्याला ज्याप्रकारे आकार देतो त्याला आपण प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे. जी व्यक्ती यहोवाच्या दर्जांनुसार जगते व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात बदल होऊ देते ती कुंभाराच्या चाकावरील चिकण मातीसारखी मऊ असते. या व्यक्तीला उपयोगी पात्र बनवण्याकरता आकार दिला जातो, चकाकी आणण्याकरता घासले जाते. आपण जेव्हा यहोवाला सहकार्य देतो तेव्हा आपण त्याच्या सार्वभौमत्त्वाचे गौरव करतो आणि यामुळे आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात.