नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
यहोवा गौरवास पात्र आहे. आपण यहोवाचे गौरव कसे करू शकतो? याबाबतीत काही जणांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे? यहोवाचे गौरव करणाऱ्यांना आज कोणते आशीर्वाद मिळतात? २००८ सेवा वर्षाच्या विभागीय संमेलन कार्यक्रमात या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली जातील. या संमेलनाचा विषय असा आहे: ‘सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा.’ (१ करिंथ. १०:३१) यंदाच्या दोन दिवसांच्या आध्यात्मिक मेजवानीत आपल्यासाठी काय काय वाढून ठेवण्यात आले आहे ते आता आपण पाहूया.
आपले प्रांतीय पर्यवेक्षक “देवाचे गौरव का करावे?” आणि “देवाने घालून दिलेल्या अटी पूर्ण करून उदाहरण मांडा,” या विषयांवर भाषण देतील. ते, “देवाचे गौरव करणारे लोक कोण आहेत?” हे जाहीर भाषण तसेच “संपूर्ण जगभरात देवाचे गौरव एकतेने करणे,” हे समाप्तीचे भाषण देतील. ईश्वरशासित प्रशाला देखील तेच संचालित करतील. विभागीय पर्यवेक्षक, “देवाचे गौरव प्रतिबिंबित करण्यात आनंद माना,” “विभागाच्या गरजांकडे लक्ष देणे,” आणि २ पेत्र १:१२ वर आधारित “‘सत्यात स्थिर’ राहा” या विषयांवर भाषणे देतील. याशिवाय आपण, कशाप्रकारे, “पायनियर सेवा देवाचे गौरव करते” हे पाहणार आहोत. “जीवनातील प्रत्येक पैलूत देवाचे गौरव करणे,” असा विषय असलेल्या दोन विचार-प्रवर्तक परिसंवादांपैकी पहिल्या परिसंवादात १ करिंथकर १०:३१ या वचनातील ईश्वरप्रेरित वचनांचे सखोल परीक्षण केले जाईल. दुसऱ्या परिसंवादाचा विषय आहे: “यहोवाच्या स्तुतीसाठी पवित्र सेवा करणे.” यांत, आपल्या उपासनेच्या विविध पैलूंची चर्चा केली जाईल. आपल्याला टेहळणी बुरूज अभ्यास लेखाचा सारांश तसेच रविवारी सकाळी दैनिक वचनाची चर्चा देखील ऐकायला मिळेल. बाप्तिस्म्यासाठी देखील तेथे संधी असेल.
बहुतांश मानवजात यहोवा हा देव आहे असे कबूल करत नाही. पुष्कळ लोकांना, यहोवाच्या भव्यतेचा विचार करायला वेळ नाही कारण ते त्यांच्या योजनांमध्ये व्यस्त आहेत. (योहा. ५:४४) परंतु ‘सर्व काही देवाच्या गौरवासाठी कसे करायचे’ याचा विचार करण्यासाठी वेळ खर्च करणे किती महत्त्वाचे आहे याची आपल्याला खात्री पटलेली आहे. तेव्हा, चारही सत्रांना उपस्थित राहून त्यांचा पुरेपूर फायदा करून घ्या.